(सीताशोक)
3641.
(सीताशोक)
राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउली ॥१॥
धन्यधन्य ते शरीर । तीर्थ व्रतांचे माहेर ॥धृपद॥
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥
राम म्हणे ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥३॥
राम म्हणे भोगी त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगी ॥४॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तो जीवन्मुक्त ॥५॥
अर्थ :
वाटेने चालत असताना मुखाने राम राम असे उच्चार केला तरी पावलापावली यज्ञ केल्याचे पुण्य घडते. आणि जे शरीर रामनामाचे उच्चार करते ते शरीर धन्य आहे व सर्व तीर्थांचे व व्रतांचे ते शरीर माहेरच आहे. कोणताही कामधंदा करताना जो मुखाने राम राम असे म्हणतो त्याला नेहमी सुखाची समाधी लागते. जो प्रत्येक घासाघासाला रामनामाचा उच्चार करतो तो जेवलेला असला तरी देखील त्याला उपवास घडतो. कोणत्याही प्रकारचा भोग करताना किंवा त्याग करताना जो मुखाने रामनामाचा उच्चार करतो त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे कर्म लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे जो रामनामाचा जप नित्य करतो तो जीवनमुक्त होतो.
