रुक्मिणी स्वयंवर-प्र
3.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तिसरा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तिसरा
श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरी अक्षर ॥१॥
मनोवेगाचा पै वारु । त्यावरी बैसविला द्विजवरू । कृष्णापासी सत्वरू । समूळ मूळ पाठविला ॥२॥
माझे पूर्णपुण्ये तू द्विजवरु । कृष्णप्राप्तीसी मज तू गुरु । म्हणवोनि केला नमस्कारू । वेगी यदुवीरू आणावया ॥३॥
स्वामिचरणी ठेविला माथा । द्वारकेसी जावे जी तत्त्वता । प्राण वांचवा हो आता । वेगी कृष्णनाथा आणावे ॥४॥
द्विज पावला द्वारका । वैकुंठ कैलासांहूनि अधिका । जेथे निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा ॥५॥
द्वारकाबाह्यप्रदेशी । आराम रमवी जीवशिवांसी । वसंत विनवी सदा सुमनेसी । संताप कोणासी असेना ॥६॥
प्रेमे विकासली कमळे शुद्ध । रुंजी करिता कृष्ण षट्पद । ऎकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावले ॥७॥
प्रबोध पारवे घुमघुमती । तेणे वागेश्वरी चमके चित्ती । विस्मित जाहला बृहस्पती । आश्चर्य मानिती सुरवर ॥८॥
डोलती पै द्राक्षांचे घड । मुक्त परिपाके अतिगोड । सकळ कामाचे पुरे कोड । गोडाही गोड ते गोडी ॥९॥
कोकिळा कृष्णवर्ण कूजती । शब्द नि:शब्द मधुर वृत्ती । तेणे सनकादिक सुख पावती । प्रजापती तटस्थ ॥१०॥
मयूर आनंदे नाचत । अप्सरानृत्य तेणे तटस्थ । तांडव विसरले उमाकांत । अतिअद्भुत हरिलीला ॥११॥
शुद्ध हंस द्वारकावासी । मुक्तमोतिये चारा त्यासी । ते देखोनिया परमहंसी । निजमानसी लाळ घोटी ॥१२॥
शुक पिंगळे अनुवादत । तेणे वेदान्त दचकत । अतिगुह्याचे गुह्यार्थ । पक्षी बोलत द्वारकेचे ॥१३॥
इतर नगरांची उभवणी । तिखणावरी पांचखणी । त्यांहीमाजी अतिदुखणी । द्वारकापट्टणी ते नाही ॥१४॥
द्वारका पाहता वाडेकोडे । विजू पिळूनि घातले सडे । मुक्त पताका चहूकडे । मशक त्यांपुढे सत्यलोक ॥१५॥
द्वारकेची नवलपरी । चिंतामणीची चिंता हरी । कल्पतरूची कल्पना वारी । परियेसाची निवारी । जडत्व काळीमा ॥१६॥
दशेचे दैन्य निवडी । अमृताची साल काढी । स्वानंदाची उभवी गुढी । नांदे उघडी द्वारका ॥१७॥
द्वारकेमाजी शुद्ध केणे । दो अक्षरांचे खरे नाणे । जैसे घेणे तैसे देणे । कोणासी उणे असेना ॥१८॥
वैकुंठीचिया वैभवासी । कृष्णे आणिले द्वारकेसी । देखता ठक पडले द्विजासी । ते द्वारका कैसी वर्णावी ॥१९॥
द्विजासी सत्वरता मोठी । नगर न पाहावेचि दृष्टी । भीतरी पातला उठाउठी । जेथे जगजेठी श्रीकृष्ण ॥२०॥
म्हणवुनी द्वारकावर्णन । रहावयाचे हेचि कारण । द्विजासी देखिला श्रीकृष्ण । विस्मित मन तयांचे ॥२१॥
हेमसिंहासनी आदिमूर्ती । बैसला असे सहजस्थिती । द्विजासी देखोन श्रीपती । भाव चित्ती जाणिला ॥२२॥
याचिया आगमनविधी । थोर होईल कार्यसिद्धी । फावली एकांतांची संधी । होय सद्बुद्धि ब्राह्मण ॥२३॥
सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्ही कर जोडी । नमन साष्टांगपरवडी । पूजी आवडी द्विजाते ॥२४॥
अमर करिती कृष्णपूजा । तैशियापरी पूजी द्विजा । ब्राह्मणदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ॥२५॥
ब्राह्मणासी मंगलस्नान । देऊनि पीतांबर सुमन चंदन । सन्निध बैसोनि आपण । दिधले भोजन यथारुचि ॥२६॥
शय्या घालुनि एकांती । अरळ सुमनांची निगुती । विडिया देऊनि श्रीपती । शयन करविती द्विजाते ॥२७॥
कृष्ण बैसोनिया शेजारी । ब्राह्मणाचे चरण चुरी । येरू म्हणे गा श्रीहरी । करी धरी कृष्णाते ॥२८॥
ऎके स्वामी देवाधिदेवा । आम्ही करावी तुझी सेवा । तू पूजितोंसी भूदेवा । ब्राह्मण देव म्हणवूनिया ॥२९॥
निजात्मभावे उचिते । ह्रदयी साहिले लाथेते । ते हित नव्हेचि आमुते । विपरीतार्थ फळला असे ॥३०॥
तुझिया पूजा पूज्य जाहलो । तेणे गर्वासी चढिन्नलो । कृष्णसेवेसी नाडलो । थोर वाढलो अभिमाने ॥३१॥
तू यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न । वृक्षा गेले त्यांचे हवन । कर्मठपण कर्माचे ॥३२॥
सर्वाभूती भगवद्भावो । नपुजे तव न भेटे देवो । तैसा मी ब्राह्मण नोहे पाहा हो । जाणसी भावो ह्रदयींचा ॥३३॥
कृष्णे पुशिले स्वागत । वृत्ति आहे की निश्चित । चित्ती चिंता ज्या वर्तत । ते दुश्चित सर्वदा ॥३४॥
जयाची चिंता निवर्तली । तयाची वृत्ति सुचित जाहली । त्यासीच स्वकर्मे फळली । निजात्मफळाचेनि फळे ॥३५॥
असोनि इंद्राची संपत्ती । तृप्ती नाही जयाचे चित्ती । ते अतिशय दु:खी होती । विटंबिजेती संसारी ॥३६॥
असोनिया अकिंचन जयाची वृत्ति समाधान । तेणे अजिता माते जिंकिले जाण । बंदीजन मी तयाचा ॥३७॥
सर्वाभूती भगद्भावो । त्यावरी स्वधर्मनिष्ठ भूदेवो । त्याचिया पाऊलापाऊली पाहा वो । सर्वांग वोडवी ॥३८॥
ऎसिये निष्ठेचे जे ब्राह्मण । ते मज सदा पूज्य जाण । त्यांचे नमस्कारी मी चरण । वारंवार मस्तकी ॥३९॥
कृष्णदर्शने समाधान । ब्राह्मणासी पडिले मौन । विसरला कार्याची आठवण । जाणोनि प्रश्न हरि करी ॥४०॥
कोठोनि येणे झाले स्वामी । कवण ग्राम कवण भूमी । तुमचे देशीचा देशस्वामी । प्रजा स्वधर्मी पाळी की ॥४१॥
दुर्गम मार्ग अति संकटी । क्रमूनि आलेति आमुचे भेटी । कवण इच्छा आहे पोटी । ते गुह्य गोष्टी सांगावी ॥४२॥
आम्ही केवळ ब्राह्मणभक्त । आज्ञा करणे हे उचित । काय अपेक्षित तुमचे चित्त । ते निश्चित मी करीन ॥४३॥
कवण कार्याचिये विधी । तुम्ही आलेति कृपानिधी । ते झाली कार्यसिद्धी । जाणा त्रिशुद्धी सर्वथा ॥४४॥
ऎकोनि कृष्णमुखींची गोष्टी । द्विजे बांधिली शकुनगाठी । हर्ष वोसंडला पोटी । आनंद सृष्टी न समाये ॥४५॥
म्हणे वैदर्भदेशीचा राजा भीमक । जैसा वैराग्यामाजी विवेक । भागवतधर्मी अतिधार्मिक । शुद्ध सात्त्विक सत्त्वाचा ॥४६॥
त्याची कन्या चिद्रत्न । लावण्य गुणे गुणनिधान । सकळ भूषणांचे भूषण । ते मंडन तिन्ही लोकी ॥४७॥
उदार धीर गुणगंभीर । सज्ञान ज्ञाने अतिचतुर । तुझ्या ठायी अतितत्पर । कलत्रभावे विनटली ॥४८॥
पित्याने तुम्हासी दिधली वधू । ऎकुनि हांसिन्नला गोविंदू । हरिखे न सांभाळे स्वानंदू । द्विजासी क्षेम दीधले ॥४९॥
जे होते कृष्णाचे पोटी । तेचि द्विजे सांगितली गोष्टी । जीवी जीवा पडली मिठी । पाठी थोपटी द्विजाची ॥५०॥
आणिक एक संवादू । तिचा ज्येष्ठ बंधू विरोधू । तेणे शिशुपाळा दिधला शब्दू । लग्न परवा धरिलेंसे ॥५१॥
येचिविषयी यदुनायका । आहे भीमकीची पत्रिका । ते वाचूनिया सविवेका । कार्यसिद्धी करावी ॥५२॥
मग काढिली पत्रिका । कुममंडित सुरेखा । धीर न धरवेचि हरिखा । आवडी देखा चुंबिली ॥५३॥
पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणार्थी आर्तभूत । एका जनार्दनी विनवीत । पत्रिकार्थ परिसावा ॥५४॥
इति श्रीमदभागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पत्रिकावलोकनं नाम तृतीय: प्रसंग: ॥३॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥
