ऐसा दुस्तर भवसागर ।
3221.
ऐसा दुस्तर भवसागर । नेणो कैसा उतरू पार ॥१॥
कामक्रोधादि सावजे थोर । दिसताती भयंकर ॥धृपद॥
मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥
वासनेच्या लहरा येती । उद्योग हेलकावे बैसती ॥३॥
तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधे बैसे ॥४॥
अर्थ :
हा भवसागर फारच कठीण आहे आणि तो पार करुन कसा जावा हे मला काही कळेनासे झाले आहे. अहो मला या ठिकाणी कामक्रोधादीरुपी भयंकर प्राणी दिसत आहे. या भवसागरामध्ये माया ममतेचे भोवरे भयानक फेरे घेत आहेत. वासनेच्या लहरी सारख्या सारख्या येतात व त्यामुळे अनेक कर्माचे हेलकावेही बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, या भवसागरातून तरुन जाण्यासाठी एकच युक्ती आहे ती म्हणजे हरीनामरुपी नौकेत आपण बसावे आणि या नौकेत मी बसलो आहे.
