पावया छंदे तल्लीन गो
188.
पावया छंदे तल्लीन गोविंदे ।
नाचती आनदे गोपाळ कैसे ॥
यमुनेच्या तीरी गाई चारी हरि ।
गोपाळ गजरी आनंदले ॥
ठायी ठायी मातु पेंद्या पै नाचतु ।
वाकुल्या दावितु हरिछंदे ॥
ठायी ठाती उभ्या विसरल्या माया ।
हाकितु लवलाह्या कृष्णहरि ॥
ज्ञानदेवा जीवी कृष्ण चिरंजिवी ।
गोपाळ रंजवी प्रेमभक्ती ॥
अर्थ :
पावा वाजवताना कृष्णाला पाहुन ते गोपाळ तल्लीन होऊन आनंदाने नाचायला लागले. स्वतः तो हरि यमुना तीरी गायी चारताना पाहुन ते गोपाळ त्याच्या नामाचा गजर करु लागले. त्या आनंदात ते सर्व गोपाळ नाचत असताना तो पेंद्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. व हे पाहुन चरताना ठिकठिकाणी उभ्या गोमातांना तो हरि घाईने वळु लागला आहे. माझ्यासाठी चिंरजिंव असलेला तो परमात्मा त्या गोपाळांना प्रेम भक्तीने रंजवीत आहे असे माऊली सांगतात.
