॥ श्रीएकनाथमहाराजकृत
1.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय पहिला ॥
श्रीरामांचे दंडकारण्यात गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकं अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
कुजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् ॥२॥
श्रीरामनाम महिमा :
श्रीराम चूतवृक्ष प्रबळ । त्यावरी वाल्मीक कवि कोकिळ ।
नारदवसंतें फुटली कीळ । मधुराक्षरी सरळ आलापु केला ॥१॥
त्या मधुराक्षरांमाजी मधुर । श्रीरामनाम हे सुखसार ।
सुखी केले चराचर । सुखे शंकर डुल्लत ॥२॥
उफराटे राम ये अक्षरी । मरा मरा या उत्तरीं ।
नारद वाल्मीका उपदेश करी । दो अक्षरीं उद्धरला ॥३॥
नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध । जो जपे तो पावन शुद्ध ।
श्रीरामनाम जगद्वंद्य । परमानंद हरिनामें ॥४॥
चोरटा वाल्मीक तरे संसारी । हेही नामाची कोण थोरी ।
नाम पावन जगदुद्धारी । नाम उद्धरी महापातक्यां ॥५॥
इतर कवी गज गजरी । वाल्मीक कवि वनगजकेसरी ।
श्रीरामनामें सिंहनाद करी । रानभरी नवरसां ॥६॥
नवरसांचा रसिक । वनरंगडा रघुकुळटिळक ।
श्रीरामनामाचा एकैक श्लोक । सुखदायक नवरसां ॥७॥
हास्यादि नवरसवृत्ती । श्रीरामरसें त्यांसी सुख प्राप्ती ।
वाल्मीकनामाच्या नामोक्तीं । पावन होती कविकुळें ॥८॥
श्रीरामनामेंवीण जे तोंड । ते केवळ जाणा चर्मकुंड ।
भीतरी जिव्हा चामखंड । कवित्वकाटें काटली ॥९॥
ऐकता कथा रामायणी । नवरसपापां होय घुणी ।
नामे उद्धरली कुंटणी । पवित्रवाणी श्रीरामनामे ॥१०॥
श्रीरामकथेची नव्हाळी । शिव वंदी प्रेमसमेळीं । कळा भूतळीं जगद्वंद्य ॥११॥
ते शतकोटी रामायण । येथे आकळू शके कोण ।
तेथे अपुरतें मी दीन । कथा जनार्दन स्वये वदवी ॥१२॥
भरताचे अयोध्येकडे प्रयाण :
करीतां लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जन मानिती अर्दन ।
यालागी नांवे श्रीजनार्दन । निजव्याख्यानशास्त्रार्थै ॥१३॥
असो काय काय बहु शास्त्रार्थै । मुख्य श्रीरामकथा येथे ।
तेंची श्रवण मनन करावे ग्रंथे । सावध चित्ते अवधारा ॥१४॥
भरत आलिया अयोध्येसी । मागे श्रीराम वनवासी ।
काय वर्तले एके दिवसीं । ते कथेसी अवधरा ॥१५॥
प्रतियाते तु भरते वसंरामस्तपोवने ।
लक्षयामास सोव्देगास्तत्रारण्यनिवासिनः ॥३॥
राममासाद्य निरतांस्तानलक्षयदुत्सुकान् ॥४॥
भरत अयोध्ये गेलियावरी । मागे चित्रकूटवासी ऋषीश्वरी ।
अति उद्वेगचित्तेंकरीं । परस्परीं बोलती ॥१६॥
ब्राह्मणांची कुजबूज :
ते येवोनि श्रीरामाप्रती । खुणावोनियां कुजवुजती ।
ते देखोनिया श्रीरघुपती ।साशंकित चित्ती स्वये जाला ॥१७॥
भरत आला होता सैन्येंसीं । कांही उपद्रव जाला ऋषींसीं ।
किंवा कांही मजपासी ।अधर्मासी देखिले ॥१८॥
अथवा लक्ष्मणे यासी । कांही दिधले अपमानासी ।
किंवा कांही सीतेपासीं । अधर्मासी देखिले ॥१९॥
ऐसी अति चिंता श्रीरामासी । तंव ते कळो सरलें जाबाली ऋषीसी ।
तो येवोन श्रीरामापासीं । सत्वरेंसीं बोलत ॥२०॥
कृतांजलिरुवाचेढमृर्षिर्जाजलिकस्तदा ।
अथर्षिर्जरया वृद्धस्तपसा नियतेंद्रियः ॥५॥
चलनं तात वैदेह्यास्तपस्विषु विशेषतः ।
त्वन्निमित्तमिदं तावत्तापसान्प्रति वतर्त ॥६॥
जाबाली ऋषींकडून वृत्तांतकथन :
जाबाली ऋषि अति वृद्ध । तापसामाजी अति प्रसिद्ध ।
इंद्रियनेमीं अति अगाध । प्रज्ञाप्रबुद्ध ऋषिवर्य ॥२१॥
ऐसा जो का ऋषि जाबाली । तेणे करोनिया कृतांजळी ।
मृदु मधुर वाक्यें मंजुळी । श्रीरामाजवळी बोलत ॥२२॥
श्रीरामापासोनि दुश्चरित । न घडे जागृतिस्वप्नसुषुप्तींत ।
तुझेनि नामे दुष्कृती तरत । तो तू सांशकित का होसी ॥२३॥
तुझेनि मुखचंद्रें चंद्र निष्कळंक । त्या तुझे देखता श्रीमुख ।
कोटिजन्मांचे हरे दुःख । परम सुख कोंदाटें ॥२४॥
लक्ष्मणापासोनि अनुचित । मूर्खही सत्य न मानित ।
तुझिया भक्तापासोनि अकृत्य । न घडे निश्चित श्रीरामा ॥२६॥
निजभक्ताचे अनुचित । ते तू करिसी अति पुनीत ।
प्रल्हादे करविला पितृघात । किर्ति लोकांत अति पावन ॥२६॥
प्रल्हादाचा पितृघात । वंद्य केला त्रैलोक्यात ।
जे निजमायेचा करिती अंत । ते ते अति आप्त मानिसी ॥२७॥
मातृघात पितृघात । जे जे करिती तुझे भक्त ।
ते ते मानिसी परम आप्त । अति पुनीत तिही लोकी ॥२८॥
मातृघातकी परशुराम । पितृघातकी प्रल्हाद परम ।
या दोघांचे स्मरतां नाम । भेटे श्रीराम स्वानंदे ॥२९॥
प्रल्हाद भक्तमुकुटमणी । पढविला प्रातःस्मरणीं ।
दुजा ब्रह्मचारिशिरोमणी । वेदीं पुराणीं वानिजे ॥३०॥
यांहूनि सौमित्र परम भक्त । सखा आणि अति पुनीत ।
यापासोनि अनुचित । न घडे निश्चित श्रीरामा ॥३१॥
सीता तुझी धर्मपत्नी । अयोनिजा जनकनंदिनी ।
अधर्म तियेपासोनी । जागृती स्वप्नीं घडेना ॥३२॥
अधर्माची आशंकता । तुम्हांमाजी नाही श्रीरघुनाथा ।
ऋषि बोलती जे वार्ता । ते ऐक आता सांगेन ॥३३॥
जनस्थानी वसते जे जन । त्या तापसांचें अति कंदन ।
राक्षसी केले अन्योन्य । ते भय संपूर्ण सांगती ऋषिवर्य ॥३४॥
त्या महाभयाची वार्ता । ऋषी शंकले तुज सांगता ।
मजहातीं तुज श्रीरघुनाथा । तिही हे कथा सांगविली ॥३५॥
तापसां करी कोण बाधु । ऐसा पुसती संबंधु ।
रावणाचा धाकटा बंधु । खर नामे अगाध राक्षस तो ॥३६॥
त्रिशिला आणि खर दूषण । हे तिघे बंधु सखे जाण ।
चवदा सहस्त्र रक्षससैन्य । जनस्थानी बसविलें ॥३७॥
त्या राक्षसांभेणें भयभीत । तुझा आश्रम करोनि येथ ।
ऋषी राहिले समस्त । त्या राक्षसा अंत श्रीराम ॥३८॥
राक्षसांच्या युद्धाची भीती :
परी आजी आली असे नवी वार्ता । तेणे भय भारी ऋषीतें समस्ता ।
तुज सांडोनि श्रीरघुनाथा । आणिका पर्वता जाऊ पाहती ॥३९॥
राक्षस खराप्रति सांगत । श्रीरामासवे ऋषी समस्त ।
राहिले चित्रकूटांत । तो स्वये येथ येऊ इच्छी ॥४०॥
ससैन्य बंधु तिघे जण । रातोराती घाला घालून ।
मारोनि रामलक्ष्मण । सीता आपण नेऊ पाहती ॥४१॥
सन्मुख यावे तुम्हांप्रती । तंव तुम्ही परमपुरुषार्थी ।
हा धाक सदा वाहती । तुमची ख्याती कळली असे ॥४२॥
ताटका वधिली एके बाणे । सुबाहु घेतला प्राणें ।
मारीच उडविला सत्राणे । त्यासी जुंझणें प्राणांत ॥४३॥
धनुष्यें रावणा लाविली ख्याती । ते मोडिलें घेवोनि हाती ।
त्यासी युद्ध न घडे निश्चिती । निद्रिस्त रातीं मारावें ॥४४॥
हा राक्षसी केला इत्यर्थ । तेणे ब्राह्मण चळी कांपत ।
तुझ सांगवया साशंकित । ते म्या समस्त श्रुत केले ॥४५॥
ऐके श्रीरामा निश्चित । तेथे वन आहे अति गुप्त ।
धाके ऋषी जाताती समस्त । तुम्हींही तेथे शीघ्र यावे ॥४६॥
बहुमूलफलं चित्रमविदूरादितो वनम् ।
सबांधव इतो गच्छ यदि चित्तं प्रवर्तते ॥७॥
गुप्तस्थानी जाण्याची सुचना :
निकट वन अति गहन । अतर्क्य तर्केना गुप्तस्थान ।
फळ मूळ गंगाजीवन । विश्रामस्थान वस्तीसी ॥४७॥
तेथे यावे तुम्ही तिघें जणीं । ऐसे ऋषीश्वरांचे मनी ।
ते गुह्य बोलता कानी । जालीं तुझ्या मनी आशंका ॥४८॥
हात जोडोनि समस्तांसी । श्रीराम विनवी ऋषीश्वरांसी ।
सुखे असावे आश्रमासी । त्या राक्षसांसी मी जाणे ॥४९॥
संरक्षावे गोब्राह्मण । हेचि व्रत स्वधर्माचरण ।
मी श्रीराम असता रक्षण । भय तुम्हांलागून पै नसे ॥५०॥
बाणी भेदीन मेरुगिरी । मारीन राक्षसांच्या हारी ।
मी रघुवीर असता सेवक घरी । कैसियापरी भय तुम्हा ॥५१॥
ऐसे बोलता श्रीरामासी । विचार करिती अवघे ऋषी ।
तिन्ही धुरा दळबळेसीं । केंवी दोघांसी आकळती ॥५२॥
एक घेवोनि पळेल सीता । एकला उरेल श्रीराम झुंजतां ।
समस्त राक्षसांच्या घाता । कैसा साहता तो होय ॥५३॥
सुबाहु मारिला तत्वता । तै जवळी नव्हती सीता ।
दोघे बंधु एकात्मकता । केले घाता सुबाहुच्या ॥५४॥
राक्षसांच्या प्रचंड सेनेपुढे तिघांचा पाड कसा लागणार :
स्त्रियेचे चिंतेकरितां । धैर्य नुरे पुरुषार्था ।
स्त्रीलोभ हृदयी असता । जयो सर्वथा न पाविजे ॥५५॥
तीन्ही धुरा भद्रजाती । श्रीराम झुंजेल एकला किती ।
चारी शर निरसोनि जाती । मग पळती माघारे ॥५६॥
हृदयी स्त्रीलोभ असता । युद्धी नुरे एकाग्रता ।
मंत्रबीज गिळी चिंता । जयो सर्वथा न पाविजे ॥५७॥
हे तिघे वनी गुप्त होती । मग राक्षस आम्हासीं भक्षिती ।
याची सांडोनिया संगती निघा निश्चिती अवघेही ॥५८॥
युक्ति सांगती श्रीरामाप्रती । तुम्ही दोघे जण पुरुषार्थी ।
तरी न रहावे येथिले वस्ती । यावे निश्चिती आम्हासवें ॥५९॥
राक्षस धर्मयुद्धी नव्हेती । छळणें पळणे त्यांची शक्ती ।
सिंतरोनियां नाना युक्ती । मग मारिती सुरवरांतें ॥६०॥
राक्षस निशाचर होती । येवोनियां रातोराती ।
निदसुरा तुम्हा मारिती । तुमची शक्ति ते काय ॥६१॥
ऐसे बोलता ऋषीश्वर । राम नेदीच प्रत्युत्तर ।
ब्राह्मणांमाजी विकल्प थोर । धैर्यनिर्धार असेचिना ॥६१॥
विश्वास नाही ब्राह्मणांसी । माझी संगति न घडे यांसी ।
त्यागोनियां श्रीरामासी । निघाले ऋषी तत्काळ ॥६३॥
रहावया एकरात्री । धीर न धरवे ब्राह्मणांप्रती ।
त्यागोनियां श्रीरघुपती । अन्यत्रगती निघाले ॥६४॥
श्रीरामांच्या नकारामुळे ब्राह्मणांचे तेथून प्रयाण :
अधैर्ये ते कंपायमान । आज्ञा पुसती ब्राह्मण ।
श्रीरामे करोनिया नमन । म्हणे आपण सुखे जावे ॥६५॥
अविश्वासी द्विजवरें । हाती स्त्रिया कडिये लेंकरें ।
माथा घेवोनि यज्ञपात्रे । आश्रमांतरा ऋषी गेले ॥६६॥
सचिंतेषु प्रयातेषु तपस्विषु विशेषतः ।
विवृद्धं राक्षसं दृष्ट्वा रामोSपि गमनोत्सुकः ॥८॥
लक्ष्मणोSपि प्रयातेषु तपस्विषु विशेषतः ।
न तत्रारोचयव्दासं वैदेही च सुमध्यमा ॥९॥
मग श्रीराम विचारी निजमनी । राक्षस वाढले जनस्थानी ।
तयांच्या बीजनिर्दळणीं । आजि येथोनि निघावें ॥६७॥
सीता म्हणे श्रीरघुनाथा । समस्त ऋषी गेले असता ।
येथे राहणे रुचेना आता । आजचि तत्वता निघावे ॥६८॥
मग बोलिला लक्ष्मण । ऋषीश्वर गेले भयभीतमन ।
ते भय निर्दळवाया आपण । शीघ्र प्रयाण करावे ॥६९॥
करावे राक्षसनिर्दळण । तेणे श्रीरामा उल्हास पूर्ण ।
तेणे सर्वांगा आले स्फुरण । दंडकारण्य शोधावया ॥७०॥
बाहु थरकती समूळी । पिंजारल्या रोमाबळीं ।
करावया राक्षसांची होळी । महा आतुर्बळीं श्रीराम ॥७१॥
उल्हास श्रीरामाचे चित्ता । सौमित्रासी हौय सांगता ।
घेवोनिया आयुधां समस्ता । सहितसीता निघें वेगी ॥७२॥
एकाजनार्दना शरण । चित्रकूटवस्ती त्यावोनि जाण ।
केले श्रीरामे प्रयाण । दंडकारण्यप्रवेशा ॥७३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
दंडकारण्यगमनं नाम प्रथमोSध्यायः ॥१॥
॥ ओंव्या ७३ ॥ श्लोक ९ ॥ एवं ८२ ॥
