॥ श्रीएकनाथमहाराजकृत
63.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय त्रेसष्टावा ॥
रावणाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
उभय सैन्याला उद्देशून रावणाने केलेली श्रीरामांची स्तुती :
श्रीरामे रावण जाण । निजबोधबाणेंकरुन ।
निवटिंतांचि संपूर्ण । काय दशानन बोलत ॥१॥
ऐका गा हे सेनास्थित । नर वानर राक्षस बहुत ।
उभय सेनेचे समस्त । माझा वचनार्थ परिसावा ॥२॥
ऐकोत देव दानव । यक्ष आणि गंधर्व ।
सिद्धचारणादि सर्व । श्रीरामवैभव परिसत ॥३॥
श्रीराम माणूस नव्हे जाण । राम सर्वांतर्यामी पूर्ण ।
राम सर्वातीत सनातन । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥४॥
राम सकळलोककर्ता । राम ब्रह्मादिका पाळिता ।
राम काळाचा आकळिता । सकळांचे माथा श्रीराम ॥५॥
श्रीराम आदिहेतु उत्पत्ती । राम स्थितीची निजस्थिती ।
राम विश्रांतीची विश्रांती । गतीची गती श्रीराम ॥६॥
रामे बोलविल्या वेद बोले । रामे चालविल्या वायु चाले ।
रामे चाळिल्या प्राण चळे । जेणे रक्षिलें देहमात्र ॥७॥
रामे प्रकाशिला भास्कर । झाला सकळा प्रकाशकर ।
रामे निवविला हिमकर । निववी साचार सकळांसी ॥८॥
रामे धरिली धरा राहे । राम जीवना जीवविताहे ।
श्रीरामतेजे पावक पाहे । देदीप्त होय पाचनीं ॥९॥
रामे मोकलितां सावकाश । गगनी उदंड अवकाश ।
रामविस्मरणी अहंकारास । अति उल्लास देहबुद्धी ॥१०॥
राम इंद्राचा आदिइंद्र । राम नरेंद्राचा नरेंद्र ।
राम यमाचा संहारकर । ईश्वरा ईश्वर श्रीराम ॥११॥
श्रीरामे चेतविलें पाहे । चित्त चेतनेते धरिताहे ।
रामे अधिष्ठिला होये । बोध स्वये बुद्धीसीं ॥१२॥
श्रीरामप्रभावें अल्प । मनी स्फुरती संकल्प ।
त्या श्रीरामाचे स्वरुप । वाग्जल्प केंवी जल्पे ॥१३॥
श्रीराम रणी रणकल्लोळ । राम कृपाळुवां कृपाळ ।
राम दीनांचा दयाळ । प्रणतपाळ श्रीराम ॥१४॥
माझ्या उद्धारासाठीच श्रीराम वनांत आले :
देहदरिद्रें पीडतां । देखोन मज लंकानाथा ।
कृपा उपजली रघुनाथा । वना तत्वता तेणे आला ॥१५॥
छळोनियां कैकेयी माता । वना धाडिलें श्रीरघुनाथा ।
उद्धरावया लंकानाथा । वना तत्वता राम धाडी ॥१६॥
माझ्या उद्धारासाठीच परमगुरु वसिष्ठांनी रामांना सीतेसह धाडले :
श्रीरामाचा गुरु वसिष्ठ । तो माझा परम गुरु श्रेष्ठ ।
वसिष्ठें अनिष्टइष्ट । कळलें स्पष्ट आजि मज ॥१७॥
प्रबोधोनि सकळांसी । सवे दिधले जानकीसी ।
हे अद्यापि कोणासी । जनी जनासी लक्षेना ॥१८॥
उद्धारावया रावण । सद्गुरुसीं कळवळा पूर्ण ।
तेणे जानकीसी देऊन । रघुनंदन पाठविला ॥१९॥
श्रीरामाची निजशक्ती । सीता पतिव्रता महासती ।
अनुग्रहावया लंकापती । लंकेप्रती स्वये आली ॥२०॥
रावण बापुडे अति दीन । ते केंवी करी सीताहरण ।
स्वयेंचि येवोनि आपण । दशानन उद्धरिला ॥२१॥
जाणे स्वामीचें मनोगत । निरपराधें न करी घात ।
करोनि अपराधी लंकानाथ । श्रीरामे घात करू आली ॥२२॥
श्रीरामाची निजशक्ति सीता । सतीशिरोमणी पतिव्रता ।
विश्वाची ते विश्वमाता । लंकानाथा कळवळिली ॥२३॥
मिनधा कोप वरीवरी । माता कृपाळु अंतरी ।
कृपे कोपोनि रावणावरी । सहपरिवारी उद्धरिला ॥२४॥
श्रीरामाचा नव्हे बाण । सायुज्याचा मुळ्हारी पूर्ण ।
छेदूनि माझे दशवदन । विश्वमुख पूर्ण मज केले ॥२५॥
जितुके रामाचे पूर्णपण । तितुकी माझी व्याप्ति पूर्ण ।
लागता श्रीरामाचा बाण । एवढी स्थिति जाण मज आली ॥२६॥
अनंत ब्रह्मांडे ज्यामाजि जाण । तो मज माजी रघुनंदन ।
सगळा बुडाला आपण । एवढें पूर्णपण मज आले ॥२७॥
श्रीराम – रावण यांचि एकरुपता :
श्रीरामे वधिला रावण । की रावणे राम गिळिला पूर्ण ।
दोघांचेंही दोहीपण । हरपोनी पूर्ण श्रीराम झाले ॥२८॥
अवनी दहन जीवन जाण । पवनेंसहित गगन ।
श्रीरामाचे रामपण । स्वये रावण होऊन ठेला ॥२९॥
माझे रावणपण देख । राम झाला स्वये एक ।
त्रिसप्त चौदा लोक । लोकालोक तेथे कैंचे ॥३०॥
सकळ सुखांचें सोलीव सुख । स्वये श्रीराम सम्यक ।
त्याचाही प्रकाशक । रावण देख मी झालों ॥३१॥
चंद्रकिरणींचें अमृत । जेंवी सोमकांतें द्रवत ।
तेंवी श्रीरामसुख समस्त । माझेनि प्रगटत जगामाजी ॥३२॥
म्या विरोधिलें नाही श्रीरामासी । उद्धरावया सकळ कुळासी ।
हिरोनि आणिले जानकीसी । त्या भावार्थासी सांगेन ॥३३॥
जेथे जेथे अधिष्ठान । श्रीरामाचे संपूर्ण ।
त्याचे करोनि निरोधन । कुळउद्धरण म्या केले ॥३४॥
श्रीरामकृपा सनातन । देवांवरी आहे पूर्ण ।
म्हणोनिया निरोधन । केले आपण देवांचे ॥३५॥
सीता रामाची शक्ती । ते म्या आणिली याचि प्रीती ।
धांवोनि येईल रघुपती । देईल मुक्ती सकळांसी ॥३६॥
सीतेला ओलीस ठेविली म्हणून श्रीराम धावून आले व मी उद्धरलो :
आपुलें मागावया ठेवणे । वोल धरिती शाहणे ।
तैसे म्या केले रावणे । कोप झणें कोणी म्हणा ॥३७॥
उद्धरावया सकळ कुळासी । म्या ओली धरिली सीतेसी ।
त्या ओलीलागीं राघवासी । निजमानसीं कळवळा ॥३८॥
अति प्रीती श्रीरघुपती । ओल सोडवावया निश्चिती ।
येथे येवोनि शीघ्रगती । सकुळ लंकापती उद्धारिला ॥३९॥
लागता श्रीरामाचा बाण । चहू देहांसी त्रिपुटीचें भान ।
एकाएकी छेदून पूर्ण । चैतन्यघन मज केले ॥४०॥
श्रीरामाचा तो नव्हे शर । चैतन्याचा धांवणेकर ।
सकळ कुळेंसीं दशवक्त्र । केला चिन्मात्र निमेषार्धे ॥४१॥
दिवस मास न लागता । संधान आवेशें करिता ।
उडाली शून्याची शून्यवार्ता । चिदाभासता कोंदली ॥४२॥
हेत मात दृष्टांत । न रिघे ज्याचे शिंवेआंत ।
तो पूर्णब्रह्म रघुनाथ । सदोदित कोंदला ॥४३॥
न दिसे रामाचे रामपण । सौमित्रादि सुग्रीव सहसैन्य ।
सहसैन्य बुडाला रावण । चैतन्यघन कोंदला ॥४४॥
जेथे परतल्या श्रुती । उपनिषदे मौनावती ।
शास्त्रें थोंटावलीं ठाती । रघुपती देखता ॥४५॥
निजविश्वासें रावण । या रीती रघुनंदन ।
स्तवोनियां आपण । करी विनवण जिवलगा ॥४६॥
राग नीरागतां गच्छ द्वेष निर्देषतां भज ।
भवद्भ्यां सुचिरं कालमिह प्रकिडितं मया ॥१॥
रावणाची रागद्वेषादिकांची प्रार्थना :
रागदिक समुदायासी । माझे लोटांगण सकळांसी ।
विनवीत आहे तुम्हांसी । ते विनंतीसी परिसावे ॥४७॥
तुमचे संगतीस्तव जाण । तुमचेनि धर्मेकरुन ।
विविध भोग दारुण । म्या संपूर्ण भोगिले ॥४८॥
सज्जनांची ऐसी स्थिती । अवंचक मित्रकार्यार्थी ।
मज अनुग्रहिलें रघुपती । निजविश्रांती द्यावया ॥४९॥
माझे पुत्रपौत्रादि प्रधान । बंधुसहित सकळ सैन्य ।
मजहीआधीं माझे जन । श्रीरामे आपण उद्धरिले ॥५०॥
सकळ कुळा देवोनि मुक्ती । मजही उद्धराया निश्चिती ।
राम उभा रणाप्रती । म्हणोनि तुम्हाप्रती प्रार्थितों ॥५१॥
तुम्हांवगळा मोक्ष घेता । लागों पाहे वंचकता ।
म्हणोनिया तुम्हई आता । भजा रघुनाथा सर्वभावे ॥५२॥
विनवित असे कामासी । भजावे निष्काम रामासी ।
तेणे निजसुख पावसीं । अनायासीं श्रीरामे ॥५३॥
द्वेषा तुज लोटांगण । निर्द्वेष रघुनंदन ।
तुवा भजुनि अविच्छिन्न । पावावें कल्याण शांतीचे ॥५४॥
वासनादिकां समस्तांसी । माझे लोटांगण सर्वांसी ।
निर्वासना श्रीरामासी । अविकळतेसीं भजावे ॥५५॥
तेणे तुम्हा निजसुख । वेगे पावाल आवश्यक ।
यालागी मिळोनि सकळिक । रघुकुळटिळक भजावा ॥५६॥
कामक्रोधादिकांचे रावणास उत्तर :
ऐसे विनविता रावण । तंव हासिन्नले कामादिगण ।
तुझे तुज न कळे चिन्ह । श्रीरघुनंदननिजकृपा ॥५७॥
आमची वस्ती अंतरी । राम अंतर्यामी निर्धारी ।
तो पूर्वीच आम्हांवरी । अनुग्रह करी तुजहूनी ॥५८॥
पूर्वी सर्वभावेंशीं आम्ही । अनुसरलो राघवासी ।
तरीच श्रीरामे रावणा तुजसी । अति प्रीतीसी अंगीकारिले ॥५९॥
आम्ही अनुसरलों नसतां । कृपा तया रघुनाथा ।
नये नये गा सर्वथा । जाण तत्वता लंकेशा ॥६०॥
तू आमुचा निजसखा । तुझेनि धर्मे सकळिका ।
भेटी झाली रघुकुळटिळका । अनंत सुखा मेळविले ॥६१॥
ऐसे परस्परें येरयेर । कामादिक पै समग्र ।
आणि स्वये दशवक्त्र । येरयेर स्तविताती ॥६२॥
आपल्या आघाताने रावणाचा शिरच्छेद होईना म्हणून
रामबाण विस्मय पावला त्या बाणाला रावणाकडून समज :
तंव श्रीरामाचा निजबाण । करी शिरांचें छेदन ।
तरी पडेना दशानन । विस्मित बाण स्वये झाला ॥६३॥
देखोनि बाणाचा विस्मयो । रावण बोलतसे पहा हो ।
श्रीरामाचा पूर्णानुग्रहो । तुज स्वयमेवो कळेना ॥६४॥
श्रीरामामृतकूपिका । अखंड माझे हृदयी देखा ।
ते प्रसवत असे मुखां । तुझा आवांका तो किती ॥६५॥
प्रकाशावया निजमहिमान । शिरे प्रसवत रघुनंदन ।
लाजली तुझी आंगवन । नामामृत जाण अनिवार ॥६६॥
निग्रहो द्यावा तुम्हांसी । राम प्रसवत शिरांसी ।
अद्यापि न कळे तुम्हांसी । जरी अहर्निशी जिवलग ॥ ६७
रामनाममहिमा ऐकून रामबाण लज्जित झाला :
ऐकोनि रावणाचे वचन । लाजा संकोचला बाण ।
अलोट नामाचे महिमान । माझी आंगवण ते किती ॥६८॥
अहर्निशी जवळी असता । श्रीराममहिमा तत्वता ।
न कळे न कळे सर्वथा । आलो वृथा संसारा ॥६९॥
गुळामाजील दगड । सर्वांगी दिसे जैसा गोड ।
परिपाकी दावी निवाड । अति अवघड कठिनत्वें ॥७०॥
श्रीरामाचे निजभातां । आम्ही अहर्निशी जवळी असता ।
श्रीराम न कळे तत्वता । काय आता वल्गेजों ॥७१॥
श्रीरामवैभव नेणोन । स्वये थोटावला बाण ।
क्षीण माझी आंगवण । करू कंदन राहिला ॥७२॥
ते पाहून रावणाकडून रामबाणाला वंदन व त्याची स्तुती :
ते देखोनि दशानन । नमिता झाला श्रीरामबाण ।
तुझेनि धर्में आम्हा जाण । वैभवज्ञान रामाचे ॥७३॥
कंठी लागता तुझा घावो । हृदयी झाला आविर्भावो ।
सर्वसाक्षी श्रीरामरावो । अद्वितीय अखंड ॥७४॥
अद्वितीय श्रीरघुनाथ । ऐसा बाणला इत्यर्थ ।
तेचि नाममृतकूपिका येथ । शिरे अनंत प्रसवती ॥७५॥
एकदेशी परिच्छिन्न । होतो करंटा दशवदन ।
तो सर्वगत सनातन । श्रीरघुनंदन स्वये झालों ॥७६॥
तरी सज्जनांचा ऐसा महिमा । भेतलिया उत्तमाधमां ।
उडवोनि द्वंद्वंधर्मा । निजधामा पावविती ॥७७॥
चोरटा वाल्मीक तत्वता । नारद भेटला अवचितां ।
निरसोनि मागील दुरिता । पावविलों श्रीरघुनाथ । कृतकृत्य करुनी ॥७९॥
परस्परें दोघे जण । येरयेरांचे करिता स्तवन ।
शब्दासी उपरती होऊन पूर्ण । समाधान पावले ॥८०॥
उपरती होवोनि शब्दांसी । स्मरता श्रीरामस्वरुपासी ।
बाहेर देहाची दशा कैसी । न कळतां भूमींसीं उलंडले ॥८१॥
रावणाची पंचमहाभूतें । मिनलीं भूतात्म्या श्रीरामाते ।
इंद्रियचेष्टाही तेथे । चिन्मूर्तीतें विनटल्या ॥८२॥
स शरो रावणं हत्वा रुधिरार्द्रमुखच्छविः ।
भृत्यवत्कर्मणि कृते स तूणं पुनरागतः ॥२॥
रावणाचा शिरच्छेद करुन तो बाण पुनः रामांच्या भात्यात शिरला :
भूमीवरी पडता रावण । आनंदमय झाला बान ।
कार्य साधिले संपूर्ण । नमून रघुनंदन भातां रिघे ॥८३॥
जेंवी इतर सेवक । स्वामिकार्य साधूनि देख ।
स्वये परते एकाएक । विजयसुख सांगत ॥८४॥
जैसी स्वामीची आज्ञा होती । कार्य साधिले त्याच रीती ।
ऐसे सांगोनि स्वामीप्रती । धरी उन्नती निजगर्वे ॥८५॥
तैसा नव्हे श्रीरामबाण । अजय त्रैलोक्यी रावण ।
त्याचे करोनि निर्दळण । अणुही जाण गर्व नाही ॥८६॥
मौनेंचिकरीं श्रीरामासी । बाणे नमोनि वेगेंसी ।
जाणोनि स्वामीच्या वैभवासी । रिघे पाठीसी भात्यांत ॥८७॥
लौकिकी प्रथा ऐसी । जे वधावया रावणासी ।
प्रसन्न करोनि सूर्यासी । रामे दशवक्त्रासी निवटिले ॥८८॥
ज्याचेनि तेजे रविशशी । प्रकाशरुप जगासीं ।
तो शरण जाईल आणिकासीं । कदा काळेंसीं घडेना ॥८९॥
प्रचंड रावण रणभूमीवर कोसळला :
भूमीं पडता दशकंठ । प्रवाहे रुधिराचा लोट ।
चिडाणी झाली उद्भट । झाला शेवट युद्धाचा ॥९०॥
द्रुम शिखरेंसहित । जेंवी उलंडे पर्वत ।
तेंवी पडला लंकानाथ । अति विख्यात पुरुषार्थी ॥९१॥
भूमीं पडता रावण । दणाणिलें त्रिभुवन ।
कैलास झाला आंदोलायमान । सत्यलोक पूर्ण डळमळिला ॥९२॥
विसां खांदियांचें दिंड । झाड उन्मूळिलें वितंड ।
तेंवी वीसही बाहु प्रचंड । रावण उदंड उलंडला ॥९३॥
सुवर्णबंदी कार्मुक । भूमीं लोळत असे देख ।
बाण पडिले रुक्मपुंख । शस्त्रे अनेक लोळती ॥९४॥
रत्नजडित मुकुट । भूमीं लोळत तेजिष्ठ ।
रणी पडला लखलखाट । जडित उद्भट भूषणे ॥९५॥
रणभूमीवरील विदारक दृश्य :
महावीर रणकर्कश । रनयोद्धे अति दुर्धर्ष ।
रणी पडले बहुवस । मोकळे केश लोळती ॥९६॥
बाहु लोळती सांगद । मस्तकें मुकुटेंसीं विविध ।
करचरणहित कबंध । रणी बहुविध लोळती ॥९७॥
कोटी सैन्य रणी पडत । तै एक कबंध उठत ।
ऐसी बंधें अनंत । सैरा रणांत धांवती ॥९८॥
असंख्य सैन्य पडिले रणी । रत्नखचित मुकुटाभरणीं ।
तेथे पातल्या पक्षिश्रेणी । विचित्र ध्वनी बोलत ॥९९॥
मांसभक्षणार्थ पशु-पक्ष्यांचे व भूतादिकांसह
कात्यायनी चामुंडा व कंकाळीचे आगमन :
घार गीध श्येन काक । गोमायु पातले असंख्य ।
मांशभक्षणीं अति हरिख । रणी सकळिक मानिती ॥१००॥
भूते पातली तत्क्षणीं । नव कोटी कात्यायनी ।
छपन्न कोटी दळ घेऊनी । चामुंडायणी पातली ॥१॥
औट कोटी भूतावळी । घेवोनि आली कंकाळी ।
नाचो लागलीं गोंधळीं । मांस सकळीं सेवावया ॥२॥
सेवावया मांस रुधिर । येरापुढें धांवे येर ।
दुजे म्हणती परतें सर । हावें फार भरलीस ॥३॥
एक म्हणती आलो पहिलें । दुजा म्हणे नवल झाले ।
शेंतीं रावण ठेविले । त्यासी काय आले धणीपण ॥४॥
पहिलें होतासी राखण । तरी भाते घे पा मोजून ।
अमूप घ्यावया आंगवण । सर्वथा जाण तुज नाही ॥५॥
बळे घेऊ जाय आवेशी । दुजा त्याते सुबद्ध धुमसी ।
बोंब सुटली रणभूमीसी । कलह भूतांसीं लागला ॥६॥
सर्व भूतांचे भांडण चामुंडेनें सोडवून श्रीराम महिमा त्यांना कथन केला :
सकळा श्रेष्ठ चामुंडायणी । तिणें देखोनि झोंटधरणी ।
सकळा समीप बोलावूनी । पुसे भांडणीं काय काज ॥७॥
तेही सांगती वृत्तांत । येरी खदकदां हासत ।
तुमचा कलह समस्त । लागला येथ तोडावा ॥८॥
श्रीराम रणामाझारी । पीक आलेंसे घुमरी ।
तुम्हांसीं भांडण परस्परीं । भक्षावारी लागले ॥९॥
पूर्विले वेळे हनुमंते । विभागून यथार्थे ।
समजावोनि सकळांते । केली भूते पै तृप्त ॥११०॥
त्याहूनि आता येथे । तृप्ती होईल सकळांतें ।
संदेह न धरावा चित्ते । श्रीराम रणातें पावूनी ॥११॥
नाम स्मरतां रघुनाथ । महापापी उद्धरत ।
तो संमुख असता रणाआंत । कोण अतृप्त राहू शके ॥१२॥
ज्याचे दासाचेनि सामर्थ्ये । तृप्ती झाली सकळ भूतांतें ।
तो श्रीराम असता येथे । केंवी अतृप्तें रहाल ॥१३॥
सहिष्णुर्विजयी भवेत् । ऐसे श्रुतिशास्त्र गर्जत ।
त्वरा न कारावी तुम्ही येथ । तृप्ति अद्भुत पावाल ॥१४॥
ऐसे चंडेश्वरी बोलता । आनंद झाला सकळ भूतां ।
कलह सांडून परता । भाग तत्वता वांछिती ॥१५॥
श्रीरामाज्ञेने रामबाणाने सर्व मांसाची वांटणी केली :
श्रीराम नेटका विंदानी । आज्ञापिले बाणालागूनी ।
आदरिली भागवांटणी । सावधानीं अवधारा ॥१६॥
श्रीरामबाण तो मापारी । नरकपाल कुडवेंकरी ।
मविता झाला अति कुसरी । खळेकरी भैरव ॥१७॥
छप्पन्न कोटी भुतावळी । घेऊन आली भद्रकाळी ।
मानिली भूजगणी सकळी । स्वामिणी भली राजभागा ॥१८॥
नवकोटी सैन्यासमवेत । कात्यायनी पातली तेथ ।
प्रजाभाग पै समस्त । हातोहात तिणें नेला ॥१९॥
सैन्य घेवोनि औटकोडी । चामुंडा आली लवडसवडी ।
शेषतळा उडाउडीं । अति तांतडी घेऊनि गेली ॥१२०॥
निजसमुदायासकट । झाली कंकाळी प्रकट ।
पाडेवरीचे जे पाट । तेणे उद्भट सुखावली ॥२१॥
बलुते काढिले उभेरासी । मेसको घेवोनि गेली त्यासी ।
सुखावोनि निजमानसी । श्रीरामासी ओवाळिती ॥२२॥
मेसकोची निजदासी । ते मारको आली आवेशी ।
खळे मातेरें देवोनि तिसी । अति प्रीतीसी समजावी ॥२३॥
पाडव आणि मापारी । कराळी त्याते अंगीकारी ।
श्रीरामबाण जो मापारी । आपण करी दास्य त्याचे ॥२४॥
भैरव वेताळ दोन्ही । देव ब्राह्मण त्यांलागूनी ।
देवोनि अति सन्मानी । रणांगणी सुखी केले ॥२५॥
पिराणा आणि फकिराणा । मैळिमुकीलागोनि जाणा ।
देवोनियां अति सन्माना । रणामाजी गौरविली ॥२६॥
रणामाजीं समस्ते । बाणे समजाविलीं भूते ।
संतोष मानोनि चित्ते । निजभागातें पै घेती ॥२७॥
शरीरभागांची विभागणी :
मुख्य काळीज तो राजभाग । काळिका घेवोनि गेली सांग ।
मज्जा जो का प्रजाभाग । कात्यायनी सवेग घेऊन गेली ॥२८॥
मांगभाग चामुंडेसी । रुधिर ते कंकळीसी ।
मेद दिधले मेसकोसी । अस्थि मारकोसी पै देखा ॥२९॥
भाग वांटिती ते वेळे । मागत्याचे मिळती पाळे ।
म्हणोनि धर्मालागीं वहिले । शिर काढिले पै देखा ॥१३०॥
धर्मार्थ सार अर्पिती । ते उभयलोकीं सुख भोगिती ।
यालागी उत्तमांगें निश्चिती । धर्माप्रती अर्पिलीं ॥३१॥
तेणे भैरव वेताळ । दोघे पावले सुखकल्लोळ ।
त्वचा काढिली जे सकळ । ते नेली तत्काळ मैळ्यामुक्या ॥३२॥
खंकाळें जे आणिकीं भूते । निःशेष विसरोनि रामातें ।
सैरा धांवती खाकातें । विषयभोगातें वांछूनि ॥३३॥
त्यांचे तृप्तिलागीं देख । लिंग काढून देती एक ।
तेणेचि करोनि तृप्तिसुख । तेंही अशेख मानिलें ॥३४॥
एवं सकळा निजतृप्तीं । श्रीरामबाणें निश्चिती ।
करोनिया शीघ्रगती । रणी समस्ती गौरविले ॥३५॥
तेणे सुखावलीं समग्र । होवोनिया आल्हादपर ।
परस्परें पाहुणेर । अत्यादर मांडिला ॥३६॥
देखतांचि श्रीरघुनाथ । आनंद कांदला बहुत ।
कलह तुटला समस्त । सुख अद्भुत उलथले ॥३७॥
पहिलीं झालीं जी भांडणें । ती विसरावयाकारणें ।
घालिती येरयेरा जेवणें । देती वाणे परस्परें ॥३८॥
अत्यंत होवोनियां नम्र । परस्परें अत्यादर ।
भोजन मांडिलें एकत्र । मांसरुधिरसमरसीं ॥३९॥
महावीरांचा रणमद । तेंचि भोजनी घेती मद्य ।
मांस भक्षिती विविध । अति आल्हाद मांडिला ॥१४०॥
मेद आणि मद्यमांस । आवडी सेविता सावकाश ।
आनंद चढला भूतांस । रणभूमीसी नाचती ॥४१॥
विश्वजननी सीता सती । धरोनि आणिली लंकापतीं ।
ते सुटावया निश्चिती । नवसी होती नवसिले ॥४२॥
तो दुरात्मा रावण । श्रीरामबाणेंकरुन ।
वधिला न लागता क्षण । आनंद पूर्ण तेणे त्यांसी ॥४३॥
सिद्धी पावले नवस । तेणे आनंद भूतांस ।
मिळोनिया रणभूमीस । निज नवस उजविती॥४४॥
आदिशक्ति सीता सती । तीलगीं सकळही भूतीं ।
मिळोनिया रणाप्रती । गोंधळ घातला स्वानंदे ॥४५॥
काळी कराळी कंकाळी । मारको मेसको भद्रकाळी ।
हरिखें लंकेच्या पाबळीं । गोंधळ सकळीं मांडिला ॥४६॥
काहळा भोंवळा मांदळ । गिडबिडीं गुजबुजीं टाळ ।
सूक्ष्म वाद्यें चिनकाहळ । तुरे बंभाळ वाजविलीं ॥४७॥
रणी यक्षिणी निजवेशीं । विसरोनि देहभावासी ।
नाचो लागलीं उल्लासीं । अति प्रीतीसी स्वानंदें॥४८॥
मेद मांस रुधिर । प्रीती वांटिती येरा येर ।
उन्मत्त झाली अपार । करिती गजर आल्हादे ॥४९॥
तृप्ति झाली रणभूमीसी । तेणे आनंद भूतांसी ।
स्तविते झाले श्रीरामासी । निजगजरेंसी अति प्रीती ॥१५०॥
दुर्जय जो त्रैलोक्यासी । जेणे निग्रहिले देवांसी ।
त्या निवटिले रावणासी । श्रीरामे ऐसी ख्याती केली ॥५१॥
जन्मादारभ्य आजिवरी । सकळ भूतां एकसरी ।
तृप्तिदाता संसारी । कोणी धरेवरी नव्हताचि ॥५२॥
ती आजि श्रीरघुनाथे । तृप्त केली सकळ भूते ।
म्हणोनि गोंधळ ये रणभूमीते । सावचित्तें माजविला ॥५३॥
तरी नवल नाही याचे । राम जीवन जगाचें ।
पाळण करावे सृष्टीचें । हेंचि श्रीरामाचे निजव्रत ॥५४॥
राम विश्वाचा विश्वात्मा । राम जीवाचा जीवात्मा ।
राम पराचा परमात्मा । राम परमात्मा निजाचा ॥५५॥
ऐसे करिता स्तवन । उडालें भूतांचे भूतपण ।
अवघी झालीं चैतन्यघन । श्रीरघुनंदननिजकृपा ॥५६॥
वधोनिया अहंरावण । विजयी झाला रघुनंदन ।
एका जनार्दना शरण । सुखसमाधान श्रीरामे ॥१५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणवधो नाम त्रिषष्टिमोऽध्याय : ॥६३॥
ओंव्या ॥१५७॥ श्लोक ॥२॥ एवं ॥१५९॥
