॥ श्रीएकनाथमहाराजकृत
8.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय आठवा ॥
रावण सीता संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणाच्या आगमनाने सीतेची झालेली स्थिती :
पूर्वप्रसंग संपतां तेथ । रावण होऊनि पंचोन्मत्त ।
येवोनि अशोकवनांआंत । सीता पाहत भोगेच्छा ॥१॥
रावणे ऐसी देखिली सीता । कंपायमान अति भयार्ता ।
जेंवी कदली वायुघाता । श्रीरामकांता तेंवी कांपे ॥२॥
देखोनिया दशानन । ऊरूउदरबाहुभूषण ।
पीतांबर अति जीर्ण । तेणेंचि आपणा आच्छादी ॥३॥
पीतांबर तो अति जीर्ण । तेणे अवयव आच्छादून ।
जानकी अति लज्जायमान । अधोवदन राहिली ॥४॥
नाही अभ्यंग ना स्नान । सर्वांग मलिन मळकण ।
नाही आच्छादन आस्तरण । नाही आसन बैसावया ॥५॥
सीता धरणिजा आपण । धरासनीं सुखसंपन्न ।
बैसली असे सावधान । लज्जायमान दशवक्त्र ॥६॥
अंतर्यामी रामचिंतन :
धनलोही खतेली असे । तीमाजी निजनिधान वसे ।
सीता बाह्य मलिन भासे । अंतरी वसे श्रीराम ॥७॥
सीता बाह्य भासे भयमान । अंतरी निःशंक सावधान ।
हे नेणोनि दशानन । करी प्रार्थना भोगार्थ ॥८॥
रावणाची स्वमुखाने आत्मश्लाघा :
स्वमुखें रावण म्हणे सीते । मज भिऊं नको प्रियकांते ।
मज देखोनि निजांगाते । वृक्षा आपणियातें गुप्त करिसी ॥९॥
मी प्रार्थितों दशानन । मजला व्हावे सुप्रसन्न ।
सकल लज्जेसी सांडोन । सुखसंपन्न रम मजसी ॥१०॥
सांडीं श्रीरामाची आस । हे घे माझी सत्य भाष ।
मज तुज जालिया आश्लेष । भोगी अशेष निजराज्य ॥११॥
ऐशीं सहस्त्र माझ्या नारी । तयांत मुख्य जे का मंदोदरी ।
तुझी करीन ते किंकरी । अवघ्यांवरी तू श्रेष्ठ ॥१२॥
इंद्रादिक देव समग्र । तुझे करीन वो किंकर ।
मी ही होईन आज्ञाधर । साक्ष शंकर प्रमाण ॥१३॥
स्वर्गमृत्युपाताळींची । संपत्ति आणिली त्रिभुवनींची ।
ते ही अर्पीन मी तुजची । घे आमुची निजभाक ॥१४॥
सवेग मलिनांबरें फेडीं । माझी दिव्यांबरे वेढी ।
सांडोनि श्रीरामाची ओढी । भोगी आवडी तू मज ॥१५॥
मस्तक दिसताहे मलिन । करी जवादीचे मंगळस्नान ।
तुज मी चर्चीन चंदन । घनस्तन निववावया ॥१६॥
रत्नजडित अलंकार । रत्नकुंडले पदक हार ।
कंकणें बाहुवटे मनोहर । अर्धचंद्र रत्नांचे ॥१७॥
सहित किंकिणीज्वाळामाळा । कटी विराजे मेखळा ।
वांकी अंदुवांचा खळाळा । कळिकाळा भिऊं नको ॥१८॥
तुझे देखानि रूप यौवन । ब्रह्मा पडे मूर्च्छापन्न ।
माझे उतावेळ मन । दे आलिंगन जानकी ॥१९॥
त्रिदशा न खालवीं मान । तो मी येतो लोटांगण ।
तुझे धरितों चरण । पाणिग्रहण करी सीते ॥२०॥
कुंभकर्ण दारवंटेकर । इंद्रजित करीन फुलधर ।
अखयादि समग्र कुमर । करीन किंकर आज्ञांकित ॥२१॥
मंदोदरी स्वये आपण । नित्य करील चरणक्षालन ।
मी करीन संवाहन । अंगस्पर्शनसुखार्थ ॥२२॥
तुझा अंगस्पर्श सहज । घडावया भाग्य कैचें मज ।
माझी सांडोनिया लाज । भोगी निर्लज्ज भोग माझे ॥२३॥
सिद्ध कामगविमानीं । दोघे एकत्र बैसोनीं ।
चैत्रवनीं नंदनवनीं । अशोकवनी क्रीडू पै ॥२४॥
सांडोनिया श्रीरामचंद्र । माझा करी अंगीकार ।
राम बापुडे कोण किंकर । मजसमोर यावया ॥२५॥
श्रीरामांची रावणाकडून निंदा :
राम बापुडे ते किती । तू का त्याची करिसी खंती ।
ऐक त्या रामाची स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥२६॥
वनवासी चीरवासी । अन्नावीण तो उपवासी ।
काय तू त्याते भोगिसी । भोगी मजसी त्रिविध भोग ॥२७॥
गतविजयों श्रीरामचंद्र । गतश्रीक वनगोचर ।
त्यासी तू काय भोगिसी सुंदर । भोगी निरंतर भोग माझे ॥२८॥
रामसी नाही शौर्यसाटोप । स्त्री हारविली अल्पतप ।
नाही परमकर्मप्रताप । धैर्यही स्वल्प श्रीरामा ॥२९॥
धैर्येराम निधडा असता । तरी का स्त्रीलागीं रडत पडता ।
झाडोझाडीं का खेंव देता । सीता सीता म्हणोनि ॥३०॥
नाही धैर्य मजसमान । नाही राज्य मजसमान ।
नाही मजसी समान धन । हीन दीन श्रीराम ॥३१॥
नाही यश मजसमान । नाही समान सेनाधन ।
न चले मजसी आंगवण । हीन दीन श्रीराम ॥३२॥
नाही ज्ञान मजसमान । स्त्री हारविली अपेश गहन ।
वनोवनीं करी रूदन । हींन दीन श्रीराम ॥३३॥
श्रीरामाची कथावार्ता । तुज मी ऐकों नेंदी सर्वथा ।
मजपासुनि सुटलिया आता । केंवी रघुनाथा पावसी ॥३४॥
व्यर्थ जाते तुझे यौवन । ते तंव नये वो परतोन ।
सेजे भोगी दशानन । सुखसंपन्न तू होसी ॥३५॥
परदारा स्वये भोगितां । पाप लागेल लंकानाथा ।
राक्षसांची स्वधर्मता । ऐक आता जानकीये ॥३६॥
आम्ही हरोनि परनारी । बळेंचि भोगाव्या निजघरीं ।
परराज्याची थोरी । बळेंचि करी हरावी ॥३७॥
देव दैत्य दानव मानव । बळेंचि विभांडोनि सर्व ।
स्त्रियादि अपूर्व वैभव । आम्ही स्वयमेव भोगावें ॥३८॥
आग्रह सांडोनि आपुला । सीते ऐक माझ्या बोला ।
राम अति दुःखे निमाला । प्राण दिधला लक्ष्मणे ॥३९॥
राम लक्ष्मण आहे की नाही । हा संदेह फिटला पाहवी ।
सुखे अनुसरें माझे ठायी । म्हणोनि पायी लागला ॥४०॥
तुझी भीड म्या धरिली भारी । राखिलीसे षण्मासांवरी ।
आंता भोगीन बलात्कारी । अंगीकारीं मज सीते ॥४१॥
आणा पालखी धरा छत्र । सीतेनें वरिला दशवक्त्र ।
निशाणे त्राहाटा रे सर्वत्र । करा गजर वाद्यांचा ॥४२॥
सीतेचा रोष :
ऐसे रावणाचे वचन । सीतेनें टाकिलें उपेक्षून ।
गजापासीं भुकें श्वान । दशानन तेवीं भुंके ॥४३॥
देखोनि उत्तम पक्क्वान । स्वये वसवसिजे श्वान ।
रावण दहा तोंडाचें शुन । सीतेकारणें वसवसी ॥४४॥
देखोनि दहींभाताचा गोळा । झडपूं धांवे जेंवी कावळा ।
तेंवी देखोनि जनकबाळा । रावण काळा डोंबकाग ॥४५॥
रावणा देखोनिया सीता । अल्पही बाधा न बाधे चित्ता ।
बैसली असे निःशंकता । श्रीरघुनाथाचेनि नेटे ॥४६॥
सीता पतिव्रता आपण । सबाह्य श्रीराम परिपूर्ण ।
हे स्मरणेंवीण नित्यस्मरण । मानी रावण तृणप्राय ॥४७॥
ऐकोनि रावणाचे वचन । प्रलोभयुक्त समाधान ।
साधूपुढे भुंके श्वान । तत्समान मानी सीता ॥४८॥
जेंवी दहा तोंडाचें घुबड । तैसी रावणाची बडबड ।
ते सीतेसी न लागे गोड । तद्विधि चाड अपवित्र ॥४९॥
आभिषालागीं तळपे मासा । परदाराभोगीं रावण तैसा ।
श्रीरामबाणांचा पडेल फांसा । हे लंकेशा लक्षेना ॥५०॥
कामसर्प लागला रावणासीं । कडू परदारा गोड होय त्यासी ।
लहरी येता रामबाणेंसी । क्षणार्धेंसी निमेल ॥५१॥
असो हे सावधान सीता । लोकलज्जेच्या लौकिकार्था ।
आडकाडी करोनि हाता । लंकानाथा शिकवितसे ॥५२॥
सीतेचे परखड उत्तर, रावणाचा धिक्कार व अधिक्षेप :
जन्मोनि ब्रह्मयाचे वंशीं । रावणा भाग्ये वेद विभागिसी ।
तो तू परदारा अभिलाषिसी । वृथा मरसी अधर्में ॥५३॥
जेंवी अशुची विकल्पवंता । ऋद्धि सिद्धी नये हाता ।
तेंवी मी सती श्रीरामकांता । तुज लंकानाथा अपवित्रा ॥५४॥
साळी भोज्य त्या शुकासी । सांडोनि जाता नारळीसी ।
ते फळ भक्षू म्हणता त्यासी । चंचुभंगेसीं तळमळी ॥५५॥
तेंवी तू त्यजूनि स्वदारा । भोगू जाता परदारा ।
दुःखी होशील गा दशशिरा । बाणधारा श्रीरामाच्या ॥५६॥
तुझ्याचि स्त्रिया लंकानाथा । स्वइच्छे परपुरूषासीं रमतां ।
त्यांची तुज न माने पवित्रता । दोहींच्या घाता तू करिसी ॥५७॥
तेंवी मी श्रीरामांची कांता । तुजसी बोलणें अपवित्रता ।
कैंची अंगसंगाची कथा । मरसी वृथा अभिलाषें ॥५८॥
आत्मौपम्येन सर्वत्र । जो पाहे तो ज्ञाता नर ।
जैसी रक्षावी स्वदार । तैसी परदारा संरक्षी ॥५९॥
म्हणसी श्रीराम जरी दूरी । परी तो तुज मजमाझारी ।
नांदताहे निरंतरी । त्याचि चोरी चालेना ॥६०॥
भोईभेणें जो पळोनि जाये । जिकडे पाहे तिकडे भोये ।
तैसाचि श्रीराम माझा पाहे । सबाह्य आहे परिपूर्ण ॥६१॥
त्यासी न चले चोरी मारी । तयाची भोगितां पै नारी ।
घसा निवटील सेजेवरी । संसारा उरी उरो नेदी ॥६२॥
मजपासोनि न सुटे सीता । ऐसे बोलसी ते वृथा ।
रामे गिळिलासी लंकानाथा । सबाह्यता निवटोनि ॥६३॥
जोचि भोग स्वदारेंसीं । तोचि भोग परदारेंसीं ।
एके पाविजे स्वधर्मासी । एके नरकासी जाइजे ॥६४॥
जो भोग सूकरासूकरीसी । तो भोग इंद्राउर्वसीसीं ।
भोगसमता सर्वांसी । परदारेपासी अधःपात ॥६५॥
हित सांगे ते दशशिरा । सुखे भोगावी स्वदारा ।
मज अर्पावें श्रीरामचंद्रा । कुळगोत्ररक्षणार्थ ॥६६॥
परदारा ते तंव माता । सकळ संमत वेदशास्त्रार्था ।
मातृगामी परदारभोक्ता । अधः पाता जाशील ॥६७॥
ऐसे बोलोनि सीता सुंदरी । रावण महापापी भारी ।
त्याचे अवलोकन न करी । जाली पाठमोरी जानकी ॥६८॥
सीता होतांचि विमुख । जाले रावणा परमदुःख ।
क्रोधलोभशांतवनपूर्वक । दशमुख अनुवादे ॥६९॥
रावणाचा क्रोध व सीतेला धमकी :
ऐकोनि सीतेचे दुष्ट चिन्ह । क्रोधाविष्ट दशानन ।
सर्वांगेसीं कंपायमान । काय आपण बोलत ॥७०॥
मी तंव स्वये राक्षसराजा । देव दानव माझ्या प्रजा ।
दुष्ट वचनें अपमान माझा । श्रीरामभार्या तू करिसी ॥७१॥
मज रावणा देखता दृष्टी । देव दानव कांपती पोटी ।
तू तंव धीट आहेस मोठी । वदसी गोष्टी अपमाने ॥७२॥
माझ्या स्त्रीपुत्रादेखतां । मज निर्भर्त्सिलें लंकानाथा ।
तुझ्या करावे म्या घाता । परी स्त्री वधितां निषिद्ध ॥७३॥
तुझे अंगसंगाची आर्ती । कामक्रोधांची करीन शांती ।
तुझी मज अति प्रिती । वध तदर्थीं न करवे ॥७४॥
शेखी तू न देशी अंगसंग । तुझ्या करीन अंगभंग ।
वेगवेगळाले विभाग । तुझे सर्वांग छेदीन ॥७५॥
वानिसी श्रीरामाची शक्ती । ते तंव मनुष्य बापुडे किती ।
केंवी येईल लंकेप्रती । विचार चित्ती न करिसी ॥७६॥
श्रीरामाच्या दैन्यावस्थेचे चित्रण :
सीता नेली लंकेसी । हे कोण सांगेल रामापासी ।
दुर्घट मार्ग न कंठे त्यासी । समुद्रासी काय करी ॥७७॥
श्रीराम बापुडे चरणचाली । सीताविरहे भुललें भुली ।
अगाध समुद्राची खोली । उतरवली केंवी जाय ॥७८॥
श्रीराम राक्षसा भातुकें । ते मी भक्षीन महाकौतुके ।
लक्ष्मण गिळीन चुळोदकें । यथानुसुखें मज भजें ॥७९॥
तुज सीतेसी रामसंगती । कदा न घडे कल्पांती ।
मज अनुसरें अनन्यप्रीतीं । सांडी आसक्ती रामाची ॥८०॥
पित्याने दिधला दवडून । राज्यहीन स्वधर्महीन ।
नाही अन्न नाही धन । अति दीन श्रीराम ॥८१॥
नित्य तृणाचे शयन । मुखी घालावया न मिळे पान ।
वनवासी न मिळे अन्न । अति दीन श्रीराम ॥८२॥
नाही वस्त्र नाही भूषण । नाही अभ्यंग तैलमर्दन ।
जटा वळिल्या वल्कल परिधान । अति दान श्रीराम ॥८३॥
श्रीरामासी बळ असतें । तरी का वनी रडत राहतें ।
तयासी येववेना पै येथे । राम निश्चिते अति दीन ॥८४॥
मजसमान नाही बळ । मजसमान नाही दळ ।
मजसी न करवे सळ । राम केवळ अति दीन ॥८५॥
बैसोनियां वनवासी । जुंझावया राक्षसांसी ।
रामे मेळविलें वानरांसी । तेही आम्हांसी निजभुक्ति ॥८६॥
श्रीराम होवोनि वनचर । वनी मेळविले वानर ।
त्यांते गिळती निशाचर । भक्ष्य साचार ते आम्हा ॥८७॥
डमरूपुराणातील ऋषिभाष्य :
रावण सांगे साक्षेपूनी । ऋषिभाष्य डमरूपुराणी ।
जे भाष्य ऐकिलें कानी । ते सीते सावधानीं अवधारी ॥८८॥
भवित्री रंभोरू त्रिदशवदनग्लानिरधुना
स ते रामः स्थाता न युधि पुरतो लक्ष्मणसखः ।
इयं यास्यत्युच्चैर्विपदमधुना वानरचमूः
लधिष्ठेदं षष्ठाक्षरविपरीलोपात्पठ पुन: ॥१॥
रंभास्तंभगर्भ अति सुकुरू । त्याहूनि अरूवार तुझा ऊरू ।
यालागी बोलिजे रंभोरू । श्लोकार्थ सादर अवलोकीं ॥८९॥
त्रिदशवदन जे का देव । थोर आपत्ती पावती सर्व ।
माझे रणी भंगेल राघव । विमुख स्वयमेव लक्ष्मणेंसीं ॥९०॥
माझिया कंदनाआंत । रणी भंगलिया रघुनाथ ।
वानरे होता वाताहत । राक्षस समस्त भक्षितील ॥९१॥
सीता सज्ञान बोले सुंदर । रावणा श्लोक हा साचार ।
लोपोनिया तिन्ही सप्ताक्षर । करी उच्चार श्लोकाचा ॥९२॥
रावणा तू अति लघिष्ठ । मूर्खत्वें वाहसी दाही कंठ ।
सातवे अक्षर लोपोनि स्पष्ट । वाचीं घडघडाट श्लोकार्थ ॥९३॥
ऐकोनि भाष्य लंकानाथा । असत्य वचन न वदे सीता ।
श्लोकाचिया भविष्यार्था । सावधानता अवधारी ॥९४॥
भविष्यार्थ आहे अति गहन । ग्लानि पावेल दशवदन ।
रणी विजयी रघुनंदन । सखा लक्ष्मणसमवेत ॥९५॥
वानरसेना आघवी । उंचावेल विजयीगौरवीं ।
रावण निर्दळोनि राघवी । रामराज्यपदवी तिही लोकी ॥९६॥
सीतेनें कथिता श्लोकार्थ । कोपे तिचा करावया घात ।
रावणे उचलिला हात । वृक्षीं हनुमंत कोपला ॥९७॥
त्यामुळे रावण क्रोधायमान होऊन सीतेचा उपहास व निर्भर्त्सना :
रावणे उचलितां हात । सीता निर्भर्त्सी लंकानाथ ।
कामोन्मत्त गर्वोन्मत्त । मरणोन्मत्त जाहलासी ॥९८॥
कोपला देखोनि लंकानाथ । सीता मशकप्राय मानित ।
श्रीरामस्मरण अति समर्थ । निःशंक नित्य जानकी ॥९९॥
दुःखदायक रावणवचन । अखंडधारा वर्षे घन ।
तेणे डळमळेना सीतेचे मन । जेंवी का गगन तिंबेना ॥१००॥
रावणाची वचनें लाघवें । मानी मृगजळहेलावे ।
त्याचीं झाडावया गर्वपर्वें । निजानुभवें बोलत ॥१०१॥
सीतेचे वचन अति गुह्यार्थ । स्वहित आणि परहित ।
दोही अर्थीं असता समर्थ । शुद्ध शब्दार्थ अनुवादे ॥१०२॥
जेंवी का शुद्ध पुण्यकीर्ती । तीस नातळे अपकीर्ती ।
तैसी रावणाची दुष्ट दुरूक्ती । सीता सती स्पर्शेना ॥१०३॥
देव दानव सेवा करिती । लंकाराज्य यश : कीर्ती ।
यावरी जोडिली अपकीर्ती । सीता सती चोरोनि ॥१०४॥
शिवाचा सेवक प्रसिद्धू । चोरिता श्रीरामाची वधू ।
ऐसा रावण बुद्धिमंदू । पापबाद्ध जालासी ॥१०५॥
चोरी करोनि लंकानाथा । पळूं पाहसी तू केउता ।
श्रीराम बाणाचे आघाता । तुज कोण आता राखील ॥१०६॥
धाता पिता सोम सविता । अनळ यम विधाता ।
कोपलिया श्रीरघुनाथा । हे सर्वथा न राखिती ॥१०७॥
लपों जाता शिवपुरीं । शिव मारील त्रिशूळेंकरी ।
माझिया स्वामीची चोरिली नारी । प्रत्यक्ष वैरी तू माझा ॥१०८॥
श्रीरामकांता जगत्त्रयजननी । विशेषे माझी गुरूपत्नी ।
का चोरिली हे अभिलाषोनी । तृतीयनयनी जाळील ॥१०९॥
यापरी गा लंकानाथा । चोरिलिया श्रीरामकांता ।
कोणी नाही गा रक्षिता । तुज तत्वता मारील ॥११०॥
म्हणसी मज आहे दळबळ । श्रीराम एकाकी निर्बळ ।
श्रीरामांचे बळ प्रबळ । ऐक प्रांजळ सांगेन ॥१११॥
ताटका मारिली आणि सुबाहु । मारीच मारिला त्याचा भाऊ ।
विरोध करिता गर्व बहु । रणगौरवु बाणे एके ॥११२॥
एकलेनि बाणे रामे जाण । चवदा सहस्त्र राक्षसगण ।
त्रिशिरा मारिला खर दूषण । रणकंदन जनस्थानी ॥११३॥
लाज नाही तुजलागूनी । शूर्पणखा सखी भगिनी ।
तिचे नाक कान कापूनी । विटंबोनी धाडिली ॥११४॥
तुज येता तिच्या कैवारी । प्रथम जाहलासी भिकारी ।
चोरोनि श्रीरामाची अंतुरी । भयेंकरीं पळालासी ॥११५॥
मुख न दाविता रामासी । बाणभये पळालासी ।
धाके लंकेमाजि लपसी । आणि जल्पसी वाढिव ॥११६॥
जटायूसी करिता रण । मजदेखतां आपण ।
दांती तुवा धरिले तृण । काय आंगवण वानिसी ॥११७॥
मारूतीचा विस्मय :
सीता निर्भत्सी लंकानाथ । हनुमान हांसे वृक्षावरूतें ।
देखोनि जानकीचा पुरूषार्थ । अति विस्मित वानर ॥११८॥
श्रीरामे मारूनि खर दूषण । दोघे बंधु स्वये बैसोन ।
वांटा केला आपणा आपण । सावधान अवधारी ॥११९॥
ज्येष्ठ वांटा श्रीराम द्विगुण । रावण आणि कुंभकर्ण ।
कनिष्ठ वांटा लक्ष्मण । इंद्रजित जाण एकाकी ॥१२०॥
उद्भट वीर वाढिवेंसी । वांटा दिधला हनुमंतासी ।
शिष्टाई दिधली अंगदासी । नळनीळांसी सेतुबंध ॥१२१॥
येर समस्त सैन्यासी । श्रीरामे दिधले सुग्रीवासी ।
वीरवृतिविभागांसी । वानरांसी समजावी ॥१२२॥
श्रीराममाहात्म्य
श्रीराम स्वये सच्चिदानंदघन । त्यासी तू म्हणसी अति दीन ।
श्रीरामाचे महिमान । सावधान अवधारी ॥१२३॥
श्रीरामनाम नित्यस्मरणीं । शिव वंदित पायवणी ।
ब्रह्मा घाली लोटांगणी । देवा शिरोमणि श्रीराम ॥१२४॥
एकांती बैसोनि चंद्रचूडे । नित्य श्रीरामनाम पढे ।
त्यांते निंदिजे तुवा मूढें । मरण रोकडे तुज आले ॥१२५॥
जो जो श्रीरामाची निंदा करी । शिव साक्षेपे त्याते मारी ।
आपुला स्वामी तुंवा केला वैरी । मूर्ख संसारी तू एक ॥१२६॥
श्रीरामनिंदेमुळे सीता क्रुद्ध होते :
श्रीराम निंदितां जाणा । जिव्हा झडेल गा रावणा ।
होसिल नरकाचा पाहुणा । आंदणा महादुःखा ॥१२७॥
निंदिता देखानि रघुनंदन । सीता जाली कोपायमान ।
रावणा तुझे भस्म करीन । अर्ध क्षण न लागता ॥१२८॥
बळेंचि भोगीन म्हणसी सीता । आणि निंदिता श्रीरघुनाथा ।
तुझे भस्म करीन आता । क्षण न लागता रावणा ॥१२९॥
क्रोधाचा संयम, कामक्रोधाचे परिणाम :
परी आज्ञा समर्थ रघुनाथा । लागलिया अति आघाता ।
कोप न यावा सर्वथा । केंवी लंकानाथा भस्म करू ॥१३०॥
आंगा येता क्रोधसंग । अपवित्र होय सर्वांग ।
ब्रह्मचर्या होय भंग । तपा संहार होय क्रोधे ॥१३१॥
यज्ञदानव्रतदक्षिणा । कोप येतांचि पै जाणा ।
सर्व क्रियाकर्म व्यर्थ जाणा । करी उगाणा तपाचा ॥१३२॥
छिद्र पडता घट गळे । क्रोधानळें तप जळे ।
योगी संन्यासी पडती मैळे । क्रोधे निजबळे गांजिले पै ॥१३३॥
बाह्य मांगाचा विटाळ । जलमार्जनें फिटे मळ ।
क्रोध अतिशये चांडाळ । नव्हे निर्मळ प्रयागीं ॥१३४॥
करिता काशीवासस्नान । तंव क्रोध खवळे गहन ।
क्रोधाऐसा पापी पूर्ण । नाही आन संसारी ॥१३५॥
काम क्रोध लोभ जाणे । हे नरकाचे पाहुणे ।
तिन्ही त्यजावे आपणें । आज्ञा संपूर्ण रामाची ॥१३६॥
श्रीरामाज्ञा प्रतिपाळितां । क्रोध आतळो नेदी चित्ता ।
तेणे वांचलासी लंकानाथा । अपघाता चुकलासी ॥१३७॥
रावणाला भावी घटनांचे कथन :
आता मी वांचलो तत्वता । ऐसे न मानी लंकानाथा ।
करील श्रीराम तुझ्या घाता । हेही कथा अवधारी ॥१३८॥
श्रीरामधनुष्याचा ध्वनी । पडतांचि लंकाभुवनीं ।
राक्षस पडती मूर्च्छापन्नी । त्रिकूट खचोनी पडे धाके ॥१३९॥
पायी उतरोनी अपांपती । शरवृष्यिसंपातीं ।
वीरे वीर पडती क्षिती । अश्वगजरथीसमवेत ॥१४०॥
इंद्रजित लक्ष्मणाचा भाग जाण । तो निकुंबळे घालील खाण ।
मेघनादाचा घेईल प्राण । शस्त्रे दारूण वर्षोनी ॥१४१॥
श्रीराम विंधोनियां जाण । बाणी फोडील कुंभकर्ण ।
रावणा तुझा घेईल प्राण । अर्ध क्षण न लागता ॥१४२॥
जेंवी थिल्लरी अल्प जळ । रवि शोषिता न लगे वेळ ।
तेंवी श्रीरामाचे बाण प्रबळ । प्राण तत्काळ घेतील ॥१४३॥
राजया उन्माद कामासक्तीं । तोहि काम अधर्मरतीं ।
त्याचीं राष्ट्रें पुरे नासती । राज्यसंपत्ती समवेत ॥१४४॥
लंका रत्नाढ्य कनकगिरी । रावणा तुझी परदारचोरी ।
भस्म होईल क्षणामाझारी । सहपरिवारी सहपुत्र ॥१४५॥
रामबाणाचा महिमा :
निवारेल वज्रधार । निवारेल काळचक्र ।
परी श्रीरामाचा बाण अनिवार । दशशिरवधार्थ ॥१४६॥
पाठी लागलिया काका । ज्याचे हातींची दर्भशिखा ।
नावरेचि तिंहीं लोका । शिवादिकांसमवेत ॥१४७॥
त्या रामाचे सकोप बाण । येथे निवारूं शकेल कोण ।
घेतील राक्षसांचा प्राण । मुख्य रावणा लक्षूनी ॥१४८॥
म्हणसी सबळ दशानन । राम नव्हे मजसमान ।
श्रीराम सिंह तू श्वान । पलायमान होसी चोरा ॥१४९॥
रावणाची निर्भर्त्सना :
मुखी धरोनि पक्वान्न । हडहड करिता पळे श्वान ।
सीता चोरून चिद्रत्न । पलायमान तू तैसा ॥१५०॥
श्रीराम चिन्मात्र गजेन्द्रु । रावण विषयाचा काळेन्द्रु ।
घरींचियांवरी करी कुरूकुरू । श्रीरामासामोरू न राहवे ॥१५१॥
तू तंव शूर्पणखेसमान । चोरी करोनि शूर पूर्ण ।
त्यावरीही बुचाट आंगवण । काळे वदन रावणा ॥१५२॥
रावणाचा क्रोध :
ऐकोनि सीतेचा अनुवाद । रावणा आला सुबद्ध क्रोध ।
तिचा करावया वध । जाहला सिद्ध साटोपे ॥१५३॥
सीतावचनाचे बाणाग्री । रावण खोंचला जिव्हारीं ।
दांत खांवोनियां करकरी । नेत्र वटारीं अति क्रोधे ॥१५४॥
संतापक्रोधे उचंबळे । फोडा इचे दोन्ही डोळे ।
वेगे मोडा रे सिसाळे । अंत्रमाळा काढा इच्या ॥१५५॥
जिव्हा छेदा रे सवेग । वेगी करा अंगभंग ।
विदारोनियां अष्टांग । भिन्न भाग करा इचे ॥१५६॥
मारूतीचा आवेश :
तिचा करावया घात । रावण शस्त्रेंसीं धांवत ।
ते दिखोनियां हनुमंत । रागे कांपत थरथरां ॥१५७॥
हात दोनी कुसकरी । पुच्छ भोवंडी चक्राकारीं ।
शेंडी माथेवरी थरारी । वृक्षावरी पिलंगत ॥१५८॥
डोळे भोवंडित गरगरा । दांत खातसे करकरा ।
रोमें थरकती थरथरां । आला वानरा अति कोप ॥१५९॥
सीतेसी लाविता हात । करीन रावणाचा घात ।
येणे साटोपे हनुमंत । घुलकावित वृक्षेंसीं ॥१६०॥
कोपला देखोनि वानरा । हाहाकार सुरवरा ।
कोपला देखोनि दशशिरा । स्त्रिया समग्र कांपती ॥१६१॥
मंदोदरीचे आगमन :
सीता गांजिता रोकडी । हनुमंत जंव न घाली उडी ।
मंदोदरीची प्रज्ञा गाढी । आली तांतडी ते संधी ॥१६२॥
खड्ग घेवोनि लंकानाथ । करिता सीतेचा पै घात ।
मंदोदरी धांवोनि तेथ । धरिला हात खड्गाचा ॥१६३॥
मंदोदरी धरिता हात । दचकलासें लंकानाथ ।
हनुमान वृक्षीं राहे गुप्त । पुढील कथार्थ अवधारा ॥१६४॥
ऋषिरामायणाआंत । सीतारावणशब्दोन्मथित ।
कथा आहे अत्यद्भुत । तितका ग्रंध न धरेचि ॥१६५॥
कथा सांगता संकळित । इतका वाढला पै ग्रंथ ।
वदनी वदविता श्रीरघुनाथ । गुह्य गुह्यार्थ तो जाणे ॥१६६॥
श्रीराम आणि जनार्दन । दोहींमाजी ब्रह्म परिपूर्ण ।
एकाजनार्दना शरण । कथा पावन श्रीरामे ॥१६७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीतारावणसंभाषणं नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥
॥ ओव्या १६७ ॥ श्लोक १ ॥ एवं संख्या १६८ ॥
