त्याचिपरि हा मुरारी
88.
त्याचिपरि हा मुरारी ।
पसरला न दिसेचि ऐसा दुरी ।
चालतू उदगाचिया परी ।
तो असुरी लक्षित ॥१॥
येता देखोनिया कृष्णासी ।
दैत्य हारीखला मानसी ।
म्हणे साधूनिया निजकार्यांसी ।
जाईन अति त्वरेंसी उडोनिया ॥२॥
ऐसे विचारुनिया मानसी ।
पक्ष झाडी अति अवेशी ।
म्हणे कंसाचिया पुण्यराशी ।
झालिया सन्मुख या काळे ॥३॥
आता गिळुनिया नंदकुमारा ।
खोवीन मस्तकी यशाचा तुरा ।
मात जाणवीन रोश्रवरा ।
मथुरेशर जाऊनि उल्हासे ॥४॥
म्हणोनी आता राहे सुखी ।
माझिया बळे तू इहलोकी ।
तोषवीन नृपति पुण्यलोकी ।
आम्हा पाळक दैत्याचा ॥५॥
परी हा मृत्यूचि आला हे नेणतु ।
वृथाचि मनोरथ वाढवितु ।
आपआपणासीची श्रलाघवितु ।
महा मूर्ख तो पापराशी ॥६॥
मग अति आवेशे धाविला ।
कृष्णा झगटावया पातला ।
तव तो तेणे आसूडिला ।
तोंडघशी पडिला चरणातळी ॥७॥
पक्ष धरुनिया दोन्ही हाते ।
उपटूनिया सांडिले परौते ।
लोला करुनिया गोपीनाथे ।
चरणघाते तुडविला ॥८॥
ऐशियापरी घाबरा केला ।
चुंचीत धरुनिया घोळसिला ।
म्हणे मायाविया दाखवी आला ।
मायाप्रतापु या काळे ॥९॥
बहुत दिवस मामाचे अन्न्ा ।
भक्षिले झाडा तो घेईन ।
आजि मृत्युपंथे पाठवीन ।
गौरव करुन ताडनाचा ॥१०॥
ऐसे बोलोनिया श्रीहरि ।
सोडिला तव तो दीर्घ स्वरी ।
गर्जोनिया कृष्णावरी ।
अति तवके उठिला ॥११॥
आधीच तव तो निशाचर ।
रुप धरुनिया भयंकर ।
कृष्णा गिळावया सत्वर ।
मुख पसरुनी धंविला ॥१२॥
हे देखोलि लोक म्हणती ।
गिळिला गिळिला रे श्रीपती ।
वेगी जाऊनिया नंदाप्रती ।
मात जाणवा दसवंतिये ॥१३॥
ऐसा झाला हाहाकार ।
कृष्णे तेचि क्षणी अति सत्वर ।
िफोडूनि जाभाडे दंतावळि चुर ।
करुनिया पाडिला ॥१४॥
मग रगडूनिया पादघाते ।
मुरगाळिली मुंडी होते ।
दैत्य त्यागिता निज देहाते ।
शब्द केला आचाट ॥१५॥
म्हणे धाव धाव कंसासुरा ।
तुझिये काजी वेचलो पुरा ।
निळा म्हणे मग शारंगधरा ।
वरुनी प्राणा ओंवाळिले ॥१६॥
