राव म्हणे अहो ऋषि ।
303.
राव म्हणे अहो ऋषि । काशीखंड वाराणशी ॥1॥
तेथे जाऊनिया आम्ही । ऋण फेडू तुमचे स्वामी ॥2॥
एक मासाची अवधी । तुम्ही द्यावी कृपानिधी ॥3॥
ऋषि म्हणे खरे बोला । नातरी शापीन तिघांला ॥4॥
रोहिदास म्हणे त्यासी । गहाण राहीन तुम्हापाशी ॥5॥
पितृवचनाचे ऋण । त्यांचा उतराई होईन ॥6॥
ऋण हत्या आणि वैर । नाही चुकत मेल्यावर ॥7॥
ऐसी बाळकाची वाणी । ऐकूनि दचकला मनी ॥8॥
ऋषि बोलला नृपासी । नको राहू आमुचे देशी ॥9॥
निके निके त्यासी म्हणे । बाहेर आली तिघेजणे ॥10॥
वनी निघाला त्वरित । झाला लोकाचा आकांत ॥11॥
लोट पूर जाती पळा । नेत्री उदक ढळढळा ॥12॥
कैसा ब्राम्हण पहा हो । नृपचंद्रालागी राहो ॥13॥
राजा बाहेर दवडुनी । पाहे आमुचाचि धणी ॥14॥
नगरलोकासी फिरवुनी । राव निघाला तेथुनी ॥15॥
अलंकार देखियेला । मागे विश्वामित्र आला ॥16॥
माझ्या राज्यातील संपत्ती । तारामती धरिली हाती ॥17॥
घेई भूषण उतरोनी । म्हणे नामयाची जनी ॥18॥
