काळे ना सावळे धवळे न
945.
काळे ना सावळे धवळे ना पिवळे ।
घोंगडे निराळे लाधलो मी ॥१॥
मागील रगटे झाडिले आता ।
पंढरीनाथा चरणाजवळी ॥२॥
नवे नवघड हाता आले ।
दृष्टी पाहे तव मन हारपले ॥३॥
सहस्र फुलीवरी गोंडा थोरू ।
धडुते दावी रखुमादेविवरू ॥४॥
अर्थ :
जे घोंगडे काळे सावळे पांढरे पिवळे इत्यादि कसल्याही रंगाचे नसून जो निर्गुण स्वरूप आहे असे ते निर्गुण स्वरूपाचे चांगले घोंगडे मला मिळाले. त्यामुळे माझ्या जवळचे देहात्मबुद्धिचे रगटे पांडुरंगरायांच्या चरणी ठेवले. बोधाचे चांगले घोंगडे मला मिळाल्यामुळे माझे मन त्या घोंगड्याशी एकरूप होऊन गेले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते सहस्र फुली म्हणजे हजारो रंगाचा चित्रविचित्र फुलांचा गोंडा असे ते धडसे घोगडे मला पांडुरंगरायाने दाखवून दिले असे माऊली सांगतात.
