घोगडी घेऊनि हाटासि ज
944.
घोगडी घेऊनि हाटासि जाये ।
पंढरिये आहे वस्ती आम्हा ॥१॥
घोंगडियाचे मोल पै जाले ।
चरणी राहिले विठ्ठलाचे ॥२॥
घोंगडे येक बैसले थडी ।
उभया गोडी विठ्ठलाची ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे ।
शहाणे ये खुणे संतोषले ॥४॥
अर्थ :
आम्ही वारकरी पंढरपूरात राहात असून व्यापारी आहोत हे घोंगडे घेऊन संतांच्या बाजारात गेलो' त्याठिकाणी त्या घोंगडीचे चांगले मोल झाले ते मोल म्हणजे श्रीविठ्ठलाचे ठिकाणी आम्ही एकरूप झालो. चंद्रभागेच्या काठांवर एक घोंगडे (पुंडलिक) बसले आहे. त्याला विटेवर उभे असलेल्या श्रीविठ्ठलाची जोडी असून त्यांना एकमेकाची गोडी आहे. अनुभवी पुरूषच हे माझे बोलणे समजतील. आणि तेच शहाणे या माझ्या खुणेच्या बोलण्याने संतोष पावतील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
