वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › २. अगस्त्यमुनींचे आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088323 · अभंग क्र. २

2.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय दुसरा ॥
पुलस्त्यांचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भद्रासनीं दशरथकुमर । बैसलासे करूणाकर ।
दक्षिणे शेषावतार । वामे भरतशत्रुघ्न ॥१॥
कुळगुरू वसिष्ठ सन्मुख । परिवेष्टित प्रधान लोक ।
चर्चा करिती धर्मकर्मादिक । तर्कवितर्क बोलती ॥२॥
एक सांगती पुराण । एक करिता रामकीर्तन ।
एक करिती गायन । होऊन लीन स्वात्मपदीं ॥३॥
एक पढती चतुर्वेद । एक म्हणती प्रबंध ।
एक करिती विवाद । गद्यपद्य शास्त्रांचे ॥४॥
ऐसी सभा प्रसन्नवदन । देखोनि वंदिती बंदिजन ।
एक म्हणती हा रघुनंदन । ब्रह्मी जीवन मूर्तिमंत ॥५॥
एक म्हणती हा रघुनंदन । अवतार धरावया एक कारण ।
एक म्हाणती धरा भारे पीडोन । श्रीरामा शरण गेली ते ॥६॥
तिचिया कैवारा राघव । सगुण होवोनि सावयव ।
मारोनियां दशग्रीव । बंदींचे देव सोडविले ॥७॥
श्रीराम भक्तजनवत्सल । नानावतारीं खेळे खेळ ।
ब्रह्मादिका महिमा अकळ । मूर्ख केवळ नेणती ॥८॥
ऐसे नानापरींचे वाद । करिती परस्परें विवाद ।
नानामतप्रबंध । छंद भेद शास्त्राचें ॥९॥
युद्धकांड येता अंतीं । राक्षसांची झाली समाप्ती ।
अवनिजेसी रघुपती । अयोध्ये क्रीडती स्वानंदे ॥१०॥
राज्य करिता श्रीरामचंद्र । कोण नाही दुःख दरिद्र ।
स्वप्नीं नाही द्वंद्वबाध । सुखस्वानंद सर्वांसी ॥११॥
रजनीचर निर्दाळिले । त्रैलोक्या आनंदें भरिलें ।
हे ऐकोनि ऋषि चालिले । भेटी आले श्रीरामा ॥१२॥

अनसूया व अत्री यांचा महिमा :

अत्रि आला निजशिष्येंसी । जेणे दुष्काळीं वांचविले ऋषी ।
जयाची राणी अनसूया ऐसी । पतिव्रतांसी वंद्यत्वें ॥१३॥
जे अनसूयेच्या घरी । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी ।
बाळपणें एक संवत्सरी । स्तनपान करिती त्रिमूर्ति ॥१४॥
ज्या अगस्तीनें समुद्र शोषिला । वातापी इक्वल उदरी पचिला ।
विंध्याचळाचा गर्व हरिला । तो कुंभज आला भेटीसी ॥१५॥
तप करोनि भूमंडळी । प्रसन्न केला चंद्रमौळीं ।
गंगा मागोनि महीतळीं । ऋषिमंडळी निवविली ॥१६॥
उभयतट गोदावरी । पंचक्रोशीभीतरीं ।
जड जीव तरती तो परिवारीं । शिष्यांमाझारी गौतम आला ॥१७॥
कण्व भरद्वाज च्यवन । अंगिराजगुरू कौंडिन्य ।
घ्यवया श्रीरामदर्शन । कश्यप आपण स्वये आला ॥१८॥
जेणे सृष्टी निर्माण केली । ख्याति त्रिभुवनी मिरवली ।
ज्यांसी झाली गोत्रभुली । ते लाविले स्वगोत्रीं ॥१९॥
दत्तात्रेय महाऋषी । असित जमदग्नि परियेंसी ।
विश्वामित्र शिष्येंसीं । आणिक तापसी पै आले ॥२०॥
गायत्रीमंत्रबळें जाण । दुजी सृष्टि केली निर्माण ।
ऐसे ऋषि तपोधन । देदीप्यमान तेजस्वी ॥२१॥

श्रीरामांनी ऋषींचा सत्कार करून त्यांना भोजनदानादि दिले :

श्रीराम येवोनि सामोरा । सन्मान केला द्विजवरां ।
अर्घ्य पाद्य षोडशोपचारां । करूनि हाकारा भोजने केलीं ॥२२॥
समस्ता झाले भोजन । कर्पूरमिश्रित पूगीपानें ।
नानापरींचीं वस्त्रे भूषणे । रघुनंदने दिधली ॥२३॥
श्रीरामे सांष्टांग नमन घालून । दोनी कर जोडून ।
मृदु मंजुळ वचनेंकरून । करी प्रार्थन ऋषींचें ॥२४॥
श्रीराम म्हणे ऋषि तुम्ही । न भेटा करिता तप आश्रमी ।
भाग्ये माझिये आश्रमी । अनकळत तुम्ही आलेती ॥२५॥
की आजि दोषांचा र्‍हास झाला । भाग्योदय पूर्ण बिंबला ।
की अकस्मात मघ वोळला । वर्षाव झाला स्वानंदे ॥२६॥
ऐसे आजि झाले स्वामी । कृपा करोनि आलेति तुम्ही ।
जे न भेटाल कृतश्रमीं । पावन मी आजि झालो ॥२७॥
कवणा कार्याची उत्कंठा असे । ते सिद्धि जाईल अनायासें ।
मी तुमचा अंकित शिष्यवेशे । आज्ञा संतोषे करावी ॥२८॥

अगस्तिकृत श्रीराममहिमावर्णन :

तंव अगस्ति म्हणे श्रीरामा । न वर्णवे तुझा महिमा ।
सृष्टीकरिता जो ब्रह्मा । त्यासिही महिमा न कळे तुझी ॥२९॥
तू परात्पर निर्गुण परम । तू साक्षात् पूर्ण ब्रह्म ।
तुज नाही रूप नाम । वेदा अगम्य स्वरूप तुझे ॥३०॥
तुज वर्णिता वेदश्रुती । थोंटावल्या मागे किती ।
साही दर्शने वेदश्रुती । इतरांची युक्ती तेथे न चले ॥३१॥
ऐसा तू निर्गुण निरूपम । तुज ठेविती रूप नाम ।
तुझ्या अंगी लाविती कर्म । ते ज्ञानाधम म्हणावे ॥३२॥
न कळे त्याचा मनोरथ । न कळे चतुराचें चित्त ।
न कळे कवितार्थ । रवि न देखे ते कवि देखे ॥३३॥
तू अजन्मा जन्म धरिसी । तू अकर्मा कर्म करिसी ।
तू अकर्ता सृष्टीसी । उत्पत्ति स्थिती संहार ॥३४॥
तुझाचि आधार तया । यालागी ज्ञाने म्हणती वाया ।
ऐसे असोनि श्रीरघुराया । थोर आश्चर्या ऐकिलें ॥३५॥
सापत्नमतेच्या वचनी । सांडिली अयोध्या राजधानी ।
वास केला दंडकारण्यी । राक्षस रणी निर्दळिले ॥३६॥
शूर्पणखा विटंबून । मारिले त्रिशरा खर दूषण ।
इंद्रजित रावण कुंभकर्ण । सप्रधान मारिले ॥३७॥
अरिबंधु बिभीषण । त्यासी दिधले लंकाभुवन ।
बंदी ग्रह सुरगण । त्याचे मोचन तुवा केले ॥३८॥
भार्याबंधूंसहित । अयोध्ये आला रघुनाथ ।
रामराज्य त्रिभुवनात । ऐसे श्रुत आम्हा झाले ॥३९॥
म्हणोनि घ्यावया तुझी भेटी । येथे आलो गा जगजेठी ।
हेचि इच्छा ऋषीचे पोटी । श्रीराम दृष्टी पहावा ॥४०॥
अपूर्व एक रघुनाथा । लक्ष्मणे वधिले इंद्रजिता ।
हे आश्चर्य वाटे चित्ता । या समस्ता ऋषीश्वरा ॥४१॥
राम म्हणे अगस्तिमुनी । रावण कुंभकर्ण दोनी ।
म्या मारिले समरांगणीं । द्रुमपाणी प्रहस्तादि ॥४२॥
कुमार अक्ष जंबुमाळी । विरुपाक्ष अकंपन बळी ।
कुंभ निकुंभ वीरमंडळी । राक्षस समूळी मारिले ॥४३॥
आणिक अस्ंख्य राक्षस । नावानिगे रणकर्कश ।
जे तृणवत मानिती काळास । तेही त्रास पावले ॥४४॥
इतुके निशाचर सबळ । त्यांहूनि शक्रजिताचे बळ ।
तुम्ही वानितसा प्रबळ । मज केवळ कळेना ॥४५॥

श्रीरामांनी इंद्रजिताच्या थोरवीचे कारण ऋषींना विचारले :

शक्रजिताची महाथोरी । तुम्ही वानितसा भारी ।
मज वाटे नवलपरी । ते निर्धारी सांगावे ॥४६॥
इंद्रजिताचा पराक्रम पूर्ण । त्यासी वर देता कोण ।
हे सांगावे कृपा करुन । मजलागून ते कथा ॥४७॥
कुंभोद्‌भव म्हणे श्रीरामा । ऐल त्याचा प्रतापमहिमा ।
तू सकळाम्चा आत्मा । का पुरूषोत्तमा नेणसी ॥४८॥
रावणाची उत्पत्तिस्थिति । तुज सांगेन अवनिजापती ।
वर देता तयाप्रती । तो यथानिगुतीं अवधारी ॥४९॥

पुलस्त्याची पूर्वकथा :

पूर्वी कृतयुगामाजी जाण । प्रजापतिसुत पुलस्त्य पावन ।
पुण्यशीळ अगाधगुण । धर्मपरायण तिही लोकी ॥५०॥
वेदसंपन्न शास्त्रीं निपुण । सर्वभूती भगवद्भजन ।
शांति दया सुशीळपण । तपें दारूण तपस्वी ॥५१॥
पितयाचे धर्मेंकरीं । अपेक्षा नाही तिळभरी ।
तंव कोणे एके अवसरी । मेरूपाठारीं प्रवेशला ॥५२॥
तेथे तृणबिंदूचा आश्रम । अति रमणीय परम ।
भोवतीं उद्यानें गहन । सरोवरीं जीवन अक्षोभ्य ॥५३॥
नाना जातीचें वृक्ष सफळ । नानापुष्पीं सुवासित बहळ ।
मधुर शब्दे हंस कोकिळ । रुंजी अलिकुळ करिताती ॥५४॥
तेथे ऋषि तप करी । भस्म चर्चून शरीरी ।
रूद्रक्षमाळा कंठी शिरी । श्रीराम अंतरी जप करी ॥५५॥
नेमस्त आहार इंद्रियें निग्रहुनी । वेदाध्ययन अनुदिनी ।
तंव कोणे एके समयी त्या वनी । आल्या मिळोनि राजकन्या ॥५६॥
देखोनि ऋषि आश्रमासी । कन्या क्रीडती आनंदेसीं ।
भोवत्या पाहती तंव ऋषी । तेजोराशी देखिला ॥५७॥
पुलस्त्य म्हणे राजकुमारी । येथोनि तुम्ही जीवे झडकरी ।
माझी वेदध्वनि पडता कर्णद्वारीं । तुम्ही गरोदरी ह्वाल सर्व ॥५८॥
ऐसे ऐकोनि राजबाळा । शीघ्र गेलिया त्या वेळा ।
तंव कोण एके काळी स्वलीळा । तृणबिंदुबाळा पाहू आली ॥५९॥

पुलस्तीचा वेदध्वनी कानी पडल्यामुळे तृणबिंदूची कन्या गर्भवती झाली :

सखिया न दिसती नयनी । ऋषीची वेदध्वनि पडली कानी ।
तेणे झाली श्वेतवर्णी । वपु तत्क्षणीं पालटली ॥६०॥
उदरी गर्भ संभवला तियेसी । मग आली जनकभुवनासी ।
तृणबिंदु म्हणे कुमारीसी । शुभ्रता वपूसी का आली ॥६१॥
चिन्ह तुझे पालटले । आत्मजे कोठे काय झाले ।
कोण्या स्थळा गमन केले । ते शीघ्रकाळे सांग पा ॥६२॥
येरी म्हणे अहो जी ताता । मज सखिया शोधन करिता ।
वना गेले जी शिघ्रता । तेथे ऋषि पढत होता वेदश्रुती ॥६३॥
मग कन्या धरोनि निजकरी । तृणबिंदु आला त्या आश्रमामाझारी ।
कर जोडूनि विनंती करी । म्हणे अवधारी मुनिराया ॥६४॥
माझी कन्या या आश्रमाप्रती । आली सखया शोधनार्थी ।
तिसी ऐसी झाली स्थिती । काय गती हे न कळे ॥६५॥
येरू म्हणे अगा हे ऋषी । हे आली गेली श्रुत नाही आम्हांसी ।
कवण जाणे या अर्थासी । हे आपणासी नेणवे ॥६६॥
मग तो ऋषि विचारी ज्ञानीं । म्हणे पूर्वी शाप वदला होता मुनी ।
कन्यामात्र माझ्या वेदध्वनी । ते गुर्विणी होईल ॥।६७॥

ती कन्या पुलस्तीला देण्याचा बापाचा मानस :

तंव तृणबिंदु विचारी चित्ती । हे अर्पावी ऋषीप्रती ।
ऐसी विचारोनि युक्ती । ऋषीप्रती वदता झाला ॥६८॥
अहो जी पुलस्ती महामुनी । विनंती करितो सलगी करोनी ।
हे कन्या अंगीकारावी सेवेलागून । दास्य अनुदिनी करील ॥६९॥
पुलस्ती म्हणे ऋषिवर्या । आम्हा तापसा कोण आर्या ।
काय सेवा आचरावया । इसी कायसा देतोसी ॥७०॥
तृणबिंदु म्हणे अकल्पित आले । त्यासी अंगीकारिती साधु भले ।
कल्पिलें सहसा न फळे । इतें भावबळें अंगीकारिजे ॥७१॥

पुलस्तीचा होकार :

पुलस्ती म्हणे बरवे आता । नुल्लंघी तुझिया वचनार्था ।
येरें चरणी ठेविला माथा । कन्या तत्वता देता झाला ॥७२॥
शुभ दिन पाहूनि लग्न । तृणबिंदुनें केले कन्यादान ।
पुढे दोघें सुखसंपन्न । स्वाश्रमीं जाण विचरती ॥७३॥

पतिसेवेने त्या कन्येवर प्रसन्न होऊन ऋषींचा पुत्रप्राप्तीचा वर तिला मिळाला :

भ्रताराची सेवा करी । त्यासी मानी आत्मसाक्षात्कारी ।
भ्रतार सांडून तिळभरी । दुरी सुंदरीचे न वचे ॥७४॥
तिची देखोनि उत्कृष्ट सेवा । संतोष झाला ऋषीच्या जीवा ।
म्हणे तुज पुत्र होईल बरवा । सर्वभावा अनुकूल ॥७५॥
मजसमान होतील गुण । मजसमान तपोधन ।
मजसमान देदीप्यमान । तप अनुष्ठान करील ॥७६॥
पुलस्तीपासून जो निर्माण । तया नांव पौलस्ती जाण ।
ऐसे ऐकोनि प्रीतिवचन । आनंदे मन निवालें ॥७७॥
त्याउपरी त्या अबळेसी । प्रसूति झाली सकाळेंसीं ।
पुत्रमुख पाहे ऋषी । विधिकर्मांसी पें केले ॥७८॥
पूर्ण जातक वर्तविले । पौलस्ती नांव ठेविले ।
वेद श्रवणीं पडिले । विश्रवा झाले दुजे नाम ॥७९॥
यालागी पुलस्तीचा पौलस्ती । विश्रवा त्यासी म्हणती ।
वाल्मीकि रामायणाप्रती । कथा संतीं पहावी ॥८०॥
मूळीं वाल्मीकि कवि कर्ता । तयाचा आधार कवित्वा समस्ता ।
यालागी रामकथा वदता । संदेह सर्वथा न धरावा ॥८१॥
वाल्मीकीचे वाग्रत्न । ते हे कथा रामायण ।
सज्जनांचें अंतःकरण । भावी पूर्ण भावार्थ ॥८२॥
एका जनार्दना शरण । म्हणता गेले एकपण ।
अच्युत चित्तिं जनार्दन । तो जन वन व्यापूनि असे ॥८३॥
अच्युत नाम जयाचे वाक्पुटी । तयासीं विषयासी पडे तुटी ।
संसाराचे धरणे उठी । परब्रह्मभेटी पै होय ॥८४॥
अच्युत नाम जयाचे वाचे । तया भय नाही संसाराचे ।
यश लाहे तोचि साचे । कळिकाळ त्याचे तोडरीं ॥८५॥
एका जनार्दनी भेटी । द्वंद्वदुःखा पडली तुटी ।
संसाराचे धरणे उठी । स्वानंदपुष्टी पूर्णत्वे ॥८६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडें एकाकारटीकायां
पुलस्त्याख्यानं पौलस्त्यजन्मकथनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥ ओंव्या ॥८६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग