रुक्मिणी स्वयंवर-प्र
15.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पंधरावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पंधरावा
श्रीगणेशाय नम: । शुद्धमतीने सगळे । न फोडिता रांधिले कोहळे । चवी आले सोहंमेळे । स्वाद गोपाळे जाणिजे ॥१॥
धालेपणाचे ढेकर । स्वानंदे देती जेवणार । गोडी नीत नवी अपार । कृष्णदातार जे पंक्ती ॥२॥
स्वाद घेतला जेवणारे । जेविता कोणी न म्हणे पुरे । गोडी घेतली शार्ङ्गधरे । भाग्ये उदार शुद्धमती ॥३॥
सावध शुद्धमती वाढी । यादवा तृप्ति झाली गाढी । ब्राह्मणांची शेंडी तडतडी । धोत्रे बुडी ढिलविती ॥४॥
भीमक करताहे विनंती । अवघ्या झाली परम तृप्ती । उष्टावणलागी श्रीपती । ठायी ठेविती निजमुद्रा ॥५॥
देखोनि आनंदली शुद्धमती । भीमकीभाग्य वानू किती । कृष्णमुद्रा चढली हाती । शेषप्राप्ती निजभावे ॥६॥
कृष्णपंक्ती जे जेविले । ते सवेचि संसारा आंचवले । कृष्णरंगे सुरंग जाले । विडे घेतले सकळिकी ॥७॥
कृष्ण देखोनिया डोळा । भीमकीच्या सख्या सकळा । विस्मित राहिल्या वेल्हाळा । आणिक डोळा नावडे ॥८॥
कृष्णउच्छिट घेऊनि हाती । वेगे निघे शुद्धमती । संतोषोनिया श्रीपती । प्रसाद देती निजमाळा ॥९॥
कृष्णप्रसाद सुमनमाळा । शुद्धमती घाली गळा । लाज विसरोनि वेल्हाळा । चरणकमळा लागली ॥१०॥
कृष्णास रुखवत शेवती । देता न कळे दिवसराती । ज्योतिषी रायाते म्हणती । उदयप्राप्ति हो आली ॥११॥
वेगी मंडपासी चला । घडवटे आधी घाला । उशिर न लावा जी फळा । यादवा सकळा सांगिजे ॥१२॥
नमस्कारूनिया श्रीपती । मंडपा आली शुद्धमती । उष्टावण भीमकी हाती । परम प्रीती दीधले ॥१३॥
कृष्णप्रसाद धरिला माथा । भीमकी झाली रोमांचिता । चित्त विसरले सावधानता । कृष्णशेषे ॥१४॥
जव जव कृष्णशेष सेवी । तव तव समाधिसुखा वांकुल्या दावी । बाप भाग्याची पदवी । स्वर्गी देवी वानिजे ॥१५॥
कृष्णमुद्रा ह्रदयी धरी । अभिवंदूनिया शिरी । मग घातली कराग्री । लोण उतरी शुद्धमती ॥१६॥
चढोनि परिचिये उपरी । सद्गुरु सावधान करी । घटिका प्रतिष्ठिली अंतरी । जीवनावरी सखेच्या ॥१७॥
घडी जेंगटाते हाणत । जेंगट तेणे नादे गर्जत । काळ गेला रे गेला म्हणत । वेळ व्यर्थ जाऊ नेदी ॥१८॥
अक्षर निमिष पळेंपळ । घटिका भरता न लगे वेळ । लोक व्यापारे बरळ । गेला काळ नेणती ॥१९॥
सद्गुरु सांगे भरली घडी । उगेचि पाहाती वर्हाडी । ज्यासी निजकार्याची तातडी । ते घडिया घडी साधिती ॥२०॥
आळसी लोक निद्रापार । निजमंडपी कृष्ण सादर । विस्तारवी फलसंभार । नानाप्रकार मेचूचे ॥२१॥
शून्य सांडूनि विरजांबर । चिद्रत्नाचे अलंकार । पदकी नीळ मनोहर । जो शृंगार ह्रदयीचा ॥२२॥
अहंकाराचे बीज भरडी । मोहममतेचा कोंडा काढी । सोलींव डाळींची परवडी । भरली दुरडी श्रद्धेची ॥२३॥
विवेकचाळणिया चाळिली । कणीक आणिली तेजाळी । निवडूनि स्वानंदाची नव्हाळी । ठेविली गुळी निजगोडी ॥२४॥
देठीहूनि सुटली फळे । अत्यंत परिपाके निर्मळे । मधमधीत सुपरिमळे । सूफळ फळे रुक्मिणी ॥२५॥
अत्यंत पढिये भीमकबाळा । गुणेंवीण सुमनमाळा । अंगे गुंफी घनसावळा । हार गळा आणि जाळी ॥२६॥
सौभाग्यद्रव्ये ठेविली आधी । धनींपणे धणे हळदी । जिरे मेळविले त्यामधीं । जेवी सद्बुद्धि विवेक ॥२७॥
गाठी सांडिल्या सोडोनि । घेतला सूक्ष्म तंतू काढोनी । श्रीकृष्ण वोवी कृष्णमणी । ते रुक्मिणी गळसरी ॥२८॥
सांडोनि कठिणत्वाचे बंड । केवळ रसाचे प्रचंड । कृष्णे कृष्णवर्ण इक्षुदंड । अति उदंड आणिले ॥२९॥
बीजेंवीण वाढली फळे । एक त्वचेवीण रसाळे । चमत्काराची निर्मळे । कृष्ण फळे विस्तारी ॥३०॥
फळ विस्तारले प्रबळ । यादव शृंगारले सकळ । भेरी त्राहाटिल्या मांदळ । निशाणे ढोल लागले ॥३१॥
अनर्घ्य लुगडी आणि लेणी । लेऊनि निघाल्या वर्हाडिणी । चारी बारा सोळाजणी । चौघीजणी तयांपुढे ॥३२॥
जीवशिवा वडिल मान । तैसे वसुदेव उग्रसेन । संतोषोनि संकर्षण । करी परिपूर्ण याचका ॥३३॥
एका दिधले काही एक । एका दिधले अनंत सुख । चिद्रत्ने अलोलिक । देऊनि याचक सुखी केले ॥३४॥
फळ चालिले गजरे । ढळती रत्नदंड चवरे । झळकती पालवछत्रे । दशविध तुरे वाजती ॥३५॥
जैसी श्रद्धा आणि शांती । तैसी सुभद्रा आणि रेवती । मुख्यपणे माजी मिरविती । घेतल्या बुंथी पाचूच्या ॥३६॥
नानापरींच्या घेतल्या बुंथी । तरी अंतरशोभा बाह्य फांकती । अलंकारल्या निजवृत्ती । त्या न झांकती झाकिल्या ॥३७॥
फळ समीप आले देखा । ऎसे जाणवले भिमका । तो सावधान अतीनेटका । भावे बैसका घातली ॥३८॥
साउमा येऊनि आपण । वसुदेवादि उग्रसेन । नमस्कारूनि संकर्षण । भीतरी जाण आणिले ॥३९॥
विचित्र घातली आसने । सुकुमार मृदुपणे । गाद्या पडगाद्या टेंकणे । वोठंगणे मृदोळिया ॥४०॥
भीतरे आलिया वर्हाडिणी । शोभती जैशा दिव्य योगिनी । फळ मांडिले विस्तारोनी । भावे रुक्मिणी हरिखेली ॥४१॥
पीठ स्थापिले कुसरी । शृंगारोनिया नोवरी । वेगे आणिली बाहेरी । मंत्रोच्चारी द्विजवरी ॥४२॥
पाहता भीमकीचे रुपडे । अरूपरूपे तेज गाढे । मंडपामाजी उजियेड पडे । आणिकेकडे पाहो नेदी ॥४३॥
नानारूपाचेनि प्रकाशे । अवघी भीमकीच भासे । देखोनि जीव भुलले कैसे । डोळिया पिसे लाविले ॥४४॥
उभवूनि स्वरुपठसा । भुलविले आदिपुरुषा । एकाएकी धाविन्नला कैसा । कृष्ण पिसा इणे केला ॥४५॥
कृष्ण शहाणपणे अतिगाढा । तोही भीमकिया केला वेडा । वोढूनि नेला आपुलेकडा । दुजे पडिपाडा इसी नाही ॥४६॥
भीमकी लावण्याची राशी । कृष्णरूपा भाळली कैसी । सांडूनि जातिकुळासी । कृष्णरूपासी निवटली ॥४७॥
भीमकी कृष्णायोग्य सहजे । कृष्णवर इसींच साजे । यासारिखे न देखो दुजे । बोलो लाजिजे बोलता ॥४८॥
पाहता भीमकीची रूपरेखा । टक पडिले सकळिका । कृष्ण पारखी गे निका । जोडा नेटका मेळविला ॥४९॥
गोरेपणे अतिसुंदर । विशाळ नयन भाळ थोर । अंगे सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा ॥५०॥
कृष्ण साधावया निधान । नेत्री सूदले अंजन । पाहता भीमकीचे वदन । विकल्प मन करू नेणे ॥५१॥
भुंवया सुरेख सरळ नासिक । गंडस्थळी तेज अधिक । नाकींचे मोति जडितमाणिक । तेणे श्रीमुख शोभतसे ॥५२॥
सरळ बाहू सुपोष । कोंपर मनगटे कळास । पांचा आंगोळिया विन्यास । कळन्यास मुद्रिका ॥५३॥
सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त । बोली मधुरता तळपत । तेणे झळकत दंतपंक्ती ॥५४॥
कटिप्रदेशे शोभत जघन । माज अतिशयेंसी सान । घोटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥५५॥
माथा मोतिलग जाळी । इळके फरातळी हांसळी । मिरवे भांग टिळा कपाळी । तेज झळाळी तानवडां ॥५६॥
नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी रत्नांची मेखळा । सुनीळ कांचोळी वेल्हाळा । लेइली माळा मोतिलग ॥५७॥
गंगातीरी चक्रवाके । तेवी कुचद्वय सुरेखे । ह्रदयी घननीळ झळके । शोभां पदके दाविजे ॥५८॥
नाकींचे झळकत सुपाणी । तेणे शोभली रुक्मिणी । शोभा आली बाहुभूषणी । रत्नकंकणी कळाविया ॥५९॥
चरणी गर्जती नुपुरा । भुलोनि मदन आला उदरा । तेही भुलली शार्ङ्गधरा । कृष्णवर वरावया ॥६०॥
नाही लग्नास व्यवधान । वेगी करा फळार्पण । उठोनि वसुदेव आपण । करी पूजन भिमकीचे ॥६१॥
पहिले करावे गणेशपूजन । तव गणेश वंदी कृष्णचरण । कृष्णचरणी समाधान । गजवदन तुष्टला ॥६२॥
कृष्णपुरोहित निष्काम । न करिती कलशपूजेचे काम । नवरीचे उपाध्ये सकाम । पुरुषार्थ परम त्या दिधला ॥६३॥
वस्त्रे अर्पूनि सुंदरी । वेगी नेली अभ्यंतरी । मायावसन त्याग करी । अंगीकारी श्रीकृष्णनिवास ॥६४॥
फेडूनि मायेची परिधाने । लेइली कृष्णमय लेणे । भीमकी अत्यंत शोभली तेणे । निंबलोण जिवेभावे ॥६५॥
सवेचि आणिली बाहेरी । डोळा न पाहवे सुंदरी । दृष्टी जातसे चाचरी । आधार धरी धैर्याचा ॥६६॥
कृष्णी विनटली वाडेकोडे । ती कवणाचे दृष्टी न पडे । भाग्य वसुदेवाचे गाढे । तयापुढे बैसविली ॥६७॥
कृष्णे पाठविले फळ । नि:शेष अर्पिले सकळ । मस्तकी घरी भीमकबाळ । जन्म सफळ येणे फळे ॥६८॥
फळे वाढिले प्रबळ । झाले वर्हाडी सफळ । हाता आले कृष्णफळ । खूण प्रेमळ जाणती ॥६९॥
भीमकीसी म्हणे पुरोहित । वरासी मूळ निघा त्वरित । यादव परतले समस्त । गुण वर्णीत भीमकीचे ॥७०॥
वर्हाडिणी सांगती गोष्टी । सगुणगुणाची गोमटी । भीमकी ऎसी नाही सृष्टी । कृष्ण जगजेठी पारखी ॥७१॥
यासी माया म्हणे वेडा । परी हा देखणा चोखडा । कैसा मिळविला जोडा । निजपडिपाडा समत्वे ॥७२॥
आदिकुमारी घेऊनि जाण । कृष्णासी तेल लावी आपण । बांधोनि दृश्याचे कंकण । जीवे जीव म्हणतसे ॥७३॥
तिची करावया बोळवण । कृष्णाआंगी आंगवण । येरा न कळे महिमान । जुनाट जाण वृत्ती तिची ॥७४॥
लग्न साधावया चक्रपाणी । भीमक हाकी वर्हाडिणी । शुद्धमतीसहित सुवासिनी । चालती निशाणी गर्जत ॥७५॥
नाना वाजंत्रीचिया ध्वनी ध्वनी । नाद न समाये गगनी । मधुर शब्दांचिया किंकिणी । गोडपणे गर्जती ॥७६॥
घेऊनि पूजेचे संभर । ठाकिले विवाहमंडपद्वार । भीमके केला अति आदर । वेगे वर आणावा ॥७७॥
सहजेचि नेटुगा दातुगा । फेडावेडी नाही श्रीरंगा । सभे बैसविला समचौरंगा । नयनभृंगा आल्हादू ॥७८॥
दृष्टी जडली कृष्णरूपासी । परतोन न ये दृश्यापाशी । पारणे होतसे डोळ्यासी । कृष्णसुखासी भोगिती ॥७९॥
कृष्ण देखोनि धाले नेत्र । देताति तृप्तीचे ढेकर । तरी भुकेले अपार । वारंवार हरि पाहती ॥८०॥
शुद्धमतीने आपण । कृष्णासी आणिले तेलवण । सुखसेवयांचे लाडू जाण । ते गोडपण हरि जाणे ॥८१॥
सोलींव विवेकांचे तिळवे । स्थूळ ना सूक्ष्म अति बरवे । बांधा बांधिले अतिस्वभावे । निजभावे विस्तारी ॥८२॥
फोडोनि चार्वाकचारे । निजबीज काढिले बाहिरे । चारोळियांचे लाडू साजिरे । श्रद्धासाखरे आळिले ॥८३॥
आणोनि सडियेली खसखस । धुवोनि सांडिली घसघस । लाडू वळिले सावकाश । अतिसुरस श्रीरंगा ॥८४॥
अष्टदळ कमळाचे बीज । फोडूनि सोलोनि काढिले निज । लाडू वळिले सहज । दाखवी वोज शुद्धमती ॥८५॥
वरिवरि वैराग्याचे काटे । भीतरी अमृताचे साटे । फणस फॊडूनि चोखटे । काढी गोमटे निजबीज ॥८६॥
त्याची अवीटतेची गोडी । लाडू वळिले आवडी । शुद्धमती दावी परवडी । प्रीती गाढी हरिचरणी ॥८७॥
वरिवरी दिसती साजिरे । आत पाहता आंबट बोरे । त्यांच्या आठोळिया फोडूनि निर्धारे । काढिले साजिरे निजबीज ॥८८॥
घालूनि समतेचा गूळ गोडू । त्या बीजाचे वळले लाडू । कृष्ण करू जाणे निवाडू । पडिपाडू स्वादाचा ॥८९॥
कृष्णालागी तेलवणे । आणिली कडकडीत कडकणे । फुटले तुटले द्वंद्वपणे । रजोगुजे तळियेले ॥९०॥
वांकुढे कानवले तेलवणे । कृष्णासी आणिले कवणे गुणे । मुरडी मुरडिले अनुसंधाने । गोडपणे अंतरी ॥९१॥
शुद्धमतीने आपण । कृष्णासी वाहिले तेलवण । वस्त्रे अलंकार संपूर्ण । परिपूर्ण स्वानंदे ॥९२॥
तेलवणाचा विस्तार । किती वाढवावा उपचार । होईल लग्नासी उशीर । वर सत्वर चालो द्या ॥९३॥
शुद्धसत्त्वाचा श्वेत वारू । त्यावरी चढिन्नला कृष्णवरू । झाला वाद्यांचा गजरू । मंत्रोच्चारू द्विजांचा ॥९४॥
आठही भाव होऊनि गाढे । वारू धरिला दोहीकडे । छंदे चालती कृष्णापुढे । आणिकेकडे न चालती ॥९५॥
निजबोधाचे आतपत्र । शिरी तन्मयचे छत्र । पहावया कृष्णवक्त्र । येति सत्वर नरनारी ॥९६॥
मदे गर्जती अतिगंभिर । अनुभव स्वानंदाचे थोर । दोही बाही जी कुंजर । सालंकार पतकी ॥९७॥
चंद्रकिरण अतिसाजिरे । तैशी अतिशुभ्र चामरे । रत्नदंडी सहजाकरे । मनोहरे ढळताती ॥९८॥
कृष्णे सोडिल्या त्याग देउनी । अष्टमहासिद्धी नाचणी । नाचताती चपळपणी । देखोनि जनी भुलीजे ॥९९॥
सिद्धी नाचता देखती जेथे । जन मीनले त्याभोवते । पाहोनि विसरले कृष्णाते । नाचणीते भुलले ॥१००॥
चैतन्यबुका घाली वनमाळी । ज्यासी लागे तोचि परिमळी । देत खुणेच्या अंजली । पसेदान याचका ॥१॥
कृष्णरंगे सुरंग विडे । वांटिताती वाडेकोडे । जो राहिला मागिलकडे । त्यासी न चढे तो रंग ॥२॥
ऋग्वेदादि सामगायन । गर्जती वेद बंदीजन । त्या शब्दाची निजखूण । सत्य श्रीकृष्ण जाणता ॥३॥
सत्त्वे सात्त्वीक जगजेठी । घेऊनि विवेकाचि वेताटी । दृश्य गलबला मागे लोटी । कृष्ण दृष्टी पहावया ॥४॥
कृष्णासी आवडती अतिप्रीती । ते वैष्णव रंगी नाचती । सांडूनि अहंसोहवृत्ती । नृत्य करिती निजबोधे ॥५॥
कृष्णासवे सुवासिनी । शांति क्षमा दया उन्मनी । आल्या सुखासनी बैसोनि । वरासनी सुभद्रा ॥६॥
निर्धारूनिया तत्त्वता । निजबोधाच्या अक्षता । घालिती कृष्णाचिया माथा । लक्ष सर्वथा न चुकती ॥७॥
उग्रसेन वसुदेव । वहनी चढले यादव । अवघ्यांपुढे बळीदेव । महोत्साव करीतसे ॥८॥
सोयरे कृष्णाचे निजभावी । भक्त योगी ज्ञानी अनुभवी । तयांसी वाहने बरवी । कृष्णदेवे दिधली ॥९॥
एका सलोकतेचा वारू । एकासी समीपतारहंवरू । एकासी स्वरूपताकुंजरू । महा थोर भद्रजती ॥११०॥ ।
एका दिधले अमोल । सायुज्यता चवरडोल । त्याचा अनुभव सखोल । निजात्मबोल हरी जाणे ॥११॥
तयासी सर्वथा श्रीहरी । आपणावेगळे क्षणभरी । कोठे जाऊ नेदी दूरी । सरोभरि निजभावे ॥१२॥
वर्हाड राखावया निगुती । गुणावतार गुणमूर्ती । करणे मारणे धरणे स्थिती । तिघा हाती भरभारू ॥१३॥
तया तिघांमागिलेकडा । कृष्ण पुरुष अतिगाढा । दोही पक्षी देखणा फुडा । भार वर्हाडा त्या माथा ॥१४॥
वर्हाडाची घडामोडी । कृष्णाआंगी नलगे वोढी । अवघे पर बाहिरे दवडी । ऎसी परवडी रचियेली ॥१५॥
विचारिता निजनिवाडी । कृष्णावीण अर्धवडी । इकडील तिकडे नव्हे काडी । वृथा वेडी बलगती ॥१६॥
भरूनि रजतमाचे औषध । करूनि अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढे अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ॥१७॥
अग्नि लावूनि ठायी ठायी । ममता जाळिती हवायी । गगना उसळली पाही । धुपोनि ठायी निमाली ॥१८॥
मोहयंत्री सुमनमाळा । अग्निपुष्पे भासती डोळा । फुले म्हणती अबला । पाहता डोळा ते राख ॥१९॥
अतिलोभाच्या चिचुंदरी । अग्नि लावूनि टाकिती दूरी । पेटल्या पडती जनांवरी । उरी शिरी जाळिती ॥१२०॥
देऊनि उपशम-अनळा । जाळिती क्रोधाचा भुईनळा । भडभडा निघती ज्वाळा । तोही निमाला तात्काळ ॥२१॥
हाती धरूनि कृष्णलीला । जाळिती कामाचा हातनळा । धरू नेणती त्या अबळा । जीवी जिव्हाळा पोळत ॥२२॥
पाहता अत्यंत कठीण । चिन्मात्र अग्नि देऊनि जाण । सांडिती अहंकाराचे बाण । पळे जीवपण दचकोनी ॥२३॥
मदमत्सरधूम्रमेळे । एकाचे झाकले जी डोळे । देहबुद्धीची भेडे सकळे । विषयबळे पळाली ॥२४॥
स्वानुभवाचे महाथोर । उठावले जी कुंजर । रगडूनि अहंकाराचा दूर । निरंतर डुल्लती ॥२५॥
सवेचि निजतेजचंद्रज्योति । उजळली जी अवचित्ती । प्रकटली परम दीप्ती । तेही स्थिती परियेसा ॥२६॥
नि:शेष अंधार नाही जेथ । उष्णचांदणीयाहूनि अतीत । तेज प्रकटले अद्भुत । संतोषत श्रीकृष्ण ॥२७॥
पदोपदी नाना त्याग । करीत चाले श्रीरंग । वोंवळण्या जी अनेग । दोही भागी पडताती ॥२८॥
कौतुक दावावया श्रीपती । कपटमहामोहाचा हस्ती । आणूनि पुढा उभा करिती । भद्राजाती मातला ॥२९॥
नेणती त्याची लटकी कळा । देखोनि भय उपजे सकळा । कोण पुरे त्याच्या बळा । चळचळा कापती ॥१३०॥
महामदे झाला मस्त । अहंकारे अतिगर्जत । अव्हासव्हा जी धावत । लोकांआंत निजबळे ॥३१॥
भेडांपाठी अधिक लागे । तव ते सरती मागे । अंधकूपी पडती वेगे । मागते निघो नेदी तो ॥३२॥
भेडे लटकींच रगडी । तेणे चरफडती बापुडी । एकी त्या भेणे झोपडी । जीवेभावे धरियेली ॥३३॥
ऎसा जनांसी लाविला धाक । तव कृष्णे खुणाविला सेवक । लाता हाणोनिया देख । कपटवेष मोडिला ॥३४॥
धारणाधाये कपट झोडी । भवगज हे गोष्टी कुडी । ऎसी देखणी दृष्टी ज्या चोखडी । भवभयवोढी त्या नाही ॥३५॥
चतुर्विधा प्रसिद्ध दासी । शकुनालागी ह्र्षीकेशी । उभ्या परिपूर्णकलशेसी । महाद्वारासी तिष्ठत ॥३६॥
कृष्णभांडार ते अनंत । अखंड श्रीकृष्णासवे चालत । पाहोनिया शुद्ध भावार्थ । उचित पदार्थ हरि देत ॥३७॥
श्रद्ध कीर्ती धृति विरक्ती । त्याही दासी अति तिष्ठती । श्रीकृष्णवासाते वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ॥३८॥
जे जे काही त्या मागत । ते ते कृष्णनाथ देत । त्याहूनि अधिक दे समर्थ । महाद्वारांत प्रवेशला ॥३९॥
अंतरी प्रवेशला कृष्णवरू । सकळा स्वानंद झाला थोरू । अवघे करिती जयजयकारू । बैसकारू झाले तदा ॥१४०॥
सिद्धसामग्री मधुपर्कासी । विष्टर दिधला ह्रषिकेशी । साम्यतेचिया चौरंगासी । श्रीकृष्णासी बैसविले ॥४१॥
सांडूनि फळाशा समस्त । अर्घ्य अर्पिले सफळित । सुर नर कौतुक पाहात । सिद्ध समस्त तेथे आले ॥४२॥
पाद्यालागी आणिले तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी अतीत । चैतन्यप्रवाहे शोभत । यथोचित मनकर्णिका ॥४३॥
उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती । जेथोनि तीर्थाचि उत्पत्ती । ते पूजिती श्रीचरण ॥४४॥
चरणप्रक्षाळणा ठेविले अंबू । तव पातला तीर्थकदंबू । आम्हासी लाभों द्या एक थेंबू । चरणांबू श्रीहरीचा ॥४५॥
मूळमाधवी जाऊनि पाहे । कदंबतीर्थ अद्यापि आहे । भाग्यवंत तो तेथे नोहे । कृष्णपाये ते तीर्थ ॥४६॥
शुद्धमतीने आपण । कृष्णासी दिधले आचमन । तीन वेळा न करी जाण । सर्वापोशन एक वेळा ॥४७॥
ब्रह्मपदींचा अधिष्ठाता । त्यासि देती ब्रह्मसूत्रा । मान दे तो वेदविचारा । श्रुतिव्यवहार संरक्षी ॥४८॥
चंदन पुष्पे टिळे माळा । भावे पूजिला घनसावळा । आनंद भीमकभूपाळा । परब्रह्म डोळा देखत ॥४९॥
हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासी वोपिल्या विचित्रा । बाहुभूषणे जडित मुद्रा । पीतांबर अर्पिले ॥१५०॥
दधि मधु एकत्रता । करी घातले अच्युता । मेहुणे म्हणती कृष्णनाथा । लाज सर्वथा न धरावी ॥५१॥
गोकुळी चोरूनि दधि खाता । तुम्हासी लाज नाही सर्वथा । आम्ही निजभावे अर्पिता । का लाजता निजचोरा ॥५२॥
सलज्ज हांसे शुद्धमती । वर्हाडी वर्हाडिणी हासती । निष्कर्मासी कर्मप्राप्ती । जन वदती विपरीत ॥५३॥
भीमक म्हणे ‘प्रतिगृह्यत " । प्रतिगृण्हामि म्हणा अच्युता । टक पडिले कृष्णनाथा । मग तत्त्वता विचारी ॥५४॥
खूण बोलिला कृष्णस्वामी । ‘दान देतो एक आम्ही " । हाही भाव सांडूनि तुम्ही । मग प्रतिगृण्हामि सर्वचि ॥५५॥
संकल्प सोडिता तात्काळ । दधि मधु सेवी गोपाळ । भीमकाचे जन्म सकळ । सफळ कुळ उद्धरिले ॥५६॥
देऊनि कृष्णासी आचमन । सवेचि केले करक्षालन । गुरु म्हणती सावधान । नाही व्यवधान लग्नासी ॥५७॥
कृष्णचरण शून्य न पडे । घातले परिपूर्ण पायघडे । श्रीकृष्ण चालविला पुढे । वाडेकोडे लग्नासी ॥५८॥
भीमकी भावार्थे आइती । पर्णावया निजपती । गौरीहर सहज स्थिती । उपचारप्रीती पूजितसे ॥५९॥
कृष्णासी अंत्रपाट पुढे । बोलता बोलणे हे कुडे । श्रोते म्हणती न सुची झाडे । लग्न निवाडे लागो द्या ॥१६०॥
आधीच कृष्णकथा सखोल । त्याहीवरी तुझे रसाळ बोल । जाणसी प्रेमाची बोल । येताती डोल सुखाचे ॥६१॥
ऎकोनि श्रोतियांचे वचन । आनंदला एक जनार्दन । मने करूनि लोटांगण । वंदिले चरण निजभावे ॥६२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणी स्वयंवरे लग्नअतिकालसमयोनाम पंचदश: प्रसंग ॥१५॥
॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥
