विश्वाचा चाळक सूत्रध
114.
विश्वाचा चाळक सूत्रधारी एक । विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥
ते रूप साजिरे कृष्ण घनःश्याम । योगिया परम रूप ज्याचे ॥२॥
शिवशिवोत्तम नाम आत्माराम । जनवनसम गोपवेषे ॥३॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक । आपरूपे एक सर्वत्र असे ॥४॥
अर्थ:
जगाच्या सर्व सत्तांचे सुत्र हातात असलेला तो विश्वंभर ह्या जगात पुर्ण रुपाने भरले त्याचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान आपोआप होते. तेच परमात्म स्वरुप सुंदर मेघासारखा श्यामल कृष्णरुप होऊन साकारले आहे तेच रुप योगी ज्या परम स्वरुपाचे ध्यान करतात ते तेच रुप आहे. जे परमतत्व सर्वोत्तम शिवतत्व आहे जे सर्व जन वनात अंशात्मक स्वरुपात आहे तेच शिवतत्व पुर्ण स्वरुपात कृष्णात भरले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जे जीवन स्वरुपात सर्वत्र व्यापक स्वरुपात भरलेले आहे व जे जगाचे चालक आहे तसेच मला जाणवले आहे.
