(वारकऱ्या बरोबर पत्र
3578.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
यावरी न कळे संचित आपुले । कैसे वोढवले होईल पुढे ॥१॥
करील विक्षेप धाडिता मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥धृपद॥
जोवरी हे डोळा देखे वारकरी । तो हे भरोवरी करी चित्त ॥२॥
आस वाढविते बुद्धीचे तरंग । चित्ताचे ते वेग वावडती ॥३॥
तुका म्हणे तेव्हा होतील निश्चळ । इंद्रिये सकळ निरोपाने ॥४॥
अर्थ :
आता एवढे होऊन देखील माझे संचित कसे आहे ते मला काही कळत नाही पुढे माझे कसे होईल हे ही कळत नाही. माझे संचित कर्म मला मूळ पाठवण्यासाठी मध्येच विक्षेप करीत आहे की मला तत्परतेने मूळ पाठवण्यासाठी तातडी करीत आहे ते काही कळत नाही. जोपर्यंत माझे डोळे वारकऱ्यांना पाहात नाही तोपर्यंत माझे चित्त असेच काहीतरी चित्र विचित्र गोष्टी मनामध्ये आखणार आहेत. माझे बुध्दीचे तरंग तर अनेक प्रकारचे विचार वाढवित आहेत आणि चित्त तर वाऱ्याच्या वेगाप्रमाणेच वावरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी पंढरीहून वारकऱ्यांच्या हाती मला निरोप येईल त्याच वेळी मी निश्चिंत होईल.
