साध्यसाधनकाज निवृत्त
593.
साध्यसाधनकाज निवृत्तिचे गुज ।
केशव सहज सर्वभूती ॥१॥
रामकृष्ण मंत्रे प्रोक्षियेली गात्रे ।
हरिरूप सर्वत्र भरला दिसे ॥२॥
गुरूगम्य चित्त जाले माझे हित ।
दिननिशी प्राप्त हरि आम्हा ॥३॥
पूर्णिमाप्रकाशचंद्र निराभास ।
हरि हा दिवस उगवला ॥४॥
चकोरे सेविती आळीउळे पहाती ।
घटघटा घेती अमृतपान ॥५॥
ऐसे हे पठण ज्ञानदेवा जाले ।
निवृत्तीने केले आपणा ऐसे ॥६॥
अर्थ :
निवृत्तिरायांनी जे गुह्यज्ञान मला दिले ते ज्ञान मी माझे साध्य व साधन ठरविले. त्या योगाने परमात्मा सर्वाभूती भरला आहे. असे मला सहज कळले. त्या गुह्यज्ञानरूप मंत्राच्या योगाने माझी गात्रे अभिमंत्रित होऊन डोळ्यांना जिकडे तिकडे हरीचे रूपच दिसू लागले. गुरूपासूनच केवळ प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा मला लाभ झाल्यामुळे हरि रात्रंदिवस माझ्या जवळच राहिला. पूर्णिमेच्या चंद्राला जसा अत्यंत निर्मळ प्रकाश असतो. त्याप्रमाणे हरीचे रूप माझ्या अंतःकरणांत स्पष्ट दिसू लागले. ज्याप्रमाणे चकोर पक्षी मोठ्या प्रेमाने चंद्रकिरणातील अमृत घटघटा पितात. त्याप्रमाणे निवृत्तिरायांनी मला ज्ञान देऊन आत्मसात केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
