॥ श्रीएकनाथमहाराजकृत
39.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय एकोणचाळीसावा ॥
सागराची श्रीरामांना शरणागती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद :
बिभीषणासी लंकादान । देवोनियां श्रीरघुनंदन ।
सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदे ॥१॥
वानर करिती गदारोळ । बिभीषणासी सुखकल्लोळ ।
सुग्रीवा उल्लास प्रबळ । सकळ दळ देखोनि ॥२॥
वानरांचे महाभार । करू येती नमस्कार ।
श्रीरामनामाचा गजर । देती भुभुःकार आल्हादे ॥३॥
हनुमान व सुग्रीव समुद्र पार करण्याच्या विचारात :
तेथे येवोनि हनुमंत । सुग्रीवासी करी एकांत ।
सीता सोडावयाचा मुख्यार्थ । लंकानाथ वधावया ॥४॥
समुद्राचिये तीरीं । बैसल्या वानरांच्या हारी ।
कैसेनि जाववेल पैलपारी । ते विचारीं कपिनाथ ॥५॥
नद्द्या पर्जन्यें भरोनि येति । तेणे सिंधु प्रवाहे ना क्षिती ।
उष्णकाळी नद्द्या सुकती । तेणे अपांपती आटेना ॥६॥
ऐसा नित्य पूर्णत्वे गंभीर । अगाध अक्षोभ्य सागर ।
आमची सेना तंव वनचर । केंवी परपार पावती ॥७॥
समुद्रलंघना उपावो । आम्हांसी सर्वथा न दिसे पहाहो ।
तू तंव वानरांचा महाबाहो । काय उपावो करावा ॥८॥
बैसोनि वानरे समुद्रतटी । करिती लांब लांब गोष्टी ।
ते तंव मिथ्या गा चावटी । जावया परतटीं शक्ति नाही ॥९॥
सुग्रीवाची काळजी :
सुग्रीव म्हणे हनुमंता । काय बुद्धि करावी आता ।
समुद्रलंघनीं तत्वता । उपाव सर्वथा असेना ॥१०॥
कैसेनि वधावें लंकानाथा । कैसेनि आणावी ते सीता ।
सुखी न करवे रघुनाथा । ऐसी अवस्था दिसताहे ॥११॥
तुज पुसतों अति आप्तता । समुद्रलंघनी उपाव वृथा ।
कार्य न साधे श्रीरघुनाथा । काय म्या आता करावे ॥१२॥
कार्य न साधे श्रीरघुनाथा । ऐसे उत्तर ऐकता ।
स्फुरण आले हनुमंता । साटोपता उठिला ॥१३॥
हनुमंताचे स्फुरण व बळाचा आविष्कार :
निर्दळावया लंकापती । प्रळयरूद्राची आकृती ।
वेगे वाढिला मारुती । भेणे कांपती सुरवर ॥१४॥
पिंजारिल्या रोमावळी । शेंडी थरथरी समूळी ।
पुच्छ वाढिंनलें निराळीं । आतुर्बळीं खवळला ॥१५॥
तुम्ही अवघे वानरगण । करा माझे पुच्छग्रहण ।
श्रीरामलक्ष्मणां खांदीं वाहून । जाईन घेऊन लंकेसी ॥१६॥
बिभीषण शरणागत । त्यासी धरोनि ह्रदयात ।
एकेचि खेपें पै समस्त । नेईन निश्चित लंकेसी ॥१७॥
हनुमान आतुर्बळी उद्भट । वाटारिले नेत्रवाट ।
बाहु स्फुरती थरथराट । वळिला साट पुच्छाचा ॥१८॥
देखोनि हनुमंताची शक्ती । सुग्रीव दचकला चित्ती ।
गजबजिले जुत्पती । शांत मारूती केंवी होय ॥१९॥
त्यामुळे सर्वांची गजबज, परंतु श्रीरामांकडून त्यांचे सांत्वन :
देखोनि हनुमंताचे त्राण । वेगी उठिला रघुनंदन ।
त्यास ह्रदयी आलिंगून । मधुर वचन अनुवादे ॥२०॥
समुद्र वापुडे ते कोण । अग्निबाणें कोरडा करीन ।
पायी नेईन वानरगण । लंकाकंदन करावया ॥२१॥
कायसा रावणाचा पुरूषार्थ । अर्धक्षणें करीन घात ।
ऐसा शांतवोनि हनुमंत । स्वस्थ रघुनाथे बैसविला ॥२२॥
सागराला प्रार्थना करावी अशी बिभीषणाची मार्गदर्शनपर सूचना :
ऐकोनि श्रीरामांचे वचन । सुखावला बिभीषण ।
सुगमेपायें समुद्रतरण । मूळ कारण सांगत ॥२३॥
श्रीरामवाक्य प्रतापपूर्ण । ऐकोनियाम बिभीषण ।
स्वये घालोनि लोटांगण । कर जोडूनि विनवित ॥२४॥
सोडोनियां अग्निबाण । सिंधु शोषिता न लागे क्षण ।
परी ते नव्हे गा भूषण । अतिदूषण सूर्यवंशा ॥२५॥
सावधान परिसे श्रीरघुनाथा । सांगेन मी समूळ कथा ।
समुद्र पूर्वज तत्वता । ते मूळानुवार्ता अवधारी ॥२६॥
तुझे पूर्वज सगर जाण । त्यांचेनि सागर हा निर्माण ।
यालागी सागर हे अभिधान । देवपुराणा अनुवादे ॥२७॥
पूर्वी समुद्र काये नव्हता । आवरणोदकीं अति गुप्तता ।
सगरें खाणोनियां तत्वता । प्रकटार्था आणिला ॥२८॥
सगरापासूनि सागरता । तो तुज पूर्वज तत्वता ।
कैसेनि त्याच्या करावे घाता । निजवंशस्था समुद्रा ॥२९॥
वेगळें करोनि दशरथा । सागर सातवा प्रपिता ।
ऐसी सूर्यवंशाची कथा । होय सांगता बिभीषण ॥३०॥
समुद्र पूर्वज पूज्य जाण । त्यासी श्रीराम निघाल्या शरण ।
तो तुज भेटोनि आपण । सागरात्तरण सांगेल ॥३१॥
तुझा प्रताप श्रीरघुनाथा । समुद्र जाणतो तत्वता ।
त्या तुज भेटीची परम आस्था । मज सर्वथा कळलीसे ॥३२॥
तू तंव प्रतापी रघुराज । सगरवंशीं वंशध्वज ।
समुद्र तुझा निजपूर्वज । करील काज वंशाचें ॥३३॥
निजपूर्वज सिंधूसीं शरण । रिघतां तुज लाज कोण ।
सुखोपायें समुद्रतरण । स्वये आपण सांगेल ॥३४॥
धर्मशीळ सज्ञानता । समूळ निजवंशाची कथा ।
बिभीषणें स्वये सांगता । श्रीरघुनाथा आल्हाद ॥३५॥
बिभीषणाची सूचना श्रीरामांना मान्य :
बिभीषणाची जे गोष्टी । ते रूचली श्रीरामाचे पोटी ।
लक्ष्मणसुग्रीवें लक्षोनि दृष्टी । तेंच जगजेठी अनुवादे ॥३६॥
सागरासी रिघावे शरण । गोड बोलिला बिभीषण ।
सुग्रीव राजा सखा लक्ष्मण । तुम्हा हे वचन रूचे की ॥३७॥
सुग्रीव आणि लक्ष्मण । वदती वंदोनि श्रीरामचरण ।
बिभीषणवचन अति प्रमाण । तेंचि आपण करावे ॥३८॥
सत्यवादी बिभीषण । सिंधुपूर्वजासी रिघोनि शरण ।
अनायासें समुद्रतरण । तेंचि आपण करावे ॥३९॥
त्याप्रमाणे समुद्राचे पूजन व त्रिरात्र अनुष्ठान :
ऐकोनि दोघांचे वचन । रिघावया समुद्रा शरण ।
श्रीराम करी समुद्रपूजन । सुमनचंदनफळमूळें ॥४०॥
रम्य समुद्राचें तटीं । पसरोनि कुशास्तरण दाटी ।
दर्भशयनी श्रीराम जगजेठी । घ्यावया भेटी सागराची ॥४१॥
तू आमुचा पूर्वज । आम्ही तुझे वंशज ।
माझे सिद्धी पाववीं काज । शरण तुज अनन्यत्वे ॥४२॥
ऐसे बोलोनि रघुनंदन । दर्भासनी करी शयन ।
जेंवी पुरिला हुताशन । दैदीप्यमान अग्निहोत्रीं ॥४३॥
यापरी श्रीरघुनाथ । साधावया निजकार्यार्थ ।
त्रिरात्र सिंधुशरणागत । दिसे निद्रिस्थ सावधत्वे ॥४४॥
जागृती स्वप्न सुषुप्ती । तुरीयातीत श्रीराममूर्तीं ।
तोही शरण सिंधू शरणार्थी । दिसे प्रतीति सुरनरां ॥४५॥
ऐसा प्रसुप्त श्रीरामचंद्र । देखोनि तळमळती वानर ।
केव्हा पावों समुद्रपार । दशशिरावधार्थ ॥४६॥
तरीही समुद्राच्या असहकारामुळे सर्वांना चिंता व हनुमंताचा त्वेष :
अनुलक्षोनि श्रीरघुनाथ । हनुमान निजगुह्य सांगत ।
निद्रा करितांचि येथ । व्यर्थ पुरूषार्थ दिसताहे ॥४७॥
स्वये बोलती वानरगण । श्रीरामभाता दुर्धर बाण ।
तरीं का निघाला शरण । गाढेपण धरोनी ॥४८॥
हनुमान म्हणे मी निजसेवक । समुद्रतरणीं कायसी अटक ।
पुच्छाग्रीं समग्र कटक । एकीकक उतरीन ॥४९॥
अंतर्यामी श्रीरघुनाथ । जाणोनि हनुमंताचे ह्रद्गत ।
स्वये उठिला सावचित्त । निजपुरूषार्थ दावावया ॥५०॥
श्रीरामांचा क्रोध व धनुष्यबाण आणण्याचा आदेश :
तीन दिवस लोटल्यापाठीं । स्वये समुद्र न येचि भेटी ।
श्रीराम कोपला जगजेठी । रक्तांबरदृष्टी कृतांत ॥५१॥
आमुचा पूर्वज हा पूर्ण । म्हणोनि सद्भावे रिघालो शरण ।
तंव याचे दुर्जनपण । न येचि आपण भेटीसी ॥५२॥
याचा वाढवोनि सन्मान । करोनि अर्घ्यपाद्द्यादि पूजन ।
अनन्य भावे रिघता शरण । न येचि आपण भेटीसी ॥५३॥
श्रीरामांच्या नम्रत्वाचा अनादर, राजांना मार्दव उपयोगी नाही याचा प्रत्यय :
याचे सर्वांगी गर्व मोठा । अक्षोभ्यत्वें अगाध ताठा ।
यासी मी लक्ष्मणा सुभटा । लावीन वाटा निधनाचे ॥५४॥
शरण रिघाल्या पुरूषार्थी । कीर्ति ते होय अपकीर्ती ।
शरण रिघावे अशक्तीं । ते केलियां शक्तिलाभ कैंचा ॥५५॥
शरण रिघतांचि पाठी । वाढीव होय उफराटी ।
तेथे कायसी यशाची गोष्टी । अपेश वाक्पुटी जग वदे ॥५६॥
शरण रिघतांचि बळवंतीं । समूळ पळे यश कीर्ती ।
त्याची कैंची विजयप्राप्ती । अवघे म्हणती अशक्त ॥५७॥
समुद्र स्वये अभक्त आपण । यासी मी भक्त रिघालों शरण ।
तंव तेणे गर्व धरिला पूर्ण । केले उपेक्षण पै माझे ॥५८॥
मृदुपणे नाही यश कीर्ति । मृदुपणे नाही लाभप्राप्ती ।
मृदुपणे नाही विजयवृत्ती । जाण निश्चिती सौमित्रा ॥५९॥
मृदुत्वें संन्यासीं धरावी शांती । तेणे त्यासी परमार्थप्राप्ती ।
मृदुत्व आम्हा रायांप्रतीं । जाण अपकीर्ति कारण ॥६०॥
अदंड्याचें राजें दंडिती । अदम्यातें राजे दमिती ।
ते राजे जै शांति धरिती । तेचि अपकीर्ति तयांसी ॥६१॥
समुद्राचा गर्व पूर्ण । तो नाशीन न लागता क्षण ।
दे दे माझे धनुष्यबाण । अति दारूण सर्पप्राय ॥६२॥
सर्प लागल्या उतरे विख । त्याहूनि माझे बाण तीख ।
सुरा असुरां प्राणांतक । जीवातेंही देख जीव घेती ॥६३॥
श्रीरामांच्या कोपामुळे देवादिकांचा उद्वेग :
ऐसे बोलोनि आपण । कोपे वाहिलें धनुष्यबाण ।
अग्निअस्त्र सज्जोनि आपण । वोढी काढोन चालिला ॥६४॥
क्षोभला श्रीराम देखोन । स्वर्गी देव कंपायमान ।
तळमळिती मगर मीन । आले निधन सिंधुसी ॥६५॥
समुद्र शोषिता राघव । पाताळीं कांपती दानव ।
दैत्य नाग मानव । धाकती सर्व श्रीरामा ॥६६॥
बाण पडता समुद्रजळी । सप्तपाताळां करील होळी ।
पाताळवासीं कांपती चळी । श्रीराम महाबळी क्षोभला ॥६७॥
धनुष्य चढवितां श्रीरामा । धाके रविचंद्रां काळिमा ।
नक्षत्रे पडती व्योमा । ऋषी स्वधर्मा विसरले ॥६८॥
शोषिता समुद्राचें पाणी । बाणाग्नि मिळोनि अर्णवाग्नीं ।
दोनी भस्म करिती अवनी । ब्रह्मा मनी संचिंत ॥६९॥
ब्रह्मा देखोनि सचिंत । ब्रह्मभुवनीं अति आकांत ।
सिंधुनिर्दळणी श्रीरघुनाथ । करील अंत सृष्टीचा ॥७०॥
ऐके सौमित्रा साचार । शोषोनि समुद्राचें नीर ।
पायी उतरोन वार । निशाचरावधार्थ ॥७१॥
श्रीरामांचा रौद्रावतार पाहून सागराचे स्त्रीपुत्रांसह आगमन :
धनुष्य ओढिता सत्राण । दोनी वटारिले नयन ।
श्रीराम दिसे काळासमान । वानरगण कांपती ॥७२॥
क्षोभला देखोनि श्रीरघुनाथ । स्त्रियांपुत्रांसमवेत ।
समुद्रासी अति आकांत । आला प्राणांत श्रीरामे ॥७३॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । त्याते निवारूं शकेल कोण ।
त्यासी न होतांचि शरण । आले मरण निश्चित ॥७४॥
परम कृपाळु श्रीरघुनाथ । स्त्रियांपुत्रांसमवेत ।
स्वये होवोनि मूर्तिमंत । समुद्राआंत प्रकटला ॥७५॥
रामनिकट सागरी । सहस्त्रोर्मि महालहरीं ।
सिंधु प्रकटला त्यांमाझारी । रूपधारी साकार ॥७६॥
व्दादशनामांकित टिळे । कंठी यज्ञोपवीत रूळे ।
सुपुत्रस्त्रिया कुटुंबमेळे । देखिले त्या काळे श्रीरामे ॥७७॥
स्त्रियांपुत्रांसमवेत । समुद्र पायवाटे येत ।
ते देखोनि श्रीरघुनाथ । अति विस्मित स्वये झाला ॥७८॥
सागराची मूळ उत्पत्ती ब्रह्मापासून, त्यामुळे
तो ब्राह्मण मानून त्याला श्रीरामांनी वंदन केले :
पूर्वी ब्रह्मयाने केला निर्माण । यालागी सिंधु शुद्ध ब्राह्मण ।
सगरीं पुढे केले खनन । सागर अभिधान तेणे त्यासी ॥७९॥
ऐसा ब्राह्मण देखोनि तेथ । कृपाळु तो श्रीरघुनाथ ।
न करीच शरसंपात । व्दिजघात चुकवावया ॥८०॥
बाहेर आलिया ब्राह्मण । मग समुद्री सोडूनी बाण ।
श्रीरामे विचारोनि जाण । वोढी काढोन राहिला ॥८१॥
सागराची श्रीरामांना विनंती :
मग ब्राह्मण उदकाआंतौता । शरण शरण म्हणे श्रीरघुनाथा ।
माझ्या करू नको घाता । शरण तत्वता मी आलो ॥८२॥
कोणे अपमानिलें निजव्दारा । धनवृत्तीं की हरिली दारा ।
ते सांगे गा मज रघुवीरा । तुझ्या कैवारा मी करीन ॥८३॥
आधी साधीन व्दिजकार्यार्था । मग सोडवीन गा सीता ।
त्रिसत्य सत्य हे रघुनाथा । सांगा मी आता काय करू ॥८४॥
मज श्रीरामा आलिया शरण । तुज कल्पांती नाही मरण ।
श्रीराम वंदुनी व्दिजाचे चरण । पुसे आपण काय करू ॥८५॥
व्दिज म्हणे श्रीरघुनाथा । मी समुद्र शरण आलो आता ।
सोडोनियां शरसंपाता । माझ्या घाता का करिसी ॥८६॥
श्रीरामांचे उत्तर :
तू माझा पूर्वज सनातन । तुज देवोनि सन्मान ।
तीन दिवस निरंजन । म्या दर्भशयन सेविले ॥८७॥
तुझे आंगी गर्व पूर्ण । भेटी न देसीच जाणोन ।
आता वांचवावया निजप्राण । आलो शरण म्हणतोसी ॥८८॥
न येण्याचे कारण सागर सांगतो :
तुझेनि थोर अपकीर्ति । झाली सूर्यवंशा अपख्याती ।
तेणे क्षोभे गा रघुपती । भेटी निश्चिती न घेंचि ॥८९॥
आता धरिलिया आंगवण । तरी मी घेवो आलो दर्शन ।
तुज गुह्य सांगो आलो आपण । सावधान अवधारी ॥९०॥
देखता वानरांचिया कोटी । रत्नांजळी घेवोनि मुष्टी ।
अर्पोनि श्रीरामअंगुष्ठी । चरण ललाटीं वंदिलें ॥९१॥
श्रीराम अवतार पूर्ण । मी जाणतो संपूर्ण ।
पुढती पुढती लोटांगण । पुढती चरण वंदिले ॥९२॥
श्रीरामा ऐके सावधदृष्टी । सांगणे आहे गुह्य गोष्टी ।
सूर्यवंशी कीर्ति लाठी । ते उपराटीं तुवा केली ॥९३॥
पूर्वजांच्या कीर्तिच्या विरूद्ध घटना घडली :
माझी सूर्यवंशी उत्पत्ती । जाली असे कैशा रीती ।
तेंही सांगेन श्रीरघुपती । सावधवृत्तीं अवधारी ॥९६॥
सगरापासाव सागर । हा भागवतीं कथाविस्तार ।
कपिलमुनीश्चरचरित्र । अति विचित्र तिही लोकी ॥९७॥
तया चरित्राचें पोटी । कपिल लक्षूनि क्षोभक दृष्टी ।
सगरवीर सहस्त्र साठी । वाग्वज्रदंष्ट्रीं शापिले ॥९८॥
बलोन्मत्त साठी सहस्त्र । नाही भूतदया अणुमात्र ।
जळत असाल अहोरात्र । हे वाग्वज्र सोडिले ॥९९॥
वज्रघात एकाते मारी । वाग्वग्राची त्याहूनि थोरी ।
साठी सहस्त्रां कवळोनि वीरी । आगी एकसरी लाविली ॥१००॥
वज्रघात येता दारूण । शूर छेदिती विंधोन बाण ।
वाग्वज्रासीं निवारण । सर्वथा जाण असेना ॥१०१॥
ढळवेना ब्रह्मशापाहातीं । मागे पुढे न चले गती ।
धडधडाटें पै जळती । अहोरातीं महावीर ॥१०२॥
जळत देखता सगरांसी । कृपा उपजली मुनीश्वरांसी ।
प्रार्थोनिया कपिलासी । उश्शापासीं मागितले ॥१०३॥
भगापासूनि उत्पन्नभूत । वंशीं जन्मला भगीरथ ।
तो गंगा आणोनि एथ । सगर समस्त उद्धरील ॥१०४॥
तेचि वंशीं भगीरथ । गंगा आणोनि प्रयत्नयुक्त ।
पूर्वज तारिले गा समस्त । जग पुनीत तेणे केले ॥१०५॥
ऐसी पूर्वजांची ख्याती । तेचि वंशीं तू रघुपती ।
पुण्य पूज्यत्वें पवित्र कीर्ति । थोर अपकीर्ति तुज आली ॥१०६॥
आपण दोघे बंधु असता सीता गेली याचा खेद सागर व्यक्त करितो :
कळिकाळ घालोनि तोडरीं । दोघे बंधू धनुर्धारी ।
शेखी बाईल नेली चोरीं । लोकांतरीं अपकीर्ति ॥१०७॥
पाठीची हरविली कांता । लाज लाविली वंशपुरूषार्था ।
थोर अपकीर्ति तुझे माथा । श्रीरघुनाथा बैसली ॥१०८॥
श्रीराम सूर्यवंशस्थ । सीताविरहे रडत रडत ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत । दुःखाभिभूत मी झालो ॥१०९॥
तुवा सेविल्या दर्भशयन । तेणे क्षोभे मी क्षोभायमान ।
तुझे न घेंचि दर्शन । सत्य जाण श्रीरामा ॥११०॥
श्रीराम ते ऐकून लज्जायमान होतात :
शक्ति असोनि संपूर्ण । अशक्तसम आलासी शरण ।
येणेंही क्षोभे क्षोभायमान । तुझे दर्शन न घेंचि ॥१११॥
सीता नेतां पै रावण । तेथे न कराचि आंगवण ।
मज पूर्वजचा घ्यावया प्राण । अग्निबाण सज्ज केला ॥११२॥
ऐकोनि समुद्राचे वचन । श्रीराम झाला लज्जायमान ।
गळो पाहती धनुष्यबाण । स्वेद संपूर्ण चालिला ॥११३॥
सागर म्हणतो, रावणाने सीता नेल्यावर रडत बसता आणि
मी न आल्याबरोबर धनुष्याला बाण लावता हे विपरीत वाटते :
ऐसे देखोनि श्रीरघुनाथा । समुद्रें चरणी ठेविला माथा ।
जे मी बोललों उद्धतता । क्षमा तत्वता मज कीजे ॥११४॥
अति आवेशें सज्जोनि चाप । मजवरी थरूं नको कोप ।
सिंधु तरणें हे तंव अल्प । कार्य स्वल्प श्रीरामा ॥११५॥
सागराचा व दशरथाचा पूर्वसंबंध, सगरांना शाप, नंतर भगीरथाने केलेला उद्धार :
मी तंव वंशस्थ कैवारी । दशरथाचा कृतोपकारी ।
तीही कथा निजनिर्धारी । अवधारी गा श्रीरामा ॥११६॥
तारकामययुद्धाआंत । मी आणि दशराथ ।
इंद्रासी साह्य गेलो तेथा । युद्धकंदनार्थ दृढ झाला ॥११७॥
माझा दैत्यीं करिता घात । साह्य झाला दशरथ ।
दैत्य दमोनि समस्त । मज निर्मुक्त राये केले ॥११८॥
कष्टी करोनि अरिमंडळ । दैत्य निर्दाळिलें सकळ ।
इंद्र सुखावोनि तत्काळ । प्रीती भूपाळ पूजिला ॥११९॥
इंद्रें अत्यंत सुखावोनी । राया दिधला मुकुटमणी ।
आम्हा दोघांते पूजोनी । अति सन्मानीं गौरविलें ॥१२०॥
तोचि मणि दशरथें । अति आवडी दिधला सीतेते ।
जे खूण आणिली हनुमंते । शुद्धि निश्चिते मानावया ॥१२१॥
ऐसा मी दशरथाचा उपकारी । कांही नव्हेंचि प्रत्युपकारी ।
तुज मी होईन साहाकारी । सैन्य सागरी उतरावया ॥१२२॥
सागर श्रीरामा सांगत । पैल तो विश्वकर्म्याचा सुत ।
नळनामा कपि विख्यात । बांधील सेतू समुद्री ॥१२३॥
त्यासी पित्याचे वरदान । सेतुकर्मीं हा विचक्षण ।
आज्ञा देवोनि आपण । सेतुबंधन करावे ॥१२४॥
नंतर समुद्र मार्गदर्शन करितो :
तू तंव वंशस्थ रघुनाथा । मी कृतोपकारी दशरथा ।
ऐसियापरी परम सुह्रदता । करीन साह्यता ते ऐके ॥१२५॥
मीन महाग्राह न येती तेथ । लहरी शांत करीन समस्त ।
कुवायु वाजेना सेतुबंधांत । ऐसा साह्यार्थ करीन रामा ॥१२६॥
त्याप्रमाणे नळाची सेतुबांधणीच्या कामावर योजना, त्यामुळे नळाला आनंद :
लाहोनि पित्याचे वरदान । नळ करील सेतुबंधन ।
आणिक आहे ऐक चिन्ह । सावधान अवधारी ॥१२७॥
नळाअंगीं वानरधर्म । सागरी सांडिले शाळिग्राम ।
कोपोनिया ऋषिसत्तम । शाप परम दिधला ॥१२८॥
माझ्या तीरीं ऋषी बैसोन । करिती स्नानसंध्या अनुष्ठान ।
पुढे मांडोनि शाळिग्राम । ध्यानस्थ होवोन बैसती ॥१२९॥
तेथे नळ कपि येवोन । ऋषींचें शाळिग्राम करी घेवोन ।
समुद्रामाजी दे टाकोन । ऋषि कोपोन शाप देती ॥१३०॥
तुझेनि हातें सागरी शिळा । न बुडती कदा काळा ।
हाही सेतुबंधनीं नळा । असे आगळा पुरूषार्थ ॥१३१॥
एकोनि समुद्राचें वचन । नळे वंदोनि श्रीरामचरण ।
स्वये बोलिला गर्जोन । सेतुबंधन करीन मी ॥१३२॥
सिंधु बोलिला सत्य गोष्टी । सेतुबंधनाची हातवटी ।
आहे सामर्थ्य माझे पोटी । उठाउठी निर्मीन ॥१३३॥
सिंधु अगाध अत्यंत थोर । सेतु बांधीन मी सत्वर ।
पर्वत आणावया वानर । स्वामीने सत्वर धाडावे ॥१३४॥
सेतु बांधीन अर्धक्षणे । एकोनि नळाचें बोलणें ।
श्रीराम संतोषला सहस्त्रगुणें । अति सन्मानें प्रीती पूजी ॥१३५॥
सवेंचि सिंधूसी अनुवादन । वाक्पुष्पीं प्रीतिपूजन ।
मृदु मंजुळ मधुर वचन । श्रीरघुनंदन सांगत ॥१३६॥
धनुष्यावर जोडलेल्या बाणाचे मरूप्रदेशावर विसर्जन :
तुझ्या कोपाचिये कडाडीं । अग्निबाण लाविला कोदंडीं ।
चाप ओढिलें परम प्रौढी । तो मी न काढी माघारा ॥१३७॥
सोडोनियां अग्निबाण । सांग कोणाचा घेऊ प्राण ।
माझा बाण अति निर्वाण । सत्य जाण समुद्रा ॥१३८॥
समुद्र म्हणे पश्चिम तीरीं । मरू दैत्य दुराचारी ।
मज पीडितो नानापरी । तो संहारीं येणे बाणे ॥१३९॥
ऐकोनि समुद्राचें वचन । श्रीरामे सोडिला अग्निबाण ।
मरू मारिला न लागता क्षण । झाले शोषण समुद्राचें ॥१४०॥
त्याचे गंभीर परिणाम, पृथ्वीची दयनीय अवस्था
श्रीरामबाणाच्या कल्लोळीं । उदक आटे समूळी ।
धरा पोळोनि अग्निज्वाळीं । श्रीरामाजवळी आली शरण ॥१४१॥
धरा देखोनिया दीन । वरद वदे श्रीरघुनंदन ।
केला मरूदेश पावन । तेंहि चिन्ह अवधारा ॥१४२॥
धरेचे सांत्वन व तिला वरप्रदान :
धरेसीं सुटलिया जळ । पृथ्वी पिकेल सर्व काळ ।
फळमूळांचा बहु सुकाळ । अति रसाळ सुस्वाद ॥१४३॥
घरोघरी मागतां नीर । स्त्रिया संतोषें अर्पिती क्षीर ।
गाईंसीं उदक पंचरात्रांतर । तरी अपार क्षीर देती ॥१४४॥
पशूंसी प्रत्यही नाही जीवन । पंच दिवसां उदकपान ।
तरी घृत क्षीर परमान्न । नित्य भोजन घरोघरी ॥१४५॥
नानापरींच्या दिव्यौषधी । ज्यांच्या अंगी सुगंध गंधी ।
श्रीरामाचे निजवरदीं । सुखानुवादी मरुदेशी ॥१४६॥
तिळाचे ठायी स्नेह पूर्ण । ह्या अर्थाचें नवल कोण ।
अतिथींचें स्नेह पूर्ण । मरूदेशीं जाण घरोघरी ॥१४७॥
ज्यातें म्हणती मारवाड । तेथे जिवाचे पुरती कोड ।
श्रीरामवरदाचें कैवाड । सुखसुरवाड मरूदेशीं ॥१४८॥
सागराचे आश्चर्य :
देखोनि श्रीरामाची ख्याती । समुद्र आश्चर्य मानी चित्ती ।
हर्षे वंदोनि श्रीरघुपती । सप्रेम पुढती बोलत ॥१४९॥
सोडोनियां निजशर । वधिला मरू दैत्य दुर्धर ।
पावन केले मरूकांतार । श्रीरघुवीर कृपाळु ॥१५०॥
तुझिया प्रतापापुढें । समुद्र कायसे बापुडे ।
मज सुखी केले रोकडे । फेडिलें सांकडें दुःखाचे ॥१५१॥
स्वये राम संतोषोनी । अति प्रीती समुद्रपूजनीं ।
आल्हादे बोले हर्षवदनीं । अति सन्मानी संबोधी ॥१५२॥
श्रीरामांनी सागराचा केलेला सन्मान
जैसा पिता दशरथ । तैसा पूज्य पूर्वज तू निश्चित ।
सेतुबंधाचा कार्यार्थ । सुगम समस्त तुवा केला ॥१५३॥
तू दशरथाचा आवडता । त्याहूनि मज पढियंता ।
तुझा उपकार मज तत्वता । श्रीरघुनाथा थोर झाला ॥१५४॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । समुद्र घाली लोटांगण ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । गेला आपण निजधामा ॥१५५॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम प्रतापी संपूर्ण ।
समुद्री तरतील पाषाण । सेतुबंधन अवधारा ॥१५६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
श्रीरामसमुद्रशरणगमनं नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥
॥ ओव्या १५६ ॥ श्लोक ३१ ॥ एवं संख्या १८७ ॥
