वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ५७. लवणासुराचे आख्यान

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088329 · अभंग क्र. ५७

57.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सत्तावन्नावा ॥
लवणासुराचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामचंद्र राजीवनयन । कथा सांगता लक्ष्मणा ।
थोर आश्चर्य पावला मना । ब्रह्मानंदे डुल्लत ॥१॥
आधींच कथा रामायणी । जे का वदला वाल्मीक मुनी ।
सुरस आणि जगतारिणी । प्रवेशता श्रवणीं भवदोष खंडी ॥२॥
ऐसे श्रीरामलक्ष्मण । चर्चा करिता निशी क्रमोन ।
प्रभात होय रविकिरण । सर्वत्र अवनी प्रगटले ॥३॥
दोघे बंधु श्रीरामलक्ष्मण । करोनिया संध्यास्नान ।
भद्रासनीं येवोनि जाण । राजनीती करिते झाले ॥४॥

ऋषिसमुदाय श्रीरामांच्या दर्शनार्थ आला :

तंव सुमंत प्रधान आला । श्रीरामा नमस्कार केला ।
म्हणे स्वामी ऋषींचा मेळा । द्वारी उभा दर्शनार्थी ॥५॥
यमुनातीरींचें ऋषीश्वर । भर्गवच्यवनादि थोर थोर ।
तुमचे भेटीलागी द्वार । धरोनि उभे असतीं पै ॥६॥
ऐकोनि प्रधानाची मात । काय बोलिला काकुत्स्थ ।
वेगी पाचरीं गा त्वरित । भार्गवच्यवनादि ऋषींसी ॥७॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरी । मग त्यां सुमंतें झडकरी ।
द्वरा येवोनी विनीतोत्तरीं । ऋषीश्वरांप्रति प्राथिलें ॥८॥
सुमंत म्हणे ऋषीश्वर हो । दर्शनाकारणें जानकीनाहो ।
उद्यत बैसलासे पहा हो । जैसा चंद्रालागीं चकोर ॥९॥
तरी प्रवेशावें राजभवन । भेटीस तिष्ठे रघुनंदन ।
ऐसे ऐकोनि सुमंत वचन । ऋषी भवनी प्रवेशले ॥१०॥
ऋषींस देखोन रघुनंदन । करोनिया अभिवंदन ।
नाना परींचीं आसने देवोन । सभेमध्ये बैसविले ॥११॥
श्रीराम म्हणे जी ऋषी । तुमचे दर्शने अभीष्ट आम्हांसी ।
तरी कोण कार्याचे उद्देशीं । तुम्ही आगमन पै केले ॥१२॥
ऐकोनिया श्रीरामवचन । पूर्णकलशीं तोय पूर्ण ।
आणि फळे मुळे तूर्ण । श्रीरामासी समर्पिली ॥१३॥
ऋषींची देखोन अति प्रीती । सर्व अंगीकारुनी धरणिजापती ।
पुनरपि म्हणे कोण कार्यार्थी । तुमचे आगमन पै झाले ॥१४॥
मी तुमचा आज्ञाधर । आणि सेवकाचा किंकर ।
तुमच्या कार्यालागी अवतार । सूर्यवंशी धरिलासे ॥१५॥
राज्य आणि सकळ जीवित । हे वेंचीन प्रियकार्यार्थ ।
माझे वचन मानावे सत्य । कायावाचामानसें ॥१६॥
कोण उत्कंठा असे चित्ती । तू मज सांगा जी निश्चिती ।
मी प्रवर्तेन त्या अर्थी । तुमचे सेवेलागून ॥१७॥

ऋषींकडून श्रीरामांची स्तुती :

श्रीरामाचे ऐकोनि वचन । भला भला गा धन्य धन्य ।
तू सूर्यवंशी शिखारत्न । शिवहृदयींचें ध्यान तूंचि पै ॥१८॥
तुज देखोनि श्रीरामा । थोर सुख झाले आम्हा ।
जैसा चकोर चंद्रमा । तैसा तू आम्हा कृपाळु ॥१९॥
बहुत राजे पृथ्वीपती । नानापरींचे धरणीवरी असती ।
तयांमध्ये तू श्रेष्ठ श्रीरघुपती । अगाध कीर्ती पै तुझी ॥२०॥
तू त्रैलोक्याचा ईश्वर । ब्रह्मा तुज निजकुमर ।
फेडावया भूमिभार । अवतरालसी श्रीरामा ॥२१॥
तू जगाचा ईश्वर । सुरकार्या लागीं अवतार ।
धरोनि फेडिसी धराभार । दशरथकुमर होवोनी ॥२२॥
येथे संदेह नाही श्रीरघुपती । कार्य करिसी हे निश्चिती ।
ऋषींचें कार्य निरसावयार्थी । तुज असे अधिकार ॥२३॥

कार्य कोणते हे समजून घेतल्याशिवाय होकार देऊ नये :

ऋषि म्हणती श्रीरामा जाण । कोणे कार्यालागी ब्राह्मण ।
आले असती हे विचारून । मग करीन ऐसे वदावें ॥२४॥
न जाणता कार्याची स्थिती । न म्हणावे करीन श्रीरघुपती ।
ऐसी असे राजनीती । विनंती यदर्थी आम्ही केली ॥२५॥
ऋषींमध्यें भार्गवमुनी । जो अत्यंत सधर्म अनुष्ठानीं ।
तो ऋषिभय श्रीरामालागोनी । सांगता झाला ते काळी ॥२६॥

मधुदैत्याची कथा :

पूर्वी कृतयुगीं जाण । गोळपुत्र ज्येष्ठ मधु नामाभिधान ।
दैत्यांमध्ये परम पावन । धर्मनिष्ठ अत्यंत ॥२७॥
गायीब्राह्मणां हितकरी । परम उदार पृथ्वीवरी ।
वीर्यसंपन्न दुष्टां संहारी । कृपा करी द्विजदेवां ॥२८॥
ऐसा स्वधर्मनिष्ठ गोळनंदन । मधुनामें प्रसिद्ध जाण ।
तयासि रुद्र झाला प्रसन्न । अद्भूत वरदान पै दिधले ॥२९॥
निजशूळापासोनि जो निश्चित । निर्माण करी शैलजाकांत ।
परम प्रीतीने रुद्रें तेथ । तो शूळ तयासि दिधला ॥३०॥
अगा मधु तुझी उत्तम भक्ती । आणि सर्व जीवांसिं प्रिय निश्चिती ।
ऐसे जाणोनि मी उमापती । प्रसाद शूळ दिधला ॥३१॥
जंव स्वधर्मे पाळिसी जन । तंवपर्यंत शूळ राहेल जाण ।
जेव्हा ऋषींसी करिसी विरुद्धपण । तेव्हा शूळ जाईल निजस्थानासी ॥३२॥
या शूळानें दैत्यवधार्थी । तू जय पावसी निश्चिती ।
जेव्हा तुझी फिरेल मती । तेव्हा शूळ घाता प्रवर्तेल तुझ्या ॥३३॥
ऐसे रुद्रवर लाहोन । गोळपुत्रें प्रणिपात करुन ।
पुनरपि महादेवाप्रति वचन । बोलता झाला ते काळी ॥३४॥
अहो जी महेशा पार्वतीपती । माझ्या वंशा हो शूळप्राप्ती ।
तुम्ही प्रेमसिंधु सर्वांगी विभूती । माथा जटाजूट शोभती ॥३५॥
चंद्रशेखर त्रिपुरदहन । कामांतक वृषभवाहन ।
पिनाकपाणि त्रिलोचन । पंचवदन परमेश्वर ॥३६॥
ऐसी तया मधूची स्तुती । ऐकोनिया पशुपती ।
पुनरपि वदे दैत्याप्रती । जे जे असेल चित्ती ते पावसील मत्प्रसादें ॥३७॥
माझिये कृपेने मधु । वेगी भोगी तू सुख आनंदु ।
तुझिया पुत्रा शूळ शुद्धु । प्राप्त होईल हा जाण ॥३८॥
ऐसा मधु वर लाहोन । प्रेमे झाला सुखसंपन्न ।
पुढील श्रीरामा निरुपण । भार्गव जाण सांगता झाला ॥३९॥
ऐसे श्रीरामा धरणिजापती । मधूची कुंभनसीनामें सती ।
विश्वावसूची दुहिता निश्चिती । सुंदर गुणवंत पतिव्रता ॥४०॥
तियेच्या उदरी लवणासुर । जन्मला अत्यंत पराक्रमी शूर ।
बाळपणापासोनि कर्मे घोर । पापाचार करितसे ॥४१॥
पुत्र दुष्टात्मा देखोन । मधूसि चिंता अति गहन ।
म्हणे हा पापिष्ठ दारुण । वेगी निधन पावो पै ॥४२॥
पुत्रातें म्हणे मधु दैत्य । तू विचरे वरुणालय जेथ ।
हा शूळ घेवोनिया त्वरित । मजपासोनि पै जावे ॥४३॥
या शूळाचा महिमा अगाध । देवा दैत्यांसि करिता युद्ध ।
जवळी शूळ असता न पाविजे खेद । परी देवा ऋषींस विरुद्ध करू नये सर्वथा ॥४४॥
तेणे ऐकोनि पित्याचे वचन । शूळ करी घेवोन जाण ।
विचरता दुःख दारुण । देता झाला ऋषींतें ॥४५॥
तयाचे भयें श्रीरामा । येथवरी येणे झाले आम्हा ।
तुजवाचोनि तो दुष्टात्मा । वधिला न जाय इतरांसी ॥४६॥
अनेक पृथ्वीपति असती । तयांचेनि लवणासुर दुष्टमती ।
वधिला न जाय श्रीरघुपती । आमची भयनिवृत्ती तुवा कीजे ॥४७॥
रावणाऐसा दुराचारी । तुवा वधिला सहपरिवारी ।
तुजपुढे लवण मशकापरी । तुझे दृष्टीनें नुरेल ॥४८॥
एका जनार्दना शरण । पुढे लवणासुरी वधावयालागून ।
सहपरिवारी जाईल शत्रुघ्न । सावधान अवधारा ॥४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
लवणासुराख्यानं नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥५७॥ ओंव्या ॥४९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग