वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 5. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ › 1. रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग › 4. प्रसंग चौथा रुक्मिणीचे पत्र

रुक्मिणी स्वयंवर-प्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088065 · अभंग क्र. ४

4.

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग चौथा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग चौथा
श्रीयशोदातनयाय नम: । ॐ नमो जी यदुवीरा । तू निर्विकार नोवरा । मज न्यावे निजमंदिरा । क्रोधादिक असुरा दमूनी ॥१॥
मज वडील माझा बंधू । जेणे तुजशी विन्मुख बोधू । ज्याचेनि नीचांशी संबंधूं । निवारूनि वधू त्या करावी ॥२॥
ऎका भीमकीची वित्पत्ती । पत्रिका लिहिली चवथे भक्ती । वाचितांची भक्तपती । सहजस्थिती धाविन्नला ॥३॥
रुक्मिण्युवाच ॥ श्रुत्वा गुणान् भवनसुंदर शृण्वता ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्‌गतापम् ।
रूपे दृशां दृशिमतामखिलार्थलाभं त्वथ्यच्युतायिशति चितमपत्रपं मे ॥१॥
ऎके त्रैलोक्यसुंदरा । सकळसौंदर्यवरागरा । तुझेनि सौंदर्ये सुरनरा । सुंदरत्व वर्णिजे ॥४॥
तुझी सुधाकर कीर्ती । श्रवणश्रवणा प्रकाशिती । त्रिविध ताप अस्त पावती । जेवी गभस्ती खद्योत ॥५॥
ऎशियाची स्वरूपप्राप्ती । चारी मुक्ती दासी होती । सकळ स्वार्थ पाया लागती । ज्या देखती त्या निजलाभ ॥६॥
क्षय नाही गा निश्चित । यालागी नामे तू अच्युत । तुझिया ठायी निर्लज्ज चित्त । अतिसुरत कृष्णसखा ॥७॥
का त्वां मुकुंद महती कुशलशील रूपविद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ।
धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोऽभिरामम् ॥२॥
-विश्रांतीचा निजबोधू । म्हणवूनि नांवे तू मुकुंदू । सकळ सुखाचा आनंदकंदू । तुज कोण वधू वरीना ॥८॥
कुळ शीळ धन रूप । विद्या वयसा अतिस्वरूप । शांति कांति तेज अमूप । करिती तप तुजलागी ॥९॥
ऎशी लावण्यगुणसंपत्ती । धीरवती आणि सती । त्याही तुजसमान वर न पावती । तेथे मी किती वराक ॥१०॥
ऎके नरवीरपंचानना । प्राप्तकाळी पाणिग्रहणा । तुज कोण वरीना अंगना । मनमोहन श्रीकृष्णा ॥११॥
म्हणसी मी सोयरा अति काळा । बोलावितेसी विवाह – मेळा । तरी पाणीग्रहण जी शिशुपाळा । तो काळांतकाळ मजलागी ॥१२॥
ते काळी त्वां नुपेक्षावे । हेचि मागे जिवेभावे । मज दीनाते उद्धरावे । धावे पावे लग्नासी ॥१३॥
तन्मे भवान् खलु वृत: परिरंग जायामात्मर्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि !
मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद्वोमायुवन्मृगपतेर्बलिमंबुजाक्ष ॥३॥
माने वाचा आणि काया । निर्धारेंशी तुझी जाया । मी झाल्ये असे यदुराया । विवाह त्वां कीजे ॥१४॥
तू तव पर गा प्रकृती । तुज नावडे स्त्रियांची संगती । उपेक्षिसी माझी विनंती । थोर अपकीर्ती तुज तेव्हा ॥१५॥
मी तव तुझेचि अर्धांग । केवी शिशुपाळ शिवे माझे आंग । तू शिरावरी असता श्रीरंग । मी वीरविभाग यदुवीर ॥१६॥
कृष्णकेसरीची संपत्ती । चैद्यजंबुक जै गा नेती । कमळनयना कमळापती । थोर अपकीर्ती होईल ॥१७॥
पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुर्वर्चनादिभिरलं भगवान् परेश: ॥
आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्यतु मे न दमघोषसुतादयोऽन्ये ॥४॥
तरीच साधेल हे लग्न । जरी म्या केले असेल भगवद्भजन । ब्रह्मभावे ब्राह्मणपूजन । देवतार्चन हरीचे ॥१८॥
इष्ट जे का यागादिक । वापी कूप आराम देख । गोभूरत्‍नदानादिक । त्याहून अधिक अन्नदान ॥१९॥
व्रत जे का एकादशी । पूजाविधि जागरणेंशी । ब्राह्मणभोजन द्वादशीसी । भगवंताशी वल्लभ ॥२०॥
सकळ धर्माचा पै धर्म । गुरु तोचि परब्रह्म । ऎसा केला असेल नेम । तरी पुरुषोत्तम मज पावे ॥२१॥
व्रत तप यज्ञ दान । त्याहून अधिक हरींचे ध्यान । निमिषामाजी समाधान । अमन मन होऊनि ठोक ॥२२॥
ऎसोनि साधने साधिला बोधू । तरी गदू याचा धाकुटा बंधु । वेगी येऊनि गोविंदू । पाणिग्रहण मज करावे ॥२३॥
परादि वाचा नाही सौरस । यालागी नांवे तू परेश । भीमकीलिखिते ह्रषीकेश । तटस्थ होऊनि पै ठेला ॥२४॥
मज कृष्णे नेलियापाठी । मागे शिशुपाळाचिया पाठी । बैसेल अवकळा गोमटी । दोघा गाठी एकचि ॥२५॥
श्र्वोभाविनी त्वमजितोद्वहने विदर्भान् गुप्त: समेत्य पृतनापतिभी: परीत: ।
निर्मथ्य चैद्यमगधेंद्रबलं प्रसह्य मं राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥५॥
पत्रिका पहावी सावधान । विलंब न करावा व्यवधान । प्रात:काळी आहे लग्न । ऎसिया समयी पावावे ॥२६॥
देखोनि लिखिताची तातडी । एकला येऊनि घालिशी उडी । तेव्हा मज म्हणशील कुडी । बुद्धि धडफुडी ऎकावी ॥२७॥
तुझिया निजबोधाची सेना । प्रत्यावृत्ति पाहोनि नयना । स्वानुभवाचेनि भारे जाणा । सावध होऊनि त्वां यावे ॥२८॥
स्वरूप तेचिया मदगजा । गुढार घालावे जी वोजा । प्राणपान जिणती पैजा । तैसे वारू पालाणी ॥२९॥
जिणोनि जाती मनोरथ । तैसे संजोगावे रथ । चक्रवाटातळी पर्वत । पीठ होते कर्माचे ॥३०॥
तुझिया निजबोधाचे गाढे । द्वैतदलनी जे निजगाढे । तेचि यादव करूनि पुढे । सबळबळेशी त्वां यावे ॥३१॥
बाह्य सृष्टी जरी तू येशी । तरी तर्क पडेल लोकासी । कळो नेदिता दुजियासी । गुप्तरूपेसी प्रगटावे ॥३२॥
कृष्णासी शिकविते बुद्धी । म्हणाल चतुर तुम्ही अनादी । ह्रदयशून्य कृष्ण त्रिशुद्धी । वर्तणे बुद्धी माझेनि ॥३३॥
प्रबळ बळेशी सबळ । म्हणाल का बोलाविते बरळ । तरी माया माहेरी प्रबळ । स्थूळास्थूळ अरिवर्ग ॥३४॥
सखा जिवलग बंधु सबळ । मागध अष्टधा प्रबळ । मंथोनि चैद्यादि खळ । गज केवळ पर्णावे ॥३५॥
म्हणशी ढालाची तू मोठी । गोड बोलाची प्रकृती खोटी । येवढी का सोसू आटाटी । म्हणोनि गोष्टी नुपेक्षावी ॥३६॥
तू तव अजिंक्य गा धडफुडा । तुझेनि नावे वाटीव भेडा । मज पर्णावया आळस दवडा । होई गाढा वीरवृत्ती ॥३७॥
म्हणशी युद्ध मांडेल कडाडी । मी उठेन काढाकाढी । नाही लौकिक परवडी । कैची घडी घडवटॆ ॥३८॥
कैचा अंत्रपाट जाण । कवण म्हणेल सावधान । मी तू पणा नाही व्यवधान । म्हणशी लग्न कैसेनी ॥३९॥
ऎसेनि लग्न लागलिया पुढा । रणी नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परे पडतील ॥४०॥
म्हणशी निधीने नव्हेल लग्न । अविधीने करी पाणिग्रहण । येविषयींचे विधान । सावधान परिसावे ॥४१॥
विवाह तरी बहुतांपरी । पिशाच गांधर्व आसुरी । राजे वरिताती स्वयंवरी । पण महाशूरी भेदूनि ॥४२॥
पाणीग्रहण ब्राह्मणांसी । खड्‌गलग्न क्षत्रियांसी । रणी जिंकोनि महाशूरांशी । राक्षसविधी मज पर्णी ॥४३॥
जागृती स्वप्नी सुषप्तिकाळा । तुजवाचोनि न देखे डोळा । ग्लानि लिहिता वेळावेळा । उबग गोपाळा न मानावा ॥४४॥
आता ऎके एक बोल । तुझे वीर्य माझे मोल । अल्प वेचोनि एक वेळ । दासी केवळ मज करी ॥४५॥
अंतपुरांतरचरीमनिहत्य बंधूंस्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् ।
पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्या बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥६॥
म्हणती अंत:पुरामाजील तू वधू । काढिता आडवे येतील तुझे बंधू । त्यांचा मजकरिता वधू । दू:खसंबंधू होईल ॥४६॥
येचिविषयी जी उपाया । सांगेन ऎके यादवराया । वेगी यावे अंबालया । यात्रासमया ठाकूनी ॥४७॥
कुळीचा कुलधर्म भीमकराया । नगराबाहेर अंबालया । नववधू न्यावी पूजावया । जगदंबेसी कुळधर्म ॥४८॥
तेचि संधी जी कारण । परस्परे हेचि खूण । तेथे रहूनि सावधान । ओंपुण्या करावे ॥४९॥
यस्यांघ्रिपंकजरज:स्नपनं महांतोवांछत्युमापतिरिवात्मतमोपहत्यै ।
यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसृन्व्रतकृशान् शतजन्मभि: स्यात् ॥७॥
म्हणसी ऎश्वर्ये थोर इंद्र । रूपे मदन का चंद्र । हे सांडूनि आग्रह थोर । माझाचि का करितेसी ॥५०॥
ऎसे न म्हणावे सर्वेश्वरा । कवण जाणे या विचारा । केवळ नव्हेसी तू नोवरा । जन्मोद्धारा मजलागी ॥५१॥
तुझिया चरणींची माती । ब्रह्मादिदेवा नव्हे प्राप्ती । आंगे येऊनि उपापती । स्नान वांछिती पदरजी ॥५२॥
महादेवा तमोगुण । त्या तमासी उपशमन । तुझिये चरणींचे रज जाण । लागले ध्यान शिवासी ॥५३॥
चरणरजालागी केवळ । ब्रह्मा जाहला पोटींचे बाळ । तोही न पावे चरणकमळ । नाभिकमळी स्थापिला ॥५४॥
त्याचि लाजा जी गोपाळा । चरणजा आला गोकुळा । तुवा ठकविला त्याही वेळा । वत्से गोवळा जाहलासी ॥५५॥
हे जाणोनि सदाशिवे । ध्यान मांडिले जीवेभावे । ऎशियाची प्राप्ती मी पावे । तै थोर दैवे दैवाचा ॥५६॥
योग याग तपे तपती । तरी नव्हे तुझी प्राप्ती । मी तव धीट मोठी चित्ती । आहे वांछिती अर्धांग ॥५७॥
पत्रिका वाचिताचि देख । तुवा यावे आवश्यक । मज पर्णून नेदिशी सुख । तरी परमदु:ख होईल ॥५८॥
तुझी कृपा नव्हता फूडी । कवण जिणियाची आवडी । देहदंडाची हे बेडी । कोण कोरडी वोढील ॥५९॥
कृपा न करवेल येथे । तरी मारूनि जा आपुले हाते । मग परलोकी तरी तूते । सावकाश भोगीन ॥६०॥
ऎसे घडविता जरी न घडे । तरी देह करीन मी कोरडे । व्रते तपे अवघडे । तुज उद्देशे करीन ॥६१॥
प्राण सांडीन सर्वथा । म्हणसी काय येईल हाता । तरी एका दो पांचा साता । जन्मशता वरीन ॥६२॥
पत्रिका वाचिताचि जाण । जाणवेल शहाणपण । म्या तव वाहिलीसे आण । तुजवीण अन्य वरी ना ॥६३॥
ब्राह्मण उवाच ॥ इत्येते गुह्यसंदेश यदुदेव मयऽऽह्रता: । विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतं तदनंतरम् ॥८॥
द्विज म्हणे यदुनायका । सेवेशी निवेदिली पत्रिका । ते वाचूनि सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥६४॥
पत्रिका वाचिताचि गोपाळा । पुढे भीमकी देखे डोळा । बाहू पसरूनि उतावेळा । उठे वहिला आलिंगना ॥६५॥
भीमकी भावार्थाची कैसी । चटपट लागली देवासी । निद्रा न लगेचि सेजेसी । उठीबैसी करीतसे ॥६६॥
नवल वैदर्भीचा भावो । रात्री वोसणावे देवो । भीमकी सांडू नको देहो । आलो पाहा वे पर्णावया ॥६७॥
जया ह्रदयी जैसा भावो । तयासी तैसा भेटे देवो । भीमकी कृष्णमय पाहाहो । कृष्णदेवो तन्मय ॥६८॥
ह्रदयी नाही सत्य भावो । तव कैसिनी पावे देवो । भीमकी भाग्याची पहा हो । उठिला देवो सत्वर ॥६९॥
कृष्ण सांगे द्विजाजवळी । रात्रीची अवस्था सकळी । मग हासोनिया वनमाळी । टाळिया टाळी पिटिली ॥७०॥
एका विनवी जनार्दना । कृष्ण चालिला पाणिग्रहणा । भक्तवचनासी अवगणना । देव सर्वथा न करीचि ॥७१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे चतुर्थ: प्रसंग: ४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग