वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २८. चांगदेव चरित्र

(प्रकरण. ४)

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088651 · अभंग क्र. १५६८

1568.
(प्रकरण. ४)
पावले ब्राम्हण अलंकापुरासी ।
आनंदमानसी न समाये तो ॥१॥
देखिला दंडक्षेत्रवासी जन ।
प्रात:काळी प्रश्न करिती तीर्थी ॥२॥
पूजूनि सिध्दासी नरनारी बाळे ।
जाताती राउळा आपुलाल्या ॥३॥
बाळलीळा वेषे आनंदे खेळती ।
नर नारी देखती येता जाता ॥४॥
खालावुनी माथा श्रीमुख पाहती ।
आपुलाल्या जाती कामा लोक ॥५॥
देखोनिया ब्राम्हण मनी विवारिती ।
येथे नमस्कारिती मार्गी कोणा ॥६॥
पुढे देखियेल्या खेळता कुमारी ।
पुसती उच्चस्वरी तयांप्रती ॥७॥
निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठे ।
कोणीकडे मठ आहे त्यांचा ॥८॥
ऐकोनि कुमारी हिडसुनी धिक्कारी ।
बोट कानावरी ठेवूनिया ॥९॥
कोठील रे तुम्ही नेणा विनीतता ।
उध्दट बोलता महामूर्ख ॥१०॥
अर्भकाच्या परी नामे उच्चारुनी ।
पुसता महामुनी सिध्दराया ॥११॥
दीर्घस्वरे करिती नामाचा उच्चार ।
नेणोनिया पार महिमा त्यांचा ॥१२॥
गव्हाराच्या परी बोला सैरा शब्द ।
मूर्ख तुम्ही मुग्ध हीनबुध्दी ॥१३॥
व्यापकासी स्थान अपारासी मान ।
मानिता अज्ञान मूढमती ॥१४॥
ऐकावे स्वर्गीचे श्रीमंत गोसावी ।
नाटक लाघवी ब्रम्हांडाचे ॥१५॥
तया एकदेशी कल्पूनिया स्थान ।
पुसता अज्ञान मठ त्यांचा ॥१६॥
तिहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा ।
नेणा महिमा त्यांचा मतिमन ॥१७॥
अरे ब्रम्हादिका पूज्य ईश्वर अवतार ।
बोलता उत्तर अमर्यादे ॥१८॥
संज्ञामात्रे नेत्र खुणेने दाविती ।
पहा ते खेळती नित्यमुक्त ॥१९॥
ज्ञानप्रभा दिनमणी ते उगवले ।
ते प्रत्यक्ष देखिले देव तिन्ही ॥२०॥
सहजाचे आसन आंगी योगकळा ।
देखियेली लीळा आत्मनिष्ठ ॥२१॥
देखता लोटिले देह लोटांगणी ।
लागले चरणी अति नम्र ॥२२॥
म्हणती ज्ञानदेव चांगयापासून ।
आले हे ब्राम्हण समाचारा ॥२३॥
ते ऐकोनिया व्दिज म्हणती अंतर्निष्ठ ।
जाणीतले स्पष्ट अंतरीचे ॥२४॥
यावरी सिध्दाइ्र असावी ते कैसी ।
सर्वातरवासी देवचि हे ॥२५॥
लागोनिया चरणी दिधली पत्रिका ।
सांगितले निके वर्तमान ॥२६॥
म्हणती चांगदेवे प्रणिपात केला ।
मस्तक ठेविला चरणांवरी ॥२७॥
पत्राचे उत्तर मागितले स्वामी ।
भेटी अंतर्यामी इच्छिताती ॥२८॥
म्हणती निवृत्तिनाथ वाचा ज्ञानेश्वरा ।
तव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥२९॥
कोरे पत्र बरे निवृत्ति बोलती ।
पाकाची निष्पत्ती होय तेथे ॥३०॥
कोरे ते सोवळे खरकटे ओंवळे ।
धुतल्याही जळे शुध्द नोहे ॥३१॥
कोरे ते निर्मळ स्वीकारिले जाय ।
अमंगळ राहे खरकटे ते ॥३२॥
कोरीया अक्षर उमटे कसोटी ।
रददी जाय हाटी विकावया ॥३३॥
एकाक्षर ब्रम्ह प्रणवाचे कुशी ।
नुच्चारे पुरेशी उच्चारिता ॥३४॥
पाविजे अक्षर गुरुकृपा खुणे
येराशी उमाणे नुकलवे ॥३५॥
शिणती बहुते करिता खटपट ।
अर्थ उफराटा पडे तया ॥३६॥
अक्षर परब्रम्ह वेदा अगोचर ।
कैचा अनुस्वार उमटला ॥३७॥
न चले जाणीव न चले शाहाणीव ।
तुर्का नुरे ठाव अक्षर ते ॥३८॥
पत्र लिहा तुम्ही कृपेचा प्रसंग सोरसे ।
अज्ञापिले ऐसे निवृत्तिनाथे ॥३९॥
रेखियेली पत्री लिखिती पासष्टी ।
पाहता अर्थ दृष्टी तत्वी पडे ॥४०॥
परम गुह्या गुह्य उपनिषदीभाग ।
कृपेचा प्रसंग संपादिला ॥४१॥
वाचिलीया अर्थ अणिता मानसी ।
पाकजे अनायसी परमतत्वा ॥४२॥
न करिता यजन अध्ययन अध्ययन ।
न करिता साधन आत्मप्राप्ती ॥४३॥
देऊनिया पत्र म्हणती चांगदेवा ।
निरोरपर सांगावा विवराहे ॥४४॥
घेऊनिया पत्र निघाले ब्राम्हण ।
वंदिले चरण पुढतोपुढती ॥४५॥
आले तप्तीतीरा नमिले सिध्दासी ।
वर्तमान त्यासी निरोपिले ॥४६॥
म्हणती सिध्दराया पाहिला जी महिमा ।
आंगी निरुपमा सामर्थ्याचा ॥४७॥
अदभुत ऐश्वर्य देखिले लोचनी ।
दिधले लिहोनी पत्र तुम्हा ॥४८॥
देऊनिया पत्र म्हणती व्दिजवरा ।
देवाचे अवतार नि:संदेहे ॥४९॥
मग करुनिया पूजा पत्र वाचियेले ।
तव गुह्य देखिले न चले युक्ती ॥५०॥
मग म्हणे अभिमान अदयापि न जाळे ।
तिमिरे गेले डोळे न दिसे हित ॥५१॥
कृत्रिम आचरणे दशा झाली ऐशी ।
विश्वास मानसी थार नेदी ॥५२॥
ऐकतो श्रवणी पहावे लोंचणी ।
निश्चय तो मनी दृढ केला ॥५३॥
अनुतापे उददेश धरिला चांगदेवे ।
अळंकापुरा जावे सिध्दा भेटी ॥५४॥
तरी सार्थक धरिलिया जन्माचे ।
नाही तरी काळाचे भातुकले ॥५५॥
न चुकती जन्म चौर्‍यांयशी यातना ।
काळासी वंचना कोठवरी ॥५६॥
पाचारिले वर्स परिपत्य अधिकारी ।
सांगती तयारी करावी त्या ॥५७॥
वहने सामग्रीया सिध्द करा वेगी ।
जाणे भेटीलागी सिध्दाचिये ॥५८॥
कोठवळे जमादार आले पोतनीस ।
सरंजाम त्यास आज्ञापिला ॥५९॥
ऐकोनिया सर्व गृहस्थ शिष्यवर्ग ।
धाविले सवेग आले जवळी ॥६०॥
म्हणती सिध्दराया परिसावी विनंती ।
जाणे तरी युक्ति ऐसे जावे ॥६१॥
प्रतापे महत्वे आपुल्या महिम्याने ।
ऐश्वर्य भूषणे सिध्दाईच्या ॥६२॥
विदयेच्या सामथ्ये आपुलीया वैभवे ।
जाऊनि भेटावे बडिवारे ॥६३॥
आपणा देखोनि झाकेल त्यांचे तेज ।
येतील तेहि सहज शरण पाया ॥६४॥
तैसाचि योजिला युक्तीचा प्रसंग ।
विस्तारिले सोंग बहुविध ॥६५॥
व्याघ्रावरी स्तंभने सर्पासी मोहने ।
सिध्द केली वहने रथ वारु ॥६६॥
हाकारिला सर्व शिष्यसमुदाय ।
सांगितले काय तयांप्रती ॥६७॥
बैसा व्याघ्रावरी सर्प धरा करी ।
नाना अळंकारी जाऊ चला ॥६८॥
जाती चांगदेव भेटी समुदाये ।
महा महोत्साहे अलंकापुरा ॥६९॥
तप्तीतीराहूनि गृहस्थ अपार ।
सवे दळभार गजवारु ॥७०॥
कश्यप स्वामीचा फळला आशिर्वाद ।
राजश्रिया पद भोगप्राप्ती ॥७१॥
चालियेला राजे गृहस्थ मंडळी ।
केली विप्रकुळी परस्थाने ॥७२॥
म्हणती सिध्दा भेटी होईल परस्परे ।
पाहो अत्यादरे उत्साह तो ॥७३॥
परिवारे सांगती घेतली स्त्रियाबाळे ।
व्यवसायी पाठयाळ थोपटिली ॥७४॥
निघाला उदमि म्हणती सौदागर ।
भरियेले संभार गोणीयांचे ॥७५॥
हांशील जकाती न लगे चौकी देणे ।
लाभा नाही उणे पिकला कौल ॥७६॥
नटवे नृत्यांगना गुणिजनांचे भार ।
चालिले अपार समागमे ॥७७॥
ठाकूर नगारी गर्जती पवाडे ।
सवे चालती देव्हडे सिध्दापुढे ॥७८॥
गजावरी वादये निशाणे कुसरी ।
द्रव्ये भरिल्या हारी गाडीयांच्या ॥७९॥
नरंमिन्याची दिंडे सवे शिकारखाना ।
राज्यभार सेना तैसा चाले ॥८०॥
डेरे कनातांचे लादियेले उंट ।
चालती संघाट काटीयांचे ॥८१॥
नौबनी नगारे वादयजात सकळ ।
घाषे तया भूगोल दुमदुमिला ॥८२॥
लक्षावत यात्रा तप्तीतीराहुनी ।
चालता अवनी न पुरे मार्ग ॥८३॥
छबिने पताका मोरपिसा कुंचे ।
टाळ मृदंगांचे समारंभे ॥८४॥
शृंगारिला भेख विदयेच्या कुसरी ।
सोंगे नानापरी दर्शनाची ॥८५॥
सवारले शिष्य गुरु आज्ञेवरी ।
नाना वेषधारी बाह्यरंग ॥८६॥
चर्चियेली भस्मे काशांबरवासी ।
मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाही ॥८७॥
कडुक कुंडले शिरी जटाभार ।
मुक्तकेशी दिगंबर नागवेचि ॥८८॥
जागवटे सैल्या फुलमाळा शोभती ।
कथा विराजती नानावर्ण ॥८९॥
झोळया बटवे कक्षेमाजी जडया बुटया ।
आडबंद लंगोटया बटूवस्त्रे ॥९०॥
कुबडया काठया छडया वेणूदंड हाती ।
टोप विराजती कफणीया ॥९१॥
कुंडले सांगाते भांग घोटावया ।
चिलमी ओढाया गुडगुडया ॥९२॥
पक्ष्यांचे पिंजरे सांगाते कुतरे ।
चितळे सामरे सोकविली ॥९३॥
पावे मोह्या चंग किन्नरी झल्लरी ।
डफ हुडुक करी नागसरे ॥९५॥
गोरख छंदे हाती गोलाणे धनुष्ये ।
धावति आवेशे विदयोचिया ॥९५॥
कुशळ कवि ते वाचाळ बोलते ।
बहुमते झाकविते तर्कवादी ॥९६॥
फळे जळाहारी एक दुग्ध पिती ।
मौन्याचे व्रतस्थी पवनाभ्यासी ॥९७॥
व्याघ्रा आरोहणे रथाची वहने ।
सर्पाची वेष्टणे नानाविध ॥९८॥
योगमुद्रा अंगी दाविती कसोटी ।
नाना लक्ष दृष्टी उफराटिया ॥९९॥
कलरवापरी अंजने घालूनि नयनी ।
दाविती लोचनी तिमिर तेज ॥१००॥
भाविका नरनारी बाळा झकविती ।
हेचि ब्रम्हा म्हणती तेजाकार ॥१॥
सत्याचा दुष्काळ असत्याची रुढी ।
दाविताती प्रौढी थोरपणा ॥२॥
मार्गीचे जन लोक सामोरे धावती ।
लोटांगणी येती चांगदेवा ॥३॥
नानावस्त्रे भेटी सिध्द सामग्रिया ।
समर्पोनी पाया नमस्कारिती ॥४॥
याचेनि दर्शने जडजीवा उध्दार ।
करिती जयजयकार नामघोषे ॥५॥
आले पुण्यस्तंभा श्रीगोंदे सन्निध ।
केला तीर्थविधी स्नान संध्या ॥६॥
व्दिज संतर्पणे वांटियेली दाने ।
पुढारी गमने आरंभिली ॥७॥
आळेखिंडीवरुनि चालियेले भार ।
केले नमस्कार म्हैसीपुत्रा ॥८॥
केंदुरावरुनि उतरले घाट ।
गर्जती उध्दट सिध्दनामे ॥९॥
कान्होपाठक प्रीती चालविले सवे ।
प्रार्थुनी चांगदेवे अत्यादरे ॥१०॥
आले भीमातीरी स्नानी स्थिरावले ।
पुढे पाठविले सांगोनिया ॥११॥
यावरी म्हणे निळा होईल सिध्दभेटी ।
परस्परे ते गोमटी आहे कथा ॥१२॥
बहुत अपूर्व असमाई चरित्र ।
परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥१३॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनंनाम चतुर्थ प्रकरणं समाप्तम् ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग