सज्जन तो शब्द सत्य ज
1799.
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकासी ॥१॥
एक गुण तो केला दो ठायी । ज्याचा त्यास पाही जैसा तैसा ॥धृपद॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाही ॥३॥
जातिवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित ते अनहित केले कैसे । तुका म्हणे पिसे लागले यासी ॥५॥
अर्थ :
जो वेद-शास्र-पुराणे व संत यांचे शब्द प्रमाण मानतो त्याला ' सज्जन ' म्हणावे ; आणि जो दुस-याला पीडा देतो त्याला दुर्जन म्हणावे. मुळात एकच सामान्य गुण असतो ; पण तो दोन ठिकाणी विभागला गेला, म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो विशेषत्वाला प्राप्त होऊन त्याच्या हिताला किंवा अनहिताला कारण होतो. जो सात्त्विक आहे, तो दुस-याशी परिमित व सत्य बोलतो, आणि जो वाचाळ आहे, तो आपल्या वाणीने खोटे बोलतो. ज्याच्याकडून परमार्थ घडतो तो चांगला आणि जो नाठाळ असतो त्याला कोणाची दया येत नाही. जो शुध्द जातीचा व शहाणा असतो, तो आपला अधिकार ओळखून मर्यादेने वागतो ; आणि जो अधम आहे, तो आपला अधिकार न जाणता खुंटाप्रमाणे ताठ असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे सद्गुणाने आणि दुर्गुणाने मनुष्याचे अनुक्रमे हित व अनहित होत असते. या मनुष्यदेहात सद्गुणाने हित होणे शक्य असूनही काही लोकांनी दुर्गुणाने अनहित का केले ? या उत्तरने त्यांना वेड लागले आहे.
