उगवला दिन प्रभात| स्
1033.
उगवला दिन प्रभात| स्नान संध्या सारोनी समस्त|उद्धव कर जोडोनी बोलत| पूर्ण आर्त सर्वांचें॥१॥
अनुपम इचा महिमा| न बोलवे जाहली सीमा|आता चला वेगी़ पुरुषोत्तमा| आपले आश्रमा पंढरीसी॥२॥
गरुड सामोरा तिष्ठत| भक्त भागवत समस्त|मुनी पुंडलिक विनवित| केले दंडवत साष्टांगें॥३॥
म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदि| वाग् स्नेहो वाक्बुद्धी|परंपरा याचि वैखरी| यासी मंत्रोक्त दिधली॥४॥
ऐसाचि सोपान मार्ग| तूंचि करिता पांडुरंग|ग्राम लेखनाचा प्रसंग| निरोपिला सांग कुळयाती॥५॥
सकळवंश परंपरा| न सोडावे तुम्ही आचारा|आम्ही जातो पंढरपुरा| या विठोबा सांगातें॥६॥
सकळा आलिंगन दिधलें| मग गरुडावरी आरूढले|ज्ञानदेवांनी हरीची पाऊलें| दृढ धरिली निरंतर॥७॥
नामा नाचे हरिद्वारीं| आनंद जाला आळंकापुरीं|विठ्ठल देवो निघाले पंढरी| ज्ञानदेवा समाधि देवोनि॥८॥
