तीन अक्षरे निवृत्ति
3545.
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्री । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसे शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान ही तीन अक्षरे । जो जप करील निर्धारे । तयास ब्रह्म साक्षात्कारे । होय सत्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसी ही चौदा अक्षरे । जो ऐके कर्णविवरें । की उच्चारी मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनी प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन: नाही जन्म । ऐसे पुरुषोत्तम बोलिले ॥६॥
