आकाशाचा शेंडा कमळ नि
348.
आकाशाचा शेंडा कमळ निराळे ।
त्यासी चार दळे शोभताती ॥१॥
औट हात एक अंगुष्ट दुसरे ।
पूर्वार्ध मसुरे प्रमाण हे ॥२॥
रक्त श्वेत शाम नीळवर्ण आहे ।
पीत केशर हे माजी तेथे ॥३॥
तयाचा मकरंद स्वरूप ते शुद्ध ।
ब्रह्मांदिका बोध हाची जाला ॥४॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति प्रसादे ।
निजरुप गोविंदे जनी पाहता ॥५॥
अर्थ :
आकाशातील सृष्टीच्या अगदी शेवटचे जीवरुप शेड्याचे कमळ आहे. त्या जीवरुप कमळाच्या स्जुल, सुक्ष्म, कारण व महाकारण या चार देहरुपी पाकळ्या आहेत. यातील एक पाकळी ही साडेतीन हात आहे. दुसरी पाकळी अंगठ्या येवढी आहे तर तिसरी पाकळी अर्ध्या पेरायेवढी असुन चौथा महाकारण देह मसुरा यैवढा आहे. पाकळ्यांचा रंग तांबडा, पांढरा, काळा, व निळा आहे. त्यात पिवळ केशर आहेत. आनंद हा त्याचा सुगंध आहे व ब्रह्मरस हा मध आहे. असा बोध ब्रह्मादिकाना केला आहे. निवृत्तिनाथांच्या कृपेने त्या निजरुपाचा अनुभव येतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
