रुक्मिणी स्वयंवर-प्र
18.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अठरावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अठरावा
श्रीगणेशाय नम: । हाती दुधातुपाची वाटी । देवकी बैसवूनि पाटी । पुढे दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपी शुद्धमती ॥१॥
धन्य धन्य तुमची कुशी । जेथे जन्मले ह्रषीकेशी । म्हणोनि लागली चरणांसी । रुक्मिणीसी निरवित ॥२॥
चौघा पुत्रांहूनि आगळी । वाढविली हे वेल्हाळी । आता दिधली तुम्हाजवळी । कृष्णस्नेहे पाळावी ॥३॥
दोघीजणी मातापितरी । हाती धरूनिया नोवरी । यादवाचे मांडीवरी । यथानुक्रमे बैसविली ॥४॥
गहिंवर न धरवे भीमकासी । प्रेम लोटले तयासी । मिठी घालोनि कृष्णचरणांसी । उकसाबुकसी स्फुंदत ॥५॥
लाज सांडोनि शुद्धमती । पाया लागली श्रीपती । भीमकी देऊनिया हाती । वैकुंठपती जोडिला ॥६॥
पाहाती नरनारी सकळा । आसवे आली त्यांचिया डोळा । खंती न भीमकबाळा । मायेकडे न पाहेचि ॥७॥
कृष्णी लागलिया प्रीती । मायमाहेराची खंती । सर्वथा न करी चिती । निजवृत्ती हरिचरणी ॥८॥
वोहमायेसी कळवळ । पाया लागे वेळोवेळा । आसुवे पूर्ण आली डोळा । म्हणे प्रतिपाळा भीमकीसी ॥९॥
शुद्धमती म्हणेज रायासी । मज आंदण द्या भीमकीसी । होईन कृष्णाची निजदासी । चरण सेवेसी निरंतर ॥१०॥
राजा म्हणे शुद्धमती । जीवप्राण आणि संपत्ती । सर्वस्व अर्पिले श्रीपती । विकल्प चित्ती न धरावा ॥११॥
भाव विश्वास दोघेजण । दिधले भीमकीसी आंद्ण । कृष्णसेवेलागी जाण । अहर्निशी सादर ॥१२॥
द्विपदा आणि चतुष्पदा । नाना रत्ने धातु अष्टधा । भीमके आंदण गोविंदा । बहुत संपदा दीधली ॥१३॥
वसुदेवादि उग्रसेन । भीमकासी करिती आमंत्रण । भोजनाचा आग्रह जाण । केला सन्मान सर्वाचा ॥१४॥
भीमके विनविले कृष्णासी । विनंति आहे पायांपाशी । पुत्र झालिया भीमकीसी । निजपंक्तीसी शेष दीजे ॥१५॥
चतुर्विधा सूत्रधारी । तुझी आज्ञा आमुचे शिरी । भोजनाचा आग्रह न करी । वचन श्रीहरी मानले ॥१६॥
वरात निघाली वेगेंसी । गृहप्रवेश द्वारकेसी । आज्ञा दिधली भीमकासी । निजनगरासी तो निघे ॥१७॥
दोघे वधूवरे गजस्कंधीं । भोवती यादवांची मांदी । गीत नृत्य अतिविनोदी । द्वारकेंमध्ये उत्सवो ॥१८॥
मदगजगंधाचे पै सडे । कुंकुम कस्तूरी चहूकडे । मखरे श्रृंगारली पुढे । वाडेकोडे झळकती ॥१९॥
नगर श्रृंगारिले कुसरी । गुढिया तोरणे घरोघरी । कर्दळीस्तंभ रोविले द्वारी । फळे त्यामाझारी शोभती ॥२०॥
पूर्णकुंभ द्वारोद्वारी । प्रदीप्त दीप ठेविले वरी । दधि-अक्षता-दुर्वांकुरी । सुमनहारी सुगंध ॥२१॥
वोहरे पहावया कौतुक । नगरनागरिक लोक । मुडपघसणी होतसे देख । एकेंएक धाविन्नले ॥२२॥
एक चढली माडिया गोपुरी । पुष्पांजुळी देती नरनारी । देव वर्षती अंबरी । जयजयकार प्रर्वतला ॥२३॥
पाहता कृष्णस्वरूपासी । अराणुक नाही डोळीयांसी । यालागी न येति दृश्यापाशी । कृष्णसुखासी पकडले ॥२४॥
पदोपदी दीपावळी । वोवाळीती वनमाळी । बाप दैवाची नव्हाळी । भीमकबाळी अर्धांगी ॥२५॥
वेश्या आणि संन्यासी । मुडपघसणी होतसे कैसी । कोप आला श्रीपादासी । दंडे वैश्येसी ठोकिले ॥२६॥
येरी विसरली देहासी । वृत्ति लोभली कृष्णस्वरूपासी । रागे लाता हाणोनि तिसी । म्हणे विटाळ आम्हासी का केला ॥२७॥
येरि हासोनि कपाळ पिटी । अजुनी क्रोध न सोडी पाठी । विटंबिली दंड कांसोटी । आत्मदृष्टी तुम्हा नाही ॥२८॥
मी उत्तम पैल हीन । विषमभेदाचे अज्ञान । सर्वाभूती समसमान । निजात्मज्ञान तुम्हा नाही ॥२९॥
नाही निजशांती रोकडी । तव का केली तडातोडी । भगवी नाशिली लुगडी । उपाधि गाढी श्रीपादा ॥३०॥
शेंडी सांडिली उपडोनी । वासना वाढविली चौगुणी । श्रीकृष्ण देखिलिया नयनी । विटाळ मानी तो निजांध ॥३१॥
ऎसा करिता वाग्वाद । तव दुरी अंतरला गोविंद । आड ठाकला जनसंबंध । न दिसे मुकुंद सर्वथा ॥३२॥
वोहरे आली महाद्वारा । लोण उतरिती सुंदरा । मूद वोवाळी सुभद्रा । कृष्ण पुढारा चालिला ॥३३॥
पूर्ण कलशेसी आल्या दासी । अनंत वाणे परिवस्त्रेंसी । ते ते मेचू देऊनि त्यासी । नानाविधेंसी अलंकार ॥३४॥
शोभा आली भाणववासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । साच मानले जनांसी । तिणे सकळांसी भुलविले ॥३५॥
येता देखोनि कृष्णनाथा । लक्ष्मी लाजली तत्त्वता । सांडूनिया कृत्रिमता । निजस्वरूपता प्रगटली ॥३६॥
भीमकीया देखिले लक्ष्मीसी । विस्मय वाटला तियेसी । विचारिता निजमानसी । दोही रूपेसी आपणचि ॥३७॥
विधि गृहप्रवेशासी । वोहरे बैसविली भाणवसासी । करविती लक्ष्मीपूजनासी ॥ विधिवेदेंसी द्विजवर ॥३८॥
परमामृते भरूनि वाटी । देवकी लावी सुनेच्या वोठी । पुसे वृद्धाचारगोष्टी । सुने घालीसी पोटी निजमाये ॥३९॥
येरी म्हणे परमानंदे धाल्ये । कृष्णसुखे नित्य निवाल्ये । तुमचे सेवेसी पावल्ये । प्राप्त झाल्ये हरिचरणा ॥४०॥
रेवती येऊनि भीमकीपाशी । वेगी निरवी भाणवसासी । हाती धरूनि नोवरीसी । काय तियेसी सांगत ॥४१॥
वरूनि आलीसी कृष्णानाथा । तरी हे सर्व तुझे माथा । देणेघेणे कार्यचिता । कर्तव्यता तुज आली ॥४२॥
येथींची ऎसी आहे रिती । सुचित्त राखावी चित्तवृत्ती । सकल मानावी कृष्णस्थिती । जेणे श्रीपती संतोषे ॥४३॥
जे का खरकटले पाळे । अत्यंत गोंगाणी गोंगाइले । ते भाणवसाबाहेर पाहिजे केले । नेऊन घातले वोंवळ्यात ॥४४॥
जेंका उठंडळ डळमळी । अत्यंत झणत्कारे गडबडी । आश्रमआळा ठेविं रोकडी । वेळणी तोंडी विधीची ॥४५॥
जे का कांठफरा उलले । देखसी ज्याचे बुड भंगले । ते न पाहिजे हालविले । असो संचरले निजआळा ॥४६॥
तपे तापली तुपाची । स्वर्गसिंका बैसका त्याची । सामुग्री वेचिल्या तेथीची । मग उलंडूनि सांडिती ॥४७॥
कामक्रोधाचे उंदीर । कोरूनि टोलर करिती अपार । त्यांच्या मुखी घालूनि पाथर । येते द्वार बुजवावे ॥४८॥
लाविल्या लोण नलगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी । ते तव नाणावे पंक्तीसी । चवी त्यासी पै नाही ॥४९॥
सगळे शिजविता अवघड । काकड करिती कडकड । समजावे भरडी दृढ । होतील गोड परिपाके ॥५०॥
कणिक चाळावी असकट । पाखडूनि सांडावे कसपट । होईल परिपाक चोखट । पूर्णपुरिया सिद्धलाडू ॥५१॥
कृष्णभाणवसा त्रिशुद्धी । अष्टमहासिद्धी नवनिधी । तेथे तुवा वागावे सोहंबुद्धी । जीवउपाधी सांडूनी ॥५२॥
सासु सासरे भावे दीर । आदिकरून लहान थोर । होऊनि अवघ्यासी सादर । अति तत्पर सेवेसी ॥५३॥
वडील जाऊ आपण । भीमकीकरी निजकांकण । घालूनि करी निरवण । पाणिग्रहण भाणवसा ॥५४॥
धाकटे जावेसी प्रीतिकर । नवविध नवरत्नांचा हार । कंठी घातला मनोहर । येरी नमस्कार तिसी केला ॥५५॥
बाई जे जे तुम्ही शिकविले । ते ते मज हितासी आले । रेवति हरिखेली येणे बोले । आलिंगिले भीमकीसी ॥५६॥
एवं द्वारकेमाझारी । परमानंद घरोघरी । देव वर्षती कुसुमे अंबरी । जयजयकार प्रवर्तला ॥५७॥
यापरी गृहप्रवेश । करूनिया हृषीकेश । रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ॥५८॥
शुक म्हणे परीक्षिती । गृहस्थ जाला श्रीपती । भीमकीहरणाची ख्याती । तुजप्रती सांगितली ॥५९॥
एवं हरण पाणिग्रहण । तुज केले गा श्रवण । ज्याचेनि श्रवणे जाण । दोष दारुण नासती ॥६०॥
ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण । कळसा आले निरूपण । प्रेम सज्जन जाणती ॥६१॥
रुक्मिणीहरणवार्ता । जुनाट होय सर्वथा । परी पाणिग्रहण व्यवस्था । नवी कथा कवित्वाची ॥६२॥
ऎसा विकल्प मानाल झणी । जे बोलिले श्रीव्यासमुनी । तोचि अर्थ विस्तारूनी । प्रगट केला प्राकृते ॥६३॥
यथाविधि पाणिग्रहण । मुळी आहे व्यासवचन । ते सूत्रपाय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलो ॥६४॥
साच न मानी ज्याचे चित्त । तेणे पाहावे श्रीभागवत । तेथील श्लोकीच श्लोकार्थ । ऎसाचि असे सर्वथा ॥६५॥
राजे जिणोनि दारुण । भीमकी आणोनी आपण । कृष्णे केले पाणिग्रहण । हे निरूपण मुळीचे ॥६६॥
येणेचि पदे पदविस्तारी । कथा चालिली पुढारी । खोडी ना ठवावी चतुरी । ग्रंथ निर्धारी न पाहता ॥६७॥
जैसे वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय । तैसीच हे कथा होय । थोडेनि बहू विस्तार ॥६८॥
मूळ सांडूनि सर्वथा । नाही वाढविले ग्रंथा । पाहाता मूळींच्या पदार्था । अर्थकथा चालिली ॥६९॥
नाही ग्रंथारंभसंकल्प । नव्हता श्रोतयांचा आक्षेप । ग्रंथी उजळला कृष्णदीप । सुखरूप हरिकथा ॥७०॥
जेणे हा ग्रंथ करविला । तो आरंभीच उपरमला । पुढे ग्रंथ कैसा चालिला । बोलता बोला न बोलवे ॥७१॥
नेणो काय कृष्णनाथा । हे आवडली ग्रंथकथा । तोचि होऊनि श्रोता वक्ता । अर्थ परमार्था आणिला ॥७२॥
ये ग्रंथीचे निरूपण । जीवशीवा होतसे लग्न । अर्थ पाहता सावधान । समाधान सात्त्विका ॥७३॥
येथे विवेकी व्हावा वक्ता । समाधान पाहिजे श्रोता । त्याचेनि संवादे हरिकथा । सुख समस्ता होईल ॥७४॥
होऊनि अनुभवकसवटी । कथा चालिली मर्हाठी । वोवी न चले फुकासाठी । श्रद्धा पोटी धरिलिया ॥७५॥
हे कृष्णकथा अलोलिक । महादोषांसी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ॥७६॥
हे मुमुक्षीची कुलदेवता । मुक्तांची करी नित्य मुक्तता । येरा संसारिया सर्वथा । नवरसे निववीत ॥७७॥
जरी कोणी स्वभावे पुढे । उघडती कानींची कवाडे । अर्थ ऎकता निवाडे । पुढे पुढे अतिगोड ॥७८॥
गोडपणे पडल्या मिठी । सुटती जीवशिवांच्या गाठी । कृष्णकथा हे गोमटी । उठाउठी विजलाभू ॥७९॥
येथे भीमकीचे पुरले आर्त । तो हा आदरे वाचिता ग्रंथ । श्रोतयांचे मनोरथ । कृष्ण समर्थ पुरवील ॥८०॥
माझे पुरवाया मनोरथ । तो मनचि झाले कृष्णनाथ । एका जनार्दनी नित्य तृप्त । परंगत हरिचरणी ॥८१॥
एका जनार्दना शरण । म्हणता गेले एकपण । सहज खुंटले निरुपण । महामौन कथेचे ॥८२॥
मुखी जनार्दनचि वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता । जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ॥८३॥
एका एकजनार्दनी । जनार्दनचि एकपणी । निर्मळ जान्हवीचे पाणी । मनकर्णिका अतितीर्थ ॥८४॥
वाराणसी महापुरी । मनकर्णिकेच्या तीरी । रामजयंतीमाझारी । ग्रंथ निर्धारी संपविला ॥८५॥
शकेचवदाशे त्र्याणव । प्रजापति संवत्सराचे नांव । चैत्रमासाचे वैभव । पर्व अभिनव रामनवमी ॥८६॥
ते दिवशी सार्थक अर्थी । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ती । एका जनार्दन कृपास्थिती । ग्रंथ वाराणसीप्रति संपविला ॥८७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणि स्वयंवरे एकाकारटीकाया अष्टादश: प्रसंग: ॥१८॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ संपूर्ण ग्रंथसंख्या १७०८.
॥ समाप्तोऽयं ग्रन्थ: ॥
