काय तुमचिया सेवे न व
2681.
काय तुमचिया सेवे न वेंचते गांठोळी । माझी टाळाटाळी करीतसा ॥१॥
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसे तरी सांगा निवडूनि ॥धृपद॥
कोण तुम्हा सुख असे या कौतुके । भोगिता अनेक दुःखे आह्मी ॥२॥
तुका म्हणे काय झालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही माझी टाळाटाळ करता आणि माझा जर उध्दार तुम्ही केला तर तुमच्या पदरचे काही खर्च होणार आहे काय ? अहो चतुरांच्या राया पाडूरंगा मला यातील खरा भेद तरी निवडून सांगा. अहो देवा आम्ही अनेक प्रकारचे दु:खे भोगीत आहेत आणि हे कौतुक पाहून तुम्हाला तरी कोणत्या प्रकारचे सुख वाटते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा तुम्ही असे निर्गुण का झालात आम्हाला तुमच्यावाचून या भवसागरातून कोण सोडवील.
