रुक्मिणी स्वयंवर-प्र
6.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सहावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सहावा
श्रीगणेशाय नम: ॥ भीमकीचा विवाहसंभ्रम । पाहो आले कृष्ण राम ॥ हे परिसोनि भीमकोत्तम ॥ दर्शना सकाम ऊठिला ॥१॥
भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रे अनेग । पूजासामुग्री घेऊनि साङ्ग । समारंभेसी पै आला ॥२॥
कृष्ण देखोंनि सावधान । केले साष्टांग नमन । कृष्णे दिधले आलिंगन । विस्मित मन रायाचे ॥३॥
मूळेंवीण तू आलासी । परमसुख हे आम्हासी । शब्देंवीण सोयरा होसी । तू जाणसी ब्रह्मसूत्र ॥४॥
वर वरिष्ठ कृष्णदेवो । मनी धरूनि हाची भावो । मधुपर्कविधी पाहा हो । पूजाविधान करीतसे ॥५॥
नानापरीची उपायने । वस्त्रे अलंकार भूषणे । अंगिकारिली श्रीकृष्णे । जीवींची खूण जाणोनी ॥६॥
बळिभद्रादि प्रमुख । जे आले यादवादिक । त्यांची पूजा केली देख । यथोचित विधाने ॥७॥
राव म्हणे श्रीहरी । आता चलावे नगरांतरी । समारंभेसी सहपरिवारी । चलावे झडकरी कृपाळुवा ॥८॥
जानवसा नगराआंत । देता बोलिला कृष्णनाथ । विरोध आम्हा मागधांत । निकट वास करू नये ॥९॥
जवळी राहता बोलाबोली । शोभनामाजी वाढेल कळी । निकरा जाईल रांडोळी । आम्हा आणि रुक्मिया ॥१०॥
यासाठी पाउले दोन दूरी । राहू नगराबाहेरी । ठाव द्यावा अंबिकापुरी । ऎसे श्रीहरी बोलिला ॥११॥
तव राव हासिन्नला मनी । होय बुद्धिमंत शार्ङ्गपाणी । ठाव दिधला अंबिकाभुवनी । घाव निशाणी घातला ॥१२॥
राजा म्हणे चक्रपाणी । मार्ग आहे नगरामधूनी । कृष्णदर्शना उदित राणी । यालागोनि बुद्धि केली ॥१३॥
जाणोनिया तो भावो । रथी चढला श्रीकृष्णदेवो । आपणाजवळी बैसविला रावो । थोर उत्साहो मांडिला ॥१४॥
लागली वाद्यांची घाई । चवरे ढळती दोही बाही । बंदीजन गर्जती पाही । कृष्णकीर्तीही कीर्तने ॥१५॥
छेदावया ह्रदयबंध । साधकांमाजी रिघे बोध । तैसा प्रवेशला गोविंद । नगरामाजी निजबळे ॥१६॥
नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन । उतावेळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥१७॥
कृष्ण पाहावया नरनारी । मंडपघसणी होतसे भारी । एक चढले माडिया गोपुरी । पाहावया श्रीहरी स्वानंदे ॥१८॥
कृष्णमुखकमळ सुंदर । जननयन तेचि भ्रमर । तेथेचि गुंतले साचार । कृष्णआमोदरसभावे ॥१९॥
नयनद्वारे प्राशन । करूनि ह्रदयी आणीती कृष्ण । सबाह्य पाहाती समान । समदृष्टी कृष्णाते ॥२०॥
ऎसा देखोनि श्रीपती । कृष्णमय जाहली वृत्ती । लवो विसरली नेत्रपाती । कृष्णमूर्ती पाहाता ॥२१॥
घेऊनि निजबोधाची वेताटी । विवेक दृश्याची मांदी लोटी । तैसा सात्त्विक जगजेठी । जना सकळिका वारिता ॥२२॥
मागे परमात्मा कृष्णवीर । करूनि निजबोधाचा भार । चालतसे स्थिरस्थिर । आत्मस्थितीच्या पाउली ॥२३॥
बोलती नरनारी सकळा । काल मिरविले गे शिशुपाळा । ने देखो नोवरेपणाची कळा । नाही जिव्हाळा लग्नाचा ॥२४॥
कृष्णा नोवरा भीमकीलागी । भीमकी होय कृष्णाजोगी । सृष्टी शोभत इंहीच दोघी । तिसरे जगी न देखॊं ॥२५॥
आमुचे जन्मोजन्मीचे सुकृत । शुद्ध पुण्य जे शोभिवंत । तेणे तरी कृष्णनाथ । भीमकीकांत हो लग्नी ॥२६॥
ऎसे आशीर्वाद देती । कृष्णरूपी वेधल्या वृत्ती । प्रत्यावृत्ती हरि पाहती । नाही उपरती जनासी ॥२७॥
कृष्णे केला मेळिकार । भीमके केला आदर थोर । सकळ सैन्य पाहुणेर । यथोचित यादवांते ॥२८॥
भीमके देखिले कृष्णासी । दृष्टी जडली त्या रूपांसी । साखरेवरूनी नुठे माशी । तेवी रायासी जाहले ॥२९॥
भीमके पूजिले कृष्णासी । विकल्प वाटेल चैद्यासी । यालागी सकळीका रायांसी । पूजा विधीसी मांडिली ॥३०॥
यथा कुल तथा शील । जैसे वीर्य तैसे बळ । तदनुसार राजे सकळ । भीमके केवळ पूजेले ॥३१॥
कृष्ण आणि हलायुध । आले ऎकोनि चैद्य मागध । दचकोनि म्हणती विरोध । थोर आम्हा मांडले ॥३२॥
कृष्ण आला महाबळी । ऎकोनि चिंतेची काजळी । वाढिन्नली ह्रदयकमळी । तोंडे काळी तेणे झाली ॥३३॥
मागध परस्परे आपणात । कुजबुज करू लागले बहुत । एकमेकांते खुणवित । समस्त त्यात मीनले ॥३४॥
भीमके पूजिले कृष्णासी । केला मधुपर्क विधानेंसी । तोही मीनला आहे त्यासी । आहाच आम्हासी सोयरीक ॥३५॥
लग्न लागलियापाठी । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करू दाटोदाटी । आम्ही जगजेठी असता ॥३६॥
रुक्मिया आहे आम्हाकडे । भीमके सात्त्विक ते बापुडे । म्हातारपणी जाहले वेडे । त्यांचे त्यापुढे काय चाले ॥३७॥
वेगी विस्तारा पा फळ । सन्नद्ध जाले वीर सकळ । तूर्ये लागली प्रबळ । घावो निशाणी घातला ॥३८॥
शुद्धमती म्हणे रायासी । तुम्ही विसरलेति कुळधर्मासी । कन्या न्यावी अंबिकेसी । गौरीहरासी पूजावया ॥३९॥
तव रायाचा ज्येष्ठ कुमर । ऎकोनि कोपा चढिन्नला थोर । मिथ्या बायकाचा विचर । केवि साचार मानिता ॥४०॥
आत्मबुद्धिहितार्थाय गुरुबुद्धिर्विशेषत: । परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धि: प्रलयावहा ॥१॥
आपुली बुद्धी ते हितासी । गुरुबुद्धि त्याहून विशेषी । परबुद्धि विनाशाशी । मूळ प्रळयासी स्त्रीबुद्धि ॥४१॥
अंबालयी यादव वीर । उतरले असती अकर्माकार । हिरोनी नेतील सुंदर । लाज थोर होईल ॥४२॥
ऎसे बोले रुक्मिया वीर । करू नये आणीक विचार । कार्य साधावे सत्वर । मग हो का भलतेचि ॥४३॥
राजा म्हणे कट-कटा । व्यर्थ आलासी मझिया पोटा । नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अतिकरंटा नपुंसक ॥४४॥
अजि कळली तुझी बुद्धी । वाटीव उसधी हांडिया-सांधी । हागीर भ्याड तू त्रिशुद्धी । गाढा बुद्धि नव्हेसी ॥४५॥
वर्मी खोंचला रुक्मिया । कन्या नेईन अंबालया । ख्याती लावीन यादवा तया । मज कोपलिया कोण साहे ॥४६॥
ऎसे होते माझे पोटी । लग्न लागलियांपाठी । दोघे वधूवरे गोमटी । न्यावी भेटी जगदंबे ॥४७॥
ऎसा नव्हेचि कुळधर्म । लग्नापूर्वील हा नेम । सिद्धी पाववीन सुगम । पराक्रम पाहे माझा ॥४८॥
ऎसे सांगोनि रायासी । वेगी आला चैद्यांपासी । गुज सांगतसे तयांसी । विघ्न लग्नाली वोढवले ॥४९॥
कृष्णाकडे आमुचा पिता । जीवेभावे तिकडेच माता । कार्याकारण प्रपंचता । मिथा दाविती आम्हाकडे ॥५०॥
ऎका आमुच्या कुळधर्मासी । नोवरी न्यावी अंबिकेसी । सन्नद्ध होऊन दळभारेंसी । आले तुम्हासी पाहिजे ॥५१॥
येरीकडे चौथे बंधु । घेऊनि निघाले जी वधु । करूनि दळभारु सन्नद्ध । महावीर उदित ॥५२॥
मी तरी परवडी आढावाची । शस्त्रे उघडी हाती त्यांची । मागे परवडी धनुर्धरांची । शिते धनुष्यासी वाइली ॥५३॥
तयामागे वीर घोडी । रथ जोडियले जोडी । वर बैसले परवडी । शस्त्रे उघडी झळकती ॥५४॥
तयामागे कुंजरथाट । गळा सांखळिया एकवट । खिळिले चालती गजघंट । दुर्ग अचाट सैन्याचे ॥५५॥
भक्तजनाचिया काजा ॥ जेवी करिती आवरणपूजा । तेवी सैन्य रचिले वोज । कृष्णभाजा भीमकिया ॥५६॥
नातरी उपासनायंत्र । तैसे दिसे सैन्यसूत्र ॥ भीमकी मध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्रे निजबीज ॥५७॥
जेवी साधनचतुष्टयसंपत्ती । परमात्मयासन्मुख करिती वृत्ती । तैसे चौघे बंधू घेऊनि येती । कृष्णासन्मुख भीमकी ॥५८॥
नातरी जैसे चारी वेद । उपनिषदे करिती बोध । वृत्ति स्वये देखे निजपद । तैसे बंधू भीमकीसी ॥५९॥
नातरी चारी पुरुषार्थ जैसे । भक्तापाशी येती आपैसे । चारी बंधू जाण तैसे । भीमकीसरिसे चालती ॥६०॥
वैराग्य विवेकाचेनि बळी । तैसा रुक्मरथ रक्ममाळी । मागे पुढे जी सांभाळी । परिके जवळी येऊ नेदी ॥६१॥
स्वानंद आणि अनुभवू । जीवाहून आवडती बहू । तैसे रुक्मकेली रुक्मबाहू । दोघे भाऊ दोही भागी ॥६२॥
ऎसे भीमकीच्या चहू भागी । चौघे बंधू रंगले रंगी । भीमकीसवे चालती वेगी । धन्य जगी रुक्मिणी ॥६३॥
वडील बंधु चौघांहूनी ॥ जो अतिगर्वित अभिमानी । तो सांडिलासे त्यजूनी । साधुजनी जेवि निंदा ॥६४॥
कृष्णद्वेषिया तो खरा । मिळणी मीनला असुरा । म्हणूनि त्यजिला परबाहिरा । नव्हे सोयिरा निजाचा ॥६५॥
भोग त्यजूनि वैरागी ॥ योगसाधना निघे योगी । तैसी माया माहेर सांडूनि वेगी । चरणचाली निघाली ॥६६॥
लोकप्रतिष्ठा महंती । बैसावे अश्वगजरथी । जेणे होय कृष्णप्राप्ती ॥ भीमकी गती ते जाणे ॥६७॥
पारिखा पाई कृष्ण ठाके । हे बोलणे समूळ लटिके । ऎसे जाणोनि निष्टंके । चरणी चामके वैदर्भी ॥६८॥
कृष्णचरणी जडले मन ॥ यालगी वाचे पडले मौन । दृढ लागले अनुसंधान । सहजस्थिती चालली ॥६९॥
आत्मसाक्षात्कारवृत्ती । अनिवार अहिंसादिक येती । तेवी भीमकीसवे समस्ती । सखिया धावती स्वानंद ॥७०॥
जे का निरपेक्ष मानसी । सिद्धी तिष्ठती सेवेसी । तैसा सखिया भीमकीपाशी । उपचारेंसी चालती ॥७१॥
वडिलांमाजी वडीलपणी । निजशांतीची स्वामिणी । वागवीतसे रुक्मिणी । अग्रगणी सकळिका ॥७२॥
बोधपुत्राच्या जननी । ब्रह्मवेत्त्याच्या ब्राह्मणी । अकामकामाचिया कामिनी ॥ सवे सुवासिनी चालती ॥७३॥
जैसा अनुहताचा गजर । तैसी तुरे वाजती अपार । नादे कोंदले अंबर । शब्दाकार नभ झाले ॥७४॥
पहिले उठिले घंटानाद । मागे किंकिणींचे शब्द । मधुर शंखांचे अनुवाद । वीणावेणू रुणझुणती ॥७५॥
नादे उठिल्या झल्लरी । मृदंगध्वनी त्यामाझारी । निशाणी दुमदुमिल्या भेरी । नादाभीतरी मन निवे ॥७६॥
कृष्णकीर्तीचिया कीर्तनी । चौघीजणी गाती गाणी । त्यापुढे नाचणी नाचती । चारी मुक्ती उदास । ७७॥
कृष्ण वर्णावया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध अतिउद्भट । वंशावळी वर्णिती ॥७८॥
कळा वाढविती शब्द । साहीजणांशी विवाद । युक्तिप्रयुक्तीचे बोध । नाना छंद शब्दांचे ॥७९॥
पातली अंबिकेचे रंगण । केले करचरणक्षालन । रुक्मिणीचे सावध मन । शुद्धाचमन तिने केले ॥८०॥
श्रद्धापूजेचे संभार । शुद्ध सुमनांचे पै हार । चिद्रत्नांचे अलंकार । विरजांबर पूजेसी ॥८१॥
देवालया आली हरिखे । अंबा पाहता कृष्णाचि देखे । येणे रूपे यदुनायके । पाणिग्रहण करावे ॥८२॥
सावध होऊनि पाहे चित्ता । म्हणे हे आमुची कुळदेवता । आपुल्या रूपे दावी अनंता । होईल भर्ता निश्चित ॥८३॥
हरिखे ओसंडली पोटी । मग बांधिली शकुनगाठी । अतिउल्हासे गोरटी । पूजा विधीसी मांडिली ॥८४॥
षोडशोपचारी पूजा । करिती जाहली भीमकात्मजा । विधी सांगती द्विजभाजा । गरुडध्वजप्राप्तीसी ॥८५॥
वस्त्रे अलंकार भूषणे । नाना उपचार बलिदाने । दीपावली नीरांजने । सावधाने अर्पिली ॥८६॥
कृष्ण धरूनिया मानसी । भीमकी पूजी द्विजपत्न्यांसी । जे जे बोलिले विधीसी । ते ते त्यासी दिधले ॥८७॥
निंबे नारिंगे नारिकेळे । अपूप लाडू अमृतफळे । इक्षुदंड आंबे केळे । सुवासिनींसी दिधली ॥८८॥
मुक्ताफळेसी आभरणे । सौभाग्यद्रव्ये कंठाभरणे । हळदी जिरे लवण धणे । दिधली वाणे नारींसी ॥८९॥
होती नीलोत्पलांची माळ । ते घातली जगदंबेच्या गळा । वर देई वो घनसावळा । उचितकळा आजिच्या ॥९०॥
म्हणॊनि विसर्जिले मौन । करू आदरिले स्तवन । मनामागे ठेवोनि मन । सावधान स्तवनासी ॥९१॥
जयजय वो अव्यक्तव्यक्ती । जयजय वा अमूर्तमूर्ती । जयजय वो विश्वस्फूर्ती । चिच्छक्ती चिन्मात्रे ॥९२॥
जयजय वो जगदंबे । जयजय वो आरंभस्तंभे । जयजय वो सौभाग्यशोभे । स्वयंस्वयंभे कुमारी ॥९३॥
जयजय वो अनादि । नाकळसी तू मनोबुद्धी । देवोदेवी इंही शब्दी । तू त्रिशुद्धी नांदसी ॥९४॥
शिवा तुझेनि शिवपण । जीवा तुझेनि जीवपण । देवा तुझेनि देवपण । निजकारण तू माये ॥९५॥
तुझेनि शब्दांदिका शोभा । तुझेनि नभत्व आले नभा । तूचि मूळ प्रारंभा । विश्वकदंबा जीवन तू ॥९६॥
तुझी उघडलिया दृष्टी । नांदो लागे सकळ सृष्टी । तुवा उपेक्षिलियापाठी । देवांही नुठी देवपण ॥९७॥
ॐ पुण्याहं सुमुहूर्ती । लग्न लावणे तुझे हाती । मज नोवरा श्रीपती । समूळ कर्ती तू माये ॥९८॥
ऎसा स्तुतिवाद करिता । कंठीची माळ आली हाता । येचि माळे श्रीकृष्णनाथा । वरीन आता निर्धारे ॥९९॥
महाप्रसाद सर्वथा । म्हणोनि चरणी ठेविला माथा । आशीर्वाद देती समस्ता । पतिव्रता द्विजपत्न्या ॥१००॥
येणे उल्हासे सुंदरा । वरू निघे श्रीकृष्णवरा । स्वानुभवाचा सेवक खरा । त्याते करी धरूनी ॥१०१॥
भीमकीसौंदर्य अमूप । जिचेनि जगा नांव रूप । तिचे लावण्याचे दीप । मुख्य स्वरूप केवी वर्णू ॥१०२॥
जियेते स्रजू न शकेचतुरानन । कृष्णप्रभावे स्वरूप पूर्ण । तिचिया स्वरूपाचे वर्णन । एका जनार्दन वर्णीतसे ॥१०३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे अंबिकापूजनं नाम षष्ठ: प्रसंग: ॥६॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥
