आधी रचिली पंढरी । मग
1.
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलिया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरि । ते म्या देखिली पंढरी ॥७॥
