॥ श्रीएकनाथमहाराजकृत
35.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय पस्तिसावा ॥
बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले
श्रीराम जगदानंदकंद । श्रीराम सच्चिदानंद ।
श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाही भवबंध स्मरणे तुझ्या ॥१॥
वानरसेनासंभार । पावोनिया समुद्रतीर ।
कटक उतरले समग्र । श्रीरामचंद्रासमवेत ॥२॥
रावणमाता कैकसीची चिंता :
येरीकडेलंकेआंत । नगर जाळोनि गेला हनुमंत ।
तेणे कैकसीस आकांत । राक्षसा अंत दृढ आला ॥३॥
कैकसी रावणाची जननी । लंकागडदाहो देखोनि ।
परम दुःखित होय मनी । स्त्रवती नयनी अश्रुधारा ॥४॥
कैकसी बिभीषणाकडे जाऊन रावणाची
अपकृत्ये व त्याचे घोर परिणाम त्याला सांगते
येवोनियां बिभीषणापासीं । निजदुःख सांगे त्यासी ।
मरण आले रावणासी । राक्षसांसी कुळक्षयो ॥५॥
यासी मूळ तुझा ज्येष्ठ बंधु । चोरोनि आणिली श्रीरामवधू ।
श्रीराम रावणा करील वधू । सकुळ छेदू राक्षसा ॥६॥
सीता श्रीरामप्रियकर । शुद्धी धाडिला वानर ।
तेणे जाळोनियां नगर । निशाचर निर्दळिले ॥७॥
इंद्रजित आम्हांमाजी उद्भट । कपिनें त्याचे काढिले चारट ।
रणी खवळोनिं मर्कट । दशकंठ गांजिला ॥८॥
सविष उत्तम पक्वान्न । सेविल्या अवश्य आणी मरण ।
तैसे सीताभिलाषण । कुळनिर्दळण राक्षसा ॥९॥
संताना होय निःसंतान । ऐसे अलोट आले विघ्न ।
बिभीषणासी आलिंगून । करी रूदन कैकसी ॥१०॥
ऐके श्रीरामाची गोष्टी । जो जो वीर पडला दृष्टी ।
तो तो निर्दळी शरवृष्टीं । वीर जगजेठी श्रीराम ॥११॥
ताटका मारिली उठाउठी । सुबाहु मारिला यज्ञवाटीं ।
विराध मारिला रणदिग्पटीं । पडिल्या दृष्टी न सोडी ॥१२॥
श्रीराम पदाति एकला जाण । मारिला त्रिशिरा खरदूषण ।
चौदा सहस्त्र रक्षोगण । रणकंदन केले रामे ॥१३॥
कबंध निर्दळिला बळी । बाणी निर्दळिला बाळी ।
सुग्रीवा मिनला त्याजवळी । वानरदळासमवेत ॥१४॥
त्यामाजील हनुमंत एक । लंका जाळोनि निःशंक ।
गांजोनिया दशमुख । लाविला धाक राक्षसा ॥१५॥
येथे आलियां रघुनाथ । कोण साहेल शरसंपात ।
होय राक्षसांसी कुळघात । लंकानाथ अविवेकी ॥१६॥
कैकसी बिभीषणाला रावणास उपदेश करण्यासाठी पाठविते
अति गर्वीं दशानन । माझी नायके शिकवण ।
तुझे मानितो वचन । हित संपूर्ण उपदेशीं ॥१७॥
श्रीरामा अर्पोनि सीता । सख्य करावे श्रीरघुनाथा ।
तेणे कल्याण लंकानाथा । आणि समस्ता राक्षसा ॥१८॥
ऐसी देता शिकवण । रावण करील अपमान ।
तोही साहोनि आपण । हित संपूर्ण उपदेशीं ॥१९॥
बिभीषणा तुज परम शांती । सर्वथा क्रोध न ये चित्ती ।
करोनि अपमाननिवृत्ती । लंकापती उपदेशीं ॥२०॥
ऐसे बोलोनिया वचन । उकसाबुकसीं करीरूदन ।
माझे वाचवीं संतान । अनन्यशरण यालागी ॥२१॥
बिभीषणाची तयारी व रावणाने घात
केल्यास तत्काळ श्रीरामांकडे जाण्याची तयारी
ऐकोनि मातेचे वचन । बिभीषणे वाहिले प्राण ।
प्राणांत साहोनि अपमान । हित सांगेन लंकेशा ॥२२॥
रावणा हित शिकविता । सीतासन्निपात लंकानाथा ।
करू धावेल माझे घाता । शरण रघुनाथा मी होईन ॥२३॥
माता कैकसीची अनुज्ञा व वंशरक्षणाबद्दल आशीर्वाद
तू श्रीरामा निघालिया शरण । तुझेनि माझा कुसवा धन्य ।
तुझेनि रावणा कृतकल्याण । वंशवर्धन तुझेनि ॥२४॥
श्रीरामासी निघाल्या शरण । त्याचेनि कुळ पवित्र पूर्ण ।
त्याचेनि धरा सुखसंपन्न । तीर्थ पावन त्याचेनि ॥२५॥
शरण रिघाल्या श्रीरघुनाथा । कृथार्थ होय त्याची माता ।
त्याचेनि पूर्वजां होय सुखरूपता । उद्धरी समस्ता समागमे ॥२६॥
त्याचेनि सुखरूप संसार । त्याचेनि सुखी सुरवर ।
त्याचेनि सुखी चराचर । जे श्रीरामचंद्र सेविती ॥२७॥
श्रीरामासी रिघाल्या शरण । स्वप्नप्राय जन्ममरण ।
कळिकाळ घाली लोटांगण । श्रीरामचरण सेविल्या ॥२८॥
श्रीराम रावणाचा वैरी । कैकसी त्याचा द्वेष न करी ।
ऐकोनि मातृवचन थोरी । आल्हाद भारी बिभीषणा ॥२९॥
त्याप्रमाणे बिभीषण रावणाकडे जातो :
निर्मत्सर मातृवचन । तेणे बिभीषणा हरिख पूर्ण ।
मस्तकी वंदोनि तिचे चरण । लोटांगण घातले ॥३०॥
मातृवचन महाबळी । वोडवोनि कृतांजुळीं ।
हरिखें निघाला रावणाजवळी । जनकबाळी सोडवावया ॥३१॥
जाता देखोनि बिभीषण । माता करी निंबोळण ।
तुझी कीर्ती होईल पावन । सुखसंपन्न तू होसी ॥३२॥
माताआशीर्वचनगोष्टी । तेणे बांधिलीं शकुनगांठी ।
मग निघाला उठाउठी । घ्यावया भेटी लंकेशा ॥३३॥
सभेत रावण त्याचे स्वागत करून त्याला अर्धासनावर बसवितो
इंद्रजित अतिकाय पुत्र दोन्ही । सभा शोभत प्रधानीं ।
रावण बैसला सिंहासनी । येता देखोनि बिभीषण ॥३४॥
उठिले समस्तही राजकुमर । उठिले प्रधान चतुर ।
बिभीषण होवोनि एकाग्र । केला नमस्कार रावणा ॥३५॥
रावणे देवोनि सन्मान । अति प्रीती बिभीषण ।
देवोनियां हेमासन । आपणासमान बैसविला ॥३६॥
बिभीषणाचे रावणाशी भाषण, लंकेची स्थिती
रावणा सांगे बिभीषण । समस्त मिळाले प्रधान ।
राक्षसा आले दुर्धर विघ्न । केले कंदन हनुमंते ॥३७॥
ब्रह्मयाच्या ब्रह्मासनीं । दंश मशक वृश्चिकश्रेणीं ।
समस्त व्याकुळ लंकाभुवनी । स्वस्थ कोणी असेना ॥३८॥
हनुमंते ख्याती केली भारी । हाहाभूत लंकानगरी ।
सर्प उठिले अग्निहोत्रीं । हविर्द्रव्यामाझारीं पिपीलिका ॥३९॥
जाणोनि भविष्याची गती । हित सांगे रावणाप्रती ।
जैंहूनी आणिली सीता सती । विघ्नांची ख्याती तैंहूनी ॥४०॥
मी कनिष्ठ तू तंव ज्येष्ठ । बुद्धि सांगों नये स्पष्ट ।
विघ्न आले अति अनिष्ट । विचार श्रेष्ठ विचारीं ॥४१॥
एकले श्रीरामाचे वानर । मारिले असंख्य निशाचर ।
विध्वंसिले लंकापुर । तुम्ही समग्र असतांही ॥४२॥
तुमचे माथा देवोनि पावो । मारिला अखया महाबाहो ।
इंद्रजिताच्या जीवा संदेहो । केला दाहो लंकेचा ॥४३॥
तुही असता समग्र । कोणा न धरवेचि वानर ।
कैसेनि जिंकवेल श्रीरामचंद्र । पुढे विचार तो कैसा ॥४४॥
वैर करिता श्रीरघुपती । राक्षसकुळा आली अशांती ।
उपावो सांगेन तदर्थी । स्वार्थापरमार्थीं उपयोगीं ॥४५॥
सीता चोरून आणल्याची लंकेवर प्रतिक्रिया व पुढील कार्याविषयी सूचना
तुवा चोरोनि आणिली सीता । तया अपराधा प्रायश्चित्ता ।
मी सांगेन लंकानाथा । ते तुवा तत्वता करावे ॥४६॥
येणे तुज भुक्तिमुक्ति । येणे तुज यश कीर्तिं ।
येणे तुझिया कुळा विश्रांती । जाण निश्चिती लंकानाथा ॥४७॥
सकळ पापांचे प्रायश्चित्त । नाम स्मरावे रघुनाथ ।
तो तुवा सेविल्या सीताकांत । सुखस्वार्थ पावसी ॥४८॥
आंगी आदळल्याही विघ्न । उपाय न सांगती प्रधान ।
विचारीं प्रवेशेना त्यांचे मन । धरोन मौन राहिले ॥४९॥
देखोनि कपीचा युद्धप्रभाव । पळाली त्यांच्या बळाची हांव ।
निमाला वाटिवेचा गर्व । परम संदेह प्रधाना ॥५०॥
श्रुत दृष्ट अनुमानचिन्ह । तुज म्या सांगीतलें येवोन ।
न सांगता न राहवे जाण । सखेपण आम्हा तुम्हा ॥५१॥
यावरी पुढील कार्यार्थ । राये पाहोनि हिताहित ।
दृढ करावा इत्यर्थ । स्वार्थ परमार्थ जेणे साधे ॥५२॥
रावणाचा प्रधानांवर राग व प्रधानांची भाषणे
ऐकोनि बिभीषणाचे वचन । संतोषला दशानन ।
प्रधानावरी कोपायमान । अति उद्विग्न स्वये जाला ॥५३॥
कंदन करोनि राक्षसांतें । लंका विध्वंसिली हनुमंते ।
ते देखोनि लंकानाथे । हनुमंताते मानवला ॥५४॥
एकला एक वानर । रणरंगी वीर धीर ।
स्वामिकाजी महाशूर । दाटुगा वीर मारूती ॥५५॥
प्रधान सेनानी रक्षागण । त्यांवरी रावण कोपायमान ।
आरक्त करोनिया नयन । कठिण वचन बोलत ॥५६॥
कळिकाला माझी दुर्धर नगरी । ते शोधोनियां लंकापुरी ।
सीता शुद्धि घेवोनि खरी । करोनि बोहरी कपि गेला ॥५७॥
अखयादि सेना सैन्यगण । तुम्हांदेखता केले कंदन ।
जळों तुमचे काळे वदन । वाटीववल्गना वृथाजल्प ॥५८॥
जळो तुमची वाटीवथोरी । जावोनि करा आडविहिरी ।
नातरी पोटी घाली सुरीं । वानरे नगरी नागविली ॥५९॥
एकले एक वानर । तुम्हा न राहवे त्यासमोर ।
पुढे आलिया श्रीरामचंद्र । युद्धी समग्र पळाल ॥६०॥
कोपला देखोनि रावण । अवघेही प्रधानगण ।
बोलों लागले आंगवण । सोळा जण साटोपे ॥६१॥
सप्तघ्न आणि यज्ञगोपास्य । यज्ञकेतु आणि दुर्धर्ष ।
रश्मिकेतु आणि प्रघस । विरूपाक्ष महाबाहु ॥६२॥
वज्रदंष्ट्र आणि धूम्राक्ष । वज्रानाभि आणि विद्युन्मुख ।
विद्युज्जिव्ह आणि त्रिशिख । मेघवर्ण महामारी ॥६३॥
कुंभ निकुंभ दोहींच्या बळा । नाही करावया कांटाळा ।
ऐसे प्रधान सोळा । उठिला पाळा सन्नद्ध ॥६४॥
रथ वाजि पदाति कुंजर । शस्त्रास्त्री सन्नद्ध वीर ।
येवोनि रावणासमोर । स्वबडिवार बोलती ॥६५॥
राम व वानरसैन्याचा संहार करण्याची प्रतिज्ञा
जैशा पतंगांच्या हारी । उडी घालिती वणव्यावरी ।
तेंवी राक्षस शस्त्रस्त्रीं । श्रीरामावरी निघाले ॥६६॥
रावणा ऐके सावधान । न लागतांचि अर्धक्षण ।
आम्ही मारू रघुनंदन । सुग्रीवलक्ष्मणसमवेत ॥६७॥
आरि जुत्पती थोर थोर । अंगदादि वानर वीर ।
रणी मारोनि समग्र । धरणी रूधिरप्रवाह ॥६८॥
जेणे येवोनि लंकेआंत । केला पुरदाहो राक्षसा अंत ।
तो मारू आम्ही हनुमंत । निमेषार्धांत उपडोनी ॥६९॥
पुढे भरला आहे उदधी । नसतां तरणोपायविधी ।
अवघे धांवत दुर्बुद्धी । मरणोन्मादीं उन्मत्त ॥७०॥
यापरी ते वीर समस्त । युद्धा धांवती मरणोन्मत्त ।
त्यांसी बिभीषण निवारित । युक्तायुक्तविचारें ॥७१॥
ती दर्पोक्ती ऐकून बिभीषणाचा संताप व त्यांची निर्भर्त्सना
बिभीषण म्हणे तुम्ही वीर । युद्धी कुशळ अति दुर्धर ।
न करिता बळाबळविचार । युद्धा समग्र केंवी जाता ॥७२॥
श्रीरामाचे एक वानर । मारले कुमर निशाचर ।
जेव्हा जाळिलें लंकापुर । तेव्हा त्यासमोर का नव्हां ॥७३॥
आला देखोनि हनुमंत । तुम्ही रांड महामिणी ऐसे लपत ।
आता मिरविता महापुरूषार्थ । लंकानाथप्रलोभा ॥७४॥
अशोकवनी होता रण । तुम्ही पळालां अवघे जण ।
अखया धाडितांचि जाण । घेतला प्राण हनुमंते ॥७५॥
अखयाचिये कैवारा । धाडिता न देखता निशाचरा ।
मग धाडिलें ज्येष्ठ कुमरा । महावीरा इंद्रजिता ॥७६॥
विश्वासतां तुमच्या बळां । अखया कुमर जीवे गेला ।
इंद्रजित रणी गांजिला । लंकेचा केला पुरदाहो ॥७७॥
धिग्धिग् तुमचा पुरूषार्थ । धिग्धिग् तुमचे जीवित्व ।
वृथा चाळवा लंकानाथ । रावण निश्चित महाभोळा ॥७८॥
रावण भोळें बापुडे । तुम्हांसी विश्वासलें वेडें ।
तुमच्या पोटी आहे कुडे । हे धडफुडें लक्षेना ॥७९॥
दोषादिग्दर्शनामुळे प्रधान लज्जित :
ऐकोनि बिभीषणाचे वचन । समस्त जाले लज्जायमान ।
तंव उठिलें पंच प्रधान । आपुली आंगवण वानित ॥८०॥
प्रहस्त महोदर पार्श्वद देख । यज्ञहनु आणि दुर्मुख ।
यापांचांचे पंच श्लोक । अलौकिक आंगवण ॥८१॥
रावणाचिये निजदळीं । प्रहस्त वीर महाबळी ।
तो आपली प्रतापनव्हाळी । रावणाजवळी सांगत ॥८२॥
प्रधानांची आत्मप्रौढी, प्रहस्ताची आढ्यता
युद्धामाजी ज्याचे हात । अरिनिर्दळणीं अति समर्थ ।
यालागी नांवे प्रहस्त । अति आप्त लंकेशा ॥८३॥
खड्ग चाप शूळ फरश । गदापाणी वीर राक्षस ।
मारावया वानरास । आम्ही बहुत रणयोद्धें ॥८४॥
बहुकाळाची तृषित भूमी । वानररूधिरें तृप्त करून आम्ही ।
रणी मारू वानरस्वामी । विजयो आम्ही पावोनी ॥८५॥
लक्ष्मणासहित रामस्वामी । ठायी पाडोनि रणभूमी ।
आम्हांसी विचारिता संग्रामी । पराक्रमी कोण आहे ॥८६॥
रामलक्ष्मणां करोनि घात । सुग्रीव अंगदा करोनि अंत ।
वानर मारीन मी समस्त । तरी प्रहस्त वीर तुझा ॥८७॥
ताळफळें गण्ती वनी । तैशा पाडीन वानरश्रेणीं ।
रामलक्ष्मणां पाडोनि रणी । अर्ध क्षणी येईन ॥८८॥
महोदराची गर्जना :
ऐसे बोलता प्रहस्त । महोदर उठिला गर्जत ।
नरवानरां करीन घात । निजपुरूषार्थप्रतापें ॥८९॥
बळवंत बुद्धिवंत । रावणाचा परम आप्त ।
महोदर निजपुरूषार्थ । असे सांगत साटोपे ॥९०॥
जयाचे का उदर । दुष्ट दुराश दुर्भर ।
यालागी नाम मनोहर । जेंवी विखार महा उरग ॥९१॥
ऐक राया सावधान । मी शस्त्रास्त्रीं प्रवीण जाण ।
रणी पाडीन रामलक्ष्मण । विगतप्राण रणरंगी ॥९२॥
अंगद सुग्रीव जांबवंत । या जुत्पतींचा करीन घात ।
वानरसेना समस्त । क्षिती विख्यात पाडीन ॥९३॥
वानरांचे पै रूधिर । तृषार्त प्राशिती निशाचर ।
ऐसे बोलोनि महोदर । उठे सत्वर युद्धार्थें ॥९४॥
महापार्श्वाची स्वबलप्रौढी :
महोदरा निघतांचि देख । महापार्श्वे दिधली हाक ।
माझा पुरूषार्थ अलोकिक । स्वये दशमुखा अवधारी ॥९५॥
सकळ पार्षदमुख्यता यासी । म्हणोनि महापार्श्व म्हणती त्यासी ।
रावणा एकांतवासीं । विचारासीं अति आप्त ॥९६॥
तो महापार्श्व आपण । संमुख लक्षोनि रावण ।
बोले आपुली आंगवण । युद्ध दारूण संग्रामी ॥९७॥
बृहस्पतिसमान बुद्धी । दारूण निर्वाणयुद्धीं ।
वीर धीर त्रिशुद्धी । दुष्टबुद्धी महापार्श्व ॥९८॥
माझा प्रथम शस्त्रघायीं । श्रीरामलक्ष्मणा पाडीन ठायी ।
सुग्रीवादि वानर पाही । बहुत घायीं लोळवीन ॥९९॥
माझे बाहु तेचि वागुरा । तेंचि दृढबंधन वानरा ।
बळे रगडितां कपींद्रा । रूधिरधारा सूटती ॥१००॥
जैसा महामेरू पर्वत । वर्षाकाळीं असे द्रावत ।
तैसे वानरांचे रक्त । प्रवाहत देखाल ॥१०१॥
जैशा पंचाननाच्या चपेटा । लागता पडती गजघटा ।
तेंवी वानरे घायवटा । पडले स्पष्ट देखाल ॥१०२॥
माझिया शस्त्रघातेंकरीं । वानर पडिले पृथ्वीवरी ।
राक्षस रूधिरे स्नानेंकरीं । मांसआहारीं अति तृप्त ॥१०३॥
श्रीराम आणि लक्ष्मण । सुग्रीव आणि वानरगण ।
म्या मारिले गा संपूर्ण । ऐसे तू जाण लंकेशा ॥१०४॥
निकटवर्ती मी असता । रावणा तुज कायसी चिंता ।
सुखे भोगावी हो सीता । विमानस्था महावनीं ॥१०५॥
दुर्मुखाची उक्ती :
ऐसे बोलतांचि देख । तंव रागे उठिला दुर्मुख ।
हनुम्यानें गांजिला दशमुख । ते महादुःख साहवेना ॥१०६॥
तो हनुमंत अति दुर्धर । मारीन तरी मी दुर्मुख वीर ।
गर्जोनि बोले निशाचर । संप्रधार बळाचा ॥१०७॥
वानराची चपळवृत्ती । मज येतांचि पळे मारूती ।
तरी मी त्याची करीन शांती । ऐके निश्चिती निर्धार ॥१०८॥
अतळ वितळ सुतळ । भेणे लंघिती सप्त पाताळ ।
तेथेंही धरीन गोळांगुळ । तो मी तत्काळ मारीन ॥१०९॥
मजभेणें पळता सागरी । उडी घालोनि पुच्छी धरी ।
मग काढीन बाहेरी । भूमीवरी आपटीन ॥११०॥
आधी मारीन हनुमंत । मग मारीन श्रीरघुनाथ ।
लक्ष्मणाचाकरीन घात । करीन अंत सुग्रीवा ॥१११॥
वानरांची मादी आली । ते रगडीन घायातळी ।
एकला एक आर्तुबळी । तुजजवळी येईन ॥११२॥
दुजयाचा पाहे सांगात । जळो त्याचा पुरूषार्थ ।
रामलक्ष्मणवानरांत । रणकंदनार्थ माझेनि ॥११३॥
वज्रहनाची आरोळी :
दुर्मुखबडीवार ऐकोन । रागे उठिला वज्रहन ।
संमुख करोनि दशानन । स्वये गर्जोन बोलत ॥११४॥
पदाति रथ वाजी कुंजर । सुखे राहोत निशाचर ।
संहारावया नर वानर । माझे चक्र उदंड ॥११५॥
प्रहस्त महोदर हरिखें । महापार्षदादि दुर्मुखें ।
रावणापासी राहावे सुखे । वानरकटकें मी जाणे ॥११६॥
न लगे शस्त्रारण । आम्हांसी न लगे रणांगण ।
नरवानरांसी मरण । माझेनि जाण जिव्हाग्रें ॥११७॥
लक्ष्मणासीं समवेत । प्रथम गिळीन मी रघुनाथ ।
अंगद सुग्रीवा जांबवंत । हनुमंत महावीर ॥११८॥
नळ नीळ तरसा तरळ । सुषेण मैंदादि सकळ ।
माझेनि दर्शने वानरदळ । प्रळयकाळ पावेल ॥११९॥
पर्वताकृति निशाचर । जिव्हेनें चाटितसें वक्त्र ।
दांत खातसें करकर । नरवानर भक्षावया ॥१२०॥
जिव्हा काळी संकटक । दशन विक्राळ विटंक ।
येवोनि रावणासंमुख । देवोनि हाख गर्जत ॥१२१॥
जा रे सांगा लंकानाथा । म्या मारिले श्रीरघुनाथा ।
वधिले वानरांसमस्तां । सुखे तुवा सीता भोगावी ॥१२२॥
आजिपासोनि लंकापुरा । भय नाही निशाचरा ।
स्वभोगीं भोगाव्या निजदारा । सुमनसेजेसीं संयुक्त ॥१२३॥
ऐसे राक्षस बहुवस । मिळोनि अति कर्कश ।
बोलाचे मिरविताति यश । आले अपेश चुकेना ॥१२४॥
सर्वांची दर्पोक्ती ऐकून बिभीषणाचे उत्तर :
देखोनि राक्षसांची उद्धतोक्ती । बिभीषण तो महामती ।
तेणे निवारिलें पुढती । युक्तायुक्तिविभागें ॥१२५॥
हात जोडोनि समस्तांप्रती । मृदु मधुर मंजुळवृत्ती ।
बिभीषण बोले पुढती । स्वधर्मनीती धर्मार्थ ॥१२६॥
तुम्ही प्रधान बुद्धिवंत । धर्माधर्मविचार येथ ।
रामरावणांचा वैरार्थ । अधर्म येथ मुख्यत्वें ॥१२७॥
श्रीरामाची दारा हरण । किमर्थ करी पै रावण ।
हेंचि वैराचें कारण । प्राणहरण परदारा ॥१२८॥
सीता परम सती सृष्टी । तिचिया अभिलाषदृष्टीं ।
रावणाची बुद्धि खोटी । महापापीं सृष्टी हा एक ॥१२९॥
योग्य उपाय न सांगण्याबद्दल त्यास दोष :
त्यासी न सांगता बुद्धि । तुम्ही साह्य होता युद्दी ।
यालागी तुम्ही मंदबुद्धी । महामूढधी प्रधान हो ॥१३०॥
विष खातियाचे पंगतीं । जो बैसे तो मरणार्थी ।
धरिता पाप्याची संगती । अधोगती पावाल ॥१३१॥
विचारोनि बळाबळ । मग करावे युद्ध प्रबळ ।
तदर्थीं तुम्ही अवघे मूर्ख सकळ । अवघे निर्बळ युद्धार्थीं ॥१३२॥
सुबुद्धि सांगता वाटे दुःख । साच बोलता वाटे विख ।
आदिकरोनिया दशमुख । तुम्ही अवघे मूर्ख अविवेकी ॥१३३॥
त्या अविवेकाचें लक्षण । तुम्हांस सांगेन संपूर्ण ।
पाहोनि पराची आंगवण । फावल्या आपण युद्ध कीजे ॥१३४॥
रावण बापुडे भोळे येथ । प्रधान मिथ्यावादी समस्त ।
जैसे झकवा तैसे झकत । हिताहित जाणेना ॥१३५॥
कुष्ठियासीं कुष्ठ सांगता । कोप येतसे तत्वता ।
का रांडवेसीं रांड म्हणता । अति क्षोभतां संतापें ॥१३६॥
तेंवी मज सत्य बोलता । कोप येतसे तत्वता ।
तरी रावणाच्या हितार्था । यथार्थता बोलेना ॥१३७॥
प्रहस्ताचा अधिक्षेप :
प्रहस्त म्हणवितो बळी । पुत्र निमाला जंबुमाळी ।
हनुमान मारीच ते काळी । रणकल्लोळीं उपटोनी ॥१३८॥
पुत्रशोकें दुःखाभिभूत । रावणापासी आला रडत ।
श्रीरामसौमित्र हनुमंत । मारीन म्हणत ते मिथ्या ॥१३९॥
मिथ्या त्यांचे बळबंड । बोल बोलतो वितंड ।
प्रहस्ताचे काळे तोंड । परम लंड प्रधान ॥१४०॥
महोदराची निर्भर्त्सना :
मिथ्यावादी महोदर । जै मारिला अखया कुमर ।
तेव्हा होवोनि कपीसमोर । रणी वानर न मारीच ॥१४१॥
अखया मारिला देखोन । महोदर पलायमान ।
आता मिरवितो आगंवण । रामलक्ष्मण मारावया ॥१४२॥
सूर्य जिणावयासाठीं । खद्योत निजतेजें हुटहुटी ।
तैसी महोदराची चावटी । मिथ्या गोष्टी महामूर्ख ॥१४३॥
इंद्रजित गांजिला सुबद्ध । तेव्हा धावोनि महापार्षद ।
हनुमंतासीं न करी युद्ध । पळाला प्रसिद्ध पडलंके ॥१४४॥
तो हा मिरवितो आंगवण । मी मारीन रामलक्ष्मण ।
अंगद सुग्रीव वानरगण । हे चाळवण लंकेशा ॥१४५॥
महापार्श्वादि इतरांचीही तशीच संभावना :
यापरी महापार्श्व । वृथा जल्पतां मिथ्यावाद ।
प्रधानांमाजी महामंद । अति निंद्य नपुंसक ॥१४६॥
दुर्मुखाचें काळे मुख । जेव्हा गांजिला दशमुख ।
तेव्हा वानरासंमुख । युद्धोन्मुख न मारीच ॥१४७॥
आता बोलत बळनवाळी । जेणे केली लंकाहोळी ।
तो मी मारीन जळीं स्थळीं । सप्तपाताळीं शोधोनी ॥१४८॥
लंका जाळिली तुम्हांदेखतां । तेव्हा न माराचि हनुमंता ।
आता मारीन म्हणता । लाज सर्वथा असेना ॥१४९॥
असत्यवादी सदा देख । यालागी नांव दुर्मुख ।
त्यांचे बोलणें एक एक । अवघे लटिक लंकेशा ॥१५०॥
वज्रहनु बोलता बोली । रामलक्ष्मणवानरांसी गिळीं ।
हनुम्यानें करिता लंकाहोळी । तेव्हें तत्काळी गिळीचना ॥१५१॥
कपीने करिता लंकाहोळी । वज्रहनूची बैसे दांतखिळी ।
धाके लपाला अर्धजळीं । रायाजवळीं तै नव्हता ॥१५२॥
याप्रमाणे प्रधानांची मिथ्या दर्पोक्ति ऐकू
नये व सीता परत करावी हे श्रेयस्कर
ऐसी प्रधानाची वार्ता । समूळ मिथ्या लंकानाथा ।
श्रीरामासी अर्पावी सीता । कुल सर्वथा वांचवीं ॥१५३॥
प्रधान लज्जायमान :
ऐकोनि बिभीषण वचन । प्रधान सेनानी रावण ।
अवघे जाले लज्जायमान । अधोवदन राहिले ॥१५४॥
अपमानितां सर्वासी । देखोनि क्षोभ इंद्रजितासी ।
तोही आपण अति आवेशी । बिभीषणासी बोलत ॥१५५॥
पुढील प्रसंगीं अनुवाद । संवादामाजी विवाद ।
दोघा बंधूंसीं विरोध । परम क्रोध खवळेल ॥१५६॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामासी अनन्य शरण ।
स्वये होईल बिभीषण । तेंचि निरूपण अवधारा ॥१५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
बिभीषणेन रावणप्रधाननिर्भर्त्सनं नाम पंचत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३५॥
॥ ओव्या १५७ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १९४ ॥
