(वारकऱ्या बरोबर पत्र
3577.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
परि तो आहे कृपेचा सागर । तोवरी अंतर पडो नेदी ॥१॥
बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनिया जना उरलासे ॥धृपद॥
सांगितल्याविणे जाणे अंतरिचे । पुरवावे ज्याचे तैसे कोड ॥२॥
बहुमुखे कीर्ती आइकिली कानी । विश्वास ही मनी आहे माझ्या ॥३॥
तुका म्हणे नाही जात वायाविण । पाळितो वचन बोलिलो ते ॥४॥
अर्थ :
पण माझा विठोबा कृपेचा सागर आहे तो त्याच्यामध्ये व माझ्यामध्ये अंतर पडू देणार नाही. माझ्या पाडूरंगाला खूप कान आहेत अनेक डोळे आहेत तो सर्वांना एके वेळी पाहू शकतो एवढे नाही तर जेवढे भक्तमंडळी त्याच्यापुढे उभे आहेत त्यांना पाहून इतरांसाठीही तो शिल्लक राहील. अहो माझ्या विठोबाला जरी काही सांगितले नाही तरी तो सर्वांच्या अंत:करणातील ओळखतो आणि ज्याच्या अंत:करणामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करुन त्याचे सर्व कोडकौतूक तो पूर्ण करतो. देवाची किर्ती मी खूप संतांच्या मुखातून माझ्या कानाने ऐकली आहे व खूप जनांनी त्याची किर्ती केली आहे व देवाविषयीही माझ्या मनामध्ये पूर्णपणे विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने दिलेले वचन देव पाळतोच त्याने कोणतेही वचन दिले तरी ते कधीही वाया जात नाही.
