आग्रहा नावे पाप । यो
3301.
आग्रहा नावे पाप । योगी सारावे संकल्प ॥१॥
सहजा ऐसे भांडवल । असोनि का सारा बोल ॥धृपद॥
तै न भेटे ते काय । मना अंगींचे उपाय ॥२॥
तुका म्हणे धरी सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
अर्थ :
कोणत्याही मनुष्याने आग्रह करणे म्हणजेच पाप आहे आणि योगी मनुष्याने तर कोणत्याही प्रकारचा संकल्पच करु नये. अशा प्रकारचे सोपे भांडवल आपल्याजवळ असताना उगीचच का बोलत राहावे ? अहो मनाच्या अंगामध्ये सर्व उपाय आहेत मग आपल्याला या जगामध्ये भेटणार नाही अशी कोणती गोष्ट आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, जे योग्य आहे तेच करण्याचा मनामध्ये निग्रह धरा आणि वासनेचे डोके फोडा.
