(तुकोबाचा पत्नीस उपद
3511.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥
दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥धृपद॥
द्विजा पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥
नको चिंता करु वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी । परी तो जवळी आहे आम्हा ॥४॥
अर्थ :
देव पहावयास सायास करावे नाशवंत देहाची अपेक्षा धरु नये. आज सोमवार आहे द्वादशी तिथी आहे प्रात:काळ आहे व अशा शुध्द दिवशी चांगला पर्वकाळच घडला आहे. यामुळे तू प्रात:काळी ब्राम्हणाला बोलवून आण मन शुध्द कर आणि यथाविधी त्यांना दान दयावे. तू तुझ्या पोटाची व वस्त्राची चिंता करु नकोस आमची माऊली पाडूरंग आहे ती तुझी सर्व काळजी घेईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने गीतेत आणि वेदात असे सांगितले आहे की, मी प्रकृतीच्या पलीकडे फार दूर आहे परंतू तसे नसून तो आमच्यासाठी आमच्या फार जवळ आहे.
