॥ श्रीएकनाथमहाराजकृत
36.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय छत्तिसावा ॥
रावणाकडून बिभीषणाचा अपमान
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान :
कपिपुरूषार्थ अति प्रचंड । राक्षसांचें बळबंड ।
प्रताप ऐकता काळे तोंड । लज्जा वितंड लंकेशा ॥१॥
हनुमंताचे अति प्रबळ । बिभीषणें वानिलें बळ ।
तेणे राक्षसें सकळ । तळमळ पै करिती ॥२॥
राक्षस सेनानी प्रधान । अवघे जाले हीन दीन ।
सभा समस्त लज्जायमान । म्लानवदन दशमुख ॥३॥
हे देखोनि इंद्रजित । कोपे जालासें कृतांत ।
बिभीषणासीं बोलत । निजपुरूषार्थ वर्णोनी ॥४॥
इंद्रजिताचा संताप, स्वपराक्रम प्रौढी व बिभीषणाची निंदा :
इंद्रजित बोले कोपायमान । काकाजी तू तंव धर्मसंपन्न ।
बुद्धियुक्तिप्रज्ञानपन्न । कनिष्ठ वचन का वदसी ॥५॥
निंदोनि सेनानी रक्षोगण । निर्भर्त्सोनियां प्रधान ।
रामलक्ष्मणांची आंगवण । परम दारूण वानिसी ॥६॥
उद्देशून एक एक । तुवा निंदिले आमुचे कटक ।
श्रीरामाची आगळिक । आत्यंतिक वानिसवी ॥७॥
तू तंव प्रबुद्ध प्रज्ञाप्राज्ञ । युवराजाचे महिमान ।
रायाचे खोंचलें अंतःकरण । ऐसे कठिण का वदसी ॥८॥
पाठी थापटिलिया येडका । अधिक हाणी चारी थडका ।
तैसे सेनानी सैनिका । सन्मान देखा तुवा द्यावा ॥९॥
सन्मान देता निजसैन्यासी । अति उल्लास संग्रामासी ।
शेखी त्याते निर्भर्त्सिसी । श्रीरामासी वानोनी ॥१०॥
राजा तुझा ज्येष्ठ बंधु । तू अति कनिष्ठ वदसी वादु ।
तेणे युवराजसंबंधु । अति विरूद्ध वाढला ॥११॥
जैसा पिता तैसा चुलता । यौवराज्या असे तुझे माथा ।
ज्येष्ठा निंदोनि लंकानाथा । श्रीरघुनाथा वानिसी ॥१२॥
आमुचा एकैक रक्षोगण । करील दोघांचे भक्षण ।
यासी काइसें रणांगुण । रामलक्ष्मण ते किती ॥१३॥
बापुडे रामलक्ष्मण । आमुचे दृष्टीस ते तृण ।
परीस माझी आंगवण । चरणा शरण नृप येती ॥१४॥
वलयांकित राजोक्ति । यज्ञ भोगिता अमरपती ।
तो म्या आणिलासें क्षिती । लंकेप्रती कामारा ॥१५॥
आंसडोनियां ऐरावती । आरडत पाडिलासे क्षिती ।
दांत उपडोनि घेतला हाती । त्रिजगती चळीं कांपे ॥१६॥
माझी ऐकतांचि हाक । शूरगण एकाएक ।
अवघे पळती अधोमुख । जेंवी का रंक अति दीन ॥१७॥
इंद्रासहित अमरकोडी । ते म्या घातले बांधवडी ।
तेथे काइसी रामाची प्रौढी । साह्य माकडीं वानिसी ॥१८॥
अंगद सुग्रीव हनुमंत । नळ नीळ जांबुवंत ।
राक्षसा भक्ष्य हे समस्त । दांता दांत न लागता ॥१९॥
मनुष्य आमचें आहारीं । वानरे तंव कोशिंबिरीं ।
त्यांसी कायसीं झुंजारीं । क्षणामाझारी मारीन ॥२०॥
रणी भिडोनि साटोपता । करीन श्रीरामाच्या घाता ।
रावण सांडोनि सकळ चिंता । सुखे सीता भोगावी ॥२१॥
राम आणि लक्ष्मण । रणी पाडीन विंधोनि बाण ।
निर्दळीन वानरगण । आंगवण पाहे माझी ॥२२॥
ऐक इंद्रजिता साचार । तू तंव अपक्व बालत्व ।
अहंकार माथ्याचा वाळला नाही जार । स्वहितविचार तुज नाही ॥२३॥
अवधारी विचारे विचारकोटी । विवेक धरोनिया पोटी ।
समूळ ऐके माझी गोष्टी । स्वहितदृष्टी तुज नाही ॥२४॥
स्वहितदृष्टी तुज नाही । जे बोलसी ते मिथ्या पाही ।
त्याही बोलाची नवलाई । मूळान्वयीं अवधारी ॥२५॥
श्रीरामांच्या पराक्रमाचे वर्णन :
म्हणसी आमचा एक रक्षोगण । भक्षील रामलक्ष्मण ।
ऐकोनि श्रीरामाआंगवण । मिथ्या भाषण का वदसी ॥२७॥
बाळपणी विंधोनि बाण । ताटकेचा घेतला प्राण ।
सुबाहु मारिलां करिता रण । सैन्यगणसमवेत ॥२८॥
बाणपिसारें सुटला वारा । तेणे मारीच उडविला अंबरा ।
श्रीराम अंतक निशाचरां । तू निदसुरा उन्मादें ॥२९॥
स्वयंवरी वाहता कोदंड । रावणाचे जाले काळे तोंड ।
ते श्रीरामे केले दुखंड । बळे प्रचंड श्रीराम ॥३०॥
येचि सीतेची अभिलाखा । विराध मारिलासे देखा ।
तेचि गति दशमुखा । तुम्हाम मूर्खांचेनि बोले ॥३१॥
शूर्पणखेने करिता छळणा । स्वये मुकली नाककाना ।
गार्हाणे देतसे खरदूषणां । तेही जाणा मारिले ॥३२॥
त्रिशिरा आणि खरदूषण । चौदा सहस्त्र रक्षोगण ।
रामे मारिले करोनि रण । दुर्धर बाण वर्षोनी ॥३३॥
नाही सैन्य रथसंपत्ती । एकला श्रीराम पदाती ।
त्यासी ऐसी ऐकोनि ख्याती । तू का दुर्मति वदलासी ॥३४॥
नकट्या शूर्पणखेच्या बोली । रावणे पापबुद्धि केली ।
सीता चोरिता भीक लागली । तैसी आली अवदसा ॥३५॥
चोरावया परनारी । राजा आणि होय भिकारी ।
जळो ते वाटिवेचि थोरी । निर्लज्ज भारी तू एक ॥३६॥
दुजी वाटिव लंकानाथा । मरण देवोनि मारीचमाथां ।
छळोनि सुमित्रेच्या सुता । चोरोनि सीता पळाला ॥३७॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा । नुल्लंघवेचि दशमुखा ।
मिथ्या बोलां बळाआवांका । काळमुखा पुरूषार्थ ॥३८॥
जटायूसी करिता रण । रावणे दांतीं धरिले तृण ।
त्यासी मारिले करोनि छळण । पापी पूर्ण तुम्ही एक ॥३९॥
चोरी मारी पापी परव्दारी । इतुके रावणाचे शिरी ।
तेथे तुझे ज्येष्ठत्व भारी । बाजीगिरी जैसी विद्द्या ॥४०॥
म्हणसी जिंतिला ऐरावती । आणि जिंतिला अमरपती ।
सुरवरांसी लाविली ख्याती । श्रीरामाप्रती ते न चालें ॥४१॥
वरूणशक्रब्रह्मादि ईश । हे श्रीरामाचे अंशानुअंश ।
हे तू नेणसीं बाळभाष्य । जगी जगदीश श्रीराम ॥४२॥
म्हणसी दमिला ऐरावती । चरणी शिळा उद्धरती ।
श्रीरामाची परम शक्ती । बाळमती तू नेणसी ॥४३॥
पापकर्मास सहाय्य केल्याबद्दल त्याला दोषः
बोलसीं स्वये निजपुरूषार्था । मी मारीन श्रीरघुनाथा ।
रावणे सुखे भोगावी सीता । परदारता तू महापापी ॥४४॥
रायासी सांगता पापबुद्धी । तो वधावा सभेमधीं ।
राजपुत्र तू दुर्बुद्धी । महामूढधी कुलघाती ॥४५॥
तू एक मारिल्या जाण । सकळ कुळासी कल्याण ।
हे बुद्धि नायकता रावण । कुळनिर्दळण पावेल ॥४६॥
इंद्रजिताची वल्गना :
इंद्रजित बोलतो निजबळ । ते ते मिथ्या पै समूळ ।
सभा सर्वज्ञ ऐका सकळ । राये प्रांजळ परिसावे ॥४७॥
प्रलोभावया लंकानाथा । मारीन म्हणसीं तू रघुनाथा ।
हनुमंतेंसीं युद्ध करिता । तुझे पुरूषार्था देखिले ॥४८॥
हनुमंतासीं रणी भिडतां । शस्त्रे अस्त्रे गेली वृथा ।
कपिपुच्छ वाजता माथा । धीर सर्वथा न धरवे ॥४९॥
दुर्धर शस्त्रांचे संपात । वानरे झेलोनि समस्त ।
तुझ्या सैन्या केला घात । रणी हुंबत पाडिले ॥५०॥
हनुमंतापुढे इंद्रजिताची असहाय्यता :
सांगावया लंकेआंत । कोणीही नुरेचि जीवंत ।
कपीनें अवघियांचा केला घात । तुजदेखत इंद्रजिता ॥५१॥
त्यांची करावया सोडवण । तुझी न चलेचि आंगवण ।
कपीनें गांजिलें संपूर्ण । घाये प्राण जावों पाहे ॥५२॥
लघुलाघवी हनुमंत । मारिला सारथी भंगिला रथ ।
रणी इंद्रजित केला विरथ । छत्रपात कपिपुच्छे ॥५३॥
मल्लविद्द्येची कुसरी । चपेट हाणिता उरी शिरी ।
अशुद्ध वमितां जालासी चांचरी । पळावया दुरी ठाव नाही ॥५४॥
तुझ्या युद्धाची गति ऐसी । फावल्या मारावया शत्रूंसी ।
नातरी पळावें मेघांपासीं । कपिपुच्छासी ते न चले ॥५५॥
पडिले पुच्छाचे बिरडें । सरों नयें मागेंपुढें ।
इंद्राजित खळखळां रडे । वानरे गाढे गांजिलें ॥५६॥
रडत रडत अशुद्ध वमित । कपिपुच्छाभेणें धांवत ।
पळोनि गेलासी विवरांत । मुख्य पुरूषार्थ हा तुजा ॥५७॥
रायासंमुंख निजनिर्धारी । म्हणसी एकला मी श्रीराम मारी ।
मिथ्या जल्पसीं सभेमाझारीं । निर्लज्ज भारीं तू एक ॥५८॥
वानरा रणी देवोनि पाठी । पळालासीं उठाउठी ।
ऐसी तुझी वाटीव मोठी । समूळ खोटी बुद्धि तुझी ॥५९॥
त्याच्या खोट्या प्रौढीचे परिणाम :
तुझी ऐकतांचि बुद्धि । रावण मरेल आधी ।
मरेल राक्षसांची मांदी । कुळ त्रिशुद्धी बुडेल ॥६०॥
रायासंमुख आपण । सभेसीं वदे मिथ्या वचन ।
त्याचे काळे करोनि वदन । जिव्हा कर्ण छेदावे ॥६१॥
राजनीति ऐसी येथ । कुळघातकीं मारावा सुत ।
जेणे आणिला सभेआंत । तोही निश्चित मारावा ॥६२॥
जेणे प्रवेशिला व्दारीं । तोही मारावा निर्धारी ।
कायसी इंद्रजिताची थोरी । निशाचरीं कुळपाश ॥६३॥
रावणाचा ज्येष्ठ सुत । यालागी राखिला म्या हात ।
तुझा अवश्य करावा घात । कुळक्षयार्थ चुकवावया ॥६४॥
बिभीषणाच्या भाषणाने सभा स्तब्ध होते :
ऐकोनि बिभीषणाची मात । प्रधानसैनिकवीरांआंत ।
वाढला क्रोधाचा आवर्त । जाला कृतांत लंकेश ॥६५॥
ऐकोनि बिभीषणाचे वचन । प्रधान जाले कोपायमान ।
सेनानीं वटारिलें नयन । खाती दशन सेनाधर ॥६६॥
एक अधरोष्ट चावती । एक करकरा दांत खाती ।
एक ते हात कुस्करिती । एक वळिती वज्रमुष्टि ॥६७॥
बिभीषणाचे उत्तरी । एक निश्चित धुंधुःकारी ।
एक हांसती क्रोधाकारीं । क्षोभोनि सारे डुल्लत ॥६८॥
एक परस्परें बोलत । बिभीषण जाला उन्मत्त ।
इंद्रजिताते मारीन म्हणत । संमुख वदत लंकेशा ॥६९॥
चोरी मारी पापी परव्दारी । ऐसे बिभीषणाचे उत्तरी ।
रावण खोंचला जिव्हारी । क्रोधे करी तळमळ ॥७०॥
सन्मुख न राहवे वानरी । पळोनि गेलासि तू विवरी ।
इंद्रजित लाजिला ये उत्तरी । मौन धरोनि राहिला ॥७१॥
बिभीषणासीं संमुख । बोलों न शकेचि दशमुख ।
मग इतर कोण बोले रंक । टकमक अवघ्यांसी ॥७२॥
एक बोलती सर्वज्ञ । बिभीषणाचे धर्मवचन ।
न मानितांचि दशानन । कुळनिर्दळण सपुत्र ॥७३॥
ते दृश्य पाहून महापार्श्वाची गर्वोक्ती :
सभा देखोनि तटस्थ । महापार्श्व उठिला गर्जत ।
बिभीषण जालासें उन्मत्त । राजा राजसुत निंदिला ॥७४॥
संमुख निंदिला राजा रावण । वानितो श्रीरामाचे गुण ।
याची येथे भीड कोण । अवघे जण काय पाहती ॥७५॥
युवराज प्रतापसिंधु । रावणाचा कनिष्ठ बंधु ।
येणे सांडिला सुह्रदसंबंधु । याचा वधु करावा ॥७६॥
मारा न म्हणेचि लंकानाथ । तरी आम्ही करू याचा घात ।
गलका उठिला सभेआंत । अति उन्मत्त हा जाला ॥७७॥
बिभीषणाने शांत राहून महापार्श्वाची उपेक्षा केली :
बिभीषणाची शांती भारी । क्रोध न येचि तिळभरी ।
मारावा म्हणता निशाचरीं । भय भीतरी बाधेना ॥७८॥
जैसा सागर अगाध । तैसा बिभीषणाचा बोध ।
निंदोनि बोलिला महापार्श्वद । स्वये विषाद न मानीच ॥७९॥
जेंवी सिंहापासीं घुंगुरडे । तेंवी महापार्श्व बिभीषणापुढें ।
विरूद्ध बोलता कैवाडें । कोपा न चढे बिभीषण ॥८०॥
महापार्श्वेंसीं बिभीषण । स्वमुखे न बोलेचि आपण ।
तृणप्राय उपेक्षून । धरिले मौन निजशांती ॥८१॥
बिभीषणाच्या सेवकांचे भाषण :
बिभीषणाचा अनुचर । परम आप्त प्रधान हेर ।
महापार्श्वेसीं उत्तर । गिरा गंभीर बोलिला ॥८२॥
बंधुबंधूंचिया निजहिता । राजा युवराज बोलता ।
तू का मध्ये कुंथसी वृथा । महामूर्खता तव आंगी ॥८३॥
राजपुरूषांच्या संभाषणात सेवकाची लुडबुड कशासाठी :
दोनी धुरा अति आप्तता । स्वहिताचा विचार न करिता ।
मध्ये बोलो नये सर्वथा । बोले तो तत्वता महामूर्ख ॥८४॥
जैसा राजा रावण । तैसाच युवराज बिभीषण ।
त्यांसी बोलता कठिण । तुझा प्राण वांचेना ॥८५॥
रावणाच्या कनिष्ठ बंधूंसी । संवाद करिता धुरेसीं ।
तू का वृथा निंदा करिसी । निजप्राणासी मुकावया ॥८६॥
राजनीती ही अशी आहे :
ऐसी आहे राजनीती । दोनी धुरा संवाद करिती ।
त्यांमाजी मध्ये निंदा करिती । त्यांते मारिती नृपनाथ ॥८७॥
राजा युवराज निजहितीं । वाद करिती राजनीतीं ।
येरयेरांते निखंदिती । तेथे तू किती रे मशका ॥८८॥
बंधुबंधूंच्या हितानुवादीं । युक्ति निग्रह येती क्रोधी ।
तेथे महापार्श्वा तू दुर्बुद्धीं । निंदानुवादीं जल्पसी ॥८९॥
आला देखोनि हनुमंत । रायादेखतां तुम्ही पळत ।
आता वाटिवे गर्जत । अति समर्थ निर्लज्जत्वें ॥९०॥
तुम्ही राक्षसें रणी दीन । नपुंसकाहूनि हीन ।
वाटिवे चाळवा दशानन । अति बोलोन पुरूषार्थ ॥९१॥
श्रीरामाचे एक वानर । मारिला अखया सैन्य समग्र ।
दमिला इंद्रजित ज्येष्ठ कुमर । लंकापुरा जाळोनी ॥९२॥
वानर वनचर पालेखाइर । त्यापुढे पळाले समग्र ।
येथे आलिया श्रीरामचंद्र । दुर्धर शर कोण साहे ॥९३॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । राक्षसकुळासी निर्दळण ।
तदर्थीं हितवादी बिभीषण । ते रावण नायके ॥९४॥
सीता अर्पोनि श्रीरघुपती । स्वस्थ राहावे समस्तीं ।
ऐसी बिभीषणाची युक्ती । तू का कुत्सितोक्तीं निंदिसी ॥९५॥
महापार्श्व लज्जित होतो :
एकोनि हेराचे वचन । महापार्श्व लज्जामान ।
खालतीं घालोनिया मान । दीनवदन राहिला ॥९६॥
बिभीषणाचे पुनः भाषण व भावी घोर परिणामांचे चित्रीकरण :
सत्त्ववंत धैर्यवंत । वीर्य माधुर्य बुद्धिवंत ।
ऐसा बिभीषणा क्षमायुक्त । रावणहितार्थ बुद्धि सांगे ॥९७॥
बुद्धि सांगता पुढतपुढती । न माने रावणाचे चित्ती ।
तरी सांगे पुनरावृत्ती । सीता रघुपती अर्पावया ॥९८॥
प्रहस्त महापार्श्व महोदर । इंद्रजित मुख्य कुमर ।
शुकसारणादि थोर थोर । ऐका समग्र बुद्धि माझी ॥९९॥
करोनि रावणा केशाकर्षण । सुबुद्धि सांगेन आपण ।
सीता करावी रामार्पण । कुळनिर्दळण चुकवावया ॥१००॥
भूत लागले हो ज्यासी । मंत्रवादी त्राहटी धरोनि केशी ।
तेंवी सुबुद्धि सांगे रावणासी । सीता श्रीरामापासीं अर्पावया ॥१०१॥
सीतासन्निपात रावणासी । तेणे कुळक्षयो राक्षसांसी ।
यालागी धरोनिया केशीं । सुबुद्धि त्यासी शिकवीन ॥१०२॥
याचि नांवे परम आप्त । याचि नावें सुह्रद समस्त ।
अपायीं पडता लंकानाथ । त्यासी निश्चित वांचवावे ॥१०३॥
कुटुंब निजवोनि गृहाप्रती । जो गृहादाहा करी प्राप्ती ।
त्यासी सज्ञान निवारिती । तैसी गती रावणा ॥१०४॥
करिता श्रीरामासी वैर । समस्त मरती निशाचर ।
सपुत्र मरेल दशशिर । प्रतिज्ञोत्तर हे माझे ॥१०५॥
श्रीरामाचे एक वानर । त्यापुढे पळालेति समग्र ।
सुटल्या श्रीरामाचा शर । कोण दुर्धर साहेल ॥१०६॥
तेलसाहाणे खरसाहाणे फुडा । लावी श्रीरामाचा बाण कुर्हाडा ।
कंकपत्राचा झडाडा । कोण त्यापुढां साहों शकें ॥१०७॥
सुटला श्रीरामाचा बाण । धाके मरेल रावण ।
अतिकाय इंद्रजित कुंभकर्ण । सेनानी प्रधान निमतील ॥१०८॥
प्रहस्त महोदरा सोडिती प्राण । धाके मरेल शुकसारण ।
सैन्य मरेल संपूर्ण । श्रीरामबाण येतांचि ॥१०९॥
दुर्धर श्रीरामाचे बाण । समुद्र शोषोनियां पूर्ण ।
लंका निर्दळती रावण । सत्य वचन हे माझे ॥११०॥
इंद्रादिकांचिया कोडी । न साहे श्रीरामबाणवोढी ।
धाकेंच पडती मुरकुंडी । राक्षसें बापुडीं ती किती ॥१११॥
यालागी गा लंकानाथा । शीघ्र श्रीरामी अर्पीं सीता ।
तुझे चरणी ठेवितो माथा । विकल्प आता धरूं नको ॥११२॥
जरी विकल्प धरिसी चित्ता । तरी न जिंकवे श्रीरघुनाथा ।
श्रीरामाची प्रतापकथा । ऐक आता सांगेन ॥११३॥
वेगे आलिया रघुनाथ । तुज साहावया नाही पुरूषार्थ ।
गर्वें प्राण वेंचिसी व्यर्थ । सत्य वचनार्थ हा माझा ॥११४॥
निवारे श्रीरामबाणजाळ । तैसे तुज नाही शस्त्रबळ ।
करिता श्रीरामासी सळ । रणी विकळ पडशील ॥११५॥
रणी जिंकावया रघुनाथा । तुझ्या आंगी नाही सबळता ।
पडलासी धनुष्य वाहता । सभेदेखतां स्वयंवरीं ॥११६॥
तुजदेखतां पुरदहनी । हनुमंताते देखोनी ।
पळती प्रधान वीरश्रेणीं । केंवी राम रणी जिंकवेल ॥११७॥
तुझे करोनि काळे तोंड । रामे धनुष्य केले दुखंड ।
वृथा वाहसी बळवंड । तू तंव लंड निर्लज्ज ॥११८॥
श्रीराम पाहावया संमुख दृष्टी । धैर्य नाही तुझे पोटी ।
श्रीरामा लावोनि मृगापाठी । सीता गोरटी चोरली ॥११९॥
व्हावया श्रीरामासंमुख । तुझेंन सरेचि काळे मुख ।
वृथा बोलसी दशमुख । लाज निःशेख तुज नाही ॥१२०॥
हरावया सीता सुंदरी । सामर्थ्य नाही तुझे शरीरी ।
मग तू जालासी भिकारी । तरी गुंफेमाझारी रिघवेना ॥१२१॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा । तुज नुल्लंघवे दशमुखा ।
रणी पहावया रघुकुळटिळका । व्यर्थ आवांका जल्पसी ॥१२२॥
तुझ्या आंगी नाही बळ । म्हणसी युद्ध करील दळ ।
ते तंव पुरदाहें केवळ । केले विकळ हनुमंते ॥१२३॥
इंद्रजिताचे बळ अद्भुत । कपीनें केले हताहत ।
येथे आलिया श्रीरघुनाथ । कोणा सामर्थ्य साहावयासी ॥१२४॥
यालागी गा लंकानाथा । तुज सर्वथा न जिरे सीता ।
शरण रिघावे श्रीरघुनाथा । जनकदुहिता अर्पावी ॥१२५॥
पुढील कार्याची सूचना :
श्रीरामा अर्पिल्या सीता । सकळ कल्याण समस्ता ।
हे सुबुद्धि ऐके लंकानाथा । कुळाभिघाता चुकवावया ॥१२६॥
नानापरींच्या विवेकयुक्तीं । म्या सांगितल्या हितोक्ती ।
नाइकातां लंकापतीं । रणाभिवर्तीं मराल ॥१२७॥
श्रीराम अवतारावतारी । पूर्ण ब्रह्म चराचरी ।
त्याची कांता सीता सुंदरीं । तुज तिळभरी जिरेना ॥१२८॥
म्हणसी श्रीराम बापुडे । तरी का लपसी मागिलीकडे ।
चोरी करोनि पळसी पुढे । कर्म कुडे लंकेशा ॥१२९॥
मारिले त्रिशिरा खर दूषण । श्रीरामासी करावया रण ।
संमुख न वचे तुझे सैन्य । आंगी आंगवण असेना ॥१३०॥
श्रीराम शक्त अथवा अशक्त । तुझा करू शके घात ।
सीता अर्पोनि निश्चित । श्रीरघुनाथ सुखी करी ॥१३१॥
हे माझी बुद्धि नाइकता । वैर केलिया श्रीरघुनाथा ।
तो तुझ्या करील घाता । सैन्यसमवेता सपुत्रा ॥१३२॥
साह्य झालियाही कळिकाळ । अनिवार श्रीरामबाणजाळ ।
काळा गांजोनि तत्काळ । तुझे कंठनाळ छेदील ॥१३३॥
माझा नाइकतां वचनार्थ । पाडोनि कळिकाळाचे दांत ।
श्रीराम तुझा करील घात । जाण निश्चित लंकेशा ॥१३४॥
साह्य केलिया ब्रह्मशक्र । निवारे श्रीरामशर ।
शिव रामाचा किंकर । त्यासमोर तो नये ॥१३५॥
श्रीराम शिवाची ध्येयमूर्ती । त्याची चोरली सीता सती ।
तेणे क्षोभला उमापती । वांचती गति नाही ॥१३६॥
चोरी मारी आणि परव्दारीं । कपटवेषी संन्यासधारी ।
ब्रह्मा क्षोभला तुजवरी । वांचती परी तुज नाही ॥१३७॥
राजा आणि अधर्मशीळ । त्यासी निर्दाळी कळिकाळ ।
काळे ग्रासिले तुझे बळ । रणी तत्काळ निमसील ॥१३८॥
शक्तींमाजी आदिशक्ती । तुवा चोरिली सीता सती ।
क्षोभल्या शस्त्रदेवता समस्ती । तुझ्या घातीं उद्द्यत ॥१३९॥
विचारिता विवेकविधी । तुज क्षयो आला त्रिशुद्धी ।
माझी नाइकतां बुद्धी । रणभिमर्दीं निमसील ॥१४०॥
रावणा ऐके स्वहितवचन । श्रीरामासी रिघोन शरण ।
सीता अर्पिल्या आपण । सकळ कल्याणा पावसी ॥१४१॥
श्रीरामासी रिघाल्या शरण । तुज बाधेन जन्ममरण ।
बाधूं न शकें व्दंव्दभान । कृतकल्याण पावसी ॥१४२॥
गर्व न करी लंकानाथा । श्रीरामचरणीं ठेवोनि माथा ।
सद्भावें अर्पिलिया सीता । स्वार्था परमार्था पावसी ॥१४३॥
बिभीषणाची सूचना ऐकून रावणाचा क्रोध व त्याचा अधिक्षेप :
ऐकोनि बिभीषणाचे वचन । क्रोधे संतप्त रावण ।
त्याचे क्रोधाचें दारूणपण । श्लोकलक्षण अवधारा ॥१४४॥
ऐकोनि बिभीषणाचे वचन । रावण जाला क्रोधसंपन्न ।
आरक्त वटारिले नयन । जैसे जास्वंद नव फुललें ॥१४५॥
क्रोधे म्हणे रे बिभीषणा । नष्टा चांडाळा दुर्जना ।
मज हीनत्व स्थापोनि जाणा । रघुनंदन वानिसी ॥१४६॥
सपुत्र प्रधान अवघे जणी । आम्हांसी म्हणसी मराल रणी ।
रामा स्थापिसी विजयस्थानीं । धन्य वाणी हे तुझी ॥१४७॥
राम मनुष्य बापुडे । ते काय वानिसी मजपुढे ।
एके घायी चूर करीन हाडे । रडत त्याकडे तू जाय ॥१४८॥
जेंवी मार्जार बोका पाहे । आपली पिल्लीं आपण खाये ।
तैसाचि तू राक्षसान्वयें । कुलक्षया एक हेतु ॥१४९॥
आम्हांसि भेडसाविसी कैवाडें । म्हणसी तुम्हांसि मारितील माकडें ।
हीन दीन तू बापुडे । श्रीरामाकडे सुखे जाये ॥१५०॥
ऐक माझे सत्य भाषण । आजिच निमाला बिभीषण ।
घटस्फोट सांडा त्यालागून । कुळदूषण कुळपाश ॥१५१॥
बिभीषणाचे प्रत्युत्तर :
एकोनि रावणाचे वचन । विभीषण हास्यवदन ।
मुख्य धुरेंसींच मूर्खपण । तेथे शिकवण चालेना ॥१५२॥
कनकबीज खाय आवेशें । तो बडबडी व्याघ्र ससे मासे ।
रावणा तुज जाले तैसे । सीताभिलाषें संनिपात ॥१५३॥
रावणा सीतासंनिपात । प्रधान गर्वे मदोन्मत्त ।
विचार विवेक स्वहितार्थ । कोणे येथ मानावे ॥१५४॥
कपट काम कामासक्ती । परदारा अधर्मरती ।
रावणा तुज मरणप्राप्ती । ससैन्यसंपत्ती सपुत्र ॥१५५॥
करिता दुर्गाअभिलाषण । शुंभ निशुंभ निमाले ससैन्य ।
चंडमुंड रक्तबीज जाण । घेतला प्राण जगदंबें ॥१५६॥
तैसी श्रीरामाची सीता सती । अभिलाषिता लंकापती ।
व्यर्थ मरसी मरणावर्तीं । सपुत्रसंपत्ती ससैन्य ॥१५७॥
विष भक्षी त्याचे पंगतीं । जो बैसे त्या मरणप्राप्ती ।
त्यागोनि जाया तो सुमती । हे परम युक्ति लंकेशा ॥१५८॥
शरण रिघोनि श्रीरघुपती । प्रेमे अर्पिल्या सीता सती ।
अर्थ स्वार्थ परमार्थप्राप्ती । हे परम युक्ती ऐके पा ॥१५९॥
माझे सांगणे तुला पटत नाही म्हणून मी श्रीरामाकडे जातो :
माझी नायकता युक्ती । तुज जिरेना सीता सती ।
गर्वे मरसी लंकापती । प्रतिज्ञा निश्चिती हे माझी ॥१६०॥
तुम्ही सांडिलें मी मेलो म्हणोन । आता सुह्रदत्वें उरले कोण ।
खुंटली स्वहिताची शिकवण । श्रीरामा शरण मी जातो ॥१६१॥
श्रीरामा गेलिया शरण । मी पावेन कृतकल्याण ।
तुम्हांसी अवश्य आले मरण । श्रीरामबाणप्रतापें ॥१६२॥
शरण गेलिया श्रीरघुपती । चारी मुक्ती दासी होती ।
आनंदें ओसंडेल त्रिजगती । एवढी प्राप्ती श्रीरामे ॥१६३॥
श्रीराम मारील एकी एक । क्रिया कर्ता नुरेल देख ।
मीच देईन तिलोदक । आवश्यक तुम्हांसीं ॥१६४॥
ऐकोनि बिभीषणाची गोष्टी । रावणा राग न माय पोटी ।
खड्ग वसवोनि मुष्टिं । दांत होटीं चाविले ॥१६५॥
ते ऐकून रावणाचा संताप :
ऐकोनि बिभीषणाची मात । ह्रदयीं पोकळा लंकानाथ ।
रागे तयाकडे पाहत । जेंवी का कृतांत काळाग्नि ॥१६६॥
स्वभावे आरक्त नयन । त्यावरी होता क्रोधसंपन्न ।
झाले लाखरंगासमान । विंशति नयन वटारिले ॥१६७॥
हातात खड्ग घेऊन बिभीषणावर वार करणार
तोच त्याचा हात लचकला व रावण खाली कोसळला :
नयन आरक्त कल्लोळ । धाके कांपती लोक सकळ ।
क्रोधे नेत्री निघती ज्वाळ । जाली खळबळ सभेंसी ॥१६८॥
बिभीषणावरी घालावया उडी । कोशाबाहेरी खड्ग काढी ।
विजूतेजसम परवडी । पडली झांपडी सभेसीं ॥१६९॥
प्रळयमेघ गर्जे कडाडीं । तेंवी रावण रागे गडाडी ।
घावो हाणावया निर्वडी । शस्त्र झाडी साटोपे ॥१७०॥
ऐकता रावणाची हाक । धाके कांपती सकळ लोक ।
बिभीषण चित्ती निःशंक । न मानी धाक रामनामे ॥१७१॥
माझा स्वामी श्रीशंकर । त्यासी म्हणसी रामकिंकर ।
तरी छेदीन तुझे वक्त्र । शस्त्र सत्वर उचलिले ॥१७२॥
उडोनियां आकाशाआंत । घावो हाणिता लंकानाथ ।
रावणाचा लचकला हात । श्रीराम रक्षित निजभक्ता ॥१७३॥
चमत्कारें सुटली मुष्टी । शस्त्र गळोनि पडले भूपृष्ठीं ।
रावणे धाक घेतला पोटी । गोष्टीं उफराटी येथे झाली ॥१७४॥
रावण चांचरे घावो हाणिता । पडला सिंहासनाखालता ।
राजपुरूषार्थ करोनि वृथा । राम रक्षिता भक्तासी ॥१७५॥
बिभीषणावर लाथेचा प्रहार :
पुढती रावणे खड्ग घेता । प्रहस्ते धांवोनि धरिले हाता ।
कोप न सांवरे लंकानाथा । हाणिल्या लाथा बिभीषणा ॥१७६॥
रावणे हाणितांचि लाथा । बिभीषणें चरण वंदिले माथा ।
शरण जावया श्रीरघुनाथा । सुमुहूर्तता हे माझी ॥१७७॥
कोपा चढला लंकानाथ । त्यासी प्रहस्ते करोनि शांत ।
खड्ग घालोन दळाआंत । बैसविला स्वस्थ सिंहासनी ॥१७८॥
बिभीषण बेशुद्ध पडतो, त्याचे रामांकडे गमन :
रावणाची लागली लात । जेंवी पर्वती वज्रपात ।
बिभीषण पडतांचि मूर्च्छित । व्दंव्दनिर्मुक्त श्रीरामनामे ॥१७९॥
अगाध बिभीषणाची शांती । अणुमात्र क्रोध न ये चित्ती ।
कांही न बोलेचि दुरूक्ती । स्वस्थ चित्ती बैसला ॥१८०॥
सुबुद्धि सांगावी सुह्रदता । ते गोष्टी खुंटली आता ।
स्वस्थ असावे लंकानाथा । शरण रघुनाथा मी जातो ॥१८१॥
स्वये हाणोनियां लात । मज तुष्टला लंकानाथ ।
स्वामी भेटेल श्रीरघुनाथ । हे भाग्या प्राप्त तुझेनि ॥१८२॥
एकाजनार्दना शरण । राम आश्वासीला बिभीषण ।
ते अति गोड निरूपण । श्रोती अवधान मज द्यावे ॥१८३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणापमानो नाम षट्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३६॥
॥ ओव्या १८३ ॥ श्लोक ३२ ॥ एवं संख्या २१५ ॥
