भगवंता तुजकारणे मेलो
85.
भगवंता तुजकारणे मेलो जिताची कैसी । निष्काम बुध्दि ठेली चरण नाही तयेसी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥
भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्दीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वे त्याग केला धांव घातली आता । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आता ॥३॥
संसार सागरु गा भवदु:खाचे मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले का करु दुर्भर रे चांडाळ ॥४॥
तिही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका ।
जाणवी नरनारी जागो धर्म हा लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥
नाठवे आपपर आता काय बा करु । सारिखा दोहीसवा हारपला विचारु ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥६॥
