(तुकोबाचा पत्नीस उपद
3512.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
सुख हे नावडे आम्हा कोणा बळे । नेणसी अंधळे झालीशी तू ॥१॥
भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटले चपळ मन ठायी ॥धृपद॥
द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हासी पाषाणाहूनि हीन ॥२॥
सोइरे सज्जन जन आणि मन । अवघे समान काय गुणे ॥३॥
तुका म्हणे आम्हा जवळीच आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
अर्थ :
संसारातील सुख आम्हाला कितीही बळजबरीने दाखवले तरी आम्हाला ते आवडणार नाही ते आम्हाला आवडतही नाही कारण आम्हाला परमार्थाचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि तू परमार्थाविषयी आंधळी झाली आहेस. अरे हरीभजनाच्या सुखामुळे माझी तहान भूक कशी हरली आहे आणि चंचल असलेले मन एका ठिकाणी कसे स्थिर झाले आहे याचा तू विचार कर. लोकांना धन हे जीवापेक्षाही जास्त आवडते परंतू तेच धन आम्हाला पाषाणापेक्षाही हीन आहे. सोयरे सज्जन जन आणि वन हे सगळेच आम्हाला एकसारखे का वाटते कोणत्या गुणामुळे आम्हाला ते सर्व एक वाटते याविषयी विचार कर. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आमच्याजवळ नेहमी आमचा पाडूरंग असतो आणि तोच आमचे सुखदु:ख सर्व काही सहन करत असतो.
