वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ३५. लक्ष्मण युद्ध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088324 · अभंग क्र. ३५

35.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय पस्तिसावा ॥
हनुमंताचा प्रताप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मागिले प्रसंगी शक्रजितें । मैत्री करोनि सोडिले इंद्रातें ।
तदनंतरे सीताकांतें । अगस्तीतें विनविले ॥१॥
श्रीराम दोनी कर जोडून । अगस्तीस विनवी नम्र होऊन ।
म्हणे स्वामी वाळिरावणांचे बळासमान । भूमंडळी आन असेना ॥२॥
या दोघांच्या बळाहूनि अधिक । वायुपुत्र असे देख ।
तयाचा पराक्रम सम्यक । जम ठाऊक असे जी ॥३॥

श्रीरामांची मारुतीबद्दलची कृतज्ञता :

हनुमंताच्या प्रसादेंकरून । प्राप्र्त लंका सीता लक्ष्मण ।
येणे सुग्रीवेंसी सख्य जाण । अगणित बळ पै याचे ॥४॥
शुद्धीस जाता सहित वानरेंसीं । समुद्र देखोनि कपि चिंतातुर मानसी ।
तो शत योजने येणॆं पराक्रमेंसीं । उतरोनि लंका पावला ॥५॥
सीतेसी करोनि एकांत । व्न उपडोनि किंकरप्रधानपुत्रघात ।
आणि लाडका जो अखया सुत त्याचा निःपात येणे केला ॥६॥
सीताशुद्धी येणे केली । वन उपडोनि राक्षसें मारिलीं ।
ब्रह्मशापे बांधो देवोनि बळी । केली होळी लंकेची ॥७॥
इंद्रजितजनकें शक्ती टाकिली । तेणॆ लक्ष्मण पडिला भूतळीं ।
येणे द्रोणगिरी आणॊनि त्या वेळी । सौमित्राते वांचविले ॥८॥
याचेनि सुग्रीवासी सख्य झाले । अठरा पद्में वानर मेळविले ।
याचेनि मजला रूप येणे वाळीवानर । किंनिमित्त वधिला नाही ॥१०॥
ऐसे याचे बळ अद्भुत । देवा दानवा अतुळित ।
परी येणॆं नाही मारिला शक्रसुत । काय कारण मुनिवर्या ॥११॥
ऐसी आशंका माझे चित्ती । वसत आहे गा मुनि अगस्ति ।
सुग्रीवकार्यासी मारुती । कांही नाही प्रवर्तला ॥१२॥
ऐसे श्रीरामाचे उत्तर । ऐकोनि अगस्ति चतुर ।
काय बोलिला ते सविस्तर । श्रोती सादर ऐकिजे ॥१३॥

मारुतीची जन्मकथा :

अगस्ति म्हणे श्रीरघुपती । बाळपणी याची अद्भुत ख्याती ।
ते मी सांगेन तुजप्रती । अद्भुत शक्ती हनुमंता ॥१४॥
ब्रह्मचर्याची अति गोमटी । हनुमंतास गर्भकासोटी ।
अंजनीमाता न देखे दृष्टी । का राम जगजेट्ःई देखेल ॥१५॥
हनुमंताचे लिंगदर्शन । मुख्य माता न देखे जाण ।
मग इतर देखो शके कवण । ब्रह्मचारी पूर्ण वारुकुमर ॥१६॥
हनुमान पुसे बाळभावें । माते म्या क्षुधेसी काय खावें ।
आरक्त फ़ळ जे देखावे । ते भक्षावें म्हणे माता ॥१७॥
जन्मतांचि हनुमंत । अग्नितेजें देदीप्त ।
बालार्कप्रभासम भासत । दीप्तिमंत मारुति ॥१८॥
सूर्योदय नव्हतां तेथ । सेजे निजवोनि हनुमंत ।
अंजनीं गेली वनांत । फ़ळे त्वरित आणावया ॥१९॥
मातृविहीन हनुमट । रुदा करी अतिक्षुधित ।
देखोनि बालार्क आरक्त । फ़ळ भक्षावयार्थ उडाला ॥२०॥
क्षुधेने पीडिला प्रबळ । बाळसूर्य अति वर्तुळ ।
भक्षावया स्वये तत्काळ । उदे चपण स्वभावे ॥२१॥
हनुमंताची उड्डानशक्ती । ते गति न ये खगेश्वराप्रती ।
वायुसुताच्या शीघ्रगती । मनोवृत्ती टणकल्या ॥२२॥
भक्षावया बालार्कासी । दुर्धर गति हनुमंतासी ।
देखोनि विस्मय सुरवरांसी । देव ऋषि विस्मित ॥२३॥
धैर्य शौर्य महावीर्य । शीघ्र गमन गतिगांभीर्य ।
हनुमंताचे परमौदार्य । देव ऋषि विस्मित ॥२३॥
धैर्य शौर्य महावीर्य । शीघ्र गमन गतिगांभीर्य ।
हनुमंताचे परमौदार्य । सुरासुर वनिती ॥२४॥
हनुमंताच्या समान शक्ती । कोणा नाही त्रिजगती ।
बाळभावें शीघ्रगती । सूर्यभक्षार्थी धांवत ॥२५॥
मनोगती सांडोनि मागे । हनुमान चालिला वेगे ।
सूर्यकिरणाचेनि योगे । होईल सर्वांग भस्मांत ॥२६॥
ऐसे जाणॊनि वायुपिता । निजपुत्रातें संरक्षिता ।
किमांबुकणी निवविता । होय चालता शिशूमागें ॥२७॥
वायु धरूं पांहे हनुमंतासी । तंव तो नाटोपे वायूसी ।
वेगे जाता सूर्यापासीं । फ़ळभावेंसीं भक्षावया ॥२८॥
हनुमंत आला बिंबापासीं । रविराहुग्रहण ते दिवसीं ।
राहु ग्रासितां सूर्यासी । हनुमंतासी कोप आला ॥२९॥
माझ्या गोड ग्रासाआड । तेथे कोण आला मूढ ।
राहूचें फ़ोडिलें जाभाड । पुच्छे सदृढ गांजिला ॥३०॥
पुच्छे हाणतां वानरा । घाये राहु झाला घाबरा ।
नाकीं मुखी रुधिरधारा । थरथरा कांपत ॥३२॥
धांकें थरथरा कांओअत । गगनी गरगरा भोंवत ।
राहू पडता अति मूर्च्छित । तरी धांवोन केत धरी त्यासी ॥३२॥
राहू केतू अति आप्तता । दोघा देही एकात्मता ।
केतु येवोनि राहुसाह्यार्था । कोपे हनुमंताकडे पाहे ॥३३॥
कोप राहू देखोनि दृष्टी । रागे हनुमान हाणी मुष्टी ।
दोघा पळतां पाय पोटी । बोंब उठी ग्रहचक्रीं ॥३४॥
ग्रह सांगती सिंहिकासुता । पृच्छकेतु आला तुम्हांभोवतां ।
इंद्र अधिकारी नियंता । त्यासि तत्वता तुम्ही सांगा ॥३५॥
राहु जो का सिंहिकासुत । वनरघायें रुधिरोक्षित ।
इंद्रापासीं आला त्वरित । शंख करीत सांगावया ॥3६॥
माझी जीविका जीवनवृत्ती । चंद्रसूर्यग्रहणस्थिती ।
आजिचे ग्रहणकाळाप्रती । रविग्रहणार्थी मी गेलो ॥३७॥
तंव मजहूनी बळवंत । पुच्छराहु येवोनि तेथ ।
घाये करोनि रुधिरोक्षित । धाडिलों येथ बोंबेसीं ॥३८॥
तू नियंता देवाधिदेवो । माझा न देखता अन्यावो ।
तुंवा धाडिला पुच्छरावो । तेणॆं मज पहाहो गांजिलें ॥३९॥
शेखी मजही न सांगता । त्वा करणी केली गुप्त घाता ।
म्या काय करावे आता । मज तत्वता तू सांगे ॥४०॥
पुच्छराहु येवोनि तेथ । सूर्य आकळिल समस्त ।
माझा करू धावें घात । आलो रडत सांगावया ॥४१॥
ऐकोनि राहूचा वचनार्थ । इंद्रादि देव झाले विस्मित ।
ग्रहचक्रांत म्हणती हे विपरित । कर्ता येथे तो कोण ॥४२॥
कोणे केला नवा राहो । त्यासि निर्दळावया पहाहो ।
घेवोनि सुरसेनासमुदावो । इंद्र स्वयमेवो पै आला ॥४३॥
इंद्रें राहु पुढे करून । नवा राहु दाखवीम् म्हणॊन ।
जेणे तुज गांजिलें संपूर्ण । त्याचे निर्दळण करीन मी ॥४४॥
दाखविता हनुमंतासी । थरथरां कंप सुटला राहूसी ।
दडोनि ऐरावतींचे पाठीसी । दावी इंद्ररासी दुरोनि ॥४५॥
येरीकडे हनुमंत । धांवला रवि ग्रासावया क्षुधित ।
तेणे सूर्य चळीं कांपत । अति अनर्थ ओढवला ॥४६॥
दिनमान साडोनि नभःपथा । पहों न लाहे सविता ।
निवारूं न शके हनुमंता । अति आकांता पावला ॥४७॥
तेचि संधी इंद्रापासीं । वानर देखोनि राहूसी ।
रागे निर्दळावया त्यासी । अति आवेशी धावला ॥४८॥
मज क्षुधिताच्या आहारासी । राहू ओढविला विवसी ।
धरोनि इंद्राच्या बळासी । माझ्या ग्रासासी घेऊ आला ॥४९॥
ऐसे बोलोनि हनुमंत । सूर्याग्रासाची सांडोनि मात ।
राहूचा करू धांवे घात । येरू बोभात इंद्रासी ॥५०॥
राहु पळे इंद्राकडे । तंव हनुमंताची उडी पडे ।
येरू अति आक्रोशे रडे । इंद्रापुढें सांगत ॥५१॥
राहु म्हणे माते मर्दित । इंद्र इंद्र नामे आक्रदंत ।
वानरे पुरविला अंत । आरंबळत आक्रोशे ॥५२॥
ऐकोनि राहूचा आकांत । इंद्र नाभिकार देत ।
भिवो नको धरी पुरुषार्थ । याचा घात मी करीन ॥५३॥

इंद्र व बालहनुमंताचे युद्ध :

ऐसे बोलोनि अमरपती । वेगी प्रेरिला ऐरावती ।
त्यावरी धांवला मारुती । हस्ते हस्ती उपटावया ॥५४॥
वानर ऐरावती आकळी । त्याते पुच्छे ठोकिला कुंभस्थळीं ।
गज आक्रंदोनि किंकाळीं । चळचळीं कांपत ॥५५॥
पुच्छ नव्हे तो व्रजांघात । घाये विमुख ऐरावत ।
इंद्र बळे आंवरित । तरी युद्धाआंत परतेना ॥५६॥
पुच्छा हाणिता वानरे । गजे घेतलें घायवारे ।
शक्रशक्तीतें नावरे । केले घाबरें इंद्रासी ॥५७॥
इंद्र देवांमाजी बळी । करिता हनुमंतासीं कळी ।
वानरे मुकुट पाडिला तळी । झोंटी मोकळी सुटली ॥५८॥
मुकुट घ्यावया आपणासी । बाळभावें न कळे त्यासी ।
इंद्र केला कासाविसी । मरुद्गणेंसी मर्दूनी ॥५९॥
इंद्र गांजिला कपींद्रें । यम धांविन्नला कैवारें ।
दंडे हाणी सत्वरें । केले वानरे विपरीत ॥६०॥
यम जंव हाणी दंडासी । हनुमान आदळला अंगासी ।
थापा हाणोनियां त्यासी । तोंडघसी पाडिला ॥६१॥
घाय हाणोनी प्रचंद । सांडवोनि दंडबंड ।
यमाचें ठेचिलें तोड । बळ वितंड वानरा ॥६२॥
यमें गाजिलें जगासी । हनुमंते अर्धक्षणीं ।
सुरवरसैन्य केली भंगाणी । अवघ्या केली दाणादाणी ।
महापळणी देवांसी ॥६५॥
हनुमंताच्या वेगापुढें । आम्ही पळावें कोणीकडे ।
येरामागें येरू दडे । जीवा सांकडे देवांसी ॥६६॥
सगज उपटावया इंद्रासी । ऐरावत धरोनि पुच्छासी ।
वानरे भोवंडिला आकाशी । सदेव ऋषी गजबजिले ॥६७॥
हनुमंते देखोनिया दृष्टी । इंद्र उपडिला सृष्टी ।
जगी एकचि बोंब उठी । महाहटी वानर ॥६८॥
लघु लाघवें सुरपतीं । वज्रे हाणितला मारुती ।
घाव लागला हनुमंताप्रती । पडियेला क्षिती मूर्च्छित ॥६९॥

हनुमंत मूर्च्छित वायूच्या क्षोभाने प्राणवायूचा नोरोध :

मेरुशिखरपाठारांत । हनुमान पडिला मूर्च्छित ।
वायु पिता येवोनि त्वरित । निजसुत उचलिला ॥७०॥
क्षुधिता माझिया तान्हयासी । इंद्रें हाणोनि वज्रासीं ।
मूर्च्छित पाडिले भूमीसीं । वायु मानसी क्षोभला संपूर्ण ।
आकर्षिला जगाचा प्राण । ब्रह्मादिका संकट पूर्ण ।
ऋषिभूतगण तळमळती ॥७२॥
वायु क्षोभोनि सक्रोध । अंतरी केला प्राणरोध ।
प्राणापान ठेले स्तब्ध । अति विरुद्ध देवांसी ॥७३॥
प्राणनिरोधाची स्थिती । ठेली भूतांची नित्यगती ।
कोणा नाही सुखप्राप्ती । तळमळ करिती अति दुःखे ॥७४॥
यक्षराक्षसगणगंधर्व । सिद्धचारणादि मानव ।
सत्यलोका येवोनि सर्व । पितामह वंदिला ॥७५॥
एका जनार्दना शरण । शरण देवांचा वर लाहोन ।
वज्रदेही होईल हनुमान पूर्ण । सावधान अवधारा ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
हनुमंतप्रतापवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥३५॥ ओव्या ॥७६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग