॥ श्रीएकनाथमहाराजकृत
18.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अयोध्याकाण्ड
॥ अध्याय अठरावा ॥
श्रीरामपादुकांसह भरत अयोध्येत येतो
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरत श्रीरामांची क्षमायाचना करतोः
भरते धांवोनि आपण । दृढ धरिले श्रीरामचरण ।
अश्रु चालिले संपूर्ण । तेणे चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥
स्वस्थगात्रस्तु भरतो वाचा संसज्जमानया ।
कृताजलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत ॥१॥
स्वेद रोमांच रवरवित । तेणे सर्वांग डवडवीत ।
हरिखे उत्कंठित जाले चित्त । सद्रदित पै वाचा ॥२॥
विकळ वाचा होवोनि ठायी । विनटोनि श्रीरामाच्या पायी ।
अंजळिपुट जोडोनि पाही । भरत लवलाही विनवित ॥३॥
करोनिया कुशास्तरण । तुजवरी देत होतो प्राण ।
हा माझा अपराध दारूण । क्षमा संपूर्ण करी स्वामी ॥४॥
भूतीं पृथ्वी नांगरून । दाढी घालोनि करिती दहन ।
जीवनेंसहित लाताऊन ॥ कर्दमकंदन जन करिती ॥५॥
तो अपराध धरा न मनून । पाळित्या पोळिल्या देवोनि दिव्यान्न ।
जना सुखी करी संपूर्ण । तैसे आपण क्षमा कीजे ॥६॥
श्रीराम आमची जननी । आम्ही तुझी लेकरें तान्ही ।
माझा अपराध न मानी । म्हणोनि लोटांगणी तुज आलो ॥७॥
तुझे वंदोनि चरण । मी करितो अयोध्यागमन ।
ऐसे बोलोनि करी रुदन । मूर्च्छापन्न तो पडला ॥८॥
श्रीराम भरताचे सांत्वन करितात :
भरताचे प्रेम देखोन । कळवळिला श्रीरघुनंदन ।
धांवोनि उचलिला आपण । समाधान स्वये वदे ॥९॥
आम्ही तुम्ही चवघे जण । एका पिंडाचे उत्पन्न ।
कोणाचा अपराध मानी कोण । वृथा उद्विग्न तू का होसी ॥१०॥
जीभ रगडलिया दांतांबुडी । कोप आलिया कडाडी ।
जीभ तोडी दांत पाडीं । तैसा परवडी आम्हा तुम्हा ॥११॥
टाळी पिटतां हातोहात । दुःख वाटे का सुख होत ।
तैसे तुम्हा आम्हा येथ । एकात्मता अद्भुत आल्हाद ॥१२॥
ऐसे आश्वासून पूर्ण । श्रीरामे दिधले आलिंगन ।
म्हणे भरता अयोध्ये करी गमन । येरे वचन वंदिलें ॥१३॥
रामाज्ञेने अयोध्येला निघालेला भरत रामविरहामुळे पुढे जाऊ शकत नाही :
श्रीरामाज्ञा अतितांतडीं । भरत निघाला लवडसवडी ।
पायी वळलीसे वेंगडी । पडे मुरकुंडी मूर्च्छित ॥१४॥
मन विगुंतलें रामापासी । नयन विगुतलें रामरूपासीं ।
पाय ओढीती रामदर्शनासी । गति भरताशी खुंटली ॥१५॥
वाचा विगुंतली रामरूपासी । श्रवण विगुंतलें रामकीर्तनासी ।
क्रिया विगुंतलीरामभक्तीसी । गति भरताची खुंटली ॥१६॥
प्राण पांगुळला रामापासी । जीव विनटला श्रीरामासी ।
इंद्रियें पारखी जाली त्यासी । गति भरताची खुंटली ॥१७॥
श्रीरामाची अनन्यप्रीती । भरताची अगा स्थिती ।
देखोनि श्रीराम सुखावे चित्ती । काय त्याप्रती बोलत ॥१८॥
भरता ऐके गुह्य गोष्टी । माझे प्रेम तुझ्या पोटी ।
तेचि पोटी कैकेयी खोटी । हृदयी गांठी न धरावी ॥१९॥
मज धाडिलें वनवासासी । सीता पायी धाडीली वनासी ।
हे शल्य अहर्निशी । तुझ्या मानसी सलताहे ॥२०॥
जे हृदयी माझे पूर्ण प्रेम । तेथे नसावा द्वेष विशम ।
ऐसे बोलता श्रीराम । भरत निभ्रम पडे पुढती ॥२१॥
एवं ब्रुवाणं रामं तु वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ।
प्रयच्छ पादुके पुत्र भरताय महात्मने ॥२॥
एवमुवत्वा वसिष्ठेन राघवः प्राड्मुखः स्थितः ।
पादुके हेमविकृते मम राज्याया ते ददौ ॥३॥
रामाज्ञां शिरसि स्थाप्य पादुके भरतस्तदा ।
अयोध्यामेव गच्छामि गृहित्वा पादुके शुभे ॥४॥
वसिष्ठांची युक्ती व रामपादुका भरतास अर्पण :
श्रीरामप्रेमें प्रेमळ । रामविरहे अति व्याकुळ ।
भरत देखोनिया विकळ । तंव वसिष्ठ कृपाळू बोलत ॥२२॥
सांडोनिया श्रीराममूर्ती । भरतासी गमनीं नाही शक्ती ।
देखोनि गुरु कृपायुक्ती । काय रामाप्रती बोलत ॥२३॥
अति आल्हादे अयोध्येप्रती । भरत जाय शीघ्रगती ।
ऐसी श्रीरामा आहे युक्ती । ते त्वा निश्चिती करावी ॥२४॥
तुझ्या पादुका रघुनाथा । ठेवी भरताचिये माथा ।
तेणे जाण आल्हादे तत्वता ॥ अयोध्ये जाता उल्हास ॥२५॥
श्रीराम न घाली पायतन । करावया दीनोद्वारण ।
तारावया वृक्षवल्लीपाषाण । वनी विहरण अनवाणी ॥२६॥
रामासी कांटे न रुपती पाही । कंटक उद्धरती रामपायीं ।
अडखळतां ठायींचे ठायी । पाषाण तेही उद्धरती ॥२७॥
रामपादुका सुवर्णभूषण । आवडी वागवीं लक्ष्मण ।
त्याही केल्या भरतार्पण । गुरुवचन वंदोनि ॥२८॥
कैकेयीला दोष न देण्याविषयी भरताचे आश्वासन :
रामपादुका आलिया हाता । उल्हास भरताच्या चित्ता ।
पादुका प्रतिष्ठूनि माथा । आल्हादता काय बोले ॥२९॥
श्रीरामपादुका ठेविता माथा । जगी हारपली द्वेषविषमता ।
ते मी कैंची आणू आता । निजमाता द्वेषावया ॥३०॥
कैकेयीवरदें वनप्रयाण । दूषण नव्हे ते रामा भूषण ।
वाल्मीकवचनें कळली खूण । आता कोण द्वेषील ॥३१॥
भरत आणि स्वये शत्रुघ्न । वंदोनि वसिष्ठाचे चरण ।
करोनि श्रीरामासी नमन । काय आपण बोलत ॥३२॥
तुझ्या पादुका ठेविल्या माथा । तुज भेटल्याविण रघुनाथा ।
नाही उतरणें सर्वथा । तिन्ही अवस्था त्रिकाळीं ॥३३॥
पादुका माझे निजजीवन । पादुका माझे देवतार्चन ।
पादुका माझे निजपूजन । नित्य ध्यान चरणांचे ॥३४॥
तुझ्या पादुका जी श्रीरामा । त्या तंव माझा परमात्मा ।
वर्णूनि पादुकांचा महिमा । वंदोनि श्रीराम निघाला ॥३५॥
जाता घालोनि लोटांगण । भरत काय बोले आपण ।
वसिष्ठादि रामलक्ष्मण । अवघे जण अवधारा ॥३६॥
नंदिग्रामं गमिष्यामि मातरं भ्रातरं विना ।
तत्र दुःखमिदं सर्वं सहिष्ये राघवं विना ॥५॥
गतश्चाहो दिवं राजा वनस्थः स गुरुर्मम ।
रामागमं प्रतीक्षेऽहं पालयिष्यन्वसुन्धराम् ॥६॥
भरत नंदिग्रामात राहून शत्रुघ्नाकडून राज्यकारभार करवितो :
श्रीरामाचे अनुज्ञेनें । मी करितो अयोध्ये गमन ।
परी तेथे श्रीरामावांचोन । मी अयोध्याभुवनीं वसेंना ॥३७॥
निजराज्यातें त्यागूनी । पिता प्रवेशे वैकुंठभुवनीं ।
श्रीरामा सांडोनिया वनी । मी राजभवनीं राहेना ॥३८॥
विनंती करितो मी समस्ता । मी नंदिग्रामीं राहीन आता ।
अयोध्याराज्यभर तत्वत । होईन चालविता तेथोनी ॥३९॥
भद्रीं न देखता रघुनाथा । मज नावरे दुःखावस्था ।
यालागी अयोध्ये नवजाता । राज्यभार माथा शत्रुघ्न ॥४०॥
रामेवीण अयोध्या दृष्टी । देखता मज दुःखकोटी ।
यालागी तिची न घे भेटी । ते वस्तीची गोष्ट रुचेना ॥४१॥
नंदिग्रामी करोनि वस्ती । अयोध्येसी नजराज्याची स्थिती ।
माझिया जाण अनुमतीं । शत्रुघ्नाहातीं करवीन ॥४२॥
श्रीराम पादुकांपुढे जाण । भरत शत्रुघ्न दोघे जण ।
अयोध्यानिराज्यलक्षण । करिती संपूर्ण पादुका ॥४३॥
पादुकांचा प्रताप पूर्ण । अयोध्येकडे पाहील कोण ।
कळिकाळ नोळंगती आंगवण । राज्यलक्षण पादुका ॥४४॥
रामपादुका ऐकता कर्णी । यम काळ येती लोटांगणी ।
इंद्रादिक लागतई चरणी । राज्यलक्षणी पादुका ॥४५॥
पादुकासामर्थ्ये सामर्थ्यता । त्या भाग्ये आलिया माझ्या हाता ।
त्या म्या दृढ ओपिल्या माथा । कृपावंता श्रीरामा ॥४६॥
श्रीरामवियोगाचें दुःख । पादुका पावतां गेले निःशेष ।
पादुका पाहता स्वानंदसुख । आत्यंतिक श्रीरामा ॥४७॥
पुढती भेटे श्रीरघुनाथ । तंववरी माझे हेंचि व्रत ।
मस्तकी पादुका सतत । स्वानंदयुक्त वाहीन ॥४८॥
राम राहिला वनवासी । विसरलो त्या दुःखासी ।
पादुकारूपें मजपासीं । अहर्निशी श्रीराम ॥४९॥
तुजसी वियोग रघुनाथा । येथोनि मज नाही आता ।
उल्हास भरताचिया चित्ता । स्वानंदता गर्जत ॥५०॥
ऐकोनि भरताचे वचन । श्रीराम झाला सुखसंपन्न ।
दोघाही दिधले आलिंगन । भरतशत्रुघ्न सुखरूप ॥५१॥
चौदा वर्षे चौदा दिवसांनी आपण वनवासातून परत येऊ असे रामवचन :
चौदा वर्षीं चौदा दिवसी । मी येईन नेमेंसी ।
संदेह न धरावा मानसी । मी तुजपासी निभ्रांत ॥५२॥
ऐसे बोले श्रीरघुनंदन । यथार्थ मानी भरत शत्रुघ्न ।
दोन्ही करसंतुष्ट जोडून । सांष्टांगी नमन त्याहीं केले ॥५३॥
बंधुबंधूंस जाला ऐक्यभाव । बंधुबंधूंसीं प्रेम अपूर्व ।
यालागी चित्रकूटासी बांधव । ठेविले नाव श्रीरामे ॥५४॥
चवघां बंधूंसी एकात्मता । चित्रकूटीं आली हाता ।
यालागी बांधव हे नाम तत्वता । स्वभावतां चित्रकूटा ॥५५॥
निरोप व अयोध्येकडे भरत-शत्रुघ्नांचे प्रयाण :
लागोनि श्रीरामाच्या चरणा । वंदोनि जानकी लक्ष्मणां ।
तिघां करोनि प्रदक्षिणा । भरतशत्रुघ्नां उल्हासु ॥५६॥
रामपादुका ठेवोनि शिरी । दोघे बैसले रथावरी ।
निषाणें त्राहाटिल्या भेरी । निजनागरीं निघाले ॥५७॥
श्रीरामे निजमाता । संबोधिल्या सुखरूपता ।
त्यांच्या चरणी ठेवूनि माथा । त्याही समस्ता बोळविल्या ॥५८॥
सैन्य सेनानी प्रधान । तिही वंदोनि रघुनंदन ।
होवोनियां सुखसंपन्न । अयोध्यागमन तिही केले ॥५९॥
निजनागरीं अति उल्हासीं । बरत आला प्रयागासी ।
भेटोनियां भरद्वाजासी । वृत्तांत त्यापासी सांगितला ॥६०॥
श्रीरामाच्या निजपादुका । देखोनि बरताचे मस्तकां ।
भरद्वाज पावला हरिखा । म्हणे धन्य तिही लोकी भरता तू ॥६१॥
परमानंदे परिपूर्ण । भरता दिधले आलिंगन ।
देवोनियां आशीर्वचन । अयोध्ये गमन करविलें ॥६२॥
गंगा उतरोनि झडकरी । गुहकाचे निजनगरीं ।
भरतचरण वंदोनि शिरी । हर्षे निर्भर नाचत ॥६४॥
रामपादुका आल्या हाता । त्या तुवा प्रेमे ठेविल्या माथा ।
धन्य भाग्य तुझे भरता । तू पढियंता श्रीरामा ॥६५॥
भेटी देवोनि गुहकासी । परम सुख जाले त्यासी ।
भरत निघाला अयोध्येसी । निजसैन्येसीं सत्वर ॥६६॥
अयोध्या देखोनि भरता । सुख निपजे त्याच्या चित्ता ।
तेथे माता ठेवोनि समस्ता । होय निघतां नंदिग्रामा ॥६७॥
रथस्थः स तु धर्मात्मा भरतो भ्रातृवत्सलः ।
पादुके शिरसि स्थाप्य नंदिग्राममुपाविशत् ॥७॥
भरताची नंदिग्रामात राहून रामपादुकांची सेवा :
भ्रातृवत्सल भरतवीर । रथी बैसोनिया शीघ्र ।
रामपादुकीं मंडीत शिर । आला सत्वर नंदिग्रामा ॥६८॥
नंदिग्रामी बाह्यप्रदेशीं । रामपादुका स्थापोनि शिशी ।
भरतराजा राजऋषी । जाला तापसी अनुतापे ॥६९॥
नगरी त्यजोनि समस्त माता । अनुकूल त्यजोनि निजकांता ।
राजभोगा नातळतां । श्रीरामव्रता अनुसरला ॥७०॥
वनवासी श्रीरघुनाथ । जे जे व्रत आचरत ।
ते ते अंगीकारी भरत । तोही श्लोकार्थ अवधारा ॥७१॥
जटावल्कलधारी च मुनिवेषधरः प्रभुः ।
नंदिग्रामेंऽवसद्धीरः ससैन्यौ भरतस्तदा ॥८॥
सवालव्यजनं छत्रं धारयामास स स्वयम् ।
रामभक्तः सदा नित्यं रंजयान्विविधा प्रजाः ॥९॥
राज्यवैभव त्यजोनि दूरी । जटावल्कचीरधारी ।
रामपादुका स्थापोनि शिरी । जळफळाहारी निर्वाहो ॥७२॥
जंव होय श्रीरामाचे आगमन । तंववरी करणे नाही भोजन ।
दृष्टी पाहणें नाही अन्न । देहवर्तनें जळफळीं ॥७३॥
श्रीरामपादुकांचे भजन । श्रीरामपादुकांचें पूजन ।
श्रीरामपादुकांचें निजध्यान । स्मरण चिंतन श्रीरामाचे ॥७४॥
रामपादुकीं छत्रधरी । आतपत्र मुक्तझल्लरी ।
कनकदंड घेवोनि करी । निरंतरी ढाळीत ॥७५॥
श्रीरामनाम स्मरतां । अराणूक नाही भरता ।
मेळवोनि साधुसंता । श्रीरामकथा अनुवादे ॥७६॥
श्रीरामाज्ञा मानोनि माथा । भरत अयोध्ये आला मागुता ।
त्याच्या पादुका एकाग्रता । होय भजता अति प्रीती ॥७७॥
श्रीरामाचे निजवचन । त्यासी सर्वस्वें विकिला प्राण ।
अयोध्याराज्यसंरक्षण । करी शत्रुघ्न भरताज्ञे ॥७८॥
भरताज्ञे अति सादर । शत्रुघ्न आठही प्रहर ।
आज्ञाधारी निरंतर । अणुमात्र नुल्लघी ॥७९॥
बहू तापस अनुष्ठानी । त्यामाजी भरत महामुनी ।
विनटलासे श्रीरामभजनी । अनुदिनी तन्निष्ठ ॥८०॥
विविधजनसमूहैः सवृतो ग्राम आसीत् |
प्रतिदिननिशि पूजा पादुकानां च कुर्वन ।
विविधनृपतिकृत्यं रामपादानुरुपं ।
विधिवदतिवरेण्यो रामबंधुः कनीयान् ॥१०॥
नंदिग्रामी बाह्यप्रदेशीं । भरत राहिला मुनिवेषेंसी ।
तेथे योगी दिगंबर संन्यासी । येती त्यापासी सूरस्थ ॥८१॥
आले तपोराशी ऋषिगण । आगमी निमगी अति ज्ञान ।
जपी ध्यानी मुमुक्षुजन । साधु सज्जन तेथे आले ॥८२॥
देशोदेशींच्या प्रजा प्रधान । श्रवणीं श्रद्धाळु बहुत जन ।
अंजलिसंपुट जोडून । उभा शत्रुघ्न वचनार्थीं ॥८३॥
भरतमुखें रामायण । श्रवणें होतसे समाधान ।
देखोनि पादुकांचे भजन । विस्मित जन अवघेही ॥८४॥
भरताचे नित्ससंगतीं । श्रवण स्मरण अहोरातीं ।
देखोनि श्रीरामाची भक्ती । सुखी होटी समस्त ॥८५॥
श्रीरामपादुका ठेवोनि माथा । भरत अयोध्ये आला असता ।
राज्यीं नाही अधर्मकथा । अकर्मर्वाता असेना ॥८६॥
कैसी राजाज्ञा समर्थ । प्रजा सत्यवादी समस्त ।
स्वधर्मकर्मी नित्य रत । श्रीरामभक्त श्रद्धाळु ॥८७॥
राज्यामाजील निजजन । स्वभावेसी श्रीरामनामस्मरण ।
करिता जीविकावर्तन । रामचिंतन अहार्निशीं ॥८८॥
ऐकोनि भरताचे शीळ । देशादेशींचे भूपाळ ।
उपायनें घेवोनि प्रबळ । येती सकळ भेतीसी ॥८९॥
रत्नधनगजवाजींसीं । राजे आणिती भेटींसी ।
भरत नातळे पै त्यासी । निजमानसीं निरपेक्ष ॥९०॥
स्मरतां श्रीरामाचे नाम । मावळले क्रोध काम ।
निघोनि गेला लोभसंभ्रम । भरत निष्काम श्रीरामे ॥९१॥
भेटी परतोवोनि समस्त । राजे सन्मानें स्वये गौरवीत ।
रामप्रतापें अति विख्यात । उदार भरत तिही लोकी ॥९२॥
श्रीरामस्मरणें प्रज्ञाप्रबुद्धु । श्रीरामाचा कनिष्ठ बंधु ।
भरत भजनीं अगाधबोधु । वसे स्वानंदु नंदिग्रामीं ॥९३॥
ऐसिया अगाधस्थिती । भरता नंदिग्रामी वस्ती ।
वनवासी श्रीरघुपती । करील ख्याती ते एका ॥९४॥
निजराज्याची लोभप्राप्ती । निःशेष त्यजूनि रघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥९५॥
सापत्न मातेची वचनोक्ती । श्रीरामे पाळोनि अति प्रीती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥९६॥
देह त्यागितां नृपती । भाक न सांडी श्रीरघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥९७॥
कौसल्या मातेचिया काकुलती । श्रीरामे मौन धरोनि निश्चिती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥९८॥
सीता चरणी चाले वनाप्रती । दुःख न मानूनि सीतापती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥९९॥
लक्ष्मणाच्या क्षोभोक्तीं । क्षोभ न मानूनि रघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥१००॥
भरत नेऊ आला अति प्रीतीसी । त्यासी बोळवूनि सुखस्थितीं ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासी ॥१०१॥
त्यजोनि निजराज्य प्रचंड । वैभवासी देवोनि दंड ।
नानाभोगांचे ठेवूनि तोंड । अयोध्याकांड संपविले ॥२॥
दुःख ओढविले वितंड । ते स्वये केले खंडविखंड ।
मोहाचे करोनि काळे तोंड । अयोध्याकांड संपविले ॥३॥
अभिमान अति अवघड । भरडिला जैसा मूग कांकड ।
परिपाकी करोनि गोड । अयोध्याकांड संपविले ॥४॥
दुस्तर वन भय दुर्घड । त्या भयांचे ठेचोनि तोंड ।
वनवास करोनिया गोड । अयोध्याकांड संपविले ॥५॥
याउपरी रघुनंदन । सेवोनि दंडकारण्य ।
वधील त्रिशिरा खर दूषण । राक्षसदळण श्रीराम ॥६॥
एकाजनार्दना शरण । अगाध कथा रामायण ।
परमानंदे रसाळ पूर्ण । दंदकारण्यरहिवासु ॥७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
भरतअयोध्यागमननंदिग्रामवासो नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
॥ ओव्या १०७ ॥ श्लोक १० ॥ एवं ११७ ॥
