बाई मी लिहिणे शिकले
188.
बाई मी लिहिणे शिकले सद्गुरायापासी ॥ध्रु0॥
ब्रह्मी झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढे ओंकाराची रेख । तूर्या ह्मणावे तिसी ॥1॥
माया महतत्त्वाचे सुभर । तीन पांचाचा प्रकार ।
पुढे पंचविसांचा भार । गणती केली छत्तीसी ॥2॥
बारा सोळा एकविस हजार । आणीक सहाशांचा उबार ।
माप चाले सोहंकार । ओळखिले बावन्न मात्रेंसी ॥3॥
चार खोल्या चार घरी । चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वाशी अंतरी । राहिले पांचव्यापासी ॥4॥
पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक । ओळखिले दोघासी ॥5॥
एक बीजाचा अंकूर । होय वृक्षांशी विस्तार ।
शाखापत्रे फळ फुलभार । बीजापोटी सामावे ॥6॥
कांतीण तंतूशी काढून । वरी क्रीडा करिती जाण ।
शेवटी तंतूशी गिळून । एकटी राहे आपैसी ॥7॥
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणिता मना ।
कनकी नगाच्या भूषणा । अनुभव वाटे जीवासी ॥8॥
नामदेवाच्या प्रतापांत । शिरी विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात । पुसा ज्ञानेश्वरासी ॥9॥
