वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ३. विभीषणाची शरणागती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088153 · अभंग क्र. ३

3.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय तिसरा ॥
रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न :

साधावया रणांगण । मुळींच रावणा अपशकुन ।
श्रीरामे केले छत्रभंजन । अति उद्विग्न लंकेश ॥१॥

विसर्जयित्वा सचिवान्प्रविवेश स्वामालयम् ।
ततो राक्षसमादाय विद्युज्जिव्हं महाबलम् ॥१॥
मायाविनं महाघोरमब्रवीद्राक्षसाधिपः ।
मोहयिष्यामहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥२॥
शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।
मां त्वं समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥३॥
एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।
तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ चास्य भूषणम् ॥४॥

छत्रभंगाचा अपशकुन । तेणे उद्विग्न रावण ।
विसर्जूनियां प्रधान । आला आपण निजधामा ॥२॥
सबळ बळे श्रीरघुनाथा । वानरसैन्य असंख्यातता ।
काय म्या करावे आता । प्रबळ चिंता लंकेशा ॥३॥

रावणाचे विचार :

बळेंचि जानकी भोगू जाता । मजपरीस सबळ सीता ।
ते करु शके माझ्या घाता । मज मारिता ते नये ॥४॥
श्रीरामसेवाअनुवृत्तीं । जन्ममरणाहूनि परती ।
स्वये सीतेची नित्य वस्ती । सीता निश्चिती न मारवे ॥५॥
करिता श्रीरामनामस्मरण । तेणे ये मरणासीच मरण ।
तिसी न चाले मारकपण । सीता संपूर्ण विदेही ॥६॥
करिता श्रीरामनामस्मरण । उठोनि पळे जन्ममरण ।
तिसी न चाले मारकपण । सीता संपूर्ण विदेही ॥७॥
भोगितां न भोगवे सीता । न मारवे मारुं जाता ।
रणी न जिंकवे रघुनाथा । काय मी आता करावे ॥८॥
रणी मारिल्या रघुनाथा । वश्य होय जनकदुहिता ।
श्रीराम न मारवे सर्वथा । छळणे सीता वश्य करु ॥९॥

विद्युज्जिव्ह राक्षसाला सीतेला छळण्याचा आदेश :

स्वये कपटी रावण । विद्युज्जिव्ह कपटी पूर्ण ।
करावया सीताछळण । त्यासी आपण गुज सांगे ॥१०॥
करावया सीतेचे छळण । श्रीरामाचे शिर संपूर्ण ।
मायिक करावे आपण । धनुष्यबाण समवेत ॥११॥
विद्युज्जिव्ह म्हणे आपण । शीघ्र शिर करीन निर्माण ।
त्यासी संतोषोनि रावण । करकंकण अर्पित ॥१२॥

तो विश्वकर्म्याकडे जातो :

मायिक शिर रघुनाथा । करिता न करवे सर्वथा ।
विद्युज्जिव्हां परम चिंता । काय लंकानाथा मुख दाखवू ॥१३॥
मायिक करिता रामशिर । मोडले मुंडले हातियेर ।
जवा न बैसे कोरेकोर । मायिक शिर न करवे ॥१४॥
श्रीराम नव्हे पै रंगिक । रंगे वोरंगले सकळीक ।
विद्युज्जिव्हासी परम दुःख । दशमुख क्षोभेल ॥१५॥
माया जाणोनि समस्ता । माव न चले श्रीरघुनाथा ।
विद्युज्जिव्हासीं परम चिंता । काय म्या आता करावे ॥१६॥
माया नाही श्रीरामासी । मायिक शिर न घडवे त्यासी ।
विद्युज्जिव्ह कासाविसी । विश्वकर्म्यापासीं मग गेला ॥१७॥

त्याला विश्वकर्म्याचे उत्तर :

चरण वंदोनियां त्याचे । मायिक शिर श्रीरामाचे ।
करोनि द्यावे निश्चयाचे । ऐसे वाचे अनुवादे ॥१८॥
विश्वकर्मा वदे साचे । मायिक शिर श्रीरामाचे ।
म्हणता कुष्ठ लागे वाचे । कुळनाशाचें निजमूळ ॥१९॥
जेथे कपट तेथे तळपट । वेदानुवाद घडघडाट ।
भ्रमे भुलला दशकंठ । मरेल स्पष्ट कुळेंसीं ॥२०॥
श्रीराम सत्याचें निजसत्य । माया केवळ मिथ्याभूत ।
त्याचे मायिक शिर येथ । मज निश्चित न करवे ॥२१॥
तुमचे निदान आले गाढे । यालागी कपट मांडले कुडे ।
कपट न चले सीतेपुढे । रणी रोकडे मराल ॥२२॥
ऐसे ऐकता वचन । विद्युज्जिव्ह करी रुदन ।
श्रीरामशिर न नेतां जाण । दशानन मारील ॥२३॥
रावणा सीतासन्निपात । न कळे स्वार्थ ना परमार्थ ।
अवश्य करील माझा घात । तो अनर्थ चुकवावा ॥२४॥
दांतीं धरोनि अंगुंठे जाण । मस्तकी धरिले दृढ चरण ।
तुझा शिष्य मी पुरातन । माझे प्राण वांचवीं ॥२५॥
मायिक विद्येची व्युत्पत्ती । तुजपासून मज प्राप्ती ।
तेचि न चले श्रीरामाप्रती । कृपामूर्ति वांचवीं ॥२६॥
पुढती धरिले दृढ चरण । घालोनिया लोटांगण ।
विश्वकर्मा पै आपण । कृपेनें पूर्ण कळवळला ॥२७॥

विश्वकर्मा ध्यानयोगाने काल्पनिक रामशिर त्याला देतो :

संतचरणरज वंदून । ब्राह्मणचरणतीर्थ प्राशून ।
विश्वकर्मा स्वये आपण । श्रीरामध्यान आरंभी ॥२८॥
जै ब्राह्मणपदरज वंदिती । तै सकळ संपत्तीची अवाप्ती ।
समस्त निर्दळती आपत्ती । श्रीराममूर्ति स्वये भेटे ॥२९॥
ब्राह्मणचरण रजोमहिमान । जे जे वांछिल अर्थ संपूर्ण ।
भुक्ति त्यांपाशीं आंदण । सुप्रसन्न श्रीराम ॥३०॥
विश्वकर्म्याची ध्यानस्थिती । प्रगटली श्रीराममूर्ती ।
मायिक शिराची पै प्राप्ती । वरदोक्ती स्वये मागत ॥३१॥
विश्वकर्म्याची ध्यानमूर्ती । आनुवदे तयाप्रती ।
तुझी मागणी वरदोक्ती । कठिण प्राप्ती ते आइक ॥३२॥
शिर न ये करणी करिता । शिर न घडे स्वचें घडितां ।
काल्पनिक शिरःसंस्था । निजवरदार्था मी देईन ॥३३॥
आरसां बिंबे प्रतिवदन । रुपरेखा समसमान ।
तैसे कल्पित शिर संपूर्ण । समयी जाण पावशील ॥३४॥
जेव्हा मागेल रावण । विद्युज्जिव्ह तेव्हाची जाण ।
काल्पनिक शिर संपूर्ण । स्वये आपण पावेल ॥३५॥
आदर्शांत प्रतिमुख दिसे । परी ते तयामाजी नसे ।
मनःकल्पित शिर तैसे । अनायासें पावसी ॥३६॥
तेही शिर अचेतन । आणिक कल्पित धनुष्यबाण ।
समयी पावेल जाण । ऐसे वरदान पावला ॥३७॥
ऐसे लाहोनि वरदान । विद्युज्जिव्ह येतांचि जाण ।
आशोकवना निघे रावण । अति संपर्णू साटोपे ॥३८॥

अशोकवनिकायां च सीतादर्शनलालसः ।
नैर्ऋतानमधिपतिः संविवेश महाबलः ॥५॥
ततो दीनामदीनां तां ददर्श धनदानुजः ।
अधोमुखी शोकपरामुपविष्टां महीतले ॥६॥
भर्तारमनुध्यायंतीमशोकनिकां गताम् ।
उपसृत्य ततः सीतां प्रहृष्टेनांतरात्मना ॥७॥
इदं च वचनं धृष्टमुवाच जनकात्मजाम् ।
सांत्वमाना मया भद्रे यमाश्रित्य विमन्यसे ॥८॥
खरहंता स ते भर्ता राघवः समरे हतः ।
छिन्नं ते सर्वथा मूलं दर्पश्च निहतो मया ॥९॥
व्य्सनेनात्मनः सीते मम भार्या भविष्यसि ।
विसृजैतां मति मूढे कि मृतेन करिष्यसि॥१०॥

ते रामांचे मस्तक घेऊन रावण अशोकवनात जातोः

करीत हिरखाचा गजर । अशोकवना अति सत्वर ।
स्वये आला दशशिर सीता सुंदर प्रलोभावया ॥३९॥
बाह्य मळीं दिग्ध दिसे दीन । अंतरी सुखैकश्रीरामध्यान ।
सीता देखोनि दशानन । काय आपण जल्पत ॥४०॥
श्रीरामबळाच्या अभिनिवेशीं । माझे वचन उपेक्षिसी ।
रामवाढीव अहर्निशी । प्रजल्पसी सर्वदा ॥४१॥

रावण सीतेला ते शिर दाखवितो :

मारिला म्हणसी त्रिशिरा खर । ऐसा बळिया श्रीरामचंद्र ।
मारुन आला इंद्रजित कुमर । आणिले शिर रामाचे ॥४२॥
माझा राम शूर श्रेष्ठ । माझा राम वीर सुभट ।
राम वानिसी रणश्रेष्ठ । मज फोलकट मानिसी ॥४३॥
ज्याचे धरोनिया बळ । मजसी सदा चालविसी सळ ।
तो म्या केलासे निर्मूळ । वरी तत्काळ मजलागी ॥४४॥
रणी मारिले रघुनाथा । आता कोण सोडवील सीता ।
त्याची सांडोनि चिंता वार्ता । वरी मज लंकानाथा उल्लासें ॥४५॥
गर्वे म्हणसी पातिव्रता । ते तू आतुडसी लंकानाथा ।
तुज मी न सोडी सर्वथा । उल्लसतां वरी मज ॥४६॥
आता रावण न वरिता । तुज तांव गति नाही अन्यथा ।
सांडोनिया अति मूखर्ता । होय तू कांता लंकेशा ॥४७॥
रणी मारिले रामलक्ष्मण । निर्दळिले वानरगण ।
आता तुझा आग्रह कोण । करी रावण प्रियभर्ता ॥४८॥
श्रीराम पडलिया रणी । सौ‍मित्रेंसहित वानरश्रेणी ।
भेरी त्राहाटिल्या निशाणीं । रावण राणी सती सीता ॥४९॥

रावणाची सीतेजवळ प्रौढी :

ऐकोनि श्रीराममरण । सीते न करिसी रुदन ।
मिथ्या म्हणसी माझे वचन । रणकंदन ते ऐके ॥५०॥
ऐसे रावण जल्पतां । कांही न बोले सती ।
समूळ जाणे मिथ्या वार्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्में ॥५१॥
घाला घालोनि इंद्रजित । रणी मारिला रघुनाथ ।
सत्य न मानिसी माझी मात । रणवृत्तांत तो ऐक ॥५२॥

श्रुणु भर्तृवधं सीता घोरं वृत्रवधं यथा ।
बलेन महता रामो व्रजस्तस्तं दिवाकरे ॥११॥
सन्निविष्टः समुद्रस्य तीरमासाद्य चोत्तरम् ।
अथाध्वनि परिश्रांतमर्धरात्रे स्थितं बलम् ॥१२॥
सुखसुप्तं तमासाद्य चरितं प्रथमं चरैः ।
तत्प्रहस्तप्रणीतेन बलेन महता मम ॥१३॥
बलमस्य हतं रात्रौ यत्र रामःसलक्ष्मणः ।
पट्टिशान्परिघांश्चक्राण्यृष्टीर्दंडान्महायुधान् ॥१४॥
उद्यम्योद्यम्य रक्षोमिर्वानरेषु निपातिताः ।
अथ सुप्तस्य रामस्य प्रहस्तेन प्रमाथिना ॥१५॥
असक्तं कृतहस्तेन शिरश्छिन्नं महासिना ॥१६॥

जेंवी इंद्र वधी वृत्रासुरासी । तेंवी राक्षसी वधिले श्रीरामासी ।
भ्रतार वधिला कोणे प्रदेशीं । तेंहि तुजपासी सांगेन ॥५३॥
सेतु बांधोनि सागरी । वानरभार निजगजरीं ।
ऐसा राम समुद्राच्या पारी दक्षिणतीरीं राहिला ॥५४॥
जंव जाला अस्तमान । मार्गी भागिले वानरागण ।
अवघी केले सुखें शयन । रामलक्ष्मणसमवेत ॥५५॥
बिभीषणाचे भय दारुण । तोही जाला निद्रापन्न ।
ऐसी पाळती आणोन पूर्ण । निघे प्रधान प्रहस्त ॥५६॥
ससैन्य इंद्रजित प्रहस्त । घाला घातला रातोरात ।
निद्रिस्थ मारिला रघुनाथ । समवेत सौ‍मित्र ॥५७॥
सुग्रीवादि वानरसैन्य । मध्यरात्रीं निद्रापन्न ।
प्रहस्ते घाला घालोन । रणकंदन ते केले ॥५८॥
फरश पट्टिश तोमर । गदा मुद्‌गल बाण चक्र।
पाचारोनिंया वानर । रणी समग्र मारिले ॥५९॥
निष्ठुर ग्रहस्ताचे कर । छेदोनि श्रीरामाचे शिर ।
येथे आणिले वो साचार । तुझा भ्रतार मारुनी ॥६०॥
श्रीरामाचे धनुष्यबाण । राम मारोनि आणिले जाण ।
ऐसे सांगता दशानन । सीता रुदन करीना ॥६१॥
रणी मारिला श्रीरामचंद्र । सत्य न मानी सीता सुंदर ।
तेणे क्षोभोनि दशशिर । वीरमहामार सांगत ॥६२॥
राम लक्ष्मण निद्रितां घात । सुग्रीवाचा ग्रीवापात ।
आघातें मरे हनुमंत । जांबवंत कटिभंगे ॥६३॥
करोनिया जानुविहीनु । रणी पाडिला इंद्रजानु ।
शळे विदारिला सुषेणु । गंधामादनु पट्टिशे ॥६४॥
वर्षोनिया बाणजाळ । रणी पाडिले नळ नीळ ।
मैंद द्विविद प्रबळ । छेदिलें कपाळ असिधारा ॥६५॥
तार तरळ गवय गवाक्ष । कुमुद महावीर देख ।
पांचही मारिले निःशेख । शस्त्रे अनेक वर्षोनी ॥६६॥
पिकोनियां फणस झडे । तेवी पनसाचे शिर पडे ।
वानर वीर अति गाढे । रणी रोकडे वारिले ॥६७॥
हरिमुख दधिमुख । सुमुख आणि दुर्मुख ।
रणी वानरांचे कटक । एक एक मारिले ॥६८॥
बाहु भेदोनि सहस्कंद । रणी पाडिला अंगद ।
रात्रीं निशाचर प्रबुद्ध । रणविमर्द वानरा ॥६९॥
अश्व रगडिले एक एक । गज मर्दिले अनेक ।
एवं वानरांचे कटक । रणी निःशेख मारिले ॥७०॥
दिवसा सबळ वानर । रात्रीं दुर्धर निशाचर ।
तिही करोनि रात्रीं मार । नर वानर रणी मारिले ॥७१॥

एवं ते निहतो भार्ता ससैन्यो मम सेनया ।
क्षतजार्द्ररजोध्वस्तमिदं तस्याहतं शिरः॥१७॥
विद्युज्जिहृस्तदा गृह्य शिरस्तस्याग्रतःस्थितः ।
तमब्रवीत्ततो राजा रावणो राक्षसं स्थितम् ॥१८॥
विद्युज्जिव्हं महाज्जिव्हं समीपपरिवर्तिनम् ।
अग्रतः कुरु सीतायाःशीघ्रं दाशरथेःशिरः॥१९॥
एवमुक्तं तु तद्रक्षस्तच्छिरः प्रियदर्शनम् ।
पुरो निक्षिप्य सीतायाः क्षिप्रमंतरधीयत॥२०॥
रावणश्चापि चिक्षेप भासुरं कार्मुकं तदा ।
त्रिपु लोकेषु विख्यातं रामस्य तदिति ब्रवन्॥२१॥

माझे सैन्य सेनानी निशाचर । जावोनि रातोराती सत्वर ।
निजल्या जागीं मारोनि रगुवीर । त्याचे शिर आणिले ॥७२॥
माझ्या वचनाची वचनोक्ती । सत्य न वाटे सीतेप्रती ।
हे घे शिर देतों हाती । भेट निजपतीसीं स्वानंदे ॥७३॥
ऐकोनि रावणाची गोष्टी । सिता सज्ञान पै मोठी ।
पालवीं बांधिली शकुनगांठी । अचुक भेटी श्रीरामी ॥७४॥
शत्रुमुखींचें वचन । वदविता राम चिद्धन ।
तुज भेटवितों रघुनंदन । राम परिपूर्ण भेटेल ॥७५॥
रावण बोले उपहासता । शीघ्र भेटवीन रघुनाथा ।
तोही शकुन मानी सीता । छळणार्थता शिर दावी ॥७६॥
गर्जोनि बोले दशशिर । विद्युज्जिव्ह येईं शीघ्र ।
श्रीरामाचे शिर सुंदर । देई सत्वर सीतेसी ॥७७॥

त्याचा सीतेवर झालेला अनुकूल परिणाम :

मायिक शिर सीतेसी देता । विद्युज्जिव्हा चळीं कंपता ।
रावण दंडील न देता । अति भीतता देतसे ॥७८॥
मिथ्या शिर सीतेसी देता । क्षोभे शापील पतिव्रता ।
विद्युज्जिव्हा भयभीतता । अदृश्यता पळाला ॥७९॥
मिथ्या जाणोनि श्रीरामशिर । तेथेंही सीता भजनतत्पर ।
स्वये देखता दाशशिर । करी नमस्कार साष्टांग ॥८०॥
श्रीरामाचे धनुष्यबाण । देखोनिया सीता आपण ।
अनन्य घाली लोटांगण । स्वये रावण देखता ॥८१॥
श्रीरामशिर देखोनि छिन्न । सीता मिथ्या करी रुदन ।
रुदनामाजी महिमान । ऐके रावण तैसे गाय ॥८२॥
जन्ममरणापरता । नित्यवस्ति श्रीरघुनाथा ।
त्यासी राक्षसी केल्या घाता । केंवी सत्यतां घडे रामा ॥८३॥
निजबळे स्वये खद्योत । सूर्याचा करी घात ।
तरी राक्षसी रघुनाथ । रणाआंत न मारवे ॥८४॥
श्रीराम नित्य सावधान । जागृतिस्वप्न-सुषुप्तिविहीन ।
त्यासी निद्रिता राक्षसीं हनन । केले हे वचन केंवी घडे ॥८५॥
धूमें धुरकटेना आकाशशशी । तेंवी निद्रा न लागे श्रीरामासी ।
सूखावस्था वधिले त्यासी । निश्चयेसी केवी मानू ॥८६॥
उदकी असोनिया गगन । अंगी न लागे ओलेपण ।
तेंवी श्रीराम द्वंद्वविहीन । त्यासी मरण केंवी मानूं ॥८७॥
पर्जन्यधारा समुद्रासी । कदा न रुपती ज्याच्या त्यासी ।
तेंवी शस्त्रे श्रीरामासी । निजांगासीं न लागती ॥८८॥
उंदीर कराडूं शके चांदु । तरी श्रीरामा शिरच्छेदु ।
करु न शके राक्षस मंदु । अबद्ध बोधु केंवी मानूं ॥८९॥

हाही कपटी प्रयत्‍न व्यर्थ गेला म्हणून रावणाचा जळफळाट :

ऐसे श्रीरामपवाडे पढत । सीता उकसाबुकसीं स्फुंदत ।
तंव रावण चरफडत । सीता छळणार्था मानीना ॥९०॥
स्वयंवरीं वाहता त्र्यंबक । केले रावणाचे काळे मुख ।
त्या रामाचे प्रचंड धनुष्य । कोण मशक आणू शके ॥९१॥
श्रीरामाचा निजबाण । रणी करुनि रिपुमर्दन ।
स्वये भातां रिघे परतोन । वेगळा कोण करु शके ॥९२॥
ऐकता सीतेचे रुदन । ललाट पिटी दशानन ।
सर्वथा सीतेसी न चले छळण । तळमळी पूर्ण अभिलाषें ॥९३॥
तळमळितां दशानन । तंव झाले आनेआन ।
श्रीरामशिराचे परिज्ञान । पाहे सुचिन्ह जानकी ॥९४॥

सासीता तच्छिरो दृष्ट्वा तच्च कार्मुकमुत्तमम् ।
नयने मुखवर्णं च भर्तुस्तत्सदृशं भवेत् ॥२२॥
अंतर्धानं च तच्छीर्ष तच्च कार्मुकमुत्तमम् ।
जगाम रावणस्यैव निर्याणसमनंतरम् ॥२३॥

सादरें पाहे सीता सुंद्र । श्रीरामासारिखें शिर ।
परी रामाचे नव्हे साचार । वदे गंभीर श्लोकपद ॥९५॥
श्लोकपद अति सुरस । श्रीरामशिरेसीं सादृश्य ।
हाचि पदगर्भविलास । जाणे अनायासें जानकी ॥९६॥
श्लोकपदगर्भ गंभीर । श्रीरामशिरासारिखें शिर ।
रघुनाथाचें नव्हे साचार । सीता सुंद्र स्वये जाणे ॥९७॥
नेत्र वक्त्र श्रवण घ्राण । ओष्ठ वदन भंवया दर्शन ।
श्रीराममुखासीं समान । केले आनेआन कृत्रिम ॥९८॥

सीता घाबरली नाहीः

मिथ्या देखोनि श्रीरामघाता । गजबजिली नाही सती सीता ।
राक्षसा न मारवे रघुनाथा । समूळ कथा अवधारा ॥९९॥
शस्त्रे सतेज सज्जून । सर्वथा न छेदवे गगन ।
तेंवी श्रीरामशिरच्छेदन । राक्षसा जाण न करवे ॥१००॥
शस्त्र करांडिता दुधार । मुखच्छेदें मरे उंदीर ।
राक्षसा न छेदवे श्रीरामशिर । रामे निशाचर मरतील ॥१॥
सर्वही रस चाखे माशी । दीप चाखितां पोळे मुखासी ।
राम न मारवे राक्षसांसी । श्रीराम त्यांसी प्राणांत ॥२॥

सीतेच्या नजरेपुढून ते शिर अदृश्य झालेः

कृत्रिमशिर रघुनाथा । घडितां न घडवे सर्वथा ।
सादर पाहू जाता सीता । अदृश्यता उडालें ॥३॥
शिर देवोनियां सीतेच्या करी विद्युज्जिव्ह पळे बाहेरी ।
सीता पाहता शिर निर्धारी । क्षणामाझारीं अदृश्य ॥४॥
थिल्लरीं सूर्य बिंबला पाही । काढू जाता तो तेथे नाही ।
कल्पित शिराची नवायी । ठायींच्या ठायी अदृश्य ॥५॥
कल्पित शिरेसीं धनुष्यबान । सीतेनें पाहता निर्धारुन ।
अदृश्यगती गेले उडोन । सत्य संपूर्ण ते नव्हे ॥६॥
सीतेचिये दृष्टीपुढें । सर्वथा राहो न शके कुडे ।
मिथ्यात्वे ते समूळ उडें । मागे पुढे श्रीराम ॥७॥
सीतासतीचा भजनानुक्रम । नयनी राम वदनी राम ।
शयनी राम जीवनीं राम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥८॥
स्मरणी राम करणीं राम । पंचभूतेंसीं धरीणीं राम ।
क्षराक्षरेंसीं वाणी राम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥९॥
कर्मी राम धर्मी राम । आश्रम विश्राम स्वये राम ।
सदा स्वधर्मी श्रीराम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥११०॥
गति श्रीराम स्थिति श्रीराम । वृत्ति श्रीराम धृति श्रीराम ।
सर्वा भूती सदा श्रीराम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥११॥
ऐसियापरी सीता सती । विनटली श्रीरामभक्ती ।
तिसी न चले छळणोक्ती । लंकापति अति मुर्ख ॥१२॥

एतस्मिन्नतरे द्वाःस्थो रावणाय न्यवेदयत् ।
कार्यमात्यंतिकं घोरं सज्ञया भ्रांतलोचनः॥२४॥

त्याच वेळी द्वारपाळ श्रीरामांच्या आक्रमणाची वार्ता आणतो :

तेचि समयी अति विव्हळ । उत्तरद्वारीचा द्वारपळ ।
रावणेंसीं बोले बरळ । नेत्री विव्हळ भयभीत ॥१३॥
सपरिवार वानरगण । लावोनियां भेरी निशाण ।
लंके आले रामलक्ष्मण । दुर्धर बाण सज्जूनी ॥१४॥
विध्वंसूनि लंकाभुवन । राक्षसांसी करुनि कंदन ।
वधावया दशानन। दोघे जण स्वये आले ॥१५॥
अजूनि काय सीतेंसी छळ । संग्रामासी नीघ तत्काळ ।
नातरी देवोनि जनक्बाळ । शरण केवळ रिघे रामा ॥१६॥
द्वारपाळें रावणापासी । गोष्टी सांगतांचि ऐसी ।
छळण सांडोनि सीतेसी । निजसभेसीं स्वये आला ॥१७॥

सीतां तु मोहितां ज्ञात्वा सरमा नाम राक्षसी ।
तांसमाश्वासयामास सखीस्नेहेन सुव्रताम्॥२५॥
न हतो राघवः सीते श्रीरान शत्रुनिबर्हणः ।
रावणेन नृशंसेन माया मायाविना कृता॥२६॥

सरमा सीतेला धीर व आश्वासन देतेः

रावणे ठेविली राखण । सरमा नामे राक्षसी जाण ।
तिसी सीतेसी आप्तपण । मैत्री पूर्ण सदाकाळी ॥१८॥
रावणे सीतेसी केले छळण । ऐसे जाणोनि संपूर्ण ।
सरमा तिसी आपण । आश्वासून अनुवादे ॥१९॥
तुज छळावया येथ । मिथ्यावादी लंकानाथ ।
नाही वधिला रघुनाथ । होईं तू स्वस्थ जानकिये ॥१२०॥
सरमा वदे जाणोनि पूर्ण । स्वस्थ श्रीराम लक्ष्मण ।
स्वस्थ लाडका हनुमान । वानरगण स्वस्थ सुखी ॥२१॥
तुझे करावया छळण । मायिक शिर धनुष्यबाण ।
रावणे दाखविले जाण । कपटी पूर्ण महापापी ॥२२॥
श्रीरामेंसहित कपिकटक । अंगद सुग्रीवादि देख ।
वधावया दशमुख । लंकेसंमुख स्वये आले ॥२३॥
पैल पाहे वानरभार । करील आले गडगजर ।
ऐकोनि सरमेचें उत्तर । सुखनिर्भर जानकी ॥२४॥
सीतेनें देवोनि अलिंगन । हर्षे दिधले करकंकण ।
एका जनार्दना शरण । समाधान श्रीरामे ॥२५॥
श्रीरामे सुखसंपत्ती । श्रीरामे सुखैकप्राप्ती ।
श्रीरामे सीता सती । छळणार्थी छळेना ॥१२६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
जानकीच्छलनं कपटशिरोदर्शनं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
ओंव्या ॥१२६॥ श्लोक ॥२६॥ एवं ॥१५२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग