॥ श्रीएकनाथमहाराजकृत
20.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय विसावा ॥
उमा व श्रीराम यांचा संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पौणिमेच्या रात्री गवताच्या अंथरुणावर पहुडले असता श्रीरामांचा झालेला मनःक्षोभ :
पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।
करिता जाला सूखें शयन । करी पादसंवाहन सौमित्र ॥१॥
चंद्रादय मनोहर । चंद्रकिरण अति सुकुमार ।
अंगी लागता श्रीरामचंद्र । उठी सत्वर गजबजोनी ॥२॥
सौमित्रे ननु सेव्यतां तरुतलं चंडांशुरुज्जंभते ।
चंडांशोर्निशि का कथा रघुपते चंद्रोयऽमुन्मीलति ।
वत्सैतद्भवता कथं नु विदितं धत्ते कुरंगं यतः ।
क्वासि प्रेयसि हा कुरंगनयने चंद्रानने जानकि ॥१॥
श्रीराम म्हणे लक्ष्मण । खडतर सूर्याचे किरण ।
मज बाधिती दारुण । बैसू दोघे जण तरुतळीं ॥३॥
तंव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा । रात्रीं कायसी सूर्याची कथा ।
हा अमृतांशु चंद्र तत्वता । निववी समस्ता निजकिरणी ॥४॥
जरी हे चंद्रबिंब सांगसी पूर्ण । सौमित्रा तुज हे कैसे ज्ञान ।
बिंबीं देखोनिया मृगचिन्ह । चंद्रलक्षण मी जाणे ॥५॥
जरी हे चंद्रबिंब निजचिन्ही । एकत्र देखतसों नयनी ।
तरी मृगनयना चंद्रवदनेसी । जनकनंदिनी ते कोठे ॥६॥
जरी मृगचिन्ह चंद्र देखसी । तरी मृगनयना चंद्रवदनेंसीं ।
सीता दाखवीं मजपासीं । म्हणोनि उसकाबुकसीं स्फुंदत ॥७॥
हा हा सीता प्रियकांता । सुखरुपा जनक्दुहिता ।
लक्ष्मणा कोठे आहे सीता । दूःखावस्था अनुवादे ॥८॥
पाठींसी उभी माझी सीता । पुढे पळे जनकदुहिता ।
लक्ष्मणा धांव धांव तत्वता । रुसली कांता बुझावीं ॥९॥
सवेचि बोले आन आन । चंद्रे द्वंद्व मांडिलें जाण ।
खडतर तावितात किरण । तापलों पूर्ण सौमित्रा ॥१०॥
चंद्रश्चंडकरायते मृदुगतिर्वातोऽपि वज्रायते ।
माल्यं सुचिकुलायते मलयजो लेपःस्फुलिगायते ।
रात्रिः कल्पशतायते विधिवशात्प्राणोऽपि भारायते ।
हात हंत प्रमदावियोगसमयः संहारकालायते ॥२॥
कामज्वराची पीडा व श्रीरामाची मनःस्थितीः :
लक्ष्मणा सावध ऐके तू आता । चंद्रमा दवडीं गां परता ।
न चवे तरी करीन घाता । संतापता मज तावी ॥११॥
लक्ष्मण घाली शीतल वारा । म्हणे तू द्वंद्वा पेटलासी सौमित्रा ।
मज हाणिसी वज्रधारा । दशशिरा मिनलासी ॥१२॥
येथोनि ठऊठ जाय परता । करु आलासी माझे घाता ।
ऐसा विरहज्वर श्रीरघुनाथा । संतापता अति तावी ॥१३॥
शीतोत्पली सुमनशेजार । तेथे निजविला श्रीरामचंद्र ।
तंव सुयानीं खिळिलें सर्व शरीर । आप्त सौमित्र मज द्वंद्वी ॥१४॥
जो तू होतासी सुमित्र । तो तू जालासी कुमित्र ।
सुयांनी खिळिलें सर्व गात्र । वृथा वैर का करिसी ॥१५॥
सवेग निघावया धगी । बावन्न चंदन लाविले अंगी ।
क्रोधे श्रीराम बोले वेगी । आगी सर्वांगी लाविली ॥१६॥
सीताविरहे अति विव्हळ । त्यावरी लाविले त्वा विंगळ ।
न भेटतां जनकबाल । प्रळयकाळ मज आला ॥१८॥
सीतेचे वियोगविरहे । सूर्य निमाला रे नेणो काये ।
रात्रि आली कल्पप्राये । करु मी काय सौमित्रा ॥१८॥
मजसी वैर चालवी चंद्र । वैरा पेटला सौमित्र ।
वायु चालवी वैराकार । वज्रधार मज लागे ॥१९॥
सीतावियोगविरहें जाण । माझा निघों पाहे प्राण ।
सौमित्रा वेगी रची सरण । अलोट मरण मज आले ॥२०॥
ऐसे बोलता । सवेंचि धांवे म्हणे सीता ।
वृक्षांसि म्हणे माझी कांता । गुल्मलता आलिंगी ॥२१॥
सीता म्हणोनिया जाण । श्रीराम चुंबी पाषाण ।
धांवोनि हृदयी धरी तृण । सीता संपूर्ण हे माझी ॥२२॥
लक्ष्मणासी म्हणे तू सीता । तूचि माझी निजकांता ।
ऐसी सीतेची अवस्था । श्रीरघुनाथा अति भ्रांती ॥२३॥
मी येथे सौमित्रा सांग कोण । तू श्रेष्ठ सखा स्वामी संपूर्ण ।
स्वामित्व मज कैंचें जाण । अयोध्यापति संपूर्ण श्रीराम ॥२४॥
तू मजपासीं कैंचा कोण । हर हर मी काय सांगू आपण ।
नित्यानुवर्ती लक्ष्मण । मज सेवक संपूर्ण आज्ञाधारी ॥२५॥
तरी वनी का हिंडसी एकाकी । प्रियप्राप्तीच्या अनुलक्षीं ।
प्रिया कोण कैंची की । तुझी भार्या जानकी जनकात्मजा ॥२६॥
ऐसी आठवण देता । जानकी आठवली चित्ता ।
हा हा केउती गेली सीता । भेटवी आता सौमित्रा ॥२७॥
श्रीरामांची ही अवस्था पाहून पार्वतीने श्रीशंकरांना केलेला प्रश्न :
ऐसे देखोनि श्रीरामासी । उमा विनवी महेशासी ।
कांहींएक पुसेन तुम्हांसी । ते निश्चयेंसी मज सांगा ॥२८॥
तुम्हींच सांगितले आपण । श्रीराम प्ररब्रह्म पूर्ण ।
त्यांचे स्वरुप ते कोण । कृपा करुन मज सांगा ॥२९॥
म्हणोनि घातले लोटांगण । मस्तकी धरिले दोनी चरण ।
मग तीस उठवोनि जाण । शिव आपण स्वये सांगे ॥३०॥
वनामाजि जो विचरत । सीतेलागी आर्तभूत ।
पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ । जाण निश्चित पार्वतिये ॥३१॥
पार्वती म्हणे विषयासक्त । स्त्रीकामार्थी अति लोलुप्त ।
शिव म्हणे तेंचि सदोदित । ब्रह्म रघुनाथ पार्वतिये ॥३२॥
शिवाचे उत्तराने उमेचे उपहासगर्भ हास्य :
उमा म्हणे रडत पडत । अहर्निशों तडफडत ।
सीतेलागीं चरफडत । तरी ब्रह्म रघुनाथ शिव म्हणे ॥३३॥
तुम्हांसी काय हेंचि ध्यान । तुम्हांसी काय हेंचि चिंतन ।
शिव म्हणे ज्ञानविज्ञान । आम्हा ब्रह्म पूर्ण श्रीराम ॥३४॥
विषयकामी कामासक्त । धन्य धन्य हे दोघे देवभक्त ।
ऐसी उमा उपहासें हांसत । ब्रह्म रघुनाथ शिव म्हणे ॥३५॥
रडत पडत तरफडत । विषयकामी कामासक्त ।
तरी परब्रह्म श्रीरघुनाथ । जाण निश्चित पार्वतिये ॥३६॥
शिवाच्या अनुज्ञेने रामांची कसोटी पाहण्यासाठी निघते :
उमा म्हणे महेशासी । जरी म्या ठकविले श्रीरामासी ।
तरी शिव म्हणे पार्वतीसी । ब्रह्मत्व त्यासी पै नाही ॥३७॥
तुमचे जालिया आज्ञापन । क्षणार्धे छळीन रघुनंदन ।
शिव म्हणे तो सावधान । सुखे छळण तू करी त्यासी ॥३८॥
ऐसे शिवासीं बोलता । उमा स्वये जाली सीता ।
मग छळावया श्रीरघुनाथा । अतिलाघवता छळणार्थी ॥३९॥
सीतेचे रुप घेऊन उमा रामांकडे जाते :
हा हा सीता स्वये म्हणत । वनी विचरे श्रीरघुनाथ ।
तंव त्यासन्मुख योगोनि ओ म्हणत । उमा वनांत पै आली ॥४०॥
ओ म्हणोनि रामापुढें । राम सीता म्हणे आणखीकडे ।
ते तंव येओ तिकडे । तंव श्रीराम म्हणे आणखीकडे सीता ॥४१॥
जंव जंव ते ये रामासन्मुख । तंव तंव श्रीराम होय तिसी विमुख ।
हा हा सीते फोडोनी हाक । अधोमुख विलपत ॥४२॥
तंव लक्ष्मण विचारी निजचित्ता । वृक्षपाषाणां म्हणे सीता ।
ते जानकी सन्मुख असता दुःखावस्था का श्रीरामा ॥४३॥
त्या उमारुपी सीतेची उपेक्षा केलेली पाहून लक्ष्मणाला आश्चर्य :
तंव लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । दुःख का करिता भेटली सीता ।
तंव त्यासी हाणूं धांवे लाता । बोल बोलता मारुं पाहे ॥४४॥
मग सौमित्र म्हणे कोपसी वृथा । पैल सन्मुख उभी सीता ।
ऐसे बोलणें ऐकता । शस्त्रे घाता करु धांवे ॥४५॥
सौमित्र आम्ही तुम्ही सहोदर । तो तू मजसी करिसी वैर ।
येथे कैची सीता सुंदर । दुःख दुर्धर मज आले ॥४६॥
अति भ्रांति श्रीरघुनाथा । मारुं धांवे सीता सांगता ।
लक्ष्मण म्हणे न बोले आता । बोलों जाता मारील ॥४७॥
सन्मुख भेटलीसे सीता । तेचि प्रबोधील श्रीरघुनाथा ।
आता मी न बोले सर्वथा । म्हणोनि मौनावस्था लक्ष्मणी ॥४८॥
तसेच स्वर्गस्थ देवांनाही गूढविस्मय :
तंव स्वर्गी सुरवरा समस्ता । ओढवली प्रमावस्था ।
बंदीं सुटोनि लंकानाथा । वना सीता केंवी आली ॥४९॥
विस्मय करिती ऋषीश्वर । विस्मय करिती सुरवर ।
जे ठकवूनिया दशशिर । सीता सुंदर वना आली ॥५०॥
ऐसे ब्रह्मा मानी अपूर्वता । भस्म करोनि लंकानाथा ।
वना आली सती सीता । तेणे विधाता विस्मित ॥५१॥
पार्वती स्वये जाली सीता । हे न कळे ब्रह्मादिका समस्ता ।
ते कळलें श्रीरघुनाथा । सर्वांगें ज्ञाता श्रीराम ॥५२॥
श्रीराम अलिप्त ज्ञाने ज्ञाता । त्यासी मानिती अति भ्रांतता ।
पुढे काय वर्तली कथा । सावधानता अवधारा ॥५३॥
नंतर ती सीतास्वरुपी उमा श्रीरामांना प्रश्न करिते :
लक्ष्मण राहिला धरोनि मौन । मग सीता जल्पे रघुनंदन ।
तंव कृत्रिम सीता धरी धांवोन । सावधान व्हावे तुम्ही ॥५४॥
मी जवळीच उभी असता । व्यर्थ का धांवा म्हणा सीता ।
स्त्रीविरहें रडतां पडता । लाज सर्वथा न ये तुम्हा ॥५५॥
पूर्वी बोलोनि निजमहिमान । मी श्रीराम नित्य सावधान ।
ते स्त्रीविरहें बुडाले ज्ञान । अति अज्ञान जालेती ॥५६॥
अज्ञानाची अगाध मात । बुडविला प्रपंच आणि स्वार्थ ।
सखा बंधु भक्त विनवित । त्याचाच घात करु धांवा ॥५७॥
सखा बंधु आणि भक्त अनन्य । त्यांचे करु धांवा हनन ।
बुडाले प्रवृत्तीचें ज्ञान । ब्रह्मज्ञान तुम्हा मग कैंचें ॥५८॥
मज क्षण एक न भेटता । जड मूढ जालेती भ्रांत अवस्था ।
प्रवृत्तिज्ञान नाठवे चित्ता । मग परमार्थता तेथे कैंची ॥५९॥
वनी मी राहोनि अति गुप्त । तुमचे पाहिले आचरित ।
तंव तुम्ही जालेती अति भ्रांत । मग धांवत मी आले ॥६०॥
स पण्डितो नरश्रेष्ठ प्राज्ञः कर्मविदां वरः ।
अप्राज्ञ इव कि राम भायहितोर्विमुह्यसे ॥३॥
पूर्वी मी म्हणसी आत्मा तत्वता । परी स्त्रीविरहें तोचि आता ।
कर्म करोनि अकर्तात्मता । जडमूढता अति भ्रांत ॥६१॥
जरी वियोगें भ्रांति मोठी । तरी तुम्हा आम्हा जाली भेटी ।
आंता भ्रांति सांडोनिया पोटी । पंचवटीं जाऊ दोघें ॥६२॥
मर्यादा वर्षे चतुर्दश । आम्ही करावा वनवास ।
आता उरले असती षण्मास । अयोध्येस मग जाऊ ॥६३॥
श्रीराम तिचे सत्य स्वरुप ओळखून तिला तुकाई जगदंबा अशी हाक मारतात :
श्रीराम म्हणे तूकाई । तेंची नाम लोकांच्या ठायी ।
अद्यापि राहिलेंसे पाही । म्हणती तुकाई जगदंबा ॥६४॥
तुकाई नामे नामभिधान । ते जगदंबेचें निजस्थान ।
अद्यापि पूजिती जन । अति पावन दंडकारण्यीं ॥६५॥
श्रीरामवरदायिनी माता । तुकाई म्हणती रामवाक्यार्था ।
पुढे काय वर्तली कथा । सावधान श्रोतां परिसावी ॥६६॥
हांसोनि बोले श्रीरघुनंदन । माते तुज आलो लोटांगण ।
तुवा माझे न करावे छळण । मी अनन्य दीन शिवाचें ॥६७॥
श्रीराम म्हणे सीतेसी माता । तो विस्मय लक्ष्मणाच्या चित्ता ।
आश्चर्य सुरवरा समस्ता । नोळखे कांता ऋषी म्हणती ॥६८॥
श्रीरामांच्या प्रश्नाने उमा उद्विग्न व तिची शरणागती :
श्रीराम म्हणे पुढती तिसी । एकले सांडोनि शिवासी ।
सीतारुपे छळवयासी । तू का आलीस जननीये ॥६९॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । सीतेची स्वरुपता सांडोन ।
उमा घाली लोटांगण । श्रीराम सर्वज्ञ छळवेना ॥७०॥
शिव बोलिला सत्यवचन । श्रीराम नित्य सावधान ।
त्यासी तुझे न चले छळण । ते प्रमाण मज आले ॥७१॥
मी शिवाची शिवशक्ती । सीता जाले अतर्क्ययुक्ती ।
ब्रह्मादि देव मज नेणती तुवा श्रीरघुपती ओळखिलें ॥७२॥
श्रीरामाचे अगाध ज्ञान । न चले छळण छद्मकामन ।
ऐसी बाणली उमेसी निजखूण । मग धरोनि चरण पुसतसे ॥७३॥
खर्या स्वरुपाचे ज्ञान सांगण्याविषयींच्या उमेच्या विनंतीवरुन,
ते ज्ञान शिवापासूनच प्राप्त करण्याचा श्रीरामांचा तिला आदेश :
तू सर्वार्थसर्वज्ञ संपूर्ण । अवलंबोनियां संभ्रांतपण ।
आलिंगावया तृण पाषाण । हे काय कारण मज सांगे ॥७४॥
सीताविरहे कामकामन । तुज नाही अणुप्रमाण ।
ते बाणाली खूण संपूर्ण । जे ब्रह्म परिपूर्ण श्रीराम ॥७५॥
दुर्धर धरोनि पिशाचता । विरहेंवीण सीता सीता ।
म्हणोनि वनोवनीं धांवता । रडता पडता का होसी ॥७६॥
ऐसे बोलोनि आपण । मग उमा धरी श्रीरामचरण ।
तुझी स्थिति हे संपूर्ण । कृपा करोन मज सांगे ॥७७॥
तंव श्रीराम म्हणे माझी स्थिति गती । सदाशिव जाणे निश्चिती ।
तो सांगेल तुजप्रती । स्वमुखें कीर्ति नये सांगूं ॥७८॥
ज्ञानप्राप्ती करुन घेणर्या शिष्याची चित्तशुद्धी असणे आवश्यक :
जरी सांगांवें कृपाविधी । तरी पाहावी पात्रशुद्धीं ।
न व्हावा छळवादी । वादी विवाद नसावा ॥७९॥
न व्हावा धूर्त ज्ञानवंचक । नास्तिक दुजा शब्दवंचक ।
नीतिशात्रीं करी कुतर्क । आळसी वंचक न व्हावा ॥८०॥
द्रव्यदारत्यागोन्मुख । शोधित सत्वाचा सात्विक ।
पूर्ण परार्थी सविवेक । त्यासी परिपाक सांगावा ॥८१॥
तुझे अंगी ज्ञानभिमान । न मानोनि शिवाचें वचन ।
माझे करु आलीस छळण । तुज आपण केंवी सांगों ॥८२॥
नाही पतिवचनीं कर्तव्यार्था । नाही गुरुवचनीं भावार्थ ।
तु सांगों नये गुह्यार्थ । ऐसे श्रीरघुनाथ बोलिला ॥८३॥
पश्चात्तापदग्ध उमेची श्रीरामांची प्रार्थना :
ऐसे ऐकोनि श्रीरामवचन । उमा संकोचली मनी संपूर्ण ।
पतिवचन गुरुवचन । उल्लंघन म्या केले ॥८४॥
न मानोनि शिवाचें वचन । छळू आले रघुनंदन ।
जळो माझा ज्ञानाभिमान । करी रुदन अनुतापे ॥८५॥
ज्ञानभिमानाचें लक्षण । भेटल्या साधु सज्जन ।
जो शोधून पाहे दोषगुण । त्याचे छळण करावया ॥८६॥
छळणें छळवेना श्रीरघुनाथा । शेखी मज कोपसी ना सर्वथा ।
तेणे मज पालट जाला चित्ता । ऐक आता सांगेन ॥८७॥
त्यामुळे रामांचे समाधान व रहस्य स्पष्टीकरण :
तुझे होतांचि दर्शन । ज्ञानाभिमाना जाले दहन ।
छळच्छद्म गेले जळोन । तुझी आण श्रीरामा ॥८८॥
ऐकोन तिचे सत्य वचन । कृपें द्रवला श्रीरघुनंदन ।
आपुलें अतर्क्य गुह्य ज्ञान । सांगे आपण सद्भावे ॥८९॥
उमे ऐके सावधान । पूर्वी हे वो ऋषिजन ।
माझे प्राप्तीलागोन जाण । केले अनुष्ठान निष्कामे ॥९०॥
माझे पावावया चरण । त्यांचा सद्भाव संपूर्ण ।
सांडोनि सर्वही अभिमान । तृण पाषाण होवोनि ठेले ॥९१॥
एक ते वृक्ष होवोनी तिष्ठत । एक ते झाले पर्वत ।
एक ते तृणपाषाण होत । मी तेथे तेथे स्वये धांवें ॥९२॥
त्यांचा भावार्थ देखोन । परम प्रीतीनें दे अलिंगन ।
त्यांसी तू म्हणसी तृणपाषाण । पिसे पूर्ण मज म्हणसई ॥९३॥
ते तंव निरभिमानी भक्त । भक्तभावार्थी मी रघुनाथ ।
प्रीतीनें भक्त गिंवसित । स्वये धांवत वनोवन ॥९४॥
भक्त उद्धरावयाकारणें । रडणे पडणे अडखळणें ।
पर्वतोपर्वती धांवणे । आणि आलिंगनें वृक्षांसी ॥९५॥
उमे जाण तू निश्चित । माझे पाऊल न पडे व्यर्थ ।
जाणे सदाशिव समर्थ । तुझा भावार्थ तो नाही ॥९६॥
गाळींव भावाचा भावार्थ । सर्व भूती श्रीभगवंत ।
हाचि मुख्यत्वें परमार्थ । निजस्वार्थ परमार्थ ॥९७॥
गूळाचें कारले केले । ते सकंटक कडू नाही जाले ।
तेवी ब्रह्मवृत्तीं कर्म केले । ते मुकले बंधुत्वा ॥९८॥
साकरेचें वृंदावन फळ केले । कडू म्हणता ते स्वये ठकले ।
तेंवी साधूचें कर्म निंदोनि बोले । ते ते गेले अधःपाता ॥९९॥
साधूंची सच्चिद् गरिमा । अतर्क्य त्यांचे कर्म प्रेमा ।
ते नाकळिती मोहभ्रमा । अगाध महिमा साधूंचा ॥१००॥
ते तू म्हणसी तृणपाषाण । तरी त्या साधूंसी ब्रह्म पूर्ण ।
ऐसे ऐकोनि श्रीरामवचन । मूर्च्छापन्न पार्वती ॥१॥
मी एक शक्ती तो शिव । हे नाठवे पर्वापूर्व ।
श्रीरामासी रुप ना नांव । भावाभाव विसरली ॥२॥
अह कोहं सोहंपण । येणे नासिलें मीतूंपण ।
कोंदाटले ब्रह्म परिपूर्ण । समाधान शिवप्रिये ॥३॥
करिता श्रीरामाच्छळणोक्ती । समाधि पावली पार्वती ।
ऐसी संतांची संगती । उपकारार्थी अपकारियां ॥४॥
पावोनि पूर्ण समाधान । उमा जाली सावधान ।
त्रैलोक्य देखे चैतन्यघन । श्रीराम पूर्ण तुष्टला ॥५॥
श्रीरामांचा उपदेश :
श्रीराम म्हणे अहो माते । कांहीएक सांगेन तूंते ।
तंव उमा म्हणे सर्वस्वार्थे । तुझे आज्ञेनें नुल्लघीं ॥६॥
उमा धांवोनि उल्लासतां । श्रीरामचरनीं ठेविला माथा ।
तुझेनि जाले सुखरुपता । काय मी आता अनुवादू ॥७॥
मिथ्या व म्हणावें शिववचन । कोणाचे न करावे ढळण ।
हेंचि मागतों मी आपण । कृपा पूर्ण करी माते ॥८॥
श्रीरामा तुझे देखता चरण । छळणादि वृत्तींसी जाले धन ।
न करी शिवाज्ञाहेळण । ब्रह्मपरिपूर्ण परिपाक ॥९॥
उमेचे आश्वासन :
तुझे ऐकतांचि वचन । जाले अविद्येचे दहन ।
निमाले दळण आणि हेळण । तुझी आण श्रीरामा ॥११०॥
तुझेनि वचनें श्रीरघुनाथा । पावले सुखसायुज्यता ।
मग चरणी ठेवोनि माझे । गेली उल्लासता कैलासा ॥११॥
लक्ष्मणावर व इतरांवरही या अद्भुत घटनेमुळे परिणाम :
उमेने केलिया नमन । सौमित्रे स्वये धांवोन ।
मस्तकी धरिले श्रीरामचरण । काय आपण बोलत ॥१२॥
मी म्हणे हेचि आमची सीता । तंव ते शिवाची शिवकांता ।
भली ओळखिली श्री रघुनाथा । सर्वज्ञ सत्य तू श्रीरामा ॥१३॥
देखोनि उमेची स्थिति गती । ब्रह्मादिक विस्मित चित्ती ।
आम्ही म्हणो हे सीता सती । श्रीरामे पार्वती ओळखिली ॥१४॥
आम्ही म्हणो सीताविरहे भ्रांत । परी अचुक ज्ञाता भ्रमांत ।
याचा न कळे निजवृत्तांत । ब्रह्म सदोदित श्रीराम ॥१५॥
रडणे पडणे स्वैर धांवणे । देखोनि जग पिसे म्हणे ।
श्रीराम विचरे ब्रह्मपणें । जग उद्धरणे श्रीरामा ॥१६॥
देखोनि श्रीरामाची स्थिती । ब्रह्मादि देव विस्मित चित्ती ।
मग तिही वंदोनि श्रीराममूर्ती । गेले निश्चिती निजधामा ॥१७॥
फितली देवांची निजभ्रांती । आणि लक्ष्मण पावला विश्रांती ।
अगाध श्रीरामाची स्थिती । नामे उद्धरती जडजीव ॥१८॥
एकाजनार्दना शरण । पुढे सीतागवेषण ।
करु निघाले श्रीराम लक्ष्मण । हेंही निरुपण अवधारा ॥१९॥
उमा-शिव संवादाचा मूळ आधार शिवरामायण :
श्रीरामउमासंभाषण । यासी मूळ शिवरामायण ।
ते ग्रंथींचे निरुपण । श्रोते सज्ञान जाणती ॥२०॥
मूळ रामायण शतकोटी श्लोकसंख्येचे होते :
संख्या शतकोटी समस्त । श्रीरामायण मूळ ग्रंथ ।
सुर नर पन्नग यथार्थ । कलह करीत पै आले ॥२१॥
त्याची विभागणी करण्याच्या बाबतीत स्पर्धा :
श्रीराम राजा सुरवरांचा । त्याची कथा वांटा देवांचा ।
पन्नग म्हणती शेषशयनींचा । राम आमचा तुम्ही कैंचे ॥२२॥
मनुष्ये म्हणती मनुष्यकृतीं । रामे केली अगाध ख्याती ।
आमचा वांटा श्रीरामकीर्ती । तुम्ही तदर्थी का भांडा ॥२३॥
श्रीराम तुमचा वैकुंठपती । तरी वैकुंठीं नाही केली ख्याती ।
श्रीराम शेषशयनी जरी निश्चिती । तरी निजेल्या कीर्ति नाही केली ॥२४॥
येवोनि मनुष्यलोकाप्रती । रामे केली विचित्र ख्याती ।
मृत्युलोकींची हे कीर्ती । तुम्ही तदर्थी का भांडा ॥२५॥
एक खालते एक वरते । वांटा मागू आलेती तेथे ।
निर्लज्ज लाजाना पै चित्ते । संबंध तुम्हाते असेचिना ॥२६॥
दोघे केले निरुत्तर । तरी कथेची आवडी फार ।
न सोडिती येरयेर । कथामृतसार सेवावया ॥२७॥
विभाजनाचे काम ब्रह्मदेवाने श्रीशिवाकडे सुपूर्त केले :
तंव ब्रह्मयाने बुद्धि केली जाण । वाटेकरी तीघे जण ।
त्यांची करावया बुझावन । धाडी आपन शिवापासीं ॥२८॥
मग शिवे बुद्धि केली कैसी । तिघे येता आपणापासीं ।
स्वये राखोनि जिजसारासी । विभागेंसी बुझावी ॥२९॥
शिव म्हणे तया तिघांसी । विमुख मी न धाडीं कोणासी ।
वाटा देईन सम भागेंसी । वचन तिघांसी मानले ॥१३०॥
श्रीशिवाकडून विभागणी :
शतकोटी संख्या येथ । रामायण मूळग्रथ ।
शिव वांटी त्रैलोक्यांत । विभागार्थ तो ऐका ॥३१॥
तेहतीस कोटी प्रथमांक । तेहतीस लक्ष आणिक ।
तेहतीस सहस्र तीनशें श्लोक । तेहतीस आणिक एक उरला ॥३२॥
श्लोक एक उरला निर्धारे । त्याचीं बत्तीस अक्षरे ।
तीही वांटिली शंकरे । परिसा आदरे वांटणी ॥३३॥
शेवटी उरलेली “राम” ही दोन अक्षरे विभागणे अशक्य असल्याने श्रीशिवाने ती स्वतः घेतली :
दहा दहा अक्षरे वांट्या आली । दोन अक्षरे तेथे उरलीं ।
तदर्थी शिवे बुद्धि केली । युक्त बोली बोलून ॥३४॥
अक्षरे दोन लोक निन्ही । वांटा करिता न ये वांटणी ।
तरी ही द्यावीं मज मापार्यालागोनी । खळें दानीं दानार्थ ॥३५॥
मग तिघे जणी अति उल्लासीं । दोनी अक्षरे दिधली शिवासी ।
तेणे धरिली हृदयेसी । अहर्निशी श्रीराम ॥३६॥
रामायणींचे सार पूर्ण । शिवाचें वसवी हृदयभुवन ।
श्रीराम ही अक्षरे जाण । ब्रह्मपूर्ण परियेसा ॥३७॥
लोकविभाग व पोटविभाग :
लोकविभाग मुख्य एक । तेहतीस कोटी तेहतीस लक्ष ।
तेहतीस सहस्र तीनशें श्लोक । दहा अक्षरे अधिंक मृत्युलोकी ॥३८॥
याही भागाचें विवरण । बहुविध कवित्व रामायण ।
तेही अर्थींचें निरुपण । सावधान अवधारा ॥३९॥
बहुत प्रकारची रामायणेः
शिवरामायण शैवरामायण । आगम पंचरात्र रामायण ।
गुहा गुह्यक रामायण । अनुमंत रामायण नाटक ॥१४०॥
मत्स्य कूर्म वराह रामायण । काळिकाखंडींचें निरुपण ।
महाकालीरामायण । स्कंदरामायण प्रसिद्ध ॥४१॥
अगस्ति पौलस्ति रामायण । पद्मपुराणींचें रामायण ।
रवि अग्नि वरुण रामायण । ऐकोनि आपण जटायु वक्ता ॥४२॥
नंदिग्रामीं भरत आपण । वदे ते भरतरामायण ।
महाभारतीचें रामायण । वक्ता आपण श्रीव्यास ॥४३॥
क्रौचद्वीपीं अद्यापि जाण । कौचऋषि सांगे पुराण ।
कथा पवित्र रामायण । अति पावन अनुपम्य ॥४४॥
विभीषणापासीं जाण । नित्य कथानिरुपण ।
धर्मऋषि सांगे आपणे धर्म रामायण धार्मिक ॥४५॥
श्वेतद्वीपींचे निरुपण । श्वेतकेतुरामायण ।
कथाविचित्रविंदान । अति पावन तिही लोकी ॥४६॥
शांकर वक्ता स्वये आपण । श्रोती भवानी सावधान ।
ते शिवभवानीरामायण । कथाविंदान विचित्र ॥४७॥
सदाशिव स्वये वक्ता । स्वये श्रीराम निजश्रोता ।
ते शिवरामायणी कथा । श्रवणी ऐकता स्वानंद ॥४८॥
स्वये श्रीराम स्वानंदे पूर्ण । आपणाप्रति वदे आपण ।
ते कथा आत्मरामायण । गोड निरुपण सर्वार्थी ॥४९॥
जैमिनिकृत रामायण । अपूर्व कथेचे विंदान ।
अलोलिक निरुपण । आश्चर्ययुक्त जाण चरित्र ॥१५०॥
जे का अध्यात्मरामायण । रामायणींचे वेंचे काढोन ।
केले आध्यात्मिक निरुपण । ऋषिकृत जाण ते नव्हे ॥५१॥
मृत्युलोकामाजी भाविकीं । रामायणें असंख्यात की ।
कैसेनि आकळती तितुकीं । अल्पमात्र बोलिलोम् ॥५२॥
उमाश्रीरामदर्शन । समूळ मुळीचें निरुपण ।
एकाजनार्दना शरण । श्रोती संपूर्ण क्षमा कीजे ॥५३॥
परम विश्रांति जीवशिवां । परम विश्रांति देहविदेहभावा ।
तो हा प्रसंग विसावा । उमाराघवां संवादा ॥५४॥
विश्रांति त्रिविधतापोद्भवा । अति विश्रांति देहभावा ।
तो हा प्रसंग विसावा । उमा राघवां संवाद ॥५५॥
विश्रांति निवृति अहंभावा । विश्रांति निवृत्ति सोहंभावा ।
तो हा प्रसंग विसावा । उमाराघवा संवाद ॥५६॥
विश्रांति अहमात्मवैभवा । विश्रांति हे ब्रह्मभावा ।
तो हा प्रसंग विसावा । उमाराघवा संवाद ॥५७॥
भ्रमामाजी विभ्रमठेवा । भ्रमे चाळवी भवभवा ।
तो हा प्रसंग विसावा । उमाराघवा संवाद ॥५८॥
एकाजनार्दना शरण । अगाध रामाचे रामायण ।
विचित्र कथानिरुपण । ग्रंथभूषण श्रीराम ॥५९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
उमाराम संवादो नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥
॥ ओंव्या १५९ ॥ श्लोक ३ ॥ एवं ॥१६२॥
