अग्नी जाळी तरी न जळत
660.
अग्नी जाळी तरी न जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनिया ॥१॥
अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ | हृदयी देवकी बाळ म्हणोनिया ॥२॥
अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत | हृदयी सीताकांत म्हणोनिया ॥३॥
अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद | हृदयी गोविंद म्हणोनिया ॥४॥
अग्नी जाळी तरी न जळे पै सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनिया ॥५॥
लंकेसी उरले बिभीषणाचे घर | हृदयी सीतावर धरिला म्हणोनिया ॥६॥
नामा म्हणे तुम्ही स्मरावे गोविंदा | चुके भवबाधा संसाराची ॥७॥
