(आंधळा)
3920.
(आंधळा)
देखत होतो आधी मागे पुढे सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ । भीत मी झालो देवा काय ज्याल्याचे फळ ॥१॥
आता मज दृष्टी देई पांडुरंगा मायबापा । शरण आलो आता निवारूनिया पापा ।
अंजन लेववुनी करी मारग सोपा । जाईन सिद्धिपंथे अवघ्या चुकती खेपा ॥धृपद॥
होतसे खेद चित्ता काही नाठवे विचार । जात होतो जना मागे तोही सांडिला आधार ।
हा ना तोसा ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरली माझी मज कोणी न देती आधार ॥२॥
जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा ।
इंद्रिये मावळलीं आला बागुल आजा । कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ॥३॥
गुंतलो या संवसारे कैसा झालोसे अंध । मी माझे वाढवुनी मायातृष्णेचा बाध ।
स्वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध ॥४॥
लागती चालता गा गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग झालो निराळा कैसा ।
पाहातो वास तुझी थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा ॥५॥
अर्थ :
मी अगोदर सर्वत्र म्हणजे माझ्या मागे पुढे अगदी सगळीकडे देव आहे असेच पहात होतो परंतु भ्रमाचे पडळ माझ्या दृष्टीवर आले आणि माझी सर्वत्र देव पाहाण्याची दृष्टीच गेली. सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार कोंदाटला आणि देवा त्यामुळे ते अज्ञान प्रबळ झाले व वाढल्याने वाढतच गेले व या कारणामुळे मी खूप भयभीत झालो आणि जन्माला येऊन आपण काय फळ प्राप्त करुन घेतले याविषयी मी विचार करु लागलो. त्यामुळे हे पाडूरंगा माझ्या मायबापा आता पुन्हा मला सर्वत्र देव पहाण्याची दृष्टी दे मी माझ्या सर्व पापाचे
