(वारकऱ्या बरोबर पत्र
3587.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
माहेरींचे आले ते मज माहेर । सुखाचे उत्तर करिन त्यासी ॥१॥
पायावरी माथा आळीगीन बाही । घेईन लवलाही पायवणी ॥धृपद॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥
आपुले जीवीचे सुखदुःख भावे । सांगेन अघवे आहे तैसे ॥३॥
तुका म्हणे वीट नेघे आवडीचा । बोलिलीच वाचा बोलवीन ॥४॥
अर्थ :
माझ्या माहेराहून आलेले वारकरी हे माझ्या आईबापाप्रमाणेच आहेत मी त्यांच्याशी सुखाने बोलेन. माझे वारकरी माझ्या माहेराहून आले की मी त्यांच्या पायावर माझा माथा ठेवीन आणि त्यांना माझ्या बाहूने आलिंगन देईन व त्वरेने त्यांचे पाय धुवून त्यांचे चरणतीर्थ घेईन. वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना सर्व पर्वकाळ कसा गेला याबद्दल मी सुख समाचार त्यांना विचारीन. मी माझ्या जीवाला काय सुख दु:ख आहे ते भावपूर्वक त्यांना जसे आहे तसे सांगेन व त्यांना कळवेन. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्या गोष्टीचा कधीही वीट येत नाही आवडती गोष्ट आपण जरी बोललो तरी वाचा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आपल्याला बोलायला भाग पाडते.
