॥ श्रीएकनाथमहाराजकृत
27.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्ताविसावा ॥
कुंभकर्णावर सुग्रीवाचा विजय
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
स्वये बोले श्रीरघुनंदन । सुग्रीव आणि कुंभकर्ण ।
दोघांसी मांडलेंसे रण । सावधान अवधारा ॥१॥
उत्पपात तदा वीरः सुग्रीवो वानराधिपः ।
सशालहस्तः सहसा समाविध्य महाबला ॥१॥
अति दुद्राव वेगेन कुंभकर्ण महाबलम् ।
तमापतंतं संप्रेक्ष्य कुंभकर्ण प्लवंगमम् ॥२॥
तस्थौ विवृत्तसर्वांगो वानरेंद्रस्य संमुखः ।
कुंभकर्णं स्थितं दृष्ट्वा।सुग्रीवो वाक्यमब्रवीत ॥३॥
विहताश्च त्वचा वीराः कृतं कर्म सुदुष्करम् ।
सहस्वैकं निपातं मे शालवृक्षस्य राक्षस ॥४॥
हनुमंताच्या धर्मयुद्धनीतीमुळे कुंभकर्णाला आदर वाटतो :
सुग्रीव कपिराज आपण । लक्षोनिया कुंभकर्ण ।
सवेग करोनि उड्डाण । आला गर्जोन शालहस्ती ॥२॥
कुंभकर्ण अति विस्मित । मज उचलोनि हनुमंत ।
होता गरगरा भोवंडित । तो का न मरितां स्वये गेला ॥३॥
मज कुंभकर्णाची शक्ती । क्षणार्धे केली न सरती ।
निधडा बळियाढा मारुती । धर्मस्थितीं रणयोद्धा ॥४॥
एकावरी दोघे जण । श्रेष्ठीं करु नय रण ।
ते धर्मशास्त्र प्रतिपाळून । स्वस्थ ठेवून मज गेला ॥५॥
बळे भवंडिता आकाशी । येता देखोनि सुग्रीवासी ।
मज स्वस्थ ठेवोनि भूमीसीं । श्रीरामापासी स्वये गेला ॥६॥
हा तंव नव्हे हनुमंत । सुग्रीवराजा अति विख्यात ।
याचा करीन मी घात । संग्रामात निमेषार्धे ॥७॥
सुग्रीव व कुंभकर्णाचे परस्परांना आव्हान :
ऐसे बोलोनि आपण । सुग्रीवातें अनुलक्षून ।
संमुख आला कुंभकर्ण । शूळ घेऊन साटोपे ॥८॥
शूळहस्ती शालहस्ती । दोघे वीर भद्रजाती ।
येरयेरांतें निर्भर्त्सिती । स्वये बोलती नोकोनी ॥९॥
संमुख देखोनि कुंभकर्ण । सुग्रीव स्वये बोले आपण ।
नीचा कपीसी करोनि कंदन । दादुलपण मिरविसी ॥१०॥
आता मी आलो शालहस्ती । किती आहे तुझी शक्ती ।
ते दाखवीं का मजप्रती । रणव्युत्पत्ती विचारोनी ॥११॥
मी एकला शालहस्ती । श्रीरामसेवक भद्रजाती ।
तुझी करीन समाप्ती । रणव्युत्पत्ती महामारें ॥१२॥
ऐकोनि सुग्रीव वचन । हासोन बोले कुंभकर्ण ।
वीर न बोलती आंगवण । करोनि रण दाविती ॥१३॥
जे का बहुविध जल्पती । त्यांसी नाही संग्रामभक्ती ।
जरी तू होसील पुरुषार्थी । करोनि ख्याती दावी मज ॥१४॥
सुग्रीवासी करावया रण । कुंभकर्णा उल्लास पूर्ण ।
सरसावले दोघे जण । अति निर्वाण संग्रामी ॥१५॥
स कुंभकर्णस्य वचो निशम्य व्याविध्य शैलं सहसा ममोच ।
तेनाजघानोरसि कुंभकर्णं शैलेन शकाशनिसन्निभेन ॥५॥
तच्छैलशृंगं सहसा प्रभग्नं । भुजांतरे तस्य तदा विशाले ।
सशैलशृंगाभिहतश्चुकोप ननाद रोषाच्च विवृत्य वक्रम् ॥६॥
विन्याध शूलं च तडित्प्रकाशं चिक्षेप हर्यृक्षपतेर्वधाय ।
तत्कुंभकर्णस्य भुजप्रणुन्नं शूलं शितं कांचनदामजुष्टम्॥७॥
क्षिप्रं समुत्पत्य विगृह्य दोर्भ्यां । बभंज विरस्तरसा बलेन ॥८॥
कृतं मारसहस्रस्य शूलं कालयसं दृढम् । बभंज जानुमारोप्य संप्रहृष्टःप्लवंगमः ॥९॥
सुग्रीव-कुंभकर्ण यांचे द्वंद्वयुद्ध :
ऐकोनि कुंभकर्णवाक्यासी । कोपा आला सुग्रीवासी ।
शूळ हाणिता आवेशी । शालवृक्षीं त्यासी ठोकिलें ॥१६॥
शाल लागता भुजांतरी । शूळ पडिला धरेवरी ।
कुंभकर्णा आली घेरी । अर्धचंद्री लागली ॥१७॥
विकळ जाता चांचरी । राक्षस मूर्च्छेतें सांवरी ।
शूळ घेवोनिया करी । सुग्रीवावरी धांविन्नला ॥१८॥
कुंभकर्णें अर्ध क्षणी । वानरराज पाडीला रणी ।
राक्षससैन्याचिया श्रेणी । आल्हादोनी गर्जती ॥१९॥
शूळ ताडिता कोपेंकरी । सुग्रीवबळाची पै थोरी ।
उडोनि शूळ दोही करी । वरिच्यावरी झेलिला ॥२०॥
जैसे उंसाचें करबाड । गुडघीं घालोनि मोडिती गोड ।
तैसा शूळ अति प्रचंड । केला दुखंड सुग्रीवे ॥२१॥
शतत्रय पुरुषांसी । शूळ नुचले अति आवेशी ।
सुग्रीवे झेलोनि आकाशी । जानुप्रदेशी मोडिला ॥२२॥
निखळ तिख्याचा धगधगित । तुळितां भार शतानुशत ।
रत्नालंकारीं लखलखित । अत्यद्भुत महाशूळ ॥२३॥
तोही वरच्यावरी झेलोनी । सुग्रीवे सांडिला मोडूनी ।
हरिखें श्रीरामनामवाणी । गर्जत रणी महावीर ॥२४॥
शूळ भंगिता सत्वर । स्वर्गी नाचती सुरवर ।
सुग्रीवराजा महाथोर । कर्म दुर्धर स्वये केले ॥२५॥
स तं तदा भग्नमवेक्ष्य शूलं चुकोप रक्षोऽधिपतिर्महात्मा ।
उत्पाट्य शृंगं सहसा गिरेस्तज्जघान सुग्रीवमभिप्रतर्दन् ॥१०॥
स शैलशृंगाभिहतो विसंज्ञं पपात भूमौ युधि वानरेंद्रः ।
तं प्रेक्ष्य भूमो पतितं विसंज्ञं नेदुःप्रहृष्टा युधि यातुघानाः ॥११॥
ततस्तमासाद्य जगाम वीरं संस्तूयमानो युधि राक्षसौधैः ।
शृण्वन्निनादं त्रिदिवालयानां प्लवंगराजग्रहविस्मितानाम् ॥१२॥
ततस्तमादाय तदा स मेने हरींद्रमिंदोपममिंद्रवीर्यः ।
अस्मिन्हते सर्वमिदं प्रशांतं सराघवं सैन्यमितींद्रशत्रुः ॥१३॥
सुग्रीवाने शूळ मोडल्याबद्दल कुंभकर्ण विस्मित होतो :
जेणे शूळे सुरासुर । यक्ष गंधर्व किन्नर ।
रणी भगिला अमरेंद्र । तो येणे सत्वर मोडिला ॥२६॥
माझा शूळ अत्यद्भुत । झेलून भंगिला आकाशांत ।
तेणे कुंभकर्ण विस्मित । धन्य पुरुषार्थ सुग्रीवा ॥२७॥
शूळ भंगिला महाथोर । तेणे कोपला निशाचर ।
घेवोनिया गिरिशिखर । सुग्रीवावरी टाकिलें ॥२८॥
कुंभकर्णाच्या गिरिशिखराच्या प्रहाराने सुग्रीव मूर्च्छित :
सुग्रीव उडता आकाशी । शिखर आदळिलें उरासीं ।
मूर्च्छित पडिला भूमींसीं । संज्ञा त्यासी असेना ॥२९॥
कुंभकर्णे अर्ध क्षणी । वानरराजा पाडिला धरणी ।
राक्षसवीरांची श्रेणी । उठली गर्जोनी जयजयकारें ॥३०॥
वानरराजा रणांत । मज जाला हस्तगत ।
यश आले अत्यद्भूत । रणी डुल्लत कुंभकर्ण ॥३१॥
सुग्रीव मारिला रणांत । वानरसेना हताहत ।
रामसौमित्र हनुमंत । तेही समस्त मारीन ॥३२॥
मज विचरता रणाआंत । बापुडे मनुष्य रघुनाथ।
मुख्य मारिल्या हनुमंत । रणकंदनार्थ संपला ॥३३॥
यश मिरवावया रावणाजवळी । सुग्रीव वीर आतुर्बळी ।
स्वये सुनी काखेतळी । निघे तत्काळी लंकेसी ॥३४॥
निशाणे त्राहाटिल्या भेरी । भाट गर्जती कैवारीं ।
स्तुती करिती निशाचरी । लंकेमाझारी निघाला ॥३५॥
विद्रुतां वाहिनीं दृष्ट्वा वानराणां ततस्ततः ।
कुंभकर्णेन सुग्रीवं गृहीतं चापि वानरम ॥१४॥
हनुमांश्चिंतयासास मतिमान्मारुतात्मजः ।
एवं गृहीते सुग्रवे कि कार्यं वै मया भवेत ॥१५॥
यत्तु न्याय्यं मया कर्तु तत्करिष्यामि सर्वथा ।
भूत्वा पर्वतसंकाशो नाशयिष्यामि राक्षसम ॥१६॥
मया विमोक्षितस्यास्य सुग्रीवस्य महात्मनः ।
अप्रीतिश्च भवेत्काष्टा कीर्तिनाशश्च शाश्वतः ॥१७॥
वानरसैन्यांत कल्लोख व हनुमंताची विचारसरणी :
कुंभकर्णे रणाभिनिवेशीं । धरोनि नेतां सुग्रीवासी ।
प्रळय मांडिला वानरांसी । पळती चौपासी किरकिरत ॥३६॥
ते देखोनि हनुमंत । स्वये उठिला बळान्वित ।
सोडवावया वानरनाथ । असे गर्जत साटोपे ॥३७॥
धरोनि नेतां मुख्य धुर । उगेच पाहती वानर ।
तैसा नव्हे मी किंकर । करीन उद्धार स्वामिकार्याचा ॥३८॥
हाणोनि मुष्टिघात । सोडवीन कपिनाथ ।
कुंभकर्णाचा करीन घात । असे गर्जत साटोपे ॥३९॥
मारोनिया कुंभकर्णासी । म्या न सोडवितां सुग्रीवासी ।
परम अपकीर्ति रायासी । प्राण लाजेसी सांडील ॥४०॥
रणी मारिता कुंभकर्ण । मज न लागे अर्ध क्षण ।
लाजें सुग्रीव सांडील प्राण । यालागी आपण स्थिर व्हावे ॥४१॥
श्रीराम सहमत :
संज्ञा सांगे रघुनंदन । सुग्रीव स्वांगे आपण ।|
करील आपली सोडवण । तुम्ही आंगवण न करावी ॥४२॥
तुम्ही करिता पुरुषार्थ । राक्षस त्याचा करितील घात ।
तेंव्हा होईल अनर्थ । उगे स्वस्थ रहा येथे ॥४३॥
ऐसे सांगता रघुनाथ निवांत ।
उगा राहिला हनुमंत । पुढील कार्यार्थ अवधारा ॥४४॥
लंकामार्गात कुंभकर्णास अपशकुन :
लंके जाता कुंभकर्ण । त्यासी होती अपशकुन ।
आडवे जाती बिडालगण । करिती रुदन म्यांव शब्दे ॥४५॥
स कुंभकर्णोऽथ विवेक लंका । स्फुरंतमादाय महाहरिं तम् ।
विमानचर्यागृहगोपुरस्थैः। पुष्पाग्रवर्षेरभिपूज्यमानः ॥१८॥
ततः स संज्ञा प्रतिलक्ष्य कृच्छ्राद्वलीयसस्तस्य भुजांतरस्तथः ।
अवेक्षमाणः पुरराजमार्गं । विचिंतयामास मुहुर्महात्मा ॥१९॥
एवं गृहीतेन कथं नु नाम । शक्यं मया संप्रति कर्तुमद्य ।
तथा करिष्यामि यथा हरीणां । भविष्यतीष्टं मम चैव पथ्यम् ॥२०॥
ततः कराग्रैः शसोर्ध्वमेत्य राजा हरीणाममरेंद्रशत्रोः ।
चकर्त कर्णौ दशनैश्च नासां । ददार पार्श्वेषु च कुंभकर्णम् ॥२१॥
कुंभकर्णाचे लंकावासीयांकडून अभिनंदन :
सुग्रीव धरिला कपिनाथ । महायशें मदोन्मत्त ।
कुंभकर्ण लंकेआंत । असे जात उल्लासें ॥४६॥
लंकामंदिरे विमानाकारी । त्यांवरी राहूनि नरनारी ।
हर्षे कुंभकर्णावरी । सुमनधारी वर्षती ॥४७॥
घरोघरींच्या नारी उल्लासीं । अक्षता टाकोनियां शिशीं ।
ओंवाळिती कुंभकर्णासी । विजयाभिनिवेशीं जातसे ॥४८॥
बिभीषणाची निजकांता । जे का परम पतिव्रता ओवाळिता ।
विपरीतता तेथे जाली ॥४९॥
कुंभकर्णावर टाकलेल्या अक्षता सुग्रीवावर पडून सुग्रीव सावध होतो :
कुंभकर्ण उंच भारी । अक्षता न वचती तेथेवरी ।
त्या पडिल्या सुग्रीवाच्या शिरी । म्हणे झडकरी विजयी होईं ॥५०॥
पतिव्रतेचे वचन । सुग्रीवासी फळले पूर्ण ।
मूर्च्छा जावोनि संपूर्ण । सावधान स्वये जाला ॥५१॥
कुंभकर्णाच्या जयोन्मादात सुग्रीव त्याचे नाक व कान तोडतो :
कुंभकर्णाचे काखेभीतरीं । धरोनि आणिले लंकापुरीं ।
सुटका होय कैशापरी । ऐसे विचारी सुग्रीव ॥५२॥
श्रीरामनामा या आवर्ती । सकळ श्रमांची निवृत्ती ।
तत्काळ होय बंधमुक्ती । ते स्मरे चित्ती सुग्रीवः ॥५३॥
करिता रामनामस्मरण । सुग्रीव सुटला संपूर्ण ।
विटंबावया कुंभकर्ण । स्वये आपण विचारी ॥५४॥
निघोनिया काखेबाहेरी । बैसोनि त्याच्या उरावरी ।
नाका कानां केली बोहरी । तेही परी अवधारा ॥५५॥
मदोन्मत्त बळोन्मत्त । राजोन्मत्त ।
विजयोन्मत्त महामत्त । पंचोन्मत्त कुंभकर्ण ॥५६॥
पंचोन्मत्ताची पै भुली । सुग्रीव सुटला काखेतळीं ।
कुंभकर्णा नाठवे ते काळी । विजयोन्मेळीं उन्मत्त ॥५७॥
कुंभकर्णाचे नाक व कान घेऊन सुग्रीवाचे उड्डाण :
सुग्रीव बैसोनि उरेंसी । नखी छेदिलें नाकासी ।
दांती छेदिलें कानासी । गेला आकाशी उडोनी ॥५८॥
पंचोन्मत्त आवेशी । देह नाठवे कुंभकर्णासी ।
विटंबिलें नाककानांसी । हे तयासी स्मरेना ॥५९॥
स कुंभकर्णो हृतकर्णनासो । भृशं नदन्वेदनयान्वितश्च ।
रोषाभिभूतः क्षतजार्द्रगात्रः । सुग्रीवमाविध्य पिपेष भूमौ ॥२२॥
स भूतले भूरिबलेन पिष्टः । सुरारिभिस्तैरभिहन्यमानः ।
जगाम खं कंतुकवज्जवेन । पुनश्च रामं सहसा जगाम ॥२३॥
नाक कापोनि दोही हाती । कान छेदोनिया दांती ।
गगना उसळला कपिपती । हे नेणे निश्चिती कुंभकर्ण ॥६०॥
कुंभकर्णाचे विद्रुप रुप पाहून लंकाजनांचा विषाद :
जेंवी मद्यपी विसरे शरीर । तेंवी देह विसरे निशाचर ।
काय करोनि गेला वानर । न कळे विचार कुंभकर्णा ॥६१॥
यशोमदें डुल्लत । लंकेमाजी असे जात ।
नाककाना जाला घात । नेणे वृत्तांत् कुंभकर्ण ॥६२॥
कुंभप्राय वाटोळे कान । यालागी नांव कुंभकर्ण ।
वानरे छेदिले ते श्रवण । आता विकर्ण शोभत ॥६३॥
स्वर्गी सुरवरी पिटिली टाळी । बाप सुग्रीव आतुर्बळी ।
निष्टोनियां काखेतळीं । केली होळी नाककानां ॥६४॥
सुग्रीव उसळोनी गगना । तेथून सांडिता नाककानां ।
दडपोनि राक्षसांची सेना । मुकली प्राणा लक्षांत ॥६५॥
कुंभकर्णनाकाची बोहरी । धाड आली लंकेवरी ।
बोंब सुटली घरोघरी । राक्षसहारी निमाल्या ॥६६॥
छेदोनियां नाककान । सुग्रीवे करोनि उड्डाण ।
श्रीरामाचे ठाकिले चरण । यशस्वी पूर्ण कपिनाथ ॥६७॥
सुग्रीवाच्या आगमनाने रामांना व वानर सैन्याला हर्ष :
सुग्रीव येवोनि आपण । घालोनिया लोटांगण ।
वंदिता श्रीरामाचे चरण । केले गर्जन वानरी ॥६८॥
निशाणे त्राहाटिल्या भेरी । गुढिया उभविल्या वानरी ।
रामनामाच्या गजरीं । जयजयकारीं गर्जती ॥६९॥
आमुचा राज बळिवंत । कुंभकर्ण बळोन्मत्त ।
त्याच्या नाककानां करोनि घात । विजयान्वित स्वये आला ॥७०॥
सुग्रीवाचे निवेदन व रामनामाचा महिमा कथन :
स्वये सुग्रीव सांगे आपण । श्रीरामा ऐके सावधान ।
वृथा आमची आंगवण । तुजवीण रघुनाथ ॥७१॥
कुंभकर्णे धरिता जाण । निःशेष जाता माझा प्राण ।
आठवताचि नामस्मरण । आले स्फुरण मज तेव्हा ॥७२॥
रामनामाच्या बळापुढें । राक्षसबळ ते बापुडे ।
मशक मानू घुंगरडें । मज बळ गाढे रामाचे ॥७३॥
रामनामबळें जाण । त्याचे छेदिले नाक कान ।
नामे पावलों तुझे चरण । विजयी संपूर्ण रामनामे ॥७४॥
नामापासीं यश कीर्ती । नामापासीं विजयवृत्ती ।
नामापासी भुक्ति मुक्ती । रामनाम स्मरती ते धन्य ॥७५॥
धन्य श्रीरामाचे चरण । धन्य श्रीरामाचे दर्शन ।
धन्य श्रीरामाचे स्मरण । बंदिमोचन रामनामे ॥७६॥
धन्य श्रीरामाची कीर्ती । धन्य श्रीरामभजनभक्ती ।
धन्य श्रीरामनित्यानुवृत्ती । नाम स्मरती ते धन्य ॥७७॥
नामासी नाही विधिविधान । नामासी न लागे कर्मबंधन ।
नामाचि दासासीं अनुष्ठान । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥७८॥
नामासी न लागे सूतक । नाम भस्म करी पातक ।
नाम सर्वथा नित्य निर्दोख । सरतें सुख रामनामे ॥७९॥
नामासी नाही अनाध्यावो । नामस्मरणी नित्य स्वाध्यावो ।
नाम स्मरती ते सभाग्य पहा हो । नाम स्वयमेव परब्रह्म ॥८०॥
ऐसे बोलता सुग्रीवासी । प्रेम ओसंडलें श्रीरामासी ।
आलिंगोनियां हृदयासीं । आपणापासीं बैसविला ॥८१॥
हनुमंताची सुग्रीव क्षमा मागतो :
जीवापरीस परम आप्त । सुग्रीवा मानी श्रीरघुनाथ ।
तोही उठोनिया त्वरीत । चरण धरित हनुमंताचे ॥८२॥
माझे अपराध समस्त । क्षमा करावे त्वा निश्चित ।
म्या केले गा जे उद्धत । ते सावचित्त अवधारी ॥८३॥
तुझिया संग्रामाआड । मी आलो गा महामूढ।
विचार न करिता दृढ । केला कैवाड संग्राम ॥८४॥
तुझिया संग्रामा अभक्ती । मी पावलों बंधनप्राप्ती ।
सुटलों रामनामानुवृत्तीं क्षमा मारुति मज कीजे ॥८५॥
मी सुग्रीव प्रतापराशी । केंवी सांपडें कुंभकर्णासी ।
तुझिया संग्राविक्षेपासी अडकलों ॥८६॥
तेव्हा आठवावया श्रीरघुनाथ । हनुमानसद्गुरुकृपा समर्थ ।
येणे जालो नित्यमुक्त । जाण निश्चित कपिवर्या ॥८७॥
तुवा भेटविला श्रीरघुनाथ । तू गुरु आम्ही शिष्य समस्त ।
जे जे केले म्या उद्धत । क्षमा समस्त मज कीजे ॥८८॥
हनुमंताचे परिवर्तन :
ऐकोनी सुग्रीवाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
येरें दिधले आलिंगन । समाधान श्रीरामे ॥८९॥
दोघांचे गेले गुणागुण । दोघा नाठवे दोनपण ।
एका जनार्दना शरण । कृपा पूर्ण श्रीरामाची ॥९०॥
करिता रामनाम स्मरण । सुग्रीवे विटंबिला कुंभकर्ण ।
एका जनार्दना शरण । गोड निरुपण पुढे आहे ॥९१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवकुंभकर्णयुद्धे सुग्रीवविजयप्राप्तिर्नाम सप्तविंशतितमोऽध्यायः ॥२७॥
ओंव्या ॥९१॥ श्लोक ॥२३॥ एवं संख्या ॥११४॥
