न व्हावा तो बरा मुळी
2680.
न व्हावा तो बरा मुळीच संबंध । विश्वासिका वध बोलिलासे ॥१॥
आता माझे हित काय ते विचारा । सत्यत्वे दातारा पांडुरंगा ॥धृ॥
नाही भाव परी म्हणवितो दास । नको देऊ यास उणे येऊ ॥२॥
तुका म्हणे का हो उद्धरिता दीन । मानीतसा सीण मायबापा ॥३॥
अर्थ :
देवा तुमचा व माझा पूर्वी संबंधच झाला नसता तर हे फार बरे झाले असते आम्ही तर तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला परंतू तुम्ही आमचा विश्वासघात केला आणि शास्त्र असे सांगते की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू त्याने विश्वासघात केला म्हणजे तो एक प्रकारचा वधच ठरत असतो. त्यामुळे हे दातारा पाडूरंगा मी तुम्हाला खरोखर विनंती करुन सांगतो की माझे हित कशात आहे याविषयीचा तुम्हीच विचार करा. देवा मी तुम्हाला सत्य सांगत आहे माझा तुमच्या ठिकाणी भक्तीभाव नाही परंतू स्वत:ला निष्ठेने तुमचा दास म्हणून घेतो मग तुमचा दास म्हणून घेणार्याला तुम्ही काही उणेपणा येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापा तुम्ही माझ्यासारख्या दीन दुबळयाचा उध्दार करण्याकरता एवढा त्रास का मानून घेत आहात ?
