प्रकरण. ५)
1569.
प्रकरण. ५)
चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया ।
शीघ बैसोनिया ॥१॥
तव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी ।
मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥
बाळक्रीडालीळे होती भिंतीवरी ।
बैसली सूर्यकरी उष्ण घेत ॥३॥
तव ते पातले वार्तिक व्दिजवर ।
करिती नमस्कार विनीतता ॥४॥
सिध्द आले भेटी चांगदेव समर्थ ।
सांगती वृतांत साष्टांगेसी ॥५॥
ऐकोनि चांगदेव आले भेटावया ।
उल्हासल्या बाह्या आलिंगना ॥६॥
जावे सामोरे निवृत्तिनाथ बोलती ।
तव ज्ञानदेवा चित्ती विस्मय वाटे ॥७॥
सर्वातरवासी स्वामी सर्वगत ।
नभी नभ सतत जयापरी ॥८॥
सन्मुख विन्मुख सूर्य कोणाकडे ।
आज्ञेचे बागडे नाचवीत ॥९॥
जेथे जावे तेथे भरुनि उरलेती ।
सर्वातरी वस्ती तुमची स्वामी ॥१०॥
मग हंसूनि तयासी म्हणती निवृत्तीनाथ ।
वदलासी यथार्थ सिध्दात तू ॥११॥
परी येथे सगुणे भेटावे ।
निर्गणी तो अवघे शुन्याकार ॥१२॥
व्दैतयोग घडे निजसुखाची वृध्दी ।
अभेदी तो सिध्दी आपेआप ॥१३॥
आणखी एक गुज ऐके ज्ञानसिंधू ।
इंद्राचा हा बंधु मरुदगण ॥१४॥
पुत्र कश्यपाचा उदरी दितीचा ।
जन्म झाला याचा पूर्वजन्मी ॥१५॥
मातेने याचिये मागीतला वर ।
व्हाव राज्यधर पुत्र माझा ॥१६॥
तोचि भोगावया आला हा वैभव ।
पारमार्थिक सर्व लेउनी लेणी ॥१७॥
इंद्रादिका पूज्य व्हावी ऐसी बुध्दि ।
विदयायोग रिध्दी वरेंदु हा ॥१८॥
स्वर्गवासी आला वरदे मृत्युलोका ।
विदयांचा आवांका सर्व अंगी ॥१९॥
चतुर्वेद वक्ता षडषास्त्री संपन्न ।
अष्टादश पुराणे मुखोदगत ॥२०॥
चतुर्वेद विदया कळा ही चौसष्टि ।
मंत्र सप्तकोटी विधी ज्याचे ॥२१॥
स्थान मान कळा जाणे योगसिध्दी ।
अष्टादषौषधी रसायने ॥२२॥
जडया बुडवा जाणे रोगाच्या परीक्षा ।
पंचाक्षरी शिक्षा करीत भूता ॥२३॥
मणी मंत्र सिध्दी तोटके वेधका ।
साधका बाधका विदया जाणे ॥२४॥
चतुर हरिभक्त चौदाशे वर्षांच ।
बहुविदया सिध्दाच्या सिध्दजनी ॥२५॥
आर्तभूत आले भेटी लवलाहो ।
उचित हे आहे सामोर या ॥२६॥
णती ज्ञानदेव चलावेजि प्राज्ञा ।
भिंतीशी केल आज्ञा चला म्हणे ॥२७॥
निर्जिव चाले भिंती देखे विश्वजन ।
धावती ब्रम्हण पुढे सांगो ॥२८॥
तो येती चांगदेव वादयांच्या गजरी ।
आरुढोनि गजावरी चवरडोली ॥२९॥
तव सांगती वार्तिक महासिध्द आले ।
भिंती आळंघले चालविती ॥३०॥
ऐकूनि चांगया गलितपत्र झाला ।
लोटांगणी आला गडबडा ॥३१॥
घाली दंडवत उभा ठाके पाहे ।
भिंती चालताहे गजगती ॥३२॥
तेज सूर्यापरी चौघे भिंतीवरी ।
देखोनिया करी नमस्कार ॥३३॥
ऐसे शतवरी संख्या नमस्कार जाले ।
तव ते पातले जवळीके ॥३४॥
विनीत चांगया देखियेली स्थिती ।
उतरले क्षिती भेटावया ॥३५॥
जाली भेटी तोचि विश्रांतीचा वट ।
छाया घनदाट बैसावया ॥३६॥
प्रीतीच्या पडिभरे पडिले आलिंगन ।
परम समाधान उभयता ॥३७॥
आलिंगनिमिसे हदगत आपुले ।
सुख निक्षेपिले ह्रदयी त्याच्या ॥३८॥
चांगदेवा कृपादृकष्टी अवलोकीले ।
अमृताचे झाले मार्जन त्या ॥३९॥
नेणो काय केले ह्रदयी क्षेम देता ।
विश्रवी एकात्मता ठसावली ॥४०॥
तुटले बिरडे पुढे जन्मावळी ।
मागे झाली होळी संचिताची ॥४१॥
सकळ जनयात्रा दंडाचिये परी ।
जैसी महीवरी पडली वस्त्रे ॥४२॥
देखोनिया भाव देव कृपामूर्ती ।
आलिंगन देती लहान थोरा ॥४३॥
देवासी सारिखी आले शरणागते ।
दुबळी समथे उंचनिचे ॥४४॥
अनन्याचा भाव जाणती हदगत ।
करिती त्या सनाथ दर्शनमात्रे ॥४५॥
सकळ विश्व जन यात्रा समुदाय ।
आलिंगिले बाह्या पसरुनिया ॥४६॥
आनंद पिकला सिध्दाचिये भेटी
अमृताचि वृष्टि अनिवार ॥४७॥
विश्रांतीसी सुख आले जया ठाया ।
रुळवि त्या पायावी निढळे ॥४८॥
गर्जती आनंदे नामाच्या गजरी ।
घोष तो अंबरी न समाये ॥४९॥
नाचती नाचणी संगीत कूसरी ।
राग सप्तस्वरी आळविती ॥५०॥
वाजविती वादये करिती सोहळा ।
समर्पिती कळा अभ्यासिल्या ॥५१॥
सिध्दाच्या चरित्रे गर्जती पवाडे ।
नाचती सुरवाडे आनंदाच्या ॥५२॥
ऐसे आले अळंकापुरी इंद्रायणीतीरा ।
ब्रम्हानंद नरनारी लोका ॥५३॥
म्हणती चांगदेव महा लाभ झाला ।
हा सद्गुरु भेटला कृपामूर्ती ॥५४॥
विधियुक्त पूजा षोडशोपचारी ।
समर्पिली शिरी पुष्पांजुळी ॥५५॥
पतित पतित तारावे पतीता ।
चांगा विनितता शरण आला ॥५६॥
वरदहस्त आता मस्तकी ठेवावा ।
चांगा म्हणवावा शिष्यवर्ग ॥५७॥
मग श्रीनिवृत्तीनाथे कृपेच्या सागरे ।
आणि ज्ञानेश्वरे सोपानदेवे ॥५८॥
निरविला चांगा मुक्ताबाईप्रती ।
यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥५९॥
चांगदेवे चरणी न्यासिला मस्तक ।
मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ॥६०॥
न कळे ब्रम्हादिका सद्गुरुची हतवटी ।
कला उठाउठी निजबोध ॥६१॥
स्वरुपी अढळ ठेली चित्तवृत्ती ।
इंद्रिया विश्रांति तेणे सुखे ॥६२॥
न लाविची मुद्रा कष्ट नाही अंगी ।
केला राजयोगी जिवन्मुक्त ॥६३॥
लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ ।
होऊनि कृतार्थ ठेला पायी ॥६४॥
चांगदेव म्हणे आजिची जन्मलो ।
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ॥६५॥
मागील चौदाशे झाली जन्मांतरे ।
आजी जन्म खरे सार्थकाचे ॥६६॥
मीचि मज भासे विश्वाते वसविता ।
हे सद्गुरु वचने आता प्रतीती आले ॥६७॥
धन्य हा सद्गुरु निवृत्ति ज्ञानेश्वरु ।
सोपान मुनेश्वरु मुक्ताबाई ॥६८॥
दर्शनेंचि यांच्या सवरुप साक्षात्कारु ।
चांगा वटेश्वरु सुखी केला ॥६९॥
मग केशवदास चांगा म्हणती ज्ञानेश्वर ।
तुज असो बडिवार नामाचा या ॥७०॥
हा एकोनि उत्साह सकळ प्रांतवासी ।
आले दर्शनासी परिवारे ॥७१॥
म्हणती सिध्द भेटी आले चांगदेव ।
अगणित वैभव घेऊनिया ॥७२॥
सकळ वर्ण आले पहावया चरित्र ।
पंचक्रोशी क्षेत्र न पुरे ठावो ॥७३॥
व्यवसायी जन आले घेऊनि सौदे माल ।
होईल उकल म्हणती येथे ॥७४॥
साधिले बाजार मांडिले दुकान ।
पहिले तो वाण सिध्द आहे ॥७५॥
म्हणती चांगदेव करावे पूजन ।
दयावे निमंत्रण सर्व यात्रे ॥७६॥
त्रिलक्ष भोजनाची अइत सारिली ।
पूजा आरंभिली सद्गुरुची ॥७७॥
उभय तीरी दिले मंडप अपार ।
शोभे गंगातीर इंद्रायणी ॥७८॥
सकळ यात्रा आणि ज क्षेत्रवासी ।
यावे भोजनासी प्रार्थियेले ॥७९॥
नरनारी बाळे अवघी लहानथोरे ।
प्रार्थिली आदरे प्रसादासी ॥८०॥
भगवदभुती दयावे सर्व भुती अन्न ।
हेचि मुख्य पूजन सद्गुरुचे ॥८१॥
आरभिले पाक अन्ने नानापरी ।
शाखा कोशिंबिरी चिरयेल्या ॥८२॥
शर्करा मिश्रीत सघृत पक्काने ।
षडस दिव्यान्ने सिध्द केली ॥८३॥
मग षोडशोपचारे पूजेस आरंभ ।
वेदघोषे नभ गर्जिन्नले ॥८४॥
सिदोपंत गिरिजाबाईचे पूजन ।
करुनि स्तवन बहुत केलं ॥८५॥
तुमचिये कुळी हे विश्वाचे तारक ।
उपजले बाळक महासिध्द ॥८६॥
समर्पिली पूजा वस्त्रे अळंकार ।
संपदा अपार वोपियेली ॥८७॥
सिध्दाचे पूजन आरंभिले वोजा ।
मेळवूनिया व्दिजा व्युत्पन्नांसी ॥८८॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई ।
पूजेची नवाई विश्व देखे ॥८९॥
रत्नजडित चौक्या बैसविले वरी ।
अर्घ्यपादयादि उपचारी पंचामृते ॥९०॥
शतसहस्त्र विप्र भोवताले फेरी ।
अभिषेक पात्रे करी धरिली व्दिजी ॥९१॥
महारुद्र आरंभ उपन्यास ।
अंबर मंत्रघोषं दुमदुमीत ॥९२॥
मंगळ उतुरे नाना वादयांचा गजर ।
घोषे अवलोकिती चरण दृष्टी ॥९५॥
नानापरिमळ द्रव्ये गंधाक्षता माळा ।
जडित पदके गळा समर्पिली ॥९५॥
सुवर्ण तंतु वस्त्रे मुकुटादि अलंकार ।
लेववीले परीकर चांगदेवे ॥९६॥
मुद्रिका भूषणे जडिताचि कुंडले
कटी सूत्र सुदले वाळे वाकी ॥९७॥
नाना सुमन हार घालूनिया कंठी ।
अवलोकुनी दृष्टी भरुनिया ॥९८॥
विसन्न चांगया जाणे विधी मार्ग ।
पूजा केली सांग उपचारेशी ॥९९॥
पूजेचे आसनी विराजल्या मूर्ती ।
झाली धुपारती आरतीया ॥१००॥
सुवर्ण दक्षिणा गौदाना दिधली ।
पूजा सांग केली सद्गुरुची ॥१॥
पहाती लोचनी नरनारी बाळे ।
आणि नाचती कल्लोळे प्रेमाचिया ॥२॥
जवादी कस्तुरी बुक्याचे धुसर ।
उघळती अपार देवावरी ॥३॥
नैवेदय पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा ।
सकळा ब्राम्हणा पूजीयेले ॥४॥
हरिभक्त वैष्णव पूजिले आदरे ।
वादये मंगळतुरे घोष ध्वनि ॥५॥
व्यवसायी जन यात्रा पूजीयेले क्षेत्रवासी ।
दिधली सवसिणीसी हळदी कुंके ॥६॥
चांगदेवे मग पोटया सुंदर जानु जंघा ॥८॥
उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा ।
शोभली निर्मळ उटी अंगी ॥९॥
सरळ भुजादंड तुळशीपत्रे माळा ।
नानापुष्पे गळा डोल देती ॥१०॥
हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती ।
दुबाही पंगति विराजली ॥११॥
नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ ।
शोभल्या कळाळी गंधाक्षता ॥१२॥
जावळ कुरळमंडीत मस्तक ।
पूजा ब्रम्हादिक समर्पिती ॥१३॥
मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा ।
नित्य मुक्तलीळा दावी अंगी ॥१४॥
अर्ध्यापादयादिक वेदाच्या सुस्वरी
चांगदेव करी ध्यान पूजा ॥१५॥
धन्य तो दिवस नैवेदय अर्पिला
पुष्पांजुली केला प्रणीपाता ॥१६॥
पूजिले ब्राम्हण विधी अपचारे ।
हरिभक्त आदरे यथोचित्ता ॥१७॥
बैसविल्या पंगती इंद्रायणी तीरी ।
पात्री नानापरी विस्तारिल्या ॥१८॥
दिव्यान्ने परवडी अन्नशुध्दी वाढिली ।
मंत्रे प्रोक्षीयेली त्रिपदेच्या ॥१९॥
सोडिला संकल्प झालो निर्विकल्प ।
निराशिले पाप संदेहाचे ॥२०॥
तदर्पण केले ज्ञानेश्वर नामे ।
भोजने संभ्रमे सारियेली ॥२१॥
एक एक शीत व्दिजमुखी अर्पिता ।
शतक्रतू भोक्ता नारायण ॥२२॥
ऐसा ये क्षेत्रींचा अदभुत महिमा ।
वर्णी निरुपमा चांगदेव ॥२३॥
मग समर्पिले विडे दक्षिणा उपचारी ।
चांगदेव करी नमस्कार ॥२४॥
मंत्राक्षता व्दिजी अर्पियेल्या शिरी ।
राहो कल्पवरी क्षेत्र महिमा ॥२५॥
मग बैसवोनि पंगती परिवार आपुला ।
शेष प्रसाद घेतला चांगदेवे ॥२६॥
अदभुत सोहळा हरीची कीर्तने ।
वांटियेली धने याचकासी ॥२७॥
सकळांसी तृप्ती याचेनि दर्शने ।
करीती स्तवने नारीनर ॥२८॥
प्रत्यक्ष पंढरी ते हे अळंकापूर ।
मुक्तीचे माहेर उपासका ॥२९॥
निर्विकार जन सकळ क्षेत्रवासी ।
पूजिती सिध्दांसि नित्यकाळ ॥३०॥
धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी ।
धन्य जे यात्रेसी येती लोक ॥३१॥
ऐसा चांगदेवे स्तुतीवाद केला ।
आणि मस्तक ठेविला चरणांवरी ॥३२॥
याचि जन्मे बहुत जन्मा निवारीले ।
वंदिता पाउले सद्गुरुची ॥३३॥
बहुतेक विदयांचे बहु गुरु आहेती ।
परी ते तुळणे येती सद्गुरुचे ॥३४॥
ज्याचिया प्रसादे पावलो हा बोधू ।
समूळ मायाकंदू तोडियेला ॥३५॥
निजानंद पदी स्थापिलो सतत ।
केला जीवन्मुक्त क्षणामाजी ॥३६॥
काय उताराई होंऊ कवण्या अर्थे ।
अर्पिता नाशिवंते जीवादिके ॥३७॥
कायावाचामने करुनि कुरवंडी ।
धरी ते न सोडी चरण याचे ॥३८॥
येणे काळे सर्व लाभाचिया कोटी ।
लाधलो या भेटी सिध्दाचिया ॥३९॥
सकळ विदया सहित करुनि वोवाळणी ।
सांडीन वरुनी जीवप्राण ॥४०॥
म्हणती चांगदेव कृतकृत्य झालो ।
चरणी राहिलो मुक्ताईचे ॥४१॥
या संतचरित्र ओव्या मुक्ताफळे माळा ।
मिरवी जो गळा आवडीने ॥४२॥
पुढे वाचे गाये आणीका परिसवी ।
लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥४३॥
संतांचे चरित्र आवडी जो गाये ।
पढीयंता तो होये विठोबांसी ॥४४॥
आवडे श्रीहरी संत आचारित ।
म्हणउनी तिष्ठत हरीकथे ॥४५॥
नारद प्रल्हाद पुंडलीक नामा ।
प्रिय पुरुषोत्तमस जीवाहुनी ॥४६॥
गोरा परसा आता नरहरी सावता ।
कूर्मा आवडता पांडुरंगा ॥४७॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताइ्र ।
चांगा मिराबाई भानुदास ॥४८॥
विसोबा खेचर जाल्हान कबीर ।
रोहिदास वच्छरा चोखामेळा ॥४९॥
जनार्दन एका विष्णुदास तुका ।
वैकुंठनायका आवडते ॥५०॥
संतोबा पवार हरीभक्त अपार ।
हे परम प्रीतीकर विठोबाचे ॥५१॥
या सकळांची चरित्रे श्रवणे पठणे ।
मुक्त वाचाऋणे झाला निळा ॥५२॥
नव्हे वाचस्पती मूढ वाचक मी ।
परि उदयोकर्ता स्फूर्ति ज्ञानेश्वर ॥५३॥
तिहीच हा ग्रथ पावविला सिध्दी ।
प्रवर्तूनि बुध्दी स्फूर्ती दिली ॥५४॥
श्रोता वक्ता तूचि आवडीच्या भोरे ।
ग्रंथ अत्यादरे लिहविला ॥५५॥
नेणता प्रमेय कथेच्या अन्वया ।
नेणो केले काय सामर्थ्यगुणे ॥५६॥
सत्य सत्य सत्य त्रिवाचा हे सत्य ।
वदविता यथार्थ तुकया सिध्द ॥५८॥
उदंड राहिले कथी कथिता कथनी ।
वाढेल म्हणउनी ग्रंथ थोर ॥५९॥
देवाचिया चित्ता आले तोचि पुरे ।
राहिल्या विस्तारे काय काज ॥६०॥
पुढातो पुढती संता हेचि विनवणी ।
बैसावे श्रवणी करुनी कृपा ॥६१॥
ऐकूनि हे संत तोषले सकळ ।
म्हणती तू प्रेमळ कळो आले ॥६२॥
हरिप्रियाची कथा सप्रेमे वदलासी ।
झाला हा आम्हासी पाहुणेरु ॥६३॥
प्रासादिक वाणी आम्हारे रुचली ।
अष्टांगे निवाली श्रवणमात्रे ॥६४॥
निळा म्हणे सुखे आनंदे निवाला ।
चरणासि लागला धावोनिया ॥६५॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनअनुग्रहपूजादिउपचारकथनं नाम पंचमप्रकरणं समाप्तम् ॥
