न देखो सादृश्य हारपे
132.
न देखो सादृश्य हारपे पै दृश्य । उपनिषदांचे पै भाष्य हारपले ॥१॥
ते रूप उघडे कृष्णरूप खेळे । गोपाळांचे लळे पुरविले ॥२॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच । सर्वरूपे साच हरि आम्हा ॥३॥
निवृत्तिचे पर कृष्ण हा साचार । सर्व हा आचार कृष्ण आम्हा ॥४॥
अर्थ:
जगतात दिसणाऱ्या सर्व वस्तुत त्या स्वरुपाचे अस्तित्व असुन त्या रुपातच त्या सर्व वस्तूंचा लय आहे. त्या स्वरुपाचे वर्णन उपनिषदानाही करता येत नाही. तेच रुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोकुळात अवतरले असुन गोकुळवासीयांचे लाड त्यांच्या बरोबर खेळत आहे. त्या रुपाचे दर्शन जरी होत असले तरी त्याला प्रपंच नाही तोच सर्व जगतातील वस्तूंचे जीवाचे रुप घेऊन हरिरुप दाखवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, सर्वांच्या आचाराचे मुळपीठ असलेला तो कृष्ण असुन त्याच रुपात माझ्या समोर साकार झाला आहे.
