॥ श्रीएकनाथमहाराजकृत
24.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय चोविसावा ॥
नारदांचे यमपुरीला आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणाला नारदाचे दर्शन :
गत कथा झाली ऐसी । जे का कलिकमल्ष नाशी ।
तदनंतरे विचारतां नारदासी । राक्षसेश्वरें देखिले ॥१॥
नारद जाता गगनी । रावणे देखिला दुरोनी ।
म्हणे देवऋषि कृपा करुनी । नावेक येथवरी येइजे ॥२॥
म्हणोनि केले नमन । दोन्ही कर जोडोन ।
स्वामी क्षेम कुशळ कल्याण । हे तुम्हांस पुसणे न लगे ॥३॥
तुमचेनि भूतमात्र प्राणी । स्वानंदे वर्तती निजस्थानीं ।
तुम्ही विचंरां परोपकारालागोनी । तुमच्या दर्शनी मी धन्य ॥४॥
ऐकोनि विबुधारिजनकाचें वचन । मग बोले नारद भगवान ।
म्हणे राया तुझे वैभव देखोन । आनंदें पूर्ण निवालों ॥५॥
नारदांकडून रावणाची स्तुती :
तुज पुष्पकासारिखें विमान । इंद्रजिताऐसें पुत्रनिधान ।
जयाचे आहारा न पुरे त्रिभुवन । तो बंधु कुंभकर्ण पै तुझा ॥६॥
प्रताप सकळांहूनि आगळा । जिणिलें त्वा क्षितिपाळां ।
तुझे ठायी भावो भूपाळा । देखोनिया निघालों ॥७॥
राक्षसाधिपा तुझी थोरी । न देखो त्रिभुवनामाझारी ।
सदाशिव आज्ञाधारी । विष्णूस तेथे कवण पुसे ॥८॥
देव दैत्य गंधर्व । सिद्ध चारण मुनिपुंगव ।
आणीक पृथ्वीपति सर्व । समरांगणीं जिंतिले ॥९॥
ऐसा पराक्रम दारुण । देखोनि मी तुष्टमान ।
परी काहींएक वचन । हितालागोन सांगतसें ॥१०॥
राक्षसेंद्रा अवधारी । माझिया वचनाची थोरी ।
तुवा जिंतिले ते सामान्य अरी । जे काळचक्रीं पडिले असतीं ॥११॥
जे संसारी गांजिले । ते मृत्युनें मारिले ।
जे प्रारब्धीं घातले । ते मेले आपुलेनि कर्मे ॥१२॥
जे संसारबांदवंडीं पडिले । जे मी माझे म्हणत गेले ।
जे विधिनिषेधीं नाडिले । ते पडिले काळचक्रीं ॥१३॥
माझी स्त्री माझे पुत्र । माझे धन माझे गोत ।
जयांचे भ्रांत झाले चित्त । तया ग्रासिले कळिकाळें ॥१४॥
तुवा मारिले गांजिले हे वदंती । मिथ्यात्वे भासे माझे चित्ती ।
ऐसे ऐकोनि लंकापती । नारदाप्रती बोलिला ॥१५॥
अहो जी ऐका नारदमुनी । आता रसातळा जातो दैत्यमर्दनीं ।
आपुले करे तया जिंतोनी । समरांगणीं भिडोनियां ॥१६॥
मग समस्त जिंतिल्यावरी । ज्याचे त्यांस करीन अधिकारी ।
पुढे समुद्र मथीन त्याउपरी । अमृतपानाकारणे ॥१७॥
ऐसे रावण बोलिल्यावरी । ऐकोनि नारद ते अवसरी ।
प्रत्युत्तरशब्दचातुरीं । बोलतसे रावणेसीं ॥१८॥
नारदांचा यमाला जिंकण्याचा रावणाला सल्ला :
तुज रसातळासि जाता । आम्हासि सुख न वाटे सर्वथा ।
मी सांगतो त्या मार्गे लंकानाथा । समस्ता सुख होईल ॥१९॥
अति दुर्गम कठिण । ब्रह्मादिका न कळे जाण ।
त्या मार्गीं करावे गमन । प्रेतराज तेथे असे ॥२०॥
वैरी त्रासूनि तू उद्धट । इये मार्गी जाय स्पष्ट ।
यमराज बळे अचाट । त्याते रणी जिंकिजे ॥२१॥
जया यमाचा सर्वा दंड । जेणे दंडिले प्राणी उदंड ।
जया दंडाभेणें जन अखंड । शरण हरीसी पै जाती ॥२२॥
प्रेतराज तो पापियां यम । साधुजनांते तोचि धर्म ।
सांगता त्याचा पराक्रम परम । त्यासि दशानन पुरवसी ॥२३॥
यमाला जिंकण्याचा रावणाचा निर्धार :
मुनीची ऐकोनि गोष्टी । राक्षसे हाक मारिली मोठी ।
जैसा मेघ कडकडाटीं । गर्जतसे पर्जन्यकाळी ॥२४॥
कुंभकर्णानुज म्हणे नारदमुनी । माझे वचन ऐके सावधानीं ।
यमराम मारिला हे सत्य वाणी । तुम्ही असत्य न म्हणावी ॥२५॥
मी जातो दक्षिणदिशेसी । जेथे रविसुत करी राज्यासी ।
माझेही नारदा मानसी । क्रोध अत्यंत उचंबळत ॥२६॥
प्रत्युत्तर माझे ऐक वचन । मी तयाते मुनि दंडीन ।
छेदीन तयाचा अभिमान । जेणे प्राणिगण दंडिले ॥२७॥
ऐसे बोलोनि मंदोदरीकांत । मुनीस करोनी दंडवत ।
येता झाला लंकानाथ । प्रधानांसमवेत दक्षिणे ॥२८॥
मग तो नारद महाऋषी । जयाच्या तेजे कळाहीन रविशशी ।
जयांचे वचन देवा दैत्यासीं । अति प्रीतीसी रुचतसे ॥२९॥
ब्रह्मनिष्ठेचा जो सागर । ब्रह्मदृष्टीं देखे चराचर ।
ब्रह्मयाचा मानसकुमर । ब्रह्मादिका पार न कळे ॥३०॥
ब्रह्मवीणा वाजवीत । ब्रह्मानंदे डुल्लत ।
ब्रह्मपदें मुखी गात । गात नाचत ब्रह्मानंदे ॥३१॥
ऐसा तो नारद महामुनी । रावणाचे वचन ऐकोनि ।
क्षणैक विचारिता झाला मनी । जैसा अग्नि तैसा ऋषि ॥३२॥
माझे वचनएं हा रावण । यमरायासीं करील रण ।
तरी मी यमासी सांगेन । येतो रावण युद्धाते ॥३३॥
प्रेतराज दंडपाणी । तयाते प्रार्थीन युद्धालागूनी ।
जयाचेनि धाके प्राणी जनी । श्रीहरिभजनीं प्रवेशती ॥३४॥
तरि आपला हाचि विचार । म्हणोनि उठिला ब्रह्मकुमर ।
चालिलासे अति सत्वर । मनोवेग टाकोनि मागे ॥३५॥
नारदांचे यमनगरीत आगमन :
ऐसा तो ब्रह्मर्षीं । आला प्रेतराजनगरासी ।
नगरी देखोनि हर्ष मानसी । जैसी दुसरी अमरावती ॥३६॥
प्रेतराज रायाचे नाम । यमधर्म दुसरे परम ।
प्राणियांचे दोषधर्म । जाणोनि तैसे दंडित ॥३७॥
जयांसी भगवद्भजनीं नाही भक्ती । अधर्मटोले माथा वाजती ।
ज्यांसी गृहाश्रमी अत्यासक्ती । ते दंड पावती प्रेतरायाचा ॥३८॥
ऐसा तो नारद महामुनी । आला प्रेतपुरीलागून ।
म्हणे कलहो पावोन पुरे धणी । म्हणोनि पाय अवनी आफळित ॥३९॥
माथेची शेंडी तडाडी । कलहाची थोर आवडी ।
म्हणोनि तो लवडसवडीं । प्रेतराजनगरा पै आला ॥४०॥
एका जनार्दना शरण । राक्षसा यमासीं युद्ध दारुण ।
होईल ते परसा सावधान । निज अवधान देवोन ॥४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
नारदप्रेतपुरीआगमनं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥२४॥ ओंव्या ॥४१॥
