वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › २३. सुग्रीवाच्या शोधासाठी प्रस्थान

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088089 · अभंग क्र. २३

23.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय तेविसावा ॥
शबरीचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पंपासरोवरावर विश्रांती :

कबंधरुपें दानव दनु । पावला होता राक्षसतनु ।
तो श्रीरामे उद्धरोनु । केला पावन तिही लोकी ॥१॥
दनूनें केले उर्ध्वगमन । पुढे श्रीराम लक्ष्मण ।
पंपेसी निघाले आपण । धनुष्यबाण सज्जोनी ॥२॥

पंपायाः पश्चिमे तीरे उपविष्टो च राघवौ ।
ददर्शतुस्ततस्तत्र शबर्या रम्यमाश्रमम् ॥१॥
तौ तमाश्रममासाद्य द्रुमैर्बहुभिरावृतम् ।
सुरभ्यमभिवीक्षंतौ शबरीमभ्युपेयतुः ॥२॥
तौ दृष्ट्वा तु तदा सिद्धा समुत्थाय कृताञ्जलिः ।
पादौ जग्राह रामस्य लक्ष्मणस्य च धीमतः ॥३॥

श्रीराम लक्ष्मण अति सत्वर । पावोनि पंपापश्चिमतीर ।
सेवोनियां पंपापवित्रनीर । विश्रांतीस वीर बैसले ॥३॥

शबरीच्या आश्रमास भेट, शबरीने केलेले स्वागत :

तेथे शबरीचा आश्रम । देखोनि अति मनोरम ।
स्वये आले सौ‍मित्र राम । आल्हाद परम शबरीसी ॥४॥
श्रीरामचरणीं लोटांगण । भावे वंदिला लक्ष्मण ।
शबरीसी आल्हाद पूर्ण । श्रीरामदर्शन देखोनि ॥५॥
मातंगऋषीच्या सेवावृत्तीं । शबरीची शुद्धमती ।
भगवद्भाव सर्वा भूतीं । श्रीरामी भक्ति अनन्य ॥६॥
मातंगऋषीचे शिष्य निर्मळ । पडला असता अति दुष्काळ ।
गुरुसी आणिती फळ मूळ । स्रवले केवळ श्रमबिंदु ॥७॥
श्रमबिंदु पडता जाण । जालीं सरोवरें पावन ।
आटों नेणे तेथींचे जीवन । नित्य परिपूर्ण शुद्धजळें ॥८॥
श्रद्धेने सेविता तेथींचे आप । तत्काळ शमे त्रिविध ताप ।
सांसारिक शमे संताप । सुखरुप स्वानंदे ॥९॥
एकाचे बिंदु पडता क्षिती । सुमने झालीं नाना जाती ।
सुकों नेणती कल्पांती । नित्य टवटविती मघमघित ॥१०॥
त्या सुमनांचा घेता वास । मनाचा निरसे त्रिगुणत्रास ।
मग भोगी प्रकट पेरश । अति उल्लास जीवशिवां ॥११॥
तिही पुष्पी सुपुष्ति । वनश्री शोभासौभाग्ययुक्त ।
ते देखोनि श्रीराम संतोषत । अति भावार्थ शबरीचा ॥१२॥
देखोनि शबरीचा भावार्थ । संतोषला श्रीरघुनाथ ।
मग तिचा वृत्तांत पुसत । समाधानार्थ द्यावया ॥१३॥

कच्चित्ते निर्जिता विघ्नाः कच्चिते वर्धते तपः ।
कच्चिते नियतःकोपाअहारश्च तपोधने ॥४॥
कच्चिते नियमाःप्राप्ताःकच्चित्ते मनसःसुखम् ।
कच्चिते गुरुशुश्रूषा सफला चारुभाषिणि ॥५॥

रामाचा शबरीस उपदेश व प्रश्न :

श्रीराम पुसे आपण । शबरी तू ऐके सावधान ।
मी एक ज्ञाता जग अज्ञान । हे महाविघ्न जिंकिले की ॥१४॥
ज्ञानाचा ज्ञानाभिमान । हेंचि तापसां महाविघ्न ।
जेणे जिंतिला ज्ञानभिमान । तप वर्धमान तयाचे ॥१५॥
तयाच्या तपाची थोरी । स्वये भगवंत आज्ञाधारी ।
तोचि तपस्वी या संसारी । सुरासुरी वंदिजे ॥१६॥
अद्वैत देकिलें स्वस्वरुप । तैचि जिंतिला जाय कोप ।
असता द्वैतखटाटोप । सर्वथा कोप जिणवेना ॥१७॥
जो पुढिलाचे ढक्यानें पडे । त्यावरी तो कोपे वावडे ।
स्वये निसरोनि गडबडे । झाडितु मागे पुढे उगाचि निघे ॥१८॥
स्वजिव्हा रगडितां दातांबुडीं । तया कोपाची कडाडी ।
दात पाडी की जिव्हा तोडी । तैसी अद्वैतीं सवडी कोपासी नाही ॥१९॥
जंव द्वैताची सुदृढता । तंव जिंकवेना मोहममता ।
अद्वैतभावना भावितां । मोहममता निमाली ॥२०॥
वृति पावल्या चित्स्वरुप । तै मन होते सुखरुप ।
मनी असतीं दुःखसंताप । केल्याही तप अति मिथ्या ॥२१॥
तरी सद्‍गुरुसेवा सफळ । संसार होय मृगजळ ।
ऐसे न पावती ते बरळ । गुरु केवळ अनोळख ॥२२॥
जे गुरुसी मनुष्य मानिती । त्यांची मिथ्या गुरुभक्ती ।
त्यांसी कल्पांती नव्हे विश्रांती । उपदेशें भ्रांति मुख्यत्वें ॥२३॥
मंत्र तंत्र जे सांगती । ते तोंडींचे तोंडीं उपदेशिती ।
नाही अंतरी निजप्रतीती । उपदेशभ्रांति मुख्यत्वें ॥२४॥
सुवर्णाचा म्हणती नाग । नाग नव्हे ते सोने चांग ।
तेंवी दृष्य द्रष्टा दिसे सांग । उपदेश अव्यंग या नांव ॥२५॥
ऐसिये निजात्मप्रतीती । आहे सकळ गुरुभक्ती ।
सांडोनि ज्ञानगर्व‍उद्धती । विनीत सर्वांभूतीं अहेतुक ॥२६॥
इंद्रियकर्माची प्रवृत्ती । तुज आहे की अकर्त्रात्मप्रतीती ।
तै सकळ वासनां होय शांती । सुखस्थितिस्वानंद ॥२७॥
ऐसी निजानंदप्रतीती । या नांव सार्थक तपःस्थिती ।
निजदेह मिथ्यात्वे देखती । मुख्य परमार्थी तो एक ॥२८॥
ऐसे श्रीरामे पुसता । शबरीस झाली पूर्णावस्था ।
श्रीरामचरणी ठेवोनी माथा । समस्त तत्वत्तां वृत्तांता सांगत ॥२९॥

अद्य प्राप्ता तपःसिद्धिस्तव संदर्शनान्मया ।
अद्य मे सफलं जन्म गुरवश्च सुपूजिताः ॥६॥
चित्रकूटं त्वयि प्राप्ते विमानैरतुलप्रभैः ।
मुनयो दिवमारुढा ये मयाभ्यर्चिताः पुरा ॥७॥
तैश्चाहमुक्ता धर्मज्ञैर्मभागैर्महात्मभिः ।
आगमिष्यति काकुत्स्थः सुपुष्पामिदमाश्रमम् ॥८॥
मया तु संचितं वन्यं विविधं पुरुषर्षभ ।
तवार्थे पुरुषव्याघ्र पंपायास्तीर संभवात् ।
तत्ते परिगृहीतव्यं राम सौ‍मित्रिणा सह ॥९॥

शबरीचे उत्तर, श्रीरामास तेथे राहाण्याची विनंती :

तुझे होतांचि दर्शन । सफळ तप सफळ ज्ञान ।
सकळ ध्येय ध्याता ध्यान । सफळ अनुष्ठान आजि माजें ॥३०॥
आजि माझी सफळ वृत्ती । आजि माझी सफळ स्थिती ।
आजि माजी सफळ भक्ती । जे कृपें रघुपति आलासी ॥३१॥
तुझे करिता नामस्मरण । सहित पूर्वजां उद्धरण ।
त्या तुझे जालिया दर्शन । सफळ जनन आजि माझे ॥३२॥
तुझे देखिलिया चरण । जन्ममरणांची बोळवण ।
बोळविलें मीतूंपण । सुखसंपन्न श्रीरामे ॥३३॥
तुज येता चित्रकूटींहूनी । मार्गी उद्धरिले मुनी ।
शरभंगु जाता विमानी । म्या प्रार्थोनि पूसिलें ॥३४॥
तेणे सांगितले मजप्रती । तुझ्या आश्रमा येईल श्रीरघुपती ।
तैपासोनि अहोरात्री । चरण चित्ती दृढ धरिले ॥३५॥
माझा जाणोनि भावार्थ । कृपेनें आलासी कृपावंत ।
तरी आजि राहोनिया येथ । पूजा यथोक्त अंगीकारीं ॥३६॥
सुक्ष्म सामग्री अति पुनीत । म्या किंचित केली असे येथ ।
ते अंगीकारावी श्रीरघुनाथ । सखा समवेत सौ‍मित्र ॥३७॥
ऐसे ऐकोनि शबरीवचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
विधियुक्त पूजा अंगीकारोन । वनभोजन स्वये केले ॥३८॥

वचनात्तस्य सा रामं शबरी वाक्यमब्रवीत ।
कृत्स्नं वनमिदं दृष्टं श्रोतव्यं च श्रुतं त्वया ॥१०॥
तदिच्छाम्यभ्यनुज्ञाता त्यक्षाम्येतत्कलेवरम् ।
तेषामिच्छाम्यहं गंतुंसमीपं भावितात्मनाम्॥११॥

श्रीरामांनी शबरीची स्तुती केली :

संतोषोनी बोलिला श्रीरघुनाथ । जे दनुजमुखें तुझे सामर्थ्य ।
ऐकोनि आम्ही आलो येथ । तुझे आचरित पहावया ॥३९॥
दनुदानवें जे सांगितले । त्याहूनि अधिक म्या देखिले ।
ऐसे श्रीरामे बोलिले । मन आनंदले शबरीचें ॥४०॥
सद्‍गुरुमंत्रसामर्थ्य पूर्ण । कदा कोमेजना हे वन ।
सुमनां न ये सुकलेपण । न आटे जीवन बहुकाळे ॥४१॥
सद्‍गुरुचें सामर्थ्य भले । जैसे ऐकिलें तैसे देखिले ।
त्याचे वचन म्या पाळिले । तेणे देखिले हे पाय ॥४२॥
ऐसे बोलोनि उल्लासतां । श्रीरामचरणीं ठेविला माथा ।
कांहीएक मी मागेन आता । दयवंता ते देई ॥४३॥
तुझे घ्यावया दर्शन । धरिले देहाचें धारण ।
तरी तुझे देखिलिया चरण । कार्य कोण देहाचें ॥४४॥

शबरीची प्रार्थना :

तरी तुज देखता श्रीरघुनाथा । गेली देहाची मोहममता ।
तो मी त्यागीन जीव आता । कृपावंता आज्ञापीं ॥४५॥
देहसंगतीं अमित दोष । देहसंगति तो श्वान ओक ।
देह तोचि महा नरक । परम दुःख देहसंगें ॥४६॥
देहाचिये संगतीं । ऐशीं दुखेः नेणो किती ।
देहसंगाची करिन निवृत्ती । कृपें रघुपति आज्ञापीं ॥४७॥

रामांची अनुमती व शबरीचा उद्धार :

ऐसे शबरियें स्वये प्रार्थून । घातले चरणी लोटांगण ।
देखोनि तुष्टला रघुनंदन । आज्ञा संपूर्ण स्वये देत ॥४८॥

धर्मिष्ठं तु वचःश्रुत्वा राघवःसहलक्ष्मणः ।
अनुजानामि गच्छेति प्रहृष्टवदनोऽब्रवीत् ॥१२॥
अनुज्ञाता तु रामेण हुत्वात्मानं हुताशने ।
ज्वलत्पावकसंकाशा स्वर्गमेव जगाम ह ॥१३॥
यत्र ते सुकृतात्मानो विहरंति महर्षयः ।
तत्पुण्यं शबरी स्थानं जगामात्मसमाधिना ॥१४॥

ऐकोनि शबरीच्या वचनासी । श्रीराम बोले अति उल्लासीं ।
सांडोनिया देहलोभासी । परलोकासी सुखें जाय ॥४९॥
ऐकोनिया श्रीरामवचन । शबरी घालोनिया आसन ।
निजतेजासी चेतवोन । केले दहन देहाचें ॥५०॥
श्रीरामपुण्याची निजशक्ती । जाळोनिया देहस्थिती ।
शबरीसी कोण लोकप्राप्ती । तेही गती अवधारा ॥५१॥
जैसे पुण्याचें सामर्थ्य । ऋषि तैसे लोक पावत ।
शबरी पापपुण्यातीत । अति समर्थ श्रीरामे ॥५२॥
श्रीरामदर्शनाचे पुण्य । दिव्य भोगे नव्हे क्षीण ।
शबरी पावली अक्षय स्थान । गमनागमन जेथ नाही ॥५३॥
ऋषीश्वरांच्या पुण्यसंपत्ती । भोगक्षयें क्षया जाती ।
ते पावती पुनरावृत्ती । शबरीस प्राप्ती ते नाही ॥५४॥
जेथे नित्य वस्ती श्रीशुका । जेथे वस्ती सनकादिकां ।
शबरी पावली तया लोका । शिवादिकां निजपूज्य ॥५५॥
श्रीरामदृष्टि पुण्य परिपूर्ण । देहदहने देदिप्यमान ।
तिसी न लागेचि विमान । केले गमन निजगतीं ॥५६॥
जे जाती विमानगतीं । ते पावती पुनरावृत्ती ।
ते नाही शबरीप्रती । अगम्यगती ते गेली ॥५७॥
श्रीरामदर्शन पुण्यसंपत्ती । अक्षय सुखाची सुखवस्ती ।
क्षया न वचे कल्पांती । निजप्राप्ती शबरीसी ॥५८॥
श्रीराम देखतांची दृष्टी । पापपुण्या पडली तुटी ।
खुंटली जन्ममरणांची गोष्टी । अक्षय संतुष्टी शबरीसी ॥५९॥
स्वये श्रीराम कृपामूर्ती । शबरी तरली सुखानुभूतीं ।
स्वर्गी जयजयकार करिती । सुमनें वर्षती सुरसिद्ध ॥६०॥
यापरी शबरीद्धरण । श्रीरामे केले आपण ।
एकाजनार्दना शरण । जगदुद्धरण श्रीराम ॥६१॥
शबरीआश्रम अतिविश्रांत । राम लक्ष्मण बैसोनि तेथ ।
वनशोभा स्वये पहात । तंव अपूर्व तेथ वर्तले ॥६२॥

वनशोभा पाहात असता श्रीरामांचा चित्तक्षोभ :

देखोनि मृगशावाक्षिवदनां । सीता आठवली मृगनयना ।
मदन क्षोभला श्रीरघुनंदना । मनमोहना श्रीरामा ॥६३॥
श्रीराम नित्य निष्काम । त्यासी क्षोभला अति काम ।
काम निष्काम आक्रम । कामसंभ्रम अवधारा ॥६४॥

मां हि शोकसमाक्रान्तं संतापयति मन्मथः ।
हृषटः प्रवदमानश्च मामाहृयति कोकिलः ॥१५॥

वसते वन शोभायमान । कोकिलांचें पंचम आलपन ।
ऐकोनिया श्रीरघुनंदन । सकाम संपूर्ण सीतार्थी ॥६५॥

एष दात्यूहको हृष्टो रम्ये कानननिझरि ।
प्रणदन्मन्मथाविष्टं शोचयिष्यति लक्ष्मण ॥१६॥

ज्यांच्या ज्यांच्या कूजन-क्रीडेमुळे श्रीरामांना
मनस्ताप झाला त्यांना त्यांना शाप व उःशाप कोकिळा :

नव्हे हे कोकिळाकूजन । हे मदनाचे दुर्धर बाण ।
हृदयी विधिती दारुण । द्वंद्वं संपूर्ण हा करितो ॥६६॥
लक्ष्मणा करी गां निवारण । कोकिळा न सांडिती कूजन ।
माझे नायके हा वचन । रघुनंदन कोपला ॥६७॥
याचे खुंटो वदते वचन । यासी पडो दृढ मौन ।
रागे क्षोभे रघुनंदन । शाप दारुण स्वये वदला ॥६७॥
कोकिळा विनवी अति दीन । सवेंचि तुष्टला रघुनंदन ।
वसंती तुज मधुर वचन । येर्‍हवीं मौन सर्वदा ॥६९॥

मां दृष्टवैव मृगो याति तं मृगी परिधावति ।
वक्ष्यती वनभीः कामैः कामैरर्धा मृगीरयम् ॥१७॥

हरिण :

लक्ष्मणा माझे सन्मुख दृष्टी । मृग रमतो मृगीपाठी ।
मज काम क्षोभोनि हठी । द्वंद्वदृष्टी हो माझा ॥७०॥
माझ्या मूर्खत्वाच्या गोष्टी । सांगतो मृगीच्या कर्णपुटी ।
सीता हारविली गोरटी । मूर्ख सृष्टी श्रीराम ॥७१॥
पशु पक्षी काग कपोता । स्त्रीपासोनि नव्हे परता ।
वनी सांडोनि गेला सीता । मुख्य मूर्खता श्रीरामी ॥७२॥
हातींची हारवोनि सीता । वनी रडत भोवतो आता ।
श्रीरामऐसी मूर्खता । मज सर्वथा असेना ॥७३॥
मी सांडोनि निजकांता । श्रीरामाऐसा न वचे परता ।
ऐसिया माझ्या निद्य कथा । मृग सांगतो मृगीपासीं ॥७४॥
देखोनि मृगाचें मैथुन । श्रीरामे शापिला अति क्षोभून ।
तुज करिता दारगमन । घाये प्राण जातील ॥७५॥
ऐकोनि दुर्धर शापोक्ती । मृग श्रीरामा ये काकुळती ।
सवेंचि तुष्टला कृपामूर्ती । शापनिवृत्ति स्वये वदे ॥७६॥
घंटापारधीचे रातीं । घाये तुमचे प्राण जाती ।
येरवी विचरता स्त्रियेप्रती । सुखसंभूति स्वानंदे ॥७७॥

हत्ती व हत्तीण :

उन्मत्त कामे कामगज । गझीसी क्रीडे देखोनि मज ।
मज सीतेची लावोनि लाज । नाचे भोजें स्त्रीसंगे ॥७८॥
जेंवी मी प्रेमे आश्वासीं सीता । तेंवी तो सोंड ठेवितो गजीचे माथा ।
मज उपहासितो रघुनाथा । स्त्रीकामता उन्मत्त ॥७९॥
सीता पुसतां गजासी । कांही न बोले श्रीरामासी ।
गज क्रीडतो निजगजीसी । तेणे श्रीरामासी कोप आला ॥८०॥
श्रीरामे क्षोभोनि आपण । शाप दिधला दारुण ।
गजीसीं करिता कामरमण । स्त्रीसंगे प्राण जाईल ॥८१॥
गजी गज दीनवदन । दोघें प्रार्थिती रघुनंदन ।
त्यांचेनि वचनें संतोषोन । शापमोचन स्वये वदला ॥८२॥
गजीसीं करिता मैथुन । तू पडसी अचेतन ।
गजीनें माथा घालिता जीवन । तुझा प्राण वाचेल ॥८३॥
गती तुज पुरवील तृण । त्याचे केलिया भक्षण ।
साता दिवसां सावधान । वनविहरण तू करिसी ॥८४॥
तया नांव गजोपशेज । ऐसे मिरविसील भोज ।
ऐकता सुखी जाला गज । तेणे सहजे सुख जाले ॥८५॥
अद्यापि गजगजीमैथुन । तेथे हे चालते विंदान ।
बाप विनोद श्रीरघुनंदन । विचित्र विंदान करितसे ॥८६॥

शिखिनीभिः परिवृतास्त एते मदमूर्च्छिताः ।
मन्मथाभिपरीतस्य मम मन्मथवर्धनाः॥१८॥
पश्य लक्ष्मण नृत्यंतं मयूरमुपनृत्यति ।
शिखिनी मन्मथार्तैषा भर्तारं गिरिसानुषु ॥१९॥

मोर व लाडोरी :

पाहे पा लक्ष्मणा येथ । मय़ूरी मयूरसंयुक्त ।
नृत्य करी मन्मथोन्मत्त । मजही करोनी ॥८७॥
मयूराची निजपत्‍नी । नाही राक्षसी नेली हिरोनी ।
म्हणोनि नाचे गिरीकाननी । वांकुल्या दरोनि मज दावी ॥८८॥
म्या सीता हरविली वनी । मज दुःखितातें देखोनी ।
हा नाचतो घेवोनि पत्‍नी । रामे कोपोनि शापिला ॥८९॥
मज दुखितातें देखता । दोघें नाचती उन्मत्तता ।
तुज येईल नपुंसकता । अंगसंगता तुम्हा न घडे ॥९०॥
ऐकोनिया शापवचन । मयूर विनवी अति दीन ।
मयूरीनें धरिले चरण । शापमोचन श्रीराम वदे ॥९१॥
सीतेचे वियोगें जाण । दुःखी होसी तू रघुनंदन ।
आम्हा पक्षियांचा पाड कोण । दुःख दारुण पाहावयासी ॥९२॥
ऐसे ऐकोनि मयूरवचन । श्रीराम जाला सुप्रसन्न ।
दोघे नृत्यमानें सुखसंपन्न । चक्षुवीर्ये पूर्ण सुख तुम्हा ॥९३॥

कावळा :

पाहे पा लक्ष्मणा विपरीत । काळा कावळा पत्‍नीसमवेत ।
मज दूःखिता वांकुल्या दावित । स्वये क्रीडत पत्‍नीसी ॥९४॥
श्रीराम सीता पुसे कागासी । दोघे न बोलती श्रीरामासी ।
श्रीरामे क्षोभोनि आवेशी । त्या दोघांशी शापिलें ॥१५॥
जन्मामध्यें एकदा जाण । तुम्हा दोघा होय मैथुन ।
पुढतीं न घडे स्त्रीगमन । होती संपूर्ण कागवंध्या ॥९६॥
अद्यापि कागाच्या कागदेही । दुसरा गर्भसंभव नाही ।
कागवंध्या म्हणती पाही । लोकी तिही कागसी ॥९७॥

चक्रवाक – चक्रवाकी :

श्रीराम चक्रवाकें देखता नयनी । एकत्र विचरती पै दोनी ।
परती नव्हेती अर्धक्षणीं । गमनागमनीं एकत्र ॥९८॥

एक एव सुखी लोके चक्रवाको विहंगमः ।
पश्य दृष्ट्या मनोरम्या छाययानुगता प्रिया ॥२०॥

या लोकी सुखे सुखिया । पाहता दिसे चक्रवाकिया ।
रुपासवें जैसी छाया । तैसी भार्या अनुगत ॥९९॥
चक्रवाकीसी सांगे कथा । श्रीरामे हरविली सीता ।
मी पत्‍नीसी नव्हे परता । श्रीराममूर्खता मज नाही ॥१००॥
वनी एकली सांडी कांता । मुख्य मूर्खत्व याचे माथा ।
हे ज्ञान नाही श्रीरघुनाथा । निजमूर्खता विलपत ॥१॥
श्रीराम मूर्खशिरोमणी । का गेला निजपत्‍नी सांडोनी ।
तिजलागीं अति दुःखी होवोनी । वनोवनीं हिंडत ॥२॥
निजपत्‍नीसी क्रीडतां । देखोनिया पुढिलाचिया एकांता ।
क्षोभ उपजे श्रीरघुनाथा । उपशांतता धरीना ॥३॥
श्रीराम सीता पुसे त्यांसी । ते न बोलती श्रीरामासी ।
वियोग पावल अहर्निशी । चक्रवाकांसी शापिलें ॥४॥
चक्रवाकें तळमळती । दीने येती काकुळती ।
आमची अवधारी विनंती । कृपामूर्ति श्रीरामा ॥५॥
सीतेची वियोगगती । तुज न साहवे श्रीरघुपती ।
तो वियोग आम्हांप्रती । कैसिया रीती कंठवे ॥६॥
याहूनि श्रीरघुनाथा । अवश्य करी आमच्या घाता ।
तुझेनि हातें मारतां । सुखरुपता आम्हांसी ॥७॥
सूखें सोसेल अंगभंग । परी न साहवे स्त्रीवियोग ।
विनंति ऐकतांचि चांग । श्रीराम अव्यंग तुष्टला ॥८॥
दिवसा दोघा अंगसंगती । वियोग पावाल पै रातीं ।
परी वियोगीं योग शब्दसंगती । शापनिशर्मुक्ति श्रीरामे ॥९॥
श्रीराम पंपातीरीं । सीताविरहाचे अंतरी ।
वदला विचित्र कुसरी । लीलावधारी श्रीराम ॥११०॥
मिथ्या सीतावियोगप्राप्ती । मिथ्याचि ती विरहशक्ती ।
सत्यत्वे दावी श्रीरघुपती । शापोपहती अनुवादे ॥११॥
सर्वा भूती श्रीराम सद्रूप । मिथ्या वियोग मिथ्या शाप ।
मिथ्या विरहाचा प्रताप । चित्स्वरुप श्रीराम ॥१२॥
श्रीराम ज्ञानविज्ञान अभिव्यक्ती । श्रीराम निर्विकल्प ब्रह्ममूर्ती ।
श्रीराम चिन्मात्र दाशरथी । सीतापत परब्रह्म ॥१३॥
सीता ध्येय श्रीराम ध्यान । सीता ज्ञेय श्रीराम ज्ञान ।
सीता चेतना श्रीराम चैतन्य । दोनी अभिन्न एकत्वे ॥१४॥
श्रीराम चित्स्वरुपस्थिती । वर्णिता शास्त्रें मौनावती ।
श्रुति परतल्या नेति नेती । माझी वचनोक्ति ते काय ॥१५॥
पुढील कथानुसंधान । येथोनि ऋष्यमूकातें गमन ।
करावया सुग्रीवासी सौजन्य । श्रीरघुनंदन उद्यत ॥१६॥

ऋष्यमूको गिरिर्यत्र नातिदूरे प्रकाशते ।
यस्मिन्वसति धर्मात्मा सुग्रीवोंऽशुभमः सुतः ॥२१॥

ऋष्यमूक पर्वताकडे :

लक्ष्मणा पाहे सावचित्त । हा ऋष्यमूक महापर्वत ।
येथोनि समीप दिसत । सुशोभित फळी पुष्पी ॥१७॥

ऋष्यमूक असे का म्हणतात ? :

ऋषींनी यज्ञ याग केले येथ । यालागी ऋष्यमूक यातें म्हणत ।
सुग्रीव वसताहे तेथ । प्रधानयुक्त भयभीत ॥१८॥

वालीच्या भीतीने सुग्रीवाने या पर्वताचा आश्रय घेतला :

वाळिभयें भयभीत । सुग्रीव वसे ऋष्यमूकांत ।
वाळीस ऋषि शाप देत । नव्हे सामर्थ्य तेथ यावया ॥१९॥
सुग्रीवाची घ्यावया भेटी । तेथोनि निघाला उठाउठी ।
वाळिभयाची निवटोनि गोष्टी । देऊ सुखसंतुष्टी सुग्रीवा ॥१२०॥
भार्या हरोनि सुंदरी । वाळीनें सुग्रीव गांजिला भारी ।
श्रीराम गांजिल्याचा कैवारी । धनुर्धारी कृपाळु ॥२१॥

अरण्यकांडाची सारांशरुप उजळणी :

संपले अरण्यकांडकोड । किष्किंधाकांड अति गोड ।
त्या कथेचे सुख सुरवाड । श्रोते वारंवार परिसती ॥२२॥
पुरवोनि भरताचे कोड । पादुका देवोनि सुरवाड ।
त्याचे प्रेम वाढवोनि गोड । अरण्यकांड संपविले ॥२३॥
विराध राक्षस प्रचंड । ज्याचे रावणा भय उदंड ।
श्रीरामे त्यासी करोनि दुखंड । अरण्यकांड संपविले ॥२४॥
संघा ( सांबा ) करोनि दुखंड । शूर्पणखेचे नासिकाखंड ।
सकर्ण विंटबोनि तोंड । अरण्यकांड संपविले ॥२६॥
पंचवटीं रण वितंड । खरदूषणां छेदोनि मुंड ।
त्रिशिराचें ठेंचोनि तोंड । अरण्यकांड संपविले ॥२७॥
मायामृगें छळितां दृढ । कपटी मारीच मारिला सुदृढ ।
जाणोनि भविष्याचें वाड अरण्यकांड संपविले ॥२८॥
रावणे जटायु खंडवितंड । दुःखे पसरोनि पाडिला तोंड ।
श्रीरामे सुखी करोनि अखंड । अरण्यकांड सपविले ॥२९॥
सीताशुद्धीचें कैवाड । विलासरुप श्रीराम गोड ।
पुरवोनि पार्वतीचे कोड । अरण्यकांड संपविले ॥१३०॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामे शबरीउद्धरण ।
केले अरण्यकांड संपूर्ण । परिपूर्ण श्रीरामे ॥३१॥
कबंधाचे छेदोनि बंध । तोही मुक्त केला शुद्ध ।
एकाजनार्दनीं परमानंद । स्वानंदकंद श्रीराम ॥३२॥
संपले अरण्यकांड गोड । पुढे किष्किधाकांड अति प्रचंड ।
श्रोते परिसोत निवाड । सुखसुरवाड रामायणीं ॥३३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शबरीउद्धरणं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥
॥ ओंव्या १३३ ॥ श्लोक २१ ॥ एवं १५४ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

*** अरण्यकांड समाप्तम् ***

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग