तुझा नामा तुज व्हावा
1271.
तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मी | काय यासी आम्ही करू शको ॥१॥
मर्यादा सांडोनि बोलसी कठिण | करिसी वायांविण इष्ट तुटी ॥२॥
ऐसे कांही सुख अनुपम्य दाखवी | जया ओळखी जीवी निजरूपा ॥३॥
जेणे लोभ त्याचे मन मार्गे मोहरे | वृत्तीसहीत विरे ठाई ठाई ॥४॥
तेणे या जन्माचे विसरोनि संताप | सोय आपआप धरिल तुझी ॥५॥
जरी तू देखतीस स्वहित पूर्वी याचे | तरी का चित्त त्याचे त्रास घेते ॥६॥
संसार करिता कांही न देखेचि सुख | म्हणोनि विन्मुख जाला तुज ॥७॥
वरपंगाचे पेहे पाजिसिल काय | हा निजमुखी धाय ऐसे करी ॥८॥
तरीच तू निजाची लोभापर माता | म्हणोनि श्लाघ्यता जगामाजी ॥९॥
आता असो सहज येणेंविण काय काज | मी बोलिलो तुज कळेल ते करी ॥१०॥
नामा म्हणे देवा ऐसे काय केले | काय तुजवेगळे जीवन माझे ॥११॥
